My Followers

Tuesday, 3 July 2012

पहिले धम्मचक्र प्रवर्तन - आषाढ पौर्णिमा...!!!

पहिले धम्मचक्र प्रवर्तन - आषाढ पौर्णिमा...!!!

                      

आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. यात आपले बहुजन, मूलनिवासी, आंबेडकरी सर्व जातीपातीचे लोक हि मागे नसतात. परंतु माझ्या बौद्ध, बहुजन, मूलनिवासी, आंबेडकरी बांधवाना हे सांगावेसे वाटेल कि आषाढपौर्णिमा हि गुरूपौर्णिमा नसून पहिले धम्मचक्र प्रवर्तन होय ...!!! 

सिद्धार्थ गौतम राजपुत्र असताना शाक्य-कोलियांमध्ये रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून वाद झाला. तो वाद एवढा चिघळला की युद्धाच्या निर्णयापर्यंत येऊन ठेपला. गणांमधील सर्व सभासद युद्धाच्या बाजूने उभे राहिले. परंतु राजपुत्र सिद्धार्थ गौतम मात्र एकटाच हा वाद युद्धाने नाही तर सामंजस्याने सोडविण्याच्या बाजूने उभा राहिला. त्यांना याचा परिणाम काय होईल याची पूर्व कल्पना असूनसुद्धा हा महान शांतिदूत आपल्या निश्चयावर खंबीर उभा राहिला. आपल्या तत्वावर त्यांची अढळ निष्ठा होती. राजपुत्र असून त्यांना रक्तपात मान्य नव्हता. कुणावर अन्याय करणे पसत नव्हते. सत्य-अहिंसा-शांती त्यांच्यात भिनलेली होती. दोन राज्यांमधील युद्ध टाळण्यासाठी त्यांनी आपली प्राणप्रिय पत्नी यशोधरा, प्रिय पुत्र राहूल आणि वृद्ध माता-पित्याचा, ऐश्वर्याचा त्याग करुन देशत्यागाची तयारी दर्शविली. ऐश्वर्यात लोळणाऱ्या सिद्धार्थ गौतमाने मुंडन केले. राजवस्त्रांचा त्याग करुन काशाय वस्त्र परिधान केले. सर्व अलंकार काढून अनवानी पायाने काट्या गोट्यांमधून पाय रक्तबंबाळ होईस्तोवर चालत राहिले. तब्बल सहा वर्षे त्यांनी आपल्या देहाला अनंत यातना दिल्या. अन्नपाणी त्यागून घोर तपस्या केली. तरी त्यांना दु:खाचे मूळ कारण कोणते याचा शोध लागला नाही. शरीर हाडांचा सापळा झाले होते. पाठ आणि पोट एक झाले होते तरी त्यांना सत्याचा शोध लागला नव्हता. परंतु पिंपळ वृक्षाखाली त्यांनी सुजाताच्या हातची खीर ग्रहण केली. तृप्त मनाने आणि शांत चित्ताने त्यांनी विचार केला. त्यांच्या डोक्यात विचारांचे आंदोलन सुरु झाले. त्यांना एक वेगळीच उर्जा पिंपळवृक्षाखाली मिळाली. तिथेच त्यांना ज्ञान प्राप्त झाले. एका नव्या सत्याचा आणि दु:खाच्या मूळ कारणांचा शोध लागला. तो दिवस होता आषाढ पौर्णिमा. त्यांनी मग निरंजन नदीच्या पात्रातील थंडगार पाणी प्राशन केले. आणि त्यांना मिळालेले दिव्य ज्ञान आपल्या पाच शिष्यांना सांगितले. त्यांना प्रथम ज्ञानामृत पाजले. तेच त्याचे पहिले धम्मचक्र प्रवर्तन ठरले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. वयाच्या चौतीस-पस्तिसाव्या वर्षी मिळालेले ज्ञान सतत अखिल मानव जातीला ते पंचेचाळीस वर्षे वाटत राहिले. ज्ञानाचा प्रकाश पेरत राहिले. जिथे जातील तिथे प्रवचन करुन ते शिष्णगण जोडित राहिले. त्यांनी अंधश्रद्धा, मोक्ष, यज्ञ, ईश्वर, अशा थोतांड कल्पनांवर कडाडून विरोध केला. सत्य, अहिंसा, करुणा, मैत्री, समता, बंधुता आपल्या करुणामय वाणीने प्रभावीपणे सांगत फिरले. पाहता पाहता त्यांचा शिष्गण वाढत गेला. त्यांच्या शिष्णगणात वर्णभेद, वंशभेद, उच-नीच, लिंगभेदाला मुळीच स्थान नव्हते. बुद्धाचा संघ हा समताधिष्ठीत होता. त्यांचा धम्म हा जीवन जगण्याचा मध्यम मार्ग होता. शरीराचे जसे फाजील लाड करणे अहितकारक आहे तसेच शरीराला अति पीडा देणे हेसुद्धा हानिकारक आहे, असे त्यांचे साधे सरळ तत्वज्ञान होते. हे तत्वज्ञान त्याकाळच्या लोकवाणीमधून असल्याने लोकांच्या हृदयाला थेट जाऊन भिडत असे. त्यांची प्रभावी वाणी, शांत संयमी, स्वभाव, दृढ विश्वास, चालण्याची लकब एवढी प्रभावी होती, की मनोरुग्ण, क्रूर व्यक्ती, दरोडेखोरसुद्धा त्यांच्या एका वाक्याने भानावर येऊन त्यांच्या संघात सामील होऊन धम्म प्रसाराचे महान कार्य करीत असत. म्हणूनच अशा सम्यक संबुद्ध तथागत गौतम बुद्धांना जगातील पहिला मनोवैज्ञानिक म्हणून गौरव प्राप्त झालेला आहे.


भगवान बुद्ध निर्वाणपद प्राप्त होईपर्यंत अविरत पायी फिरत राहिले. धम्मप्रसार करीत राहिले परंतु त्यांनी कधीही ध्यान, साधना, विपश्यना यासारख्या आत्ममग्न, आलकेंद्री निर्हेतूक कृतीत निरर्थक स्वत:ला अथवा शिष्यगणांना गुरफटून ठेवल्याचे दिसत नाही. या गोष्टीचा त्यांनी कुठे उल्लेखसुद्धा केलेला नाही. परंतु पुढे-पुढे खरा बुद्ध बाजूला सारुन त्याला आध्यात्मिक स्वरुप प्राप्त झाले. महायान, तंत्रयान, वज्रयान आणि सहजयान या पंथांनी समाधी, ध्यान, विपश्यना हे वैदिक प्रकार धम्मात आणले. ज्यांनी आपली सहा वर्ष शरीराला पीडा देऊन व्यर्थ घालविली म्हणून पश्चाताप व्यक्त केला, त्याच गोष्टी बुद्धांच्या माथी मारल्या गेल्यात. या पंथांनी बुद्धाचे तत्वज्ञान चुकीच्या दिशेने नेऊन ठेवले. सम्राट अशोकांच्या काळात बुद्ध धम्माला राजाश्रय मिळाला. तो काळ बौद्ध धम्माच्या भरभराटीचा काळ होता. चौऱ्यांशी हजार स्तूप सम्राट अशोकांनी निर्माण केलेत. मुलगी संघमित्रा आणि पुत्र महेन्द्र यांना धम्मप्रसारासाठी प्रेरित केले. परंतु धम्मनायक सम्राट अशोकांचा नातू बृहद्रथाचा खून पुष्पमित्र शुंगाने कपटाने केला. बऱ्याच बौद्ध भिक्खूंच्या कत्तली केल्यात आणि तेव्हापासून बौद्ध धम्माचा ऱ्हासाला सुरुवात झाली असे म्हटले जाते. ब्राह्मणी संस्कृतीने बुद्धाला विष्णूचा अवतार मानले. बऱ्याच निरर्थक गोष्टी ज्या बुद्ध तत्वज्ञानाच्या विरोधक आहेत, अशा गोष्टी हेतूपुरस्सर बौद्ध धम्मा घुसडविल्या गेल्या. अध्यात्म, आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म, देव, स्वर्ग, नरक, ध्यानसाधना, समाधी अशा बुद्धतत्वज्ञानाच्या विरोधातील गोष्टी लादल्या गेल्या. लोकांना ध्यानसाधनेच्या, मौनव्रत धारण करण्याच्या नावावर त्यांची कार्य शक्ती, विचार शक्ती, बुद्धिप्रामाण्यवाद हिरावून घेऊन त्यांना फक्त डोळे मिटवून बसण्यास सांगितले जाते, असे केल्याने शारीरिक मानसिक व्याधी नष्ट होते, व्यक्तिमत्व सुधारते अशा आपापल्या परीने कल्पीत गोष्टी पसरविण्याचा गोरखधंदा बरीच मंडळी करीत आहेत. आणि बौद्ध धम्मीयांना खऱ्या बुद्धतत्वज्ञानापासून दूर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

बुद्ध धम्माला संवर्धित करण्याचे महान कार्य आजच्या बौद्ध भिक्खूंनी करायला हवे. काही भंतेजी ते कार्य करीतसुद्धा आहेत. पण त्यांची संख्या नगण्य आहे. त्यांच्या कार्याप्रती बौद्ध समाज कृतज्ञ आहे. परंतु मोठ्या दु:खाने आणि खेदाने म्हणावेसे वाटते की बौद्ध भिक्खूंनी खरा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक बुद्ध जनतेपर्यंत पोहोचविलाच नाही. लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म सांगण्यापेक्षा पारंपारिक तसेच आध्यात्मिक बुुद्ध सांगितला जातो.
आज जग विनाशाच्या मार्गाने जात आहे. युद्धाचे काळे ढग जगावर थैमान घालीत आहेत. अशा प्रसंगी बुद्धाच्या शांती, अहिंसेचा मार्गच उपकारक ठरत आहे. जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे. असे असताना जर आपण बुद्ध धम्माच्या शांती, अहिंसेचा, वैज्ञानिक, दृष्टिकोनाचा, समता, बंधुत्वाचा, प्रज्ञा, शील, करुणेचा मार्ग न धरता आध्यात्मिक मार्ग अवलंबिला तर मानसिक गुलाम बनून बाबासाहेबांचा वैचारिक बुद्ध नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही. परिणामी आपली अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपली दृष्टी उघडी ठेऊनच कुठलाही निर्णय घेणे उचित ठरेल, नाही की डोळे बंद करुन. चार चार तास ध्यान समाधी लावून बसण्यापेक्षा तेवढाच वेळ जर धम्मावरील ग्रंथ वाचण्यात तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ संपदा व इतर वैचारिक पुस्तके वाचण्यात आणि समाजकार्य करण्यात जर आपला वेळ खर्ची घातला तर ध्यान साधनेपेक्षा लाख पटिने उत्तम राहील. आपल्या बुद्धीला वेगळीच वैचारिक धार चढून ती सुपीक बनेल. येणारी भावी पिढीसुद्धा प्रगल्भ बुद्धिमत्तेची निपजेल. ध्यान साधना करण्यात जर जास्त वेळ घालविला तर मनुष्य मानसिक रुग्ण बनू शकतो, असे डॉक्टरांचेसुद्धा मत आहे.

डॉ. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य अन्यायाविरूद्ध संघर्ष करण्यात घालविले. हा महामानव शेवटच्या क्षणापर्यंत ग्रंथ वाचनात आणि लेखनात मग्न होता. बौद्ध धम्माला विकृत स्वरुप देण्यासाठी, आमची कार्यशक्ती नष्ट करण्यासाठी, आम्हाला मानसिक गुलाम बनविण्यासाठी हेतूपुरस्सर दुसऱ्या धर्मातील मंडळी विपश्यनेसारखे खूळ बौद्ध धम्मात घुसडवित आहोत आणि आमची भोळी भाबडी जनता त्याला बळी पडत आहे. आमचे भिक्खुसुद्धा विपश्यनेच्या मार्गाला लागलेले आहेत. आपण फार मोठे धम्म कार्य करीत आहोत, अशा आविर्भावात वावरत असतात. ही मंडळी लोकांना बुद्ध तत्वज्ञानापासून दूर नेत आहेत. धम्मात अंधश्रद्धा पसरविण्याचे कटकारस्थान करीत आहेत. म्हणूनच आज विपश्यनेची नाही तर बाबासाहेबांच्या वैचारिक बुद्धाची आवश्यकता आहे. कारण या नव्या शतकाने जसे मानवी विकासाचे अनेक मार्ग खुले केलेत, तशाच अनेक समस्याही निर्माण केल्या आहेत. भारतीय मानसिकतेचा विचार करताना इथे आध्यात्मिक तत्वज्ञानाचा आधार घेऊन माणसांना संघर्षापासून परावृत्त केले जात आहे, जीवनविकासाच्या मार्गापासून परावृत्त करुन मानसिक गुंगीद्वारे गुलाम बनविण्याची कारस्थाने वाढली आहेत. मानसिक शांतीच्या नावाखाली आध्यात्मिक थोतांड गळी उतरविलं जात आहे. अशावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चालता फिरता बुद्धच मानवतेला न्याय देऊ शकतो, हे ध्यानात ठेवणे अत्यंत जरुरी आहे. म्हणूनच आज संपूर्ण विश्वाला  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक बुद्धाची आवश्यकता आहे. 
माझ्या बौद्ध, बहुजन, मूलनिवासी, आंबेडकरी बांधवानी आषाढपौर्णिमा हि गुरूपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणून साजरी न करता पहिले धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून  साजरी  करावी

                          
(मराठवाडा नेता मधून साभार)

3 comments:

  1. माझ्या बौद्ध, बहुजन, मूलनिवासी, आंबेडकरी बांधवानी आषाढपौर्णिमा हि गुरूपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणून साजरी न करता नसून पहिले धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरी करावी.

    ReplyDelete
  2. माझ्या बौद्ध, बहुजन, मूलनिवासी, आंबेडकरी बांधवानी आषाढपौर्णिमा हि गुरूपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणून साजरी न करता नसून पहिले धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरी करावी.

    ReplyDelete
  3. राज दादा मूलनिवासी चा अर्थ सांगावा

    ReplyDelete