My Followers

Thursday 22 November 2012

26 नोव्हेंबर....संविधान दिन...!

                 26 नोव्हेंबर....संविधान दिन.....!

भारतीय इतिहासातील संविधानच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली असली तरी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे "भारतीय संविधान" 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन या संविधानाची निर्मिती केली, या रोजी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्‍या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. म्हणून 26 नोव्हेंबरला हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.

भारतीय संविधानासंदर्भात जन-जागृती, माहिती व्हावी यासाठी संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असे, मात्र ते सार्वत्रिक पातळीवर होत नाहीत. याबाबत महाराष्‍ट्र शासनाने यापुर्वी जनतेला 26 नोव्हेंबरला 'भारतीय संविधान द‍िन' साजरा करण्याचे ही आवाहन केले होते. मात्र यासंदर्भात राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची महाविद्यालये आदी आजही अनभिज्ञ दिसत आहे. शासनाने भारतीय संविधानची माहिती जनतेला करून देण्यासाठी 26 नोव्हेंबरला पोस्टर प्रदर्शन, बॅनर्स, निंबध स्पर्धा घेण्याच्या सुचना दिल्या होत्या मात्र त्या पाळल्या जात नसल्याचे चित्र समोर दिसत आहे. 


चार वर्षापूर्वी 26/11 ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. तो दिवस होता 26 नोव्हेंबर, 'भारतीय संविधानदिन'. मात्र तेव्हापासून संविधान विरोधकांना आणि मनुवाद्याना संविधान दिवसाला विरोध करण्यासाठी एक चांगले कारण भेटले आहे. म्हणून हे नमुने काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. आणि त्यांचा हा प्रत्यन लोकशाही मानणार्यांनी आणि बाबासाहेबांच्या अनुयायांनी हाणून पाडायचा आहे.    


देशावर येणार्‍या संकटप्रसंगी सारे भारतीय, आपले जातीभेत, वंश भेद, धर्म बाजूला ठेवून सारे एकत्र येतात. ही ताकद आपल्याला भारतीय संविधानाचीच आहे. या संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता कायम टिकून आहे. या दिनाप्रमाणेच 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे दिवस सरकारच्या कालदर्शिकेतून नाहिसे होणार की काय अशी भिती आता वाटू लागली आहे.

तरी सर्वाना विनंती आहे आज पासूनाच आपण संविधान दिन निमित्त माहितीपूर्ण आणि प्रबोधनपर पोस्ट टाकाव्यात, आणि आप आपल्या स्थानिक पातळ्यावर २६ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यावेत........!     

अँड. राज जाधव...!!! 

क्रूरकर्मा कसाब का हिसाब.....!

क्रूरकर्मा कसाब का हिसाब.....! 
                        
अखेर..... क्रूरकर्मा अजमल कसाब याला आज पहाटे ७.३० वाजता पुण्यातील येरवडा जेल मध्ये "ऑपेरेशन  एक्स" नुसार फासावर लटकविण्यात आले असून येरवडा जेल मधेच त्याला गाडून टाकण्यात आले आहेशिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफझल खानाचा फडशा पाडून, त्याची समाधी किल्ल्याच्या पायथ्याशी बांधली, ती एक स्वराज्यावर चालून येणाऱ्यानां सूचना होती, "जर स्वराज्यावर चालून याल तर तुमचा मुडदा देखील इथेच असा गाडला जाईल.".... कसाबला इथे गाडून हेच सांगावेसे वाटेल जो जो पाकिस्तानी या भारत भूमीवर हात टाकण्याचा प्रयत्न करेल त्याला इथेच लटकवून, इथेच गाडू....! 

२६/११ मध्ये १६६ निरपराध नागरिकांचा बळी घेणारया १० पैकी ९ आतंकवाद्यांना त्याच वेळेस कंठस्थान देण्यात आले होते, पैकी १ आतंकवाद्याला जिवंत पकडण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले होते, कसाब ला सर्व जगासमोर दोषी ठरविण्यासाठी त्याची संपूर्ण कायदेशीर रित्या ट्रायल घेण्यात आली आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला दोषी ठरविण्यात आले, आणि त्यानुसारच त्याला आज फाशी देण्यात आली, राष्ट्रपती यांनी इतर अर्जांच्या अगोदर कसाबचा दया याचिकेचा अर्ज फेटाळण्यात आला होता, संपूर्ण कायदेशीर बाजू पूर्ण करून त्या क्रूरकर्म्याला फासावर लाटकीविण्यात आले. संपूर्ण घटनाक्रमावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले कि, भारतीय लोकशाही आणि भारतीय संविधान हे जगात श्रेष्ठ आहे....! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान देशाला समर्पित करताना म्हटले होते कि, संविधानची योग्य अंमलबजावणी करणे हे, त्या त्या वेळच्या राज्यकर्त्यावर देखील अवलंबून आहे, जर या संविधानाचा योग्य वापर केला नाही तर, तो दोष संविधानावर नसून त्याच्या वापरकर्त्यावर असेल, त्याची अंमलबजावणी चांगली केली तर संविधान चांगले आणि त्याची अंमलबजावणी वाईटरीतीने केली तर संविधान वाईट मानले जाईल."    

कसाबने २६/११ ला सायंकाळी  धुमाकूळ घालून देशाच्या सुरक्षिततेला एक प्रकारचे आव्हान दिले होते. कसाब हा २६/११/२००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी आहे. मुळचा पाकिस्तानातील फरीदकोट शहरातील रहिवासी असून गेल्या काही वर्षापासून तो अतिरेकी कारवायांमध्ये सामील झाला होता. २६/११ हल्ल्यातील पोलिसांच्या हाती आलेला एकमेव जिवंत अतिरेकी. कसाबचे ह्या हल्ल्यातील बाकीचे सर्व अतिरेकी मारले गेले. कसाब आणि त्याच्याबरोबरील अतिरेक्यांनी मिळून केलेल्या दहशतवादी हल्ल्यात २०० निरपराध लोकांची हत्त्या केली. ज्यात ३४ विदेशी नागरिकांचा ही समावेश होता. कसाबच्या विरोधात एकूण ८६ आरोप सिद्ध झाले आहेत. या आरोपांमध्ये देशद्रोही कृत्य करणे, विशेष टाडा न्यायालयाने त्याला ५ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा ठोठावली होती आणि ४ अन्य गुन्ह्यांमध्ये आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात आली होती. 

क्रूरकर्मा कसाबविरुद्ध गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले होते. देशाविरुद्ध युद्ध पुकारुन देशाच्या सुरक्षिततेला आव्हान देणे, हत्येचे ‘प्लॅनिंग’ करणे, हत्या करण्यासाठी इतर अतिरेक्यांना मदत करणे. भारतीय दंडविधानाच्या कलम ३०२ अन्वये आणि दहशतवाद प्रतिबंधक कायद्यानुसार कसाबची फाशी सुप्रीम कोर्टाने निश्चित केली होती. ‘२६/११ ला सायंकाळी कसाबने धुमाकूळ घालून देशाच्या सुरक्षिततेला एक प्रकारचे आव्हान दिले होते. कसाब एखाद्या रोबोटसारखा काम करत नव्हता. त्याच्या विरोधात ठोस पुरावे आहेत. त्यावरुन त्याला शिक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे’, असे मत न्यायाधीश आफताब आलम आणि सी. के. प्रसाद यांच्या खंडपीठाने कसाबच्या फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.परंतुसबाउद्दीन अहमद आणि फहीम अन्सारी  यांच्या विरोधात कोणताही सबळ असा पुरावा नसल्याकारणाने सुप्रीम कोर्टाने त्यांना निर्दोष ठरवले व राज्य सरकारने जी याचिका दाखल केली होती, ती फेटाळून लावली होती.

क्रूरकर्मा कसाबच्या वकिलाने त्याची बाजू मांडताना वक्तव्य केले होते की, ‘कसाब वयाने मोठा नव्हता. त्याचे ‘ब्रेन वॉश’ करुन त्याला ‘जिहाद’ साठी प्रवृत्त करण्यात आले. तो फक्त एका रोबोटसारखा काम करत होता’. पण हे सगळे मुद्दे खंडपीठाने खोटे ठरवले. मात्र, सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा पर्याय कसाबकडे आहे. जर ही याचिका सुद्धा फेटाळण्यात आली तर तो क्यूरिटिव्ह पिटीशनचा पर्याय वापरु शकतो. तो राष्ट्रपतींकडे दयेचा अर्जही दाखल करु शकतो. व त्यानुसारच अजमल कसाब याने राष्ट्रपती यांचे कडे दयेचा अर्ज करून फाशीची शिक्षा कमी करावी म्हणून अपील केले होते, परंतु महामहीम राष्ट्रपती मोहोदय श्री. प्रणब मुखर्जी यांनी ५ नोव्हेंबर २०१२ रोजी कसाबची दया याचिका फेटाळून लावली आणि कसाब च्या फाशीवर शिक्का मोर्तब केले. 

क्रूरकर्मा अजमल कसाबला फासावर लटकवणार हे निश्चित झालं होतं. पण ही फाशी कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता गुप्त पद्धतीनं देण्यात आली. साहजिकच, या गुप्ततेचा भंग होऊ नये, यासाठी सुरक्षा यंत्रणांना कमालीची काळजी घ्यावी लागली. ही गुप्तता एवढी प्रचंड होती की, खुद्द येरवडा तुरुंगातील ज्या जल्लादानं कसाबला फासावर चढवलं त्यालादेखील प्रत्यक्ष क्षणापर्यंत याची कल्पना नव्हती की तो नक्की कुणाला फाशी देणार आहे. 

२००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाबला सापडल्यापासूनच आर्थर रोडमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण, त्याच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी मात्र पुण्यातील येरवडा तुरुंगात होणार होती. त्यासाठी कसाबला पुण्याला हलवावं लागणार होतं. यासाठी सुरक्षा यंत्रणांनी १८ नोव्हेंबर संपण्याची आणि १९ नोव्हेंबर उजाडण्याची वेळ निवडली. 
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, क्राईम ब्रान्च, कमांडोज् ऑफ क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) तसंच आयटीबीपीच्या अधिकाऱ्यांवर कसाबला पुण्याला पोहचवण्याची जबाबदारी होती. ही संपूर्ण टीम २००८ पासूनच कसाबच्या देखरेखीसाठी तैनात करण्यात आली होती. याच टीमबरोबर १९ नोव्हेंबरला पहाटेच कसाबला येरवडा तुरुंगात दाखल करण्यात आलं. येरवडा तुरुंगात दाखल होणाऱ्या या नव्या आरोपीची ओळख मात्र गुप्त ठेवण्यात आली होती. येरवडा तुरुंग अधिक्षकाशिवाय ही गोष्ट कुणालाच माहित नव्हती, ना जेलच्या इतर अधिकाऱ्यांना... ना डॉक्टरांना...‘जेलच्या अधिकाऱ्यांना फक्त एव्हढंच सांगण्यात आलं होती की, कुणीतरी हाय-प्रोफाईल आरोपी येरवड्यात येणार आहे. नक्की कोण आहे हे मात्र सांगण्यात आलं नव्हतं. यावेळीही आईटीबीपी अधिकाऱ्यांच्या संरक्षणात एका अंडाकृती सेलमध्ये कसाबला ठेवण्यात आलं होतं. तुरुंगाच्या जल्लादालाही आम्ही एव्हढंच सांगितलं होतं की, एका दहशतवाद्याला फाशी द्यायची आहे. प्रत्यक्ष फाशी देण्याच्या काही मिनिटे अगोदर त्याला हे सांगितलं गेलं की तो कसाबच आहे’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

फाशी देण्याच्या अगोदर अंतिम इच्छेबद्दल कसाबला विचारलं तेव्हा त्यानं नकारात्मक उत्तर देऊन आपली काहीही अंतिम इच्छा नसल्याचं म्हटलं. 
मुंबईत हल्ला करून १६६ निरपराध जीवांचे बळी घेणार क्रुरकर्मा कसाब समोर मृत्यूला पाहून भेदरला होता. फाशीच्या वेळी तो अस्वस्थ आणि गप्प होता...थोड्याच वेळात त्याला फासावर चढवण्यात आलं आणि तिथं उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी कसाब मृत झाल्याचं घोषित केलं... अखेर एका क्रूरकर्म्याचा शेवट देखील एका कायदेशीर प्रक्रीयेव्दारे कोणताही शोर्ट कार्ट न मारता २६/११ मधील निष्पाप बळी आणि शाहिदा नां अखेर न्याय मिळाला, हे फक्त भारतातच शक्य आहे.....!

अँड. राज जाधव...!!! 

संदर्भ - 
१. जलदगती न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे, 
२. विविध वर्तमानपत्रे, लेख  

Friday 16 November 2012

बांधवांसाठी निरोप....!

बांधवांसाठी निरोप....! 

सर्व मित्राना सविनय जय भीम,
गेले काही दिवस अपनास माझ्या फेसबुक अकाउंट नविन पोस्ट पहावयास मिळाल्या नाहीत, या बद्दल प्रथम मी दिलगीरी व्यक्त करतो,
              फेसबुक म्हणते आहे की माझ्या पोस्ट, या लोकांच्या भावना दुखावनाऱ्या असतात, त्यामुळे  फेसबुक महाशयानी मला कही काळा पुरते प्रतिबंधित (ब्लोक) केले आहे, त्या दिड शहन्याना माझ्या पोस्ट काय  कळणार हो ? हा सर्व डाव हा माझ्या पोस्ट जातीवाद्याना टोचणार् या, मनुवाद्याना बोचणाऱ्या, धर्मांध डोळ्यात खुपणार्या असतात, त्यामुळे धर्मांध लोकांच्या आता पर्यंत मला फेक आय डी वरून धमक्या येत होत्या, परंतु आता तर त्यांनी मूर्खपणाचा कळसच केला आहे, त्यांना वाटते मला ब्लोक करून माझ्या महत्वकांक्षा रोखतील, सर्वांनी मिळून माझ्या पोस्त पोस्ट केल्या आहेत त्यामुळे, फेसबुक ने मला काही काळ ब्लोक केले आहे, मला त्याचा काही फरक पडत नाही, कायमचे ब्लोक केले तरी चालेल मी परत परत पुन्हा पुन्हा नवीन अक्कौंट ओपेन करेन आणि तुमच्या समोर येयील, आणि माझे काम असेच चालूच ठेवणार, 
           थोड्याच दिवसात आपली भेट होईलच तोपर्यंत आपल्या ब्लोग वरून संपर्कात राहण्याच्या प्रयत्न करू.... आपल्या चळवळीला असेच धर्मांध मूर्ख लोक संपविण्याचा बालिश प्रयत्न करत असतात, त्यामुळेच म्हणावेसे वाटते,"हाथी चलता है बाजार, कुत्ते भौकते हजार....!       

मित्रानो, अवघ्या सहा महिन्यात आपल्या ब्लॉग ची वाचक संख्या 25,000 च्या पुढे गेलेली असून, आपल्या ब्लॉगचे  मेंबर  130 झालेले आहेत, तरी सर्व सभासदांचे अणि वाचकांचे मनपूर्वक आभार असेच तुमचे  प्रेम असू दया, धन्यवाद्..... जय भीम... जय शिवराय....!  

आपलाच - अँड. राज जाधव...!!! 

Monday 5 November 2012

मिलिंद प्रश्न - भाग पहिला...."नागसेन आयुष्मान रोहनची भेट"...!

मिलिंद प्रश्न - भाग पहिला...."नागसेन आयुष्मान रोहनची भेट"...!

"मिलिंदपनहो" म्हणजेच" मिलिंद प्रश्न" हा ग्रंथ बाबासाहेबांचा आवडता ग्रंथ आहे, हा ग्रंथ आपण सर्वांच्या संग्रही असायला पाहिजे. सदर ग्रंथामध्ये पुनर्जन्म या बाबी दिसतात, परंतु तत्कालीन परिस्थिती आणि बौद्ध साहित्यामध्ये झालेली भेसळ समजून घेता ग्रंथ जिज्ञासू पाने वाचल्यास जीवनाचा सार कळून येण्यास वेळ लागणार नाही. सदर ग्रंथामधील काही निवडक भाग असाच लेखाच्या स्वरुपात तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करेन.
                                 
बुद्ध साहित्यामध्ये तिपिटकांना अनन्य साधारण महत्त्व आहे, पण त्या साहित्या पलीकडल्या बुद्धविचाराचे सोदाहरण, उपमा आणि दाखल्यांच्या मदतीने विश्लेषण आणि विवेचन करण्याचे महत्कार्य ‘मिलिंद प्रश्न’ हा ग्रंथ करतो. थेट प्रश्न आणि त्यांना सार्थ आणि समर्थ उत्तरं असं त्याचं स्वरूप आहे. प्रश्नांच्या उत्तरांमधून आयुष्मान नागसेनचे बुद्धविचारांचे आकलन किती विलक्षण होते हे जाणवते. त्याप्रमाणे विचारातील स्पष्टता आणि उत्तरं मांडतानाचे त्यांचा अभ्यास आणि धरिष्ठ केवळ अचंबित करणारे नसून अफाट असेच होते. याच ग्रंथामधील "नागसेन आयुष्मान रोहनची भेट" या भागातील काही भाग वाचकांसाठी देत आहे, सदर भाग आपणास व इतरांस एखादा बौद्ध भिक्षु नजरेस पडल्यावर पडणाऱ्या  प्रश्नावर प्रकाश टाकतो.  

आयुष्मान रोहन स्थविर भिक्षाटनासाठी एके ठिकाणी गेले असता सोनोत्तर ब्राह्मणाचा मुलगा नागसेन (पुढे हे भन्ते नागसेन स्थविर झाले, आणि मिलिंद राजाला अनुत्तरीत केले ) भन्ते रोहन यांना पीत वस्त्रा मध्ये मुंडण केलेले पाहून प्रश्न विचारतो कि, हे महाशय, आपण इतर लोकांप्रमाणे डोक्यावर केस का ठेवीत नाही, त्यावर स्थविर नागसेन यांनी उत्तर दिले, "दुष्ट कृत्यांचा डाग समाजातून काढण्यासाठी उच्च प्रतीचे जीवन जगात असता त्यात सोळा दोष आड येतात. हे जाणून भिक्षु डोक्याचे आणि दाढीचे केस काढीत असतात."

"ते सोळा दोष कोणते बरे ?" बाळ नागसेन ने पुन्हा प्रश्न केला. 

रोहन म्हणाले, "केस आणि दाढी ठेवल्याने १) वेळोवेळी सावरावे लागतात २) शृंगरावे लागतात ३) तेल लावावे लागते ४) केस धुवावे लागतात ५) पुष्पमाळ बांधावी लागते ६) अत्तर लावावे लागते ७) सुगंधित ठेवावे लागते ८) हिरडा वापरावा लागतो ९) आवळ्याचे तेल लावावे लागते १०) रंगवावे लागतात ११) बांधावे लागतात १२) कंगीने विंचरावे लागते १३) वेळोवेळी न्हाव्यास बोलवावे लागते १४) केस मोकळे करावे लागतात १५) केसात उवा पडतात १६) जेव्हा केस झडू लागतात, तेव्हा लोकांना तो छळ वाटतो, त्यामुळे ते दुख्खी होतात, पश्छ्ताप करतात, मोहाच्या जाळ्यात सापडतात. त्यामुळे या १६ बाधा आड आल्या कि मनुष्याला कुशल गोष्टीचे विस्मरण होण्याची संभावना असते.    

नागसेन ने पुन्हा भन्ते रोहन स्थविर यांना विचारले,

"मग आपले वस्त्र देखील इतर लोकांच्या वस्त्रसमान नाहीत, हे का ?  

भन्ते रोहन स्थविर यांनी प्रश्नाचे उत्तर दिले,
"गृहस्थाच्या सुंदर वस्त्रात सुप्त अश्या पाच लालसा असतात. त्यामुळे भयानक धोका उद्भवण्याची शक्यता असते मात्र कषाय वस्त्र धारण करणारास त्यांचा संपर्क हि नसतो, म्हणूनच माझी वस्त्रे इतर लोकांच्या वस्त्राहून अगदी वेगळी आहेत. 

जिज्ञासू बाळ नागसेनला त्याचा मार्ग भेटला होता, त्याला कळले होते कि या भिक्षुकडे अफाट ज्ञान आहे, आणि ते आपणहि जाणून घेतले पाहिजे, रोहन स्थाविराना तशी विचारणा केल्यावर, आई वडिलांच्या सामन्तीने बाळ नागसेन प्रव्रजित होऊन श्रामणेर झाला.  नागसेन पुढे भन्ते नागसेन स्थविर होऊन अतिशय हुशार आणि बुद्धिमान असा ग्रीक राजा मिलिंद यास प्रश्नोत्तरात हरवतात, प्रश्नोत्तरात हरलेला मिलिंद राजा जीवनाचा सार समजून घेतो आणि बौद्ध धम्मास शरण येतो,     

लेखक - अँड. राज जाधव...!!! 

संदर्भ - 
मिलिंद प्रश्न, सुगत प्रकाशन 
अभिधम्म पिटक - भन्ते तीस्स्वंश 

पानिपत शोकांतिकेची दुसरी बाजू.....!

पानिपत शोकांतिकेची दुसरी बाजू.....!

पानिपत युद्धास यंदाच २५० वर्ष पुर्ण झालीत. या युद्धाने मराठ्यांची कधीही भरुन न येणारी हानी झाली. घरटी बांगडी फुटली, एवढा संहार या युद्धात झाला. त्याचा दुखरा सल आजही मराठी बांधवांत आहे.


पण पानिपतचे युद्ध ही एकाएकी घडलेली घटना नव्हती. अशा संहारक घटना एकाएकी होत नसतात. मराठे आणि मोगलांचा जो शिवाजी महाराज व औरंगजेबानंतर सामाजिक/सांस्क्रुतीक/राजकीय तत्वद्न्यानाचा जो क्रमश: -हास होत गेला त्याची अपरिहार्य परिणती म्हणुन पानिपत युद्धाकडे पहायला हवे. ताराराणीनंतर इकडे छत्रपती नामधारी बनून पेशवे सर्वोपरी बनले तसेच तिकडे औरंगजेबानंतरचे पातशहा वजीराहातची कठपुतळी बनले. रयतेसाठी म्हणुन राज्यकर्ते असतात ही भावना शिवोत्तर काळात जवळपास नष्ट होत गेली. मराठा सरदारांची स्वतंत्र बेटे बनत गेली. उत्तरेतही जवळपास असेच झाले. केंद्रीय सत्ता क्रमशा: नामशेष होत गेली. 


मराठी इतिहासकारांनी नादिरशहाच्या १७३९ मधील आक्रमणाकडे जवळपास दुर्लक्षच केलेले आपल्याला दिसते. त्याला निमंत्रीत करण्यात मोठा वाटा होता तो शाह वलीउल्लाह या कट्टरपंथी जिहादी विचारांच्या हाजीचा. भारतातील मुस्लीम हे हिंदुंच्या साहचर्याने अजलाफ (हीण) बनले आहेत, त्यासाठी सच्चा मुस्लिमांचीच देशावर सत्ता असावी असा प्रचार तो करत असे. नादिरशहाचे आक्रमण न्रुशंस आणि रानटी होते. कर्नाळ येथे झालेल्या युद्धात खुद्द पातशहाला अटक होण्याची वेळ आली. मुस्लीम सरदार/वजीरांतील स्वार्थलोलुपतेमुळे नादिरशहा दिल्लीपर्यंत पोहोचला. हजारो दिल्लीवासी ठार मारले गेले. मोगलांनी ३८० वर्ष जमवलेली संपत्ती नादिरशहाने एका झटक्यात लुटली. या धक्क्यातुन मोगल कधीच सावरले नाही.


आणि याच परिस्थीतिचा फायदा मराठ्यांना झाला. एरवी जे अशक्यप्राय होते ते साध्य करण्याची संधी मराठ्यांना मिळाली. तख्ताची मांडलिकी करत (पहिले शाहू महाराज महाराष्ट्रात आले तेच मांडलिकीच्या सनदा घेवून.) राहिले. आधीच निर्बल-कंगाल-लुटल्या गेलेल्या प्रांतांवर स्वा-या करणे, रयतेजवळ जे उरले-सुरले आहे तेही लुटने हा मराठ्यांचा एकमेव उद्योग बनला. त्यामुळे उत्तरेत मराठे रयतेच्या मनात कधीही आत्मीयतेचे स्थान मिळवू शकले नाहीत, हे वास्तव आजही अनुभवाला येते. याचा फटका पानिपत युद्धात बसला. ज्या तख्तासाठी म्हणुन ते पानिपतवर लढायला गेले, त्या तख्ताचे त्यावेळीचे स्वयंघोषित दोन्ही पातशहा दुरुन तमाशा बघत बसले. एकही मुस्लिम सरदार त्यांच्या बाजुने आला नाही....याचे एकमेव कारण म्हणजे मराठ्यांची पराकोटीची स्वार्थलोलुपता आणि त्याआधारीत सोयीचे राजकारण. 


१७५२ मद्धे नादिरशहानंतर पुन्हा शाह वलीउल्लाहच्या जिहादी प्रेरणेने अब्दालीने पहीली स्वारी केली. दुस-या स्वारीच्या वेळीस सफदरजंगाने पातशहाच्या वतीने मराठ्यांशी अहदनामा (तख्ताच्या रक्षणाचा करार) केला. नंतर याच प्रकरणी सफदरजंगालाही दुखावले. पुढे अब्दालीने तीन वेळा भारतावर स्वा-या केल्या, दिल्ली लुटली...लुट घेवून गेलाही...पण मराठे अहदनामा पाळायला आले नाहीत. एकदाही अब्दालीशी भिडले नाहीत. हा एका प्रकारे अहदनाम्याचा भंगच नव्हता का?


मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले याचा आपल्याला खुप अभिमान वाटत असतो...पण त्यांत काही पराक्रम होता असे इतिहासातुन दिसत नाही. अब्दालीने चार वेळा स्वा-या करुन पार नागवलेल्या, उध्वस्त केलेल्या प्रदेशात घुसणे हे खरे तर राजकीय आणि आर्थिक दु:साहस होते. आणि त्याचे फळ हे कि अटकेपार झेंडे रोवुनही राघोबादादा कोटभराचे कर्ज करुन आला. आणि ते स्वाभाविकही होते. राघोबादादाला नानासाहेब पेशव्यांनी या कर्जप्रकरणी दोष दिला. नवी लुट मिळायला अब्दालीने काहीतरी सोडायला तर हवे होते ना याचा तारतम्यभावाने नानासाहेब पेशव्यांनी विचार केल्याचे दिसत नाही. पुढे पानिपतच्या मोहिमेतुन त्यांचे नाव वगळले हे सर्वस्वी अन्याय्य होते. राघोबादादाला उत्तरेचा अनुभव होता आणि तो लढवैय्या तरी होता...पण त्य्याच्या ऐवजी फडावरच्या कागदोपत्त्री मुत्सद्दी भाऊंची निवड या युद्धासाठी केली गेली याबद्दल शेजवलकरांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे आणि ते संयुक्तिकही आहे. भाऊला प्रत्यक्ष युद्धाचा कसलाही अनुभव नव्हता. 


दरम्यान मराठा सरदारांतही फुटीचे चित्र निर्माण होवू लागले. शिंदे-होळकरांत वैमनस्य निर्माण झाले. जातीयवाद बोकाळला. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची ठिणगी तेथेच पडली. "एक नजिब खली राहिला आहे....त्याचे पारिपत्य कराल तर पेशवे तुम्हास धोतरे बडवावयास लावतील..." असे जुन १७५८ च्या पत्रात मल्हारराव होळकरांनी दत्ताजी शिंदेस लिहिले. तर पेशव्यांनी अन्यत्र "शुद्र मातला आहे..." असे नमुद केले. याचा अर्थ मराठ्यांत कोणत्याही धोरणाबाबत एकवाक्यता नव्हती. जातीय गंड निर्माण झाले होते...बलाढ्य सरदार पेशव्यांना जुमानत नव्हते...असते तर नजिबखान रोहिला तावडीत सापडल्यानंतर राघोबादादाची इछ्छा त्याला ठार मारण्याची असतांनाही केवळ होळकरांच्या अभयदानामुळे त्याची मुक्तता झाली नसती...कदाचीत पानिपत युद्धही मग झालेच नसते.


अहदनामा झाल्यापासुन तीन वेळा अब्दालीने स्वा-या करुनही तिकडे न फिरकलेले पेशवे याच वेळीस का गंभीर झाले आणि भाऊसाहेबांच्या व विश्वासरावांच्या नेत्रुत्वाखाली एवढे सैन्य तिकडे पाठवले? जर बुराडी घाटातील धामधुमीत दत्ताजी शिंदे अपघाती पडले नसते तर पेशव्यांनी हे पाऊल उचलले असते की नाही हा एक प्रश्न आहे. 


पण लढायचे होते काय ? 


पानिपतच्या युद्धाचा सारा घटनाक्रम पाहिला तर भाऊला खरोखर अब्दालीशी भिडायचे होते असे दिसत नाही. पानिपतचे युद्ध हे अपघात होते असे नाईलाजाने म्हणावे लागते. या स्वारीत भाऊ लाखो यात्रेकरु व बुणग्यांचे ओझे घेत अत्यंत संथपणे प्रवास करतांना दिसतो. त्याला युद्धाची घाई दिसत नाही. उलट अब्दाली गेल्या वेळीस जसा परभारे निघुन गेला तसाच याहीवेळी जाईल अशी आशा त्याला असल्याचे दिसते. या काळात तो अन्य मुस्लिम सरदार ते हिंदू राज्यकर्त्यांना युद्धात सामील होण्याचे आवाहन करणारे खलिते मात्र पाठवतांना दिसतो. शिवाय त्याला आपल्या सरदारांत मनैक्य नाही याचीही जाण असलेली दिसते. ज्या शुजाउद्दौल्ल्याच्या अयोध्या प्रांतावर दत्ताजी शिंदे खंडणीसाठी नजिबाच्या मदतीने स्वारी करायला निघाला होता, त्याच शुजाला आपल्या बाजुने वळवण्याचे वा त्याने तटस्थ रहावे असे प्रयत्न करतांना भाऊ दिसतो. पण ज्याचा बाप, सफदरजंग, मराठ्यांच्या स्वार्थलोलुपतेमुळे हाय खावुन मेला तो मराठ्यांच्या बाजुने उभा राहील ही अपेक्षाच चुकीची नव्हती काय? 


पण ज्या तख्ताच्या रक्षणासाठी भाऊ येवढा सरंजाम घेवून निघाला होता, त्याच तख्ताचा मराठ्याना मान्य असलेला पातशहा अली गौहर मात्र बिहारमद्धे जावुन तमाशा बघत राहीला होता. त्याने मराठ्यांना मदत करावी असा तख्ताच्या सरदारांना एकही आदेश काढला नाही. इकडे मराठे उपासमारीने मरु लागले होते. जनावरे दानापाण्याअभावी मरत होतीच. पोटाला मिळावे म्हणुन कुंजपु-यावर हल्ला केला. केवळ येथे आणि येथेच, ज्या इब्राहिमखान गारद्याची पलटनी सेना आणि तोफखाना कामाला आला. खुद्द पानिपत युद्धात त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. 


कुंजपु-यात एक विजय काय मिळाला मराठे निघाले कुरुक्षेत्राकडे तीर्थयात्रा करायला. याच दर्म्यान २५-२६ ओक्टोबर १७६० ला अब्दालीने पराकोटीचे साहस करुन बागपतजवळ पुराने अलांघ्य झालेली यमुना ओलांडली. तेंव्हा मराठे सोनपतजवळ होते. अब्दालीने यमुना ओलांडली या वार्तेने मराठ्यांना एवढी धडकी भरली कि ते जे पळत सुटले ते सरळ पानिपत येथे येवून पोहोचले. पानिपत हे युद्धस्थळ पुर्वनियोजित नव्हे तर अपघाताने स्वीकारावे लागलेले एक संकट बनले ते असे. 


येथे मराठ्यांनी जवळपास अडीच महिने तळ ठोकला. अब्दालीवर मात करण्याच्या मराठ्यांकडे आधी सुविधा होत्या....संध्याही होत्या. याही प्रदिर्घ काळात भाऊ सर्वकश युद्धाच्या योजना न करता तहाचाच प्रयत्न करतांना दिसतो. त्याच वेळीपण सरदारांतील जातीय तेढींमुळे एकदा अब्दालीला पराजित करण्याची संधी गमवावी लागली. एकेक सरदार व्यक्तिगत लढला तर दुसरे काय होणे अपेक्षित होते? बळवंतराव मेहेंदळ्यानी केवळ इरेला पेटुन हकनाक प्राण गमावले व आधी विजयाची संधी असतांना शिंद्यांना मदत केली नाही याचे प्रायश्चित घेतले...पण मराठ्यांना त्याचा लाभ काय झाला?


पलायन......


१४ जानेवारी १७६१ रोजी मराठे जिंकु किंवा मरु या भावनेने अब्दालीच्या सेनेवर तुटुन पडले हे खरे नाही. सत्य सांगते ती आदल्या रात्रीची सर्वांची मसलत: "गिलच्यांचे बळ वाढत चालले. आपले लष्कर पडत चालले......तेंव्हा हा मुक्काम सोडुन बाहेर मोकळे रानी जावे...दिल्लीचा राबता सोडुन दुसरीकडे जाउ...पण झाडी मोठी मातब्बर....गिलचा जावू देणार नाही...यास्तव बंदोबस्ताने निघावे." म्हणजे निकराच्या युद्धाचा बेतच नव्हता. करायचे होते ते सुरक्षीत पलायन. आणि अशा सुरक्षीत पलायनासाठी इब्राहिमखान गारद्याने विलायती पद्धतीच्या गोलाची कल्पना सर्वांना समजावुन सांगीतली. होळकर त्याशी सहमत नव्हते. पण भाउंचा गारद्यावरच सर्वाधिक विश्वास होता. त्यामुळे त्याचीच कल्पना मान्य झाली. दुस-या दिवशी गोलाची सुरक्षित रचना करुन मराठे यमुनेच्या दिशेने सरकु लागले. गारद्याचे ऐकले असते तर कदाचित एवढी हानीही झाली नसती. पण विलायती पद्धतीच्या गोलाची वैशिष्ट्ये न समजलेले विट्ठल शिवदेव व दत्ताजी गायकवाड गोल मोडुन अमीर बेग व बरखुरदाराच्या वाट अडवायला आलेल्या सैन्यावर तुटुन पडले. गारद्याचा तोफखाना मग कुचकामी ठरला. हातघाईच्या लढाईला तोंड फुटले. असे काही होईल याबाबतीत अनभिद्न्य असलेल्या भाऊने कसलीही पर्यायी योजना बनवलेली नव्हती. उलट युद्ध ऐन भरात असतांन होळकरांना निघून जायला सांगीतले. साबाजी शिंदे, खानाजी जाधव, जानराव वाबळे असे सेनानीही त्यामुळे निघुन गेले व सुरक्षीत सटकले. सेनापती म्हणुन भाऊची ही गंभीर चुक होती. पुढे काय झाले हे सर्वद्न्यातच आहे. मराठे या युद्धात नंतर ज्या शौर्याने लढले त्याला जागतीक इतिहासात तोड नाही, पण योजनाच नीट नसल्याने विनाश आणि पराजय अपरिहार्य झाला. 


मराठ्यांची या युद्धात अतोनात हानी झाली. मोगल तर मोडकळीस आलेच पण अन्य हिंदु सत्तांनाही नवी राजकीय पोकळी भरुन काढता आली नाही. नागपुरकर भोसल्यांचा अशाच चुकामुळे बंगालमद्धे पाय रोवलेल्या इंग्रजांना संधी मिळाली. दिल्लीच्या तख्ताचे पारतंत्र्य जावुन इंग्रजांची गुलामी स्वीकारायची वेळ आपल्यावर आली. कारण देशाचे एकंदरीत राजकारणच भरकटत गेले. धर्म-जातीय विग्रहाची बीजे तिकडे शाह वलीउल्लाहने पेरली, तशीच इकडे मराठेही फक्त "मराठे" न राहता जातीयतेत अडकत गेले त्याची ही एक अपरिहार्य राष्ट्रीय शोकांतिका होती. 


इतिहास हा शिकायचा असतो तो त्याचे उदातीकरण करत आपल्या सुप्त भावनांना मलम लावण्यासाठी नव्हे तर त्या इतिहासाचे तटस्थ आकलन करुन घेत त्यातुन बोध घेण्यासाठी. पण आपण काहीच शिकलो नाहीत हे आजही ज्या पद्धतीने जातीवाद/धर्मवाद फुलवला जात आहे त्यावरून लक्षात येईल. आपण नवे पानिपत घडवण्याचा चंग तर बांधला नाहीय ना? 


लेखक - संजय सोनवणी,  ९८६०९९१२०५, (....आणि पानिपत" या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक.)

संग्रह - राज जाधव.....! 

Thursday 1 November 2012

भिम कविता.....!

भिम कविता.....! 
बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...!  

मित्रा ,

त्यांनी त्रिशुलाचे वाटप 

धर्मरक्षणासाठी केले म्हणे 

तू मात्र भेगाळलेल्या जमिनीत 

पंचशील पेरीत बसलास 

त्यांना धर्मासाठी 

माणसे कापलेली चालतात 

तू मात्र माणसांसाठी 

धर्म बाजूला सारत गेलास 

ते काढतीलच त्रिशूल बाहेर कधी नं कधी 

धर्मयुद्धासाठी 

तोवर तू शांत बस 

पण त्रिशुलाच्या टोकावर 

माणसं तरंगू लागतील तेव्हा 

तुझ्या अंगणातील बोधीवृक्षाला 

तू तलवार टांगून ठेव .

 कवी मच्छिंद्र चोरमारे, नागपूर...!

______________________________________________________

लाजतो कशाले ??


मह्या भीमाच्या नावावर

तू मरू रायले खिशाले 

मंग 'जय भीम' घालतानाच 

भऊ, लाजतो कशाले ?

भिमामुळे तं मिळाली तुले 
बगला, गाडी-माडी
तुही बायको बी नेसू रायली आज टकाटक साडी 
अन भिमामुळे तं मिळाली तुला खुर्ची बसाले. मंग .....
भिमामुळे तं भाऊ तुहा

पोरगा साळत जाऊ रायला 

अन कालरशिपच्या भरवशावर

सायब व्हयून ऱ्हायला

सुटा-बुटाच्या डरेसात लावतो पेन खिशाले . मंग....
शायनीत हिंडू रायला 

अन करू रायला थाट

भिमामुळ तं गेला भाऊ

तुह्यावाला सारा बाट

मांजरावाणी राहत होता, आता पिळू रायला मिशाले. मंग....
ज्याच्यामुलं गड्या 

तू सुखानं जगू रायला

त्या भीमा-बापाशीच कामून 

फटकून वागू रायला ??

बोला ना 'जय भीम' जोराने, ताण पडू दे ना घशाले.
मंग 'जय भीम' घालतानाच 
भाऊ, लाजतो कशाले ?


 कवी शेख बिस्मिल्ला, मु.पो. सोनोशी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा

_______________________________________________________
माझा भीमराणा 
नव्हता कोणा समान माझा भीमराणा...!
ना गांधी समान ना नेहरू समान
ना कधी गांधीसारखा दहावीत नापास झाला
ना कधी नेहरू सारख्या त्याने पोरी फिरवल्या
असा होता माझा भीमराणा...!
ना गांधी सारखा हडकुळा
ना नेहरू सारखा काटकुळा 
धिप्पाड देहयष्टी स्पष्ट वक्ता 
असा होता माझा भीमराणा ...!
लढला तो जीवनभर दलितांसाठी
पण कधी हाती तलवार या बंदूक घेतली नाही
ना टिळकांसारखी अंधश्रधा बाळगली (गणपती बसवून)
असा होता माझा भीमराणा....!
पांडित्यपूर्ण शैली त्याची भाषणाची 
दमदार  लेखणी कसदार वाक्य रचना
कधी उपोषणास ना बसला
कारण रोजच त्याला उपवास घडत असे
१ चाय आणि १ पाव खावून राहावे लागे
मग वेगळा उपवास करायची गरज काय
पण कधी ना हरला ना कधी झुकला
असा होता माझा भीमराणा...!

कवी - विनोद पवार
_______________________________________________________

बापाचा बाप
बापाचा  बाप भीम माझा होता
झाला नाही तैसा आजवर नेता //
अस्पृश्य जनता होती अंधारात
क्रांती केली ऐसी आणली माणसात
कार्य ऐसे कोणा जमणार ना आता // १ //
अंधरूढी अंधश्रद्धा गाडील्या भीमाने
मनूच्या मनुस्मृतीला जाळिले भीमाने
दिधला ज्याचा धम्म तो बुद्ध होता // २ //
ज्ञानाचा सागर होता भीम माझा
जगात त्याचा होई गाजावाजा
घटना ऐसी लिहिली तो बुद्धिदाता // ३ //
बावीस प्रतिज्ञा औषध दिधले
सन्मार्गाने जगण्या पाळा ते वदले
विनोदा तो होता आपला मार्गदाता // ४ //
कवी - विनोद पवार
__________________________________________________
मातीचे सोने झाले भीमा तुझ्या मुळे


जीवनात सुख आले भीमा तुझ्या मुळे

 ज्वलंत  संघर्षाची चाखतो आम्ही गोड फळे

मानवा बुद्ध नीतीशी भीम पर्व हे जुळे

१४ ऑक्टोबरचा सोहळा महान

नाग लोकांची ती भूमी झाली पहा पावन
नील नभात नीला शालू ल्याली
आनंदाने रजनी निळी निळी झाली
अवतार घडले इथे देवांचे लाख जथे
तरीना मुक्ती पथे नाही कल्याण इथे
भीमाने वळविले विश्व हे बुद्धा कडे
भीम रायाने शिंपले पहा अमृताचे सडे

कवी - विनोद पवार
___________________________________________________
तुझ्यामुळे भीमा
तुझ्यामुळे भीमा सुख मिळे आम्हा
बुद्ध धम्माचे मंथन कळाले
सुख समृद्धी आंदन मिळाले ||
जाती यतेची हि लढाई तुम्ही जिंकिली
ज्ञानाची क्षितिजे सारी तुम्ही तोडिली
तुमच्या ज्ञानापुढे गगन हे ठेंगणे
तुम्हा हृदयाचे स्पंदन कळाले ||१ ||
देशाची घटना लिहून झाला घटनाकार
भाग्य देशाचे या थोर झाला शिल्पकार
घटना लिहिली अशी आहे बावनकशी
आम्ही घटनेला वंदन हे केले || २ ||
सनातनी हिंदुनी केले होते हैराण
माणूस न्हवे माणसातील होते सारे हैवान
बुद्धा शरण जावून विनोदा बौद्ध करून
बौद्ध धम्माचे इंधन तू दिधले || ३ ||

कवी - विनोद पवार
_______________________________________________________
काल रात्री स्वप्नात मह्या 'बाबा' आले,
मह्याकडे पाहताच 'धीरगंभीर' झाले.

बाबा म्हणाले, ' नागाच्या वंशजा आज काय विशेष माहित आहे तुला,
म्या म्हणल, 'बाबा माफ करा कालच 'गुरु पोर्णिमे' चा दिवस झाला,

'तुळसीच्या लग्नात' जेवुन हात धुतले की,
तितक्यातच 'मोहरम' आला '.

हातातल 'पुस्तक' दाखवत बाबा म्हणाले,
हे काय 'ओळखतोस' का या पुस्तकाला ?
मला वाटल बाबा आता घेतात माही 'शाला',
म्या बाबाला प्रामाणिकपणे म्हणलो,
माहित नाय बाबा थोडा शरमेने कंणलो,

बाबा म्हणाले, 'नागा हे तुझ्या मुक्तीच व्दार,
तुकारामाचा 'अभंग', शिवाजीची
'तलवार'
कबीराचा 'दोहा', बसवेश्वराचा
'सत्कार'
फुले, पेरीयारची 'कडक वाणी', शाहुचे 'सरकार'
जिजाऊची 'ममता' अन् बिरसाचा 'अधिकार'

एव्हढ सगळ ऐकाच पुस्तकात
म्या म्हणल बाबा,
याच नाव तरी काय ?
अन् तुम्ही सांगता ते कितपत खर हाय ?

बाबा म्हणाले,
'नागा, याचं नाव 'भारताचे संविधान'
फुटेल मुक्याला 'वाचा' अन् बहिर्याला 'कान',
दांभिकाला 'रट्टा' अन् स्त्रियांना
'आत्मसम्मान'
गरीबाला 'प्रेमाची साथ' अन् दुबळ्याला 'प्रथम स्थान',

मला आश्चर्य वाटलं,
मग म्या म्हणल बाबा,
'संविधान असतांना का हो
'खैरलांजी' घडावा,
'बाबरी मस्जिद' पाडुन का भाऊ आपसात लढावा,
शेतकर्याला 'आत्महत्या' करण्याचा प्रसंग का पडावा,
'स्त्रि-दलित अत्याचार' यात देह का सडावा,
'भ्रष्ट्राचाराच्या' पायी का आमचा पाय आडावा,
अन् 'गरीबाच्या पदरी' का तिरस्काराचा धोंडा पडावा

बाबा थोड्या वेळासाठी 'नाराज झाले'
पाहताच त्यांच्या 'डोळ्यात अश्रु' आले
म्या म्हणल बाबा, रडताय का तुम्ही ?
चुक झाली का माझी, गलत बोललो का मी ?

बाबा म्हणाले, नागा तुझ बरोबर आहे,
या सर्व गोष्टीची मलाही खंत आहे,

पण नागा,
'संविधान किती चांगले असेल तरी नाही फायदा होईल,
'मनुवादी' असतील चालवणारे मग ही 'मनुस्मृती' च राहिल,
मनुच्या राज्यात सर्व काही
'अराजक' होईल,
प्रत्येकजण 'अत्याचारात लाचारीत' राहील,

पण,
जर का 'बहुजन' संविधान आपल्या हातात घेईल
मग पुन्हा 'मुलनिवासि' यांचे राज्य येईल

तेव्हा राहणारच नाही कुणी
'तहानलेला उपाशी' ,
शेतकरी घेणारच नाही
'आत्महत्येची फाशी',
मग विषयच राहणार नाही
'अन्ना-केजरीवाल' पाशी,
'समीक्षा' करणार्याला 'अटल' दाखवु 'बिहार काशी',

मग 'साध्वी' चा नाद हटेल अन्
'स्वंय सेवका' चा पडदा फाटेल,
'कसाब' ला मृत्युदंड अन् पुन्हा
'अफजल' ला भिती वाटेल

'राजा अशोक-शिवाजीं' च्या स्वप्नाला साकार करु,
'भगवा निळा हिरव्या' रंगाला
'एकच रंगाचा' सार करु,

मग कोणी मनुच 'बाळ' तुम्हाला विभागणार नाही,
'रामदास' ला 'आठवेल' शहाणपण सत्तेसाठी झुकणार नाही,
'नक्षलवादी आतंकवादी' बुद्ध चरणी 'बंदुक' अर्पण करतील,
'विचारवादी' बनुन हक्क स्वाभिमानाने जगतील,

मग म्या म्हणल, 'बाबा हे केव्हा होईल,'
बाबा उद्गारले
'नागा,
विभागलेला 'मुलनिवाशी' जेव्हा एकत्र येईल,
अत्याचार करणार्याचा विरोध होईल,
जेव्हा 'संविधानाची माहिती' प्रत्येकापर्यत जाईल,
तेव्हाच 'बळीच राज येईल'
तेव्हाच 'बळीच राज येईल'

बाबाच्या 'डोळ्यात' आता एक
'तेज' वाटले,
खरच, राजेहो मला संविधानाचे
'महत्व पटले',

पण,
पाहताच बाबा....'अदृश्य' झाले,
अरे हे काय माझे 'स्वप्न' तुटले,

पण, 'बाबाच्या स्वप्नाला' आपण तुटु द्यायच नाही,
संविधानाच महत्व समजावुन देवु ठायी ठायी,
चला एकत्र होवुन 'अन्याया विरुद्ध लढु',
आता,
'बळीच राज्य आणल्या शिवाय राहायच नाही...,!'
आता,
'बळीच राज्य आणल्या शिवाय राहायच नाही.....!'



कवी: अभय भिमराव नागवंशी (नाग)
_________________________________________

आरक्षण

हे चिडवती बिनडोक , आरक्षणाच्यावरून

गेलो पुढे पहा आम्ही , ते शिक्षण घेवून ||

धुंद होवून प्रशासन करू, बदलू अवघ्या विश्वाला

भिमारायाने दिला आम्हा, स्पुर्ती रसाचा तो प्याला

त्या ज्ञानाच्या सागरा आम्ही गेलो या न्हावून || १ ||

फार कष्ट करून आम्ही, अशी मेहनत घेतली

फक्त आरक्षण घेवून, नाही सवलत लाटली

स्वाभिमानाने जगतो रे पाणी रक्ताच करून || २ ||

माणसाला माणसात, भीम बाबाने आणिले

तेव्हा गुणगान विनोदा, साऱ्या जगाने गायिले

लाज बाळगा तुम्ही थोडी नका दावू रे बोलून || ३ ||

कवी - विनोद पवार

_________________________________________

कोहिनूर हिरा
धन्य झाले माता पिता जन्माला भिवा, तो योग हा आला
१४ एप्रिल या दिनी जन्माला कोहिनूर हिरा ||
जाती यतेचा रे बळी तो बालपणी ठरला
चीड त्याच्या मनी आली पण नाही घाबरला
सडे तोड उत्तर तो देई भटाना, ज्ञान शक्तीच्या जोरा || १ ||
हक्क देण्या दलितांना खूप खूप शिकला
समाज्याच्या भल्यासाठी कधी नाही विकला
दलितांना दलितांचे हक्क ते दिले, सुटला थंड वारा || २ ||
नियतीचा खेळ पहा तो घटना भीमान लिहिली
अस्पृश्य हिणवनाऱ्यांची तोंडे काळी काळी जाहली
बौद्ध धम्म स्वीकारुनी केली ती क्रांती, विनोद पवारा || ३ ||
कवी - विनोद पवार
__________________________________________________

बुद्धं शरणं गच्छामी

अशक्य होते शक्य केले ,

माझ्या भीमरायानी

धम्म दिला तो आम्हा बुद्धाचा
बुद्धं शरणं गच्छामी //
एक , एक ना भले दोन,
दोन, दोन ना भले तीन
तिघांना हि गुरु मानले
बुद्ध फुले कबीर जाणले
चवदार तळे खुले केले
मनुस्मुर्तीला रे जाळली
जातीयता त्यांनी गाडली
शांती ने ती क्रांती केली , लढला रण मैदानी // १ //
सुख , सुख ना मिळाले
दु:ख पदरी ते आले
माणसाला माणूसपण दिले
घटना लिहून हक्क मिळविले
गांधीला जीवदान दिले
अन्यायाला वाचा फोडली
बडव्यांची ती वाचा पळाली
बुद्धीने ते युद्ध केले , विनोद रण संग्रामी // २ //

कवी - विनोद पवार
______________________________________________

वंदन

चला करू सारे वंदन भीमराया

ओ राया पडतो पाया आलो गुणगाया

तुझ्या सावलीची आहे छत्रछाया //

नियतीने तो सूड कसा उगविला

झिडकारीले ज्याला तो घटनाकार झाला

घटना अशी लिहिली देशा चालवाया //१//

झाले साकार जीवन तुझ्या जन्मामुळे

आला प्रकाश जीवनी तुझ्या येण्यामुळे

भौतिक या जगाचा विकास साधावया //२//

आठवा जयभीम करा समतेची चाल

भीम ऋण आठवा रे विनोदाचे हे बोल

चला व्हा आता सज्ज सत्ता गाजवाया //३//

कवी - विनोद पवार

____________________________________

शिल्पकार

विश्वात नाव गाजे भीमाचे घटनाकार

घटना अशी घडविली , ठरला तो शिल्पकार //

घटना बदलण्यासाठी लावाल हात कोणी

कापून टाकू हात खरी करू हो वाणी

सिंहाचे छावे आम्ही नाही कुणा भिणार //१//

तो रात दिन झटला घटना बनविण्यासाठी

रक्षण करूया तिचे घेवून हाती काठी

जगात नाही अशी ना कोणी ती लिहिणार //२//

आले किती रे गेले ना झाला त्या समान

भीमाच्या पेनावरती आहे देशाची कमान

विनोदा असा नाही कोहिनूर तो होणार //३//


_________________________________________________

जय भीम

माझ्या भीमाचे कार्य अनमोल


जय भीम बोल गड्या जय भीम बोल //
जय भीम म्हणण्यासाठी लाजतो कशाला

मग जीव दे जावुनिया जगतो कशाला
जय भीम श्वासात आमच्या आत खोल // १ //
आदर्श जीवन जय भीम जगण्याचा मार्ग
शील समाधी करुणा हा प्रज्ञेचा मार्ग
जय भीम ओळख आपली आहे बोल // २ //

नुसताच पोकळ जय भीम काहींच्या मुखात
तेहत्तीस कोटि देव असती देव्हाऱ्यात

त्यांनी बुद्ध धम्म वाचा रे सखोल // ३ //
जय भीमची गर्जना हि घुमू दे जगात
भीमाच नाव हे दुम दुमू दे जगात
बुद्ध धम्म विनोदा अनमोल // ४ //

कवी - विनोद पवार
_______________________________________________
संग्रह - अँड. राज जाधव...!!!  ________________________________________________