My Followers

Tuesday 31 July 2012

क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...!!!

क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...!!!
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व अनामिकच राहीले. असेच एक क्रांतिकारक आहेत वीर लहूजी वस्ताद साळवे. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ साली पुरंदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावी जन्मलेल्या लहूजींच्या घराण्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे.लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे (राऊत) व आईचे नाव विठाबाई होते. 
      हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांनी लहूजी साळवेंच्या खापर पंजोबांना पुरंदर किल्ला रक्षणाची जबाबदारी दिली होती. या ऐतिहासिक घराण्यात लहूंजींचा जन्म झाला. शिवकालखंडानंतर लहूजींच्या पणजोबांना पुरंदर किल्ला सोडावा लागला. पुढे दुसर्‍या बाजीराव पेशव्यांच्या काळात लहूंजीचे वडील राघोजी यांनी पुरंदर परिसरात जिवंत वाघ पकडला ही बातमी दुसर्‍या बाजीरावांना समजली. त्यांनी लहूजींच्या वडीलांना बोलवून आपल्या शिकारखाना व शस्त्रागारप्रमूखपदी नेमले. राघोजी साळवे शस्त्रास्त्रनिपुण, शरीरयष्टीने वाघासारखे बलवान होते. लहुजींचे पूर्वज आपल्या शूरवीरतेमुळे पराक्रमी घराणे म्हणून ओळखले जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. त्यामुळे शिवरायांनी आपल्या कार्यकाळात लहुजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोपविल्या होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘राऊत’ या पदवीने गौरविले होते.
   लहुजींचे घराणे शूरवीर, लढवय्ये असल्यामुळे राघोजींनी आपल्या लहुजीलादेखील एक वीर योद्धा बनविण्याच्या उद्देशाने लहानपणापासूनच शस्त्रांची, युद्धकलेची तालीम दिली. त्यामुळे लहुजी दांडपट्टा फिरविणे, घोड्यावर स्वारी, भालाफेक, बंदूक चालविणे, तोफगोळे फेकणे, गमिनी काव्याने शत्रूला मात देणे, शत्रूंची गुप्त माहिती मिळविणे आदी युद्धकलांत तरबेज व पारंगत होते. 
     खडकी येथे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत  भयानक युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व सळसळत्या तरुण रक्ताच्या २३ वर्षे वयाच्या लहुजी साळवेंनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. राघोजी साळवे या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोर शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. हिंदवी स्वराज्याचे निशाण शनवारवाड्यावरून हटवून इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.
   स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दु:खातून सावरले. या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणी लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी (थडगे) उभारली. ही समाधी अजूनही ‘वाकडेवाडी’ येथे आहे.
    आपल्या शूरवीर वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांना शिकस्त देण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्ध कलाकौशल्याचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी १८८२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर, सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हेदेखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.
       साताराचे छत्रपती प्रतापसिंह यांना १८३९ मध्ये ब्रिटीश सरकारने पदच्युत केले. यांचा वचपा काढण्यासाठी नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांनी उत्तरेत तर रंगोबापू यांनी लहूजींच्या मदतीने सातार्‍यात ब्रिटीशांविरुध्द बंड करण्याचे ठरविले. १२ जून १८५७ ही तारीखही बंडासाठी निश्चित करण्यात आली. मात्र हा कट उधळला गेला. लहूजींचे ३०-३५ क्रांतिकारक ब्रिटीशांनी पकडले. उरलेल्या सैनिकांनी चिडून पुरंदरच्या मामलेदाराला ठार मारले. यामुळे ४ ऑगस्ट १८५७ रोजी कनय्या मांग, धर्मा मांग यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. हे दोघेही लहूजींचे सैनिक होते. तसेच बाकीच्या साथीदारांना फाशी देण्यात आली. ब्रिटीशांना या सर्व बंडकारांना लहूजींकडूनच प्रशिक्षण मिळत असावे असा संशय आल्याने लहूजींनी पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी पुणे सोडले. लहूजी बैराग्याच्या वेशात, तर त्यांचे सैनिक पोतराज, फकीर, ज्योतिषी बनले. व पोलिस चौकीसमोर बसून हालहवाल देऊ लागले. पुण्याबाहेर पडल्यानंतर लहूजींनी कृष्णाखोरे, वारणा खोरे, पालीचा डोंगर , सातारा, पन्हाळा या दुर्गम भागात प्रशिक्षण केंद्रे उभारली. लहूजींना फिरंग्याची राजवट उलटून टाकलेली पाहायचे होते. 
        १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये आपल्या मायभूमीसाठी आजन्म व्रत स्वीकारलेल्या लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला.
    महापुरुष, समाजसुधारकांना घडविणारे लहुजी साळवे मात्र स्वत: उपेक्षितच राहिले. एखादी महान व्यक्ती देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:चे सर्वस्व अर्पण करते. मात्र ती व्यक्ती प्रसिद्धीपासून वंचित राहते. अशा महान व्यक्तीची जयंती व पुण्यतिथी कधी होऊन जाते हे लक्षातही येत नाही. आपले संपूर्ण आयुष्य खर्चून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढवय्यांची संघटना लहुजींनी उभी केली होती. 1857 च्या स्वातंत्र्य लढय़ात त्यांनीच प्रशिक्षित केलेले तरुण अधिक होते. त्यांच्या या महान कार्याला तोड नाही. अशा या थोर क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद या कट्टर राष्ट्रभक्ताला कोटी कोटी प्रणाम!

अँड. राज जाधव...!!!
संदर्भ - चंद्रकांत मुगले, शिवशंकर ताकतोडे यांचे लेख, विविध वर्तमान पत्रातील मी वाचलेले लेख ) 

कार्यकर्ता बदनाम हुआ "अण्णाजी" तेरे लिये...!!!

कार्यकर्ता बदनाम हुआ "अण्णाजी" तेरे लिये...!!!  
   भ्रष्टाचारविरोधी प्रभावी जनलोकपाल विधेयकासाठी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेले चार दिवस चाललेल्या टीम अण्णाच्या उपोषणाला केंद्र सरकारने दाद न दिल्याने अखेर अण्णा हजारे स्वत: रविवारपासून मैदानात उतरले आहेत. रविवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून अण्णांनी आपले बेमुदत उपोषण सुरू केले. जनलोकपाल विधेयक लवकर संमत करावे, केंद्र सरकारमधील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या १५ मंत्र्यांवर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी टीम अण्णा २५ जुलैपासून जंतर-मंतर येथे आंदोलन करत आहे. त्याला सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने रविवारपासून अण्णांनी यापूर्वी इशारा दिल्याप्रमाणे उपोषण सुरू केले. प्राण गेला तरी बेहत्तर, पण आता माघार नाही, अशा शब्दांत अण्णांनी आपला निर्धार व्यक्त केला.  
    अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने पुकारलेल्या आंदोलनाला थंड प्रतिसाद मिळतोय. गेल्या वर्षी याच जंतरमंतरवर अण्णांनी लोकपालची लढाई सुरु केली होती. त्यांच्या यावेळच्या आंदोलनाला मात्र तुलनेने अत्यंत कमी प्रतिसाद मिळतोय. त्यातच बाबा रामदेव यांनीही आज य़ा आंदोलन ठिकाणी येण्याचं टाळलंय.
    सशक्त लोकपाल आणि केंद्र सरकारमधील 15 भ्रष्ट मंत्र्यांच्याविरोधात कारवाईच्या मागणीसाठी टीम अण्णाने मोठा गाजावाजा करत दिल्लीच्या जंतरमंतरवर उपोषणं सुरु केलं खरं. बुधवारी आंदोलनस्थळी ब-यापैकी गर्दी होती. मात्र गुरुवारी दिल्लीकरांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय. जंतरमंतरवर आंदोलनाला कमी प्रतिसाद मिळाल्याचं दिसतंय. जी काही गर्दी आहेत, त्यात ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या संस्थेचे कार्यकर्तेच मोठ्या संख्येनं होतं..

    गल्लीपासून दिल्ली पर्यंत गोर्‍या गोमट्या, साजूक तुपात वरण भात खाणार्‍या, फाडफाड इंग्रजी बोलणार्‍या, कॉर्पोरेट जगतात सहजपण वावरणारे, आऊटसोर्सड जॉब्स मध्ये  गलेलठ्ठ पगार कमावणारे, द्विपदवीधर, अंगाखाद्यांने निरोगी, डोळ्यांनी सतेज, वाणीने चलाख, बुद्धीने तल्लख असलेले मेणबत्ती वाहक ऊर्फ मेणबत्ती संप्रदायातले तरुण अण्णांच्या समर्थनार्थ दंड थोपडून उभे राहीलेत. आयपीएल च्या चीअरगर्ल्स प्रमाणे चिअरमेल्स किंवा चिअरबॉय बनून सगळ्यांना चिअर करत आहेत. 
पण या आंदोलनात काळ्या- बेंद्र्या चेहर्‍याचे, हाडाचा कडीपत्ता झालेले माथाडी कामगार, सडपातळ झालेले कृमीसदृश शेतकरी वर्ग, शहरात म्यूनिसीपल कॉर्पोरेशनसाठी कचरा उचलणारे, घरकाम करणार्‍या आमच्या आया-भगिनी, सफाई कामगार, फेरिवाले, नाक्यानाक्यावर गाड्या लावणारे, क्लास ३ आणि क्लाय ४ ची कामे करणारे, सारे शिक्षक, प्राध्यापक, गांडूबगीचा आणि गोलपिठ्यातल्या भगिनी, स्वस्त अत्तराच्या दर्पात काम करणारे तरूण, भाज्या घ्यायला परवडत नाही म्हणून दिवसआड मनात नसतानाही गुडसे ठोकणारे, गावकुसाबाहेरचे हेतूपुरस्सर दूर्लक्षित राहीलेले चेहरे ज्यांना मी खरा भारत समजतो ते ह्यात कुठेच दिसले नाहीत आणि दिसतही नाही आहेत. मग ह्या आंदोलनाला मी किंवा तुम्ही कोणत्या अर्थाने राष्ट्रीय आंदोलन म्हणावे ?
     गेले चार दिवस दिल्लीतील जनतेकडूनही टीम अण्णाला थंडा प्रतिसाद मिळत होता. रविवारी अण्णांनी उपोषण सुरू केल्यानंतर मात्र त्यात फरक पडून ब-या प्रमाणात गर्दी गोळा झाली. बाबा रामदेव आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी रविवारी एका व्यासपीठावर आल्याबद्दल टीम अण्णाने आपली नाराजी स्पष्ट शब्दांत नोंदवली होती. सोमवारी मात्र टीम अण्णाने घुमजाव केले. कोणालाही भेटण्यास रामदेव मुक्त आहेत. त्यांच्या मोदीभेटीविषयी आमची तक्रार नाही. लोकपाल विधेयकासाठी आम्हीही सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्याच होत्या ', अशी सारवासारव कुमार विश्वास यांनी केली. दरम्यान केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या घरासमोर काही अण्णासमर्थकांनी निदर्शने केली. 
             प्रसारमाध्यमांतून अण्णांच्या आंदोलनास लोकांची गर्दी जमत नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर टीम अण्णांचेअनेक कार्यकर्ते दुखावले गेले अण्णांच्या आंदोलनास मीडिया चूकीच्या पद्धतीने देशास दाखवते आहे, असे आरोपकरत काही कार्यकर्त्यांनी मीडियाविरोधात घोषणा देत मीडिया कर्मचा यांना सोमवारी धक्काबुक्की केली होती .तसेच एका पोस्टरवर काही कुत्र्यांच्या गळ्यात मीडियाच्या पाट्या दाखवण्यात आल्या आणि त्याची दोरी सोनियागांधी यांच्या हातात असल्याचे दाखवले होते या सर्व प्रकारावर मीडियाकडून नाराजी व्यक्त कऱण्यात आली होतीतसेच ब्रॉडकास्ट एडिटर्स असोसिएशनकडून टीम अण्णांना एक पत्रही पाठवण्यात आले होते टीम अण्णांच्यासदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या या कृत्यावर आम्ही नाराज आहोत आणि या सर्व प्रकराबद्दल त्यांनी जाहीरमाफी मागावी असे या पत्रात म्हटले होते त्यानुसार आज ११च्या सुमारास अण्णा आणि अरविंद केजरीवालयांनी मीडिया कर्मचा यांची जाहीर माफ मागितली या प्रसंगी बोलताना, आंदोलनात मीडियाची अथवा अन्य कोणाचाही बदनामी पुन्हा केल्यास आंदोलन मागे घेण्यात येईल असा स्पष्ट इशाराही अण्णांनी यावेळी दिला 
            प्रसारमाध्यमं हा लोकशाहीचा चौथा आणि अतिशयमहत्वाचा स्तंभ आहे त्यांच्या विरोधात जर कुणी कृत्य केलेकिंवा आंदोलनाला हिंसक बनवण्याचा कुणी प्रयत्न केला तर हेआंदोलन मागे घेतले जाईल अशा इशारा ज्येष्ठ समाजसेवकअण्णा हजारे यांनी आज दिल्लीतील जंतरमंतर येथून दिला .टीम अण्णांच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरमधून मीडियाला कुत्राअसे संबोधले होते त्यानंतर अण्णांनी हा माफीनामा सादरकेला     
          प्रसार माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते. परंतु मागच्या वर्षी या चौथ्या स्तंभाला "अण्णाजी" नामक कावीळ झाला होता. तो आता बरा झालेला दिसतोय त्यामुळे "जंतरमंतर वरची गर्दी छु मंतर"  हि खरी परिस्थिती दाखवत आहेत. परंतु हे अण्णा समर्थकांना अमान्य झाल्यामुळे त्यांनी प्रसारमाध्यमांच्या   प्रतिनिधीवर हल्लाबोल केला. तसेच टीम अण्णा चे सदस्य प्रशांत भूषण यानी देखील  प्रसारमाध्यमांवर कडाडून टीका केली.   "टीमअण्णा"  नावाचा ज्वर उतरला असला  तरीही काही प्रमाणात  सामान्य  कार्यकर्ते अहिंसेच्या नावाखाली हिंसात्मक आंदोलन करून बदनाम होत आहेत... या सामान्य जनतेच्या भविष्याशी हा खेळ खेळणे टीम  अण्णा कधी बंद करेल ?

जनलोकपाल आंदोलनामागील 'मेंटल मॉडेल्स'...!!!
                            
         प्रस्थापित राज्यव्यवस्था भ्रष्टाचाराचे संकट टाळण्यास असमर्थ आहे, असे दिसून आल्याने अण्णा हजारे यांच्यावर अवतार-संकल्पनेचा प्रभाव पडला. मेंटल मॉडेल्सचा प्रभाव असलेल्या जनतेला तो भावनात्मकदृष्ट्या पटला. त्यातून शोध सुरू झाला आणि जनलोकपालाचा जन्म झाला. 
       सिव्हिल सोसायटी म्हणविणारी टीम अण्णा म्हणजे सर्व भारतीय जनता नव्हे; अण्णांची मागणी घटनाविरोधी आहे; येणारा लोकपाल भ्रष्ट निघाला तर त्याच्यावर नियंत्रण कोण ठेवणार?,' अशा मुद्यांचा अण्णा हजारेंना पाठिंबा देणाऱ्यांवर परिणाम झाला नाही. पाठिंबा देणाऱ्या अनेक तरुणांना व महाराष्ट्रातील कार्यर्कत्यांना मी भेटलो; पण जनलोकपाल कशा प्रकारे भ्रष्टाचार नष्ट करणार याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. येणारा जनलोकपाल हा आणखी एक स्वाथीर् बाबू नाही तर विकासविरोधी भस्मासूर म्हणून जन्मास येणार आहे, अशी भूमिका घेऊन मी जनलोकपालाला जाहीर विरोध केला होता. 
         खरी भारतीय मूल्ये खेड्यात संवधिर्त होतात व पाळली जातात, तसेच भावनाही बळावल्या जातात असे म्हणतात. अण्णा व त्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांवर जनलोकपालाची पडलेली भुरळ भावनेवर आधारित आहे, ज्ञानावर नव्हे. जनलोकपालाची कल्पना अण्णांना आवडण्या-मागे त्यांची खेडेगावात झालेली जडणघडण कारणीभूत आहे. जनलोकपाल हे मूळ भारतीय मॉडेल नव्हे. 'ऑम्बुड्समन' म्हणजे जनतेच्या तक्रारी ऐकणारा शासकीय अधिकारी, हे पद इतर देशांत आहे. अण्णांनी हे मॉडेल भारतासाठी का निवडले, हे समजून घेण्यासाठी अण्णा व त्यांच्या टीमवर कर्मकांडातून होत असलेले संस्कार समजून घेतले पाहिजेत. अण्णा आणि माझे खेडे यात ७० कि.मी. व आमच्या वयात १२ वर्षांपेक्षा कमी अंतर आहे. दोन्ही खेड्यांतील सांस्कृतिक, धामिर्क, राजकीय परिस्थितीत फार फरक नाही. खेड्यात घातल्या जाणाऱ्या सत्यनारायण पूजेनंतरचा चिमूटभर प्रसाद आणि चमचाभर तीर्थ यांचे आम्हाला बालपणी आकर्षण असे. पुढे आकर्षण वाढले ते सत्यनारायणाच्या कथेचे. साधू नावाच्या एका वाण्याने मूल व्हावे म्हणून सत्यनारायण व्रत घालण्याचा नवस केला. कलावती नावाची मुलगी झाली. पुढे कलावतीचा नवरा व्यापारासाठी परदेशी गेला असता चोर म्हणून पकडला गेला व मोहरांनी भरलेले त्याचे जहाज बुडाले; कारण साधू वाण्याने व्रत पूर्ण केले नव्हते. कलावतीने सत्यनारायण पूजा घातल्याने जहाज व नवरा परत मिळाले. सत्यनारायणाच्या कथेने आमचे बालपण, किशोरावस्था आणि तरुणपण प्रभावीत करून टाकले होते. 

          जेव्हा सृष्टीत उपदव सुरू होतात, विनाशाची प्रक्रिया वाढू लागते व मानव समाजाच्या धर्माची घडी विस्कटते तेव्हा तो विनाश थांबविणे, ती घडी पुन्हा नीट बसविणे, मानवसमाजाला धर्ममार्गा-वर आणणे, यासाठी भगवंत युगानुयुगे अवतार घेतो, अशी भारतीय श्रद्धावंतांची पक्की धारणा आहे. अवतारकल्पना पुराणांनी वाढवली; अनेक कथांच्या रूपाने तिचा विकास झाला. त्यामुळेच यदा-यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत! हा श्लोक तनामनाने आम्ही स्वीकृत केला आहे. आमच्या घरात कुणी आजारी पडले की वडील रामभटजीकडे जात. जनावर आजारी पडले, हरवले, शुभकार्याचा मुहूर्त, ग्रहण का लागते या सगळ्या समस्यांवर पंचांगावरून रामभटजी तोडगा सांगत. बहुजनांच्या सगळ्या संकटांवर त्या वितभर ग्रंथात उत्तर असे. सत्यनारायण पूजा, अभिषेक अशा कर्मकांडांतून तात्काळ सुख, समृद्धी, न्याय मिळविण्याच्या चमत्कार-पूर्ण गोष्टी अण्णा व माझ्या पिढीच्या मनावर कोरल्या गेल्या. पुराणांच्या संस्कारातून जग समजून घेण्याची व कार्य करण्याची आमची मेंटल मॉडेल्स बनली. याच मेंटल मॉडेल्सच्या आधारावर अण्णा व त्यांच्या टीमने भारतातील भ्रष्टाचारासारख्या गुंतागुंतीच्या प्रश्नाला अवतारकल्पना आणि चमत्कार करून संकटमुक्त करणाऱ्या प्रतिकाची हुबेहूब प्रतिमा असलेल्या जनलोकपालाची निवड केली. 
        पुराणकथांतील अवतार, सत्यनारायण पूजेतील चमत्कार ही सर्व मेंटल मॉडेल्स असून मनावर खोलवर बिंबलेली असतात. त्यांना आधार नसला तरी ती सत्य आहेत, असे मानले जाते. मेंटल मॉडेल्स म्हणजे व्यापक अर्थाने मानलेला सिद्धांत, प्रतिमा अगर चित्र असते. जग कसे आहे हे समजून घेताना अगर कृती करताना त्याचा आपणांवर अजाणतेपणे प्रभाव पडतो. अण्णांनी वयाच्या २६व्या वषीर् देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. देशापुढील प्रश्न समजून घेताना, प्रत्यक्ष कृती करताना अण्णांवर संस्कारातून निर्माण झालेल्या मेंटल मॉडेल्सचा प्रभाव पडलेला आहे. ही मेंटल मॉडेल्स अण्णांप्रमाणेच समाजातील मोठ्या समूहाने मूकपणे स्वीकारलेली आहेत. 
         अण्णाच नव्हे तर कोणतीही एक व्यक्ती संपूर्ण देश अगर समाजातील प्रश्न आणि त्यांची उत्तरे डोक्यात साठवू शकणार नाही. कथा, प्रतिमा, आधाराविना खरी मानलेली गोष्ट, ठोकताळे अशा बाबी डोक्यात साठवल्या जातात. आपल्यावर झालेल्या संस्काराचा जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर मोठा परिणाम होतो. मेंटल मॉडेल्सचा महत्त्वाचा दोष म्हणजे प्रत्येक समस्येसाठी सोपे उत्तर दिलेले असते. प्रस्थापित राज्यव्यवस्था भ्रष्टाचाराचे संकट टाळण्यास असमर्थ आहे, असे दिसून आल्याने अण्णांवर अवतार-संकल्पनेचा प्रभाव पडला. मेंटल मॉडेल्सचा प्रभाव असलेल्या जनतेला तो भावनात्मकदृष्ट्या पटला. त्यातून शोध सुरू झाला व जनलोकपालाचा जन्म झाला... 
         गेल्या चार हजार वर्षांपेक्षा जास्त काळा-पासून समाजातील एका मोठ्या वर्गाने वाचू नये व विचार करू नये असे बंधन घालण्यात आले होते. लहानपणी आम्ही आईवडिलांचा विचार अंतिम मानत असू, शाळेत शिक्षकांचा, ऑफिस-मध्ये साहेबांचा व समूहाने वागताना मेंटल मॉडेल्सचा. ४० वर्षांपूवीर् सातवीत वा अकरावीत जास्त मार्क्स मिळविले पाहिजेत असा आमच्या पालक-शिक्षकांचा अट्टहास असे. सगळी शिक्षण व्यवस्था कालबाह्य होती व मुलांना वाढविण्याची पद्धत परिपूर्ण नव्हती. आजची पिढीही घोकम-पट्टी करून मार्कांच्या मागे लागली आहे. आमच्याकाळी असलेल्या रुढी, परंपरा, कर्म-कांडे, सवयी, विचार, साहित्य आजही तसेच आहे. शाळेत शिकविले जाणारे साहित्य रंजन-वादी असून आहे तीच व्यवस्था कायम राखणारे कारकून बनविण्याचे काम करते. इंग्रज आल्यानंतर आम्ही वाचन सुरू केले, पण विचार करण्यासाठी अजून आम्ही आमची पूर्ण क्षमता वापरत नाही की काय, अशी शंका अण्णांच्या मुंबईतील उपोषणाच्या कार्यक्रमाअगोदर वाटत होती. आता मात्र आम्ही आमच्या मेंटल मॉडेल्समधून बाहेर पडल्याचे चित्र दिसू लागले आहे. कालबाह्य व्यवस्थेशी दोन हात करण्याची तयारी आता करता येईल... 

    भारतात आजमितीला मोजल्याप्रमाणे एकुण किंवा जवळपास ६,३८,३६५ गावे आहेत. आणि त्याचबरोबरीने जवळपास ३३ लाख एन जी ओ आहेत. म्हणजे दर ४०० भारतीय नागरिकांमागे एक एनजीओ कार्यान्वित आहे. आणि जर हीच आकडेवारी पोलिसांच्या बाबतीत पाहीली तर दर १५०० माणसांमागे एक पोलिस कर्मचारी आहे. पण जर ह्या एन जी ओ खरचं विकासासाठी झटतायेत आणि त्या सत्य निष्ठेने काम करतायेत तर भारतात कुपोषण,अनारोग्य,   सावकारग्रस्तनिरक्षरता का संपली नाही. मग अनुदानाचे नेमके काय केले जाते. त्याचा कोणता हिशोब दाखवला जातो काहे सगळे असताना ह्या एन जी ओ नावाच्याEXTRA CONSTITUTIONAL AUTHORITY वर विश्वास का ठेवावा?  जनलोकपाल बिलाच्या नावाखाली तथाकथित आणि स्वघोषित समाजसेवकांनी जे काही नाटक उभारलेय ते दुसरे तिसरे काही नसून जुनी  जातीयवादाची  SLAVERY SYSTEM   प्रस्थापित करण्याचा घाट आहे. ज्याची अनौरस फळे या देशातल्या अभिजनेतर वर्गाला आजपर्यंत सोसावी लागत आहेत. ह्याच वंचितांकडे कोणतीही एनजीओ नाही. त्यांना कटाक्षाने सिविल सोसायटीपासून दूर ठेवण्यात आले आहे.
अँड. राज जाधव...!!!
(संदर्भ -  सम्यक समीक्षा ब्लॉग, महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्र मधील लेख,  विविध प्रसार माध्यमे,  सुरेश खोपडे आय.पी.एस. निवृत्त) यांचा लेख.)

Monday 30 July 2012

तथागताचा प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत....!!!

तथागताचा प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत....!!!

दु:ख, अनित्यता, अनात्मता आणि निर्वाण हे बुध्द धम्माचे मूलभूत सिध्दांत आहेत. हे चारही सिध्दांत प्रतित्यसमुत्पादावर आधारित आहेत. त्यांचा उगम प्रतित्यसमुत्पादापासून झाला आहे. हा सिध्दांत ईतका महत्वाचा आहे की, जो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो तो धम्माला जाणतो आणि जो धम्माला जाणतो तो प्रतित्यसमुत्पादाला जाणतो असे भगवान बुध्द म्हणतात. या सिध्दांताच्या आधारे भगवान बुध्दाने पुन्हा पुन्हा जन्म घेणे व पुन्हा पुन्हा मरणावस्था प्राप्त करणे अशा या संपुर्ण भवचक्राचा उलगडा केला आहे. जन्म आणि मरणाचा हा क्रम अनादिकाळापासून एखाद्या चक्राप्रमाणे अखंड गतीने चालत आलेला आहे. अशा या जन्म आणि मरणाच्या रहस्यावर  भगवान बुध्दाने प्रतित्यसमुत्पाद या सिध्दांताच्या आधारे प्रकाश टाकून भवचक्राच्या प्रवृती व निवृतीच्या मुळाशी असलेल्या कारणाचे दिग्दर्शन केले आहे.

      भगवान बुध्दांनी प्रतित्यसमुत्पाद म्हणजे काय ते ‘मझिमनिकायातील चूलसकुलदायिसुत्तात’ असे सांगितले –

      ‘इमस्मिं सति इदं होति ।

      इमस्सुप्पादा इदं उपज्जति ॥

      इमस्मिंअसति इदं न होति ।

      इमस्स निरोधा इदं निरुज्जति ॥’

      ‘ह्याच्या होण्यामुळे हे होत असते.

      ह्याच्या न होण्यामुळे हे होत नसते.

      ह्याचा उत्पन्न होण्यामुळे हे उत्पन्न होत असते.

      ह्याचा निरोध केल्याने.

      ह्याचा निरोध होत असतो.’

पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थविर अश्वजित यांनी सारीपुत्तांना भगवान बुध्दांचा धम्म संक्षेपाने सांगितला-

      ‘ये धम्मा हेतुप्पभवा, हेतुं तेसं तथागतो आह ।

      तेसंच यो निरोधो, एवं वादी महासमणो ॥’

      ‘जी दु:खे, ज्या गोष्टी (धम्म) कारणांपासून उत्पन्न होतात, त्यांची कारणे तथागतांनी सांगितली आहेत आणि त्यांचा निरोध कसा करावा हे त्यांनी सांगितले      आहे. हेच महाश्रमणांचे मत आहे.’

      यावरुन हे स्पष्ट होते की, अगदी सुरुवातीपासूनच भगवान बुध्दांच्या धम्माचा पाया प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतावर आधारलेला होता.

            संयुक्‍त निकायात नमुद केल्याप्रमाणे भगवान बुध्द  भिख्कु आनंदाशी संवाद करीत असतांना म्हणाले की, ‘प्रतित्यसमुत्पाद हा सिध्दांत फार गंभ्रीर आहे. गूढ आहे. या धम्माला योग्य प्रकारे न जाणल्यामुळे आणि न समजल्यामुळे प्रजा गुंता झालेल्य धाग्याच्या गुंडीसारखी, गाठी पडलेल्य  दोरीसारखी आणि गोळा झालेल्या मुंजाच्या गवतासारखी होऊन, अपायात पडून दुर्गतीला प्राप्‍त होत आहे.’

      महापधान सुत्तात भगवान बुध्द  म्हणतात की, ‘आसक्‍तीत पडलेल्या, आसक्‍तीत रममाण असलेल्या आणि आसक्‍तीत आनंद मानणार्‍या सामान्य लोकांसाठी हे कठीन आहे की कार्यकारणासंबंधी प्रतित्यसमुत्पादाला ते समजून घेतील.’ सर्वसामान्य लोक ईश्वर, देवदेवता, दैववाद, कर्मकांड, आत्मा इत्यादी संबंधीत मिथ्यादृष्टीत गूतले होते. त्या प्रवाहाच्या विरोधात जाणारा प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत त्यांना समजेल की नाही याबाबत भगवान बुध्दांना शंका वाटत होती. परंतु महाकारुणिकांच्या असिम मैत्री, करुणा, मुदिता व उपेक्षा या ब्रम्हविहाराच्या भावनेने त्यांना प्रवृत केले की जगातील काहीतरी लोकं हा धम्म समजू शकतील. त्यानंतरच त्यांनी आपल्या सिध्दांताची शिकवण जगाला देण्याचा निश्चय केला.

      प्रतित्य म्हणजे प्रत्यय किंवा कारण आणि समुत्पाद म्हणजे उत्पत्ती. अर्थात प्रतित्यसमुत्पाद म्हणजे हेतूमुळे किंवा कारणामुळे कार्याची उत्पत्ती होणे.    ह्याच्या उत्पन होण्यामुळे हे उत्पन होत असते. यालाच  कार्यकारणभाव (CAUSE AND EFFECT) असेही म्हटले जाते. प्रतित्यसमुत्पादाला प्रत्ययाकार किंवा पच्चयाकार निदान असेही म्हणतात. त्याचा संबंध अनित्यता आणि अनात्मता यांचेशी आहे. कोणताही पदार्थ शाश्वत नाही. सव संस्कारीत पदार्थ अनित्य आहेत, क्षेणैक आहेत आणि हेतुप्रत्ययजनित आहेत. प्रतित्यसमुत्पादाला ‘मध्यमावर्ग’ असेही म्हणतात. बुध्दधम्मात शाश्वत दृष्टी व उच्छेद दृष्टी यांना टोकाचे दोन मार्ग असे म्हटले आहे. महास्थविर बुध्दघोषांनी ‘प्रतीत्य’ शब्दात शाश्वत दृष्टी आणि ‘समुत्पाद’ शब्दात उच्छेदवादी दृष्टीचे खंडण केले आहे असे सांगून प्रतित्यसमुत्पाद मध्यममार्गाचे तत्वज्ञान सांगतो असे म्हटले आहे.

      आचार्य नागार्जुन यांनी प्रतित्यसमुत्पादाला आणि शून्यता यांना एकच मानले आहे. विग्रहव्यावर्तनीमध्ये नागार्जुन म्हणतात की, ज्यांनी शून्यतेला जाणले आहे त्यांनी सर्व लौकिक आणि लोकोत्तर अर्थाला सुध्दा जाणले आहे. कारण ज्यांनी शून्यतेला जाणले आहे, त्याने प्रतित्यसमुत्पादाला जाणले आहे. त्याने चार आर्यसत्यालाही जाणले आहे.

            भगवान बुध्दांनी प्रतित्यसमुत्पाद हया  सिध्दांताचा शोध लाऊन मानवाच्या दु:खाच्या निर्मितीची प्रक्रिया अतिशय सोप्या शब्दात आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून मांडली आहे. म्हणून त्यांचा प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत हा एक अलौकीक शोध आहे. त्यावेळी जी समाजरचना होती, जी विचारधारा प्रचलीत होती, त्या प्रवाहाच्या विरोधात प्रतित्यसमुत्पादा द्वारे त्यांनी आपल्या एका नवीन धम्माची  आणी  तत्वज्ञानाची  प्रतिष्ठापना केली. 

      प्रतित्यसमुत्पाद हा सिध्दांत केवळ दु:खापुरताच मर्यादित नाही, तर तो विश्वातील सर्व गोष्टींना लागू  पडतो. 

            याच सिध्दांताच्या आधारे भगवान बुध्दाने सृष्टीचा निर्माता म्हणून इश्वराला नाकारले. तसेच ईश्वराच्या अस्तित्वाला व आत्म्याच्या स्वतंत्र अस्तित्वाला सुध्दा नाकारले.  कोणीही जग शून्यातून निर्माण करु शकत नाही व कोणतीही गोष्ट शून्यातून निर्माण होत नाही तर ती कारणाने निर्माण होत असते. त्यामुळे सृष्टीचा निर्माता ईश्वर, देव वगैरे सर्व कल्पना खोट्या आहे.  सर्व विश्व प्रतित्यसमुत्पाद म्हणजे कार्यकारणभावाच्या सिध्दांतावर आधारलेले आहे.

      भारतीय संस्कृतीत ईश्वराचा व आत्म्याचा संबंध धर्माशी जोडला आहे. भगवान बुध्दाने मानवाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी ईश्वर आणि आत्मा यांचा धर्माशी जोडलेला संबंध नाकारला. वासेठ्ठ आणि भारद्वाज या ब्राम्हणाशी झालेल्या चर्चेत बुध्दाने ईश्वराविषयी त्यांचे मत स्पष्ट केले आहे. बुध्दाच्या मते या जगात खूनी, चोर, डाकू, लुटारु, व्यभिचारी, व्यसनी, फसवे, असे अनेक तर्‍हेचे लोक असतात. जर ईश्वर सर्वज्ञ, सर्वशक्‍तीमान आणि सर्वव्यापी आहे तर तो एकतर या सर्व गोष्टीमध्ये तोच विद्यमान आहे अथवा अशा अनिष्ट गोष्टीचा तो पुरस्कर्ता तरी आहे. असेही नसेल तर अशाप्रकारचा ईश्वर आंधळा तरी आहे. सृष्टी ही ईश्वरनिर्मित नसून ती उत्क्रांत झाली आहे असे त्यांचे ठाम मत होते. भगवान बुध्दानी ईश्वराचे स्थान `सदाचार व नितिला ’ दिले आहे.

            भगवान बुध्दाने पुनर्जन्माला अवतार (INCARNATION)  म्हणून नाही तर पुनर्निमिर्ती म्हणून मानले.  त्यानी शरीराचे चार घटक म्हणजे  पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू यांचे पुनर्जन्म मानले, आत्म्याचे नाही. 

      प्रतित्यसमुत्पाद सिध्दांतात भगवान बुध्दाने दु:खाचे उगम कसे होते व त्याचा निरोध कसा करता येईल याचा शोध घेतला. प्रतित्यसमुत्पादाचा शोध लावल्यामूळे सिध्दार्थ गौतमाला बुध्दत्व प्राप्‍त झाले. ज्ञानप्राप्‍तीच्या रात्री पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या प्रहरी भगवान बुध्दांनी प्रतित्यसमुत्पादाचाच विचार केला.

      प्रतित्यसमुत्पाद हा बारा कड्‍याचा सिध्दांत आहे. ज्या प्रकारे एखाद्या चक्राला अनेक आरे असतात आणि ते चक्र आर्‍यासहित गोलाकार फिरत राहते. त्याचप्रमाणे हे भवचक्र बारा आर्‍यांचे बणले असून ते अखंडपणे फिरत राहते.

        सिध्दांतानुसार अविद्येमुळे संस्कार उत्पन्न होतात, संस्कारामुळे विज्ञान, विज्ञानामुळे नामरुप (मन आणि शरीर), नामरुपामुळे षडायतन (सहा ईद्रीये), षडायतनामुळे स्पर्श, स्पर्शामुळे वेदना, वेदनेमुळे तृष्णा, तृष्णेमुळे उपादान (चिकटून राहणे), उपादानामुळे भव (होणे), भवमुळे जाती (जन्म), जातीमुळे जरा (वार्धक्य), मरण, शोक उत्पन्न होतात. अशा तर्‍हेने अविद्येपासून ते  जरा, मरण पर्यंत दु:खाचा उगम होणार्‍या बारा कड्यांना अनुलोम प्रतित्यसमुत्पाद असे म्हणतात. दु:खाचा उगम कसा होतो हे अनुलोम प्रतित्यसमुत्पादमध्ये सांगितले आहे.  .

      तसेच अविद्येचा निरोध केला असता संस्काराचा निरोध होतो. संस्काराच्या निरोधाने विज्ञानाचा निरोध होतो. विज्ञानाच्या निरोधाने नामरुपाचा निरोध होतो. नामरुपाच्या निरोधाने स्पर्शाचा निरोध होतो. स्पर्शाच्या निरोधाने वेदनेचा निरोध होतो. वेदनेच्या निरोधाने तृष्णेचा निरोध होतो. तृष्णेच्या निरोधाने उपादानाचा निरोध होतो. उपादानाच्या निरोधाने भवाचा निरोध होतो. भवाच्या निरोधाने जातीचा निरोध होतो. जातीच्या निरोधाने जरा, मरण, शोक याचा निरोध होतो. याप्रमाणे दु:खाचा निरोध होतो. अशा तर्‍हेने अविद्येपासून ते  जरा, मरण पर्यंत दु:खाचा निरोध करणार्‍या बारा कड्यांना प्रतिलोम प्रतित्यसमुत्पाद असे म्हणतात. दु:खाचा निरोध कसा होतो हे प्रतिलोम प्रतित्यसमुत्पादमध्ये सांगितले आहे.

       दु:खाचे उगम कसे होते व त्याचा निरोध कसा होतो याची कारणमिमांसा प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतानुसार भगवान बुध्दाने याप्रमाणे समजावून सांगितला आहे.

      प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत सांगतांना अविद्येपासून सुरुवात केली आहे. परंतु अविद्या हे दु:ख निर्मितीचे मूळ कारण आहे असे म्हणता येणार नाही. जगातील प्रत्येक गोष्टीचा उगम दुसर्‍या कोणत्या तरी समुत्पादाच्या गोष्टीच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतानुसार जगात कोणतेच मूळ कारण असु शकत नाही, अविद्या म्हणजे जग जसे तसे न पाहणे, म्हणजेच दु:ख आर्यसत्याविषयी संपुर्ण ज्ञान नसणे. ज्याला आर्यसत्याविषयी संपुर्ण ज्ञान आहे. त्याच्याकडून संस्कार उत्पन्न होणार नाही, त्याच्यात तृष्णा उत्पन्न होणार नाही. म्हणजेच तो दु:खातून मुक्त होईल.

      कोणत्याही गोष्टी प्रत्ययाशिवाय म्हणजे कारणाशिवाय होत नसते. कारणामुळे जे कार्य होते ते आपल्या परीने दुस‍र्‍या कार्याचे कारण होते. आणि ते दुसरे कार्य आपल्या परीने तीस‍र्‍या कार्याचे कारण होते. अशा तर्‍हेने कार्यकारन भावाचे चक्र अव्याहतपणे चालू असते. वस्तुमात्रांतील परस्परसंबंध हे प्रतित्यसमुत्पादाचे मुळ स्वरुप आहे. कोणतीही वस्तु स्वयंसिध्द नसते. तिचे अस्तित्व संबंधजन्य असते. यावरुन असे लक्षात येईल की, जगात कोणत्याही गोष्टीला पहिले कारण नसते. कारण प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतानुसार कोणतेही अस्तित्व हे त्याच्या कारणामुळे अस्तित्वात आलेले असते. शिवाय कार्याला एकच कारण असते असेही नाही, तर बहुतांश वेळेला अनेक कारणांच्यामुळे कार्य घडत असते. म्हणून प्रतित्यसमुत्पादाचे हे सिध्दांत नीट समजल्यावर  असे  लक्षात येईल की, जगात शून्यातून काहीच निर्माण होत नाही. त्यामुळे ईश्वराला शून्यातून जग निर्माण करणे शक्य नाही. प्रत्येक कार्य हे कारणावरच अवलंबून असल्यामुळे जगावर अधिकार चालविणार्‍या ईश्वराचे काहीच काम नाही. जर ईश्वर असेलच तर तोही कोणत्यातरी कारणामुळे उत्पन्न झाला असला पाहिजे. कारण तो स्वयंभू असणे शक्य नाही. कार्यकारण भावामुळे जगात चमत्काराला वाव नाही. म्हणून बौध्द धम्मात ईश्वराला, त्याच्या चमत्काराला किंवा आत्म्याला काहीच स्थान नाही. बौध्द धम्मात ईश्वराला, त्याच्या चमत्काराला किंवा आत्म्याला मानले जात नाही. ब्रम्ह हे विश्वनुर्मितीचे कारण  असू शकत नाही. बी पासून झाड उत्पन्न होते. त्याचप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणांमुळे अस्तित्वात येत असतात. अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत. ईश्वर, ब्रम्ह, आत्मा, देव असे कोणीही अस्तित्वात असू शकत नाही. आपण केलेया कृत्याचे बरे वाईट परिणाम घडत असतात. थोडक्यात म्हणजे सर्व विश्वच प्रतित्यसमुत्पादाच्या सिध्दांतावर आधारलेले आहे.

      बौध्द धम्मात भवचक्र किंवा संसारचक्र, कर्म आणि पुनर्जन्म यांचा संबंध दु:ख आर्यसत्याशी जोडला आहे.

पुनर्संपादन - अँड. राज जाधव...!!!

(संदर्भ  - आर.के.जुमळे, यांच्या ब्लॉग वरून साभार )