My Followers

Friday, 27 July 2012

बुद्ध व्हा... शुद्ध व्हा....!!!

बुद्ध व्हा... शुद्ध व्हा....!!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदूधर्म सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मुंग्यांना साखर देवून दलितांना माणूसपण नाकारणाऱ्या कर्मठांच्यात मात्र बदल होण्याची चिन्हे दिसत नव्हती तेंव्हा बाबासाहेबांनी "येवले' मुक्कामी सन 1935 मध्ये 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही' अशी भीमगर्जना केली.  नंतर तब्बल 1956 पर्यंत विविध धर्मांचा अभ्यास केला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी मूळनिवासी नाग लोकांची भूमी असलेल्या नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि आपण स्वत: आपल्या लाखो अनुयायांना धम्मदीक्षा दिली. त्यामुळेच आजही नागपुरच्या या ऐतिहासिक भूमीवर विजयादशमी दिवशी भीमसागराला भरती येते. नागपुरात जायचे ते बुद्ध आणि शुद्ध होण्यासाठी.
     बाबासाहेबांनी भारतीय संस्कृती जपणारा, समता, स्वातंत्र्य, बंधुता या त्रीसुत्रीचा पुरस्कार करणारा, माणूस आपल्या कर्तुत्वाने "बुद्धत्व' प्राप्त करू शकतो असा विचार रुजविणारा धम्म आपल्याला दिला. असे असताना आजही आपल्यातील काही करंटे हिंदू धर्मात त्यातील कर्मकांडात गुंतलेले दिसतात. अशा या करंट्यांना जागे करण्यासाठी एक भीमकवी म्हणतो.
महाड जाऊ, नागपुर जाऊ, 
कशाला गणपतीपुळा,
कशाला गणपतपुळा नी,
जयभीमवाल्यांचा नाद हाय खुळा!

       नागपुरला जाणाऱ्या मध्ये कट्टर बौद्ध जसे असतात तसेच यात हवसे, गवशे यांचा समावेश आहे. या हवशा, गवशांनी आता बदलायला हवं. नागपुरला जाणाऱ्याची संख्या आपण पाहिली तर यामध्ये गरिब, कष्टकरी, हतावरचे पोट असणाऱ्या पण बाबासाहेबांच्या विचाराशी इमान राखणाऱ्या आंबेडकरी जनतेची संख्या अधिक असते. ज्यांना आपण कट्टर भीमअनुयायी, बौद्ध म्हणू. ज्यांनी बाबासाहेबांच्या कृपेने मिळालेल्या सवलतीचा फायदा घेऊन उच्च शिक्षण, नोकऱ्या काबीज केल्या असा वर्ग मात्र नागपूर, चैत्यभूमी अशा ठिकाणी जाताना दिसत नाही. मोफत असलेल्या रेल्वेतून प्रवास करणे, बाबासाहेबांच्या नावाचा जय घोष करणाऱ्या, भीमगीत गात रेल्वेप्रवास करणाऱ्या समाज बांधवांमधून प्रवास करणे बहुदा यांना कमीपणाचे वाटत असावे. अर्थात या कालावधीत ही (सर्वच नोकरदार नव्हे. जे सामाजिक बांधीलकी जाणत नाहीत असे) पांढरपेशी मंडळी मात्र "दसरा सण मोठा' म्हणून नोकरीच्या ठिकाणी रजा टाकून ज्यांनी यांच्या टाळूला हजारोवर्षात तेल मिळू दिले नाही अशा देव देवताना तेल घालत फिरण्यात धन्यता मानतात. 80 च्या दशकात परिवर्तनाची गती अधिक दिसत होती. या कालावधीत लोक देव देवताना ठोकरताना दिसत होते. अलिकडे मात्र परिवर्तनाची चक्रे उलटी फिरू लागली आहेत की काय? असे वाटण्याइतपत परिस्थिती बदलली आहे. आजची पीढी आणि बहुतांशी नोकर वर्ग हा पुन्हा देवदेवतांच्या नादाला लागल्याचे दिसून येते, हे अत्यंत भयावह आहे. अर्थात त्यांची ही कृती म्हणजे बापाला बाप न मानण्याची प्रवृत्ती असल्याचे लक्षण आहे. 
     नोकरी मिळेपर्यंत या लोकांना समाजाची गरज लागते. एखादा नोकरी लागली ते जात ही चोरू लागतात. हे आजचे वास्तव आहे. विशेषत: प्राध्यापक, शिक्षक असा वर्ग यात आघाडीवर आहे. यांनी शुद्धीवर येणे गरजेचे आहे.
      हिंदू धर्म असो अथवा इतर कोणताही धर्म असो अशा धर्म प्रसार आणि प्रचार करणाऱ्यांचे काम अत्यंत युद्धपातळीवर सुरू असते. प्रवचन, किर्तन, भजन यामाध्यमातून ते सतत लोकांच्यावर बिंबवले जात आहे. त्यामानाने आपल्या धम्मप्रचार आणि प्रसाराचे काम खूप संथगतीने होत असल्याचे दिसून येते. किंवा जे होत आहे. त्याबाबत धम्मकार्य करणाऱ्या संस्था, संघटना आणि सन 1956 नंतरच्या भिक्खूंनी याबाबत अंतर्मुख होणे गरजेचे आहे.
      नागपूरला जात असताना मनाशी काही खूणगाठ बांधून गेले पाहिजे. नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर दीक्षा घेऊन आल्यानंतर 22 प्रतिज्ञा ग्रहण केल्यानंतर गंडे, दोरे, ताईत फेकून दिल्यानंतर त्यांनतर आपले आचरण शुद्ध बनविले पाहिजे. तरच त्या नागपूरच्या जाण्याला अर्थ राहील.
     आज बऱ्याच गावागावातून दिसणारे चित्र मन विषन्न करणारे आहे. लोक सकाळी विहारात जातात तर संध्याकाळी कुठल्यातरी देवळात जातात. काही ठिकाणी तर ज्यांनी अनेक वर्षे धम्मवर्ग चालविला अशी मंडळी आज पुन्हा हिंदू धर्माकडे वळलेली दिसतात. काहीनी तर बाबासाहेबांचे नाव दिल्याने अथवा जयभीम म्हटल्याने आपण सुरू केलेला धंदा, व्यवसाय चालणार नाही. म्हणून या उद्योग व्यवसायांना देवदेवतांची नावे देण्याचा धंदा केला आहे. त्यांचे हे वर्तन बाबासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्यासारखेच आहे. बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्या आणि जी मनुवादी विचारांची गढी उध्वस्त करण्यासाठी बाबासाहेबांनी जिवाचे रान केले ती गढी मजबूत करायला निघालेल्या सूर्याजी पिसाळांना हे कधी कळणार आहे कोण जाणे ? फक्त नागपूरला जाऊन येण्याने बौध्द होता येत नाही. त्यासाठी आचरण शुध्द हवे. 

     हातकणंगले तालुक्यातील एका आमदाराने धम्मचक्र प्रवर्तनादिवशी त्या गावातील समाजमंदीरमध्ये त्रीसरण, पंचशिल ग्रहण करण्याचा कार्यक्रम सुरू असताना समोरच असलेल्या दगडांना नारळ फोडून आपल्या भावजयीच्या प्रचाराची सुरूवात करावी यापेक्षा दुसरी शोकांतिका कोणती ?
    आज उच्चशिक्षीत, नोकरवर्ग चळवळीतून बाहेर आहे. तर चळवळ करणाऱ्या कांहींचे आचरण शुध्द नाही. त्यामुळे समाजाची अवस्था अत्यंत विचित्र बनली आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने जागृत झाले पाहिजे. अन्यथा विहारात आल्यावर नमोतस्स्‌ बाकी एरवी जसच्या तसं असे झाले तर आपली वाटचाल जयभीम बोलो और किधर भी चलो अशीच होत राहील.


(विद्याधार कांबळे यांच्या ब्लॉग वरून साभार 

No comments:

Post a Comment