My Followers

Sunday 23 December 2012

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण विचार.......!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण विचार.......!


आरक्षण म्ह़टले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतलेच जाते. पण या आरक्षणबाबात बाबासाहेबांचे नक्की काय विचार होते. ते समजून घेऊया त्यांच्याच शब्दात...... 

जातीय प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्रयत्न दोन प्रकारांनी केले जात आहेत. पैकी एक प्रकार म्हणजे भ्याडाने गुंडापुढे योजना सादर करणं व दुसरा म्हणजे गुंडाने नेभळटांना योजना मान्य करावयास लावणं हे होय. जेव्हा जेव्हा एखादी जमात बलवत्तर होत जाते व राजकीयदृष्ट्या फायद्याच्या मागण्यांचा पुरस्कार करते तेव्हा तेव्हा चांगले मत राहण्यासाठी तिला सवलती दिल्या जातात. तिने ज्या गोष्टींची पृच्छा केली आहे, त्याबाबतीत न्याय अन्यायाची पर्वा करण्यात येत नाही किंवा तिच्या अंगच्या चांगुलपणाबद्दलही काही निर्णय देण्यात येत नाही. याचा परिणाम असा होत आहे, की तिच्या मागण्यांना मर्यादा राहत नाही व तिला देण्यात आलेल्या सवलतीलाही काही मर्यादा राहत नाही. स्पृश्यांच्या शिक्षणासाठी आपापल्या वार्षिक बजेटमधून राज्य सरकारांनी व मध्यवर्ती सरकारने एक रक्कम बाजूला काढून ठेवावी अशी घटनेमध्येच तरतूद करण्याची मागणी केली पाहिजे. अशा त-हेची मागणी फक्त प्राथमिक शिक्षणाकरताच नव्हे, तर उच्च शिक्षणासाठीही केली पाहिजे. नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून आणि वरच्या दर्जाच्या सरकारी नोकरीच्या जागा भरण्याच्या दृष्टीने अस्पृश्यांना उच्चशिक्षणांची अतिशय आवश्यकता आहे. सरकारी नोक-यांमध्ये अस्पृश्यांसाठी काही ठराविक जागा राखून ठेवण्यात याव्यात व या जागा आवश्यक त्या कमीत कमी पात्रतेच्या नियमाप्रमाणे भराव्या हेही अत्यावश्यक आहे. 

अर्थात याचे कारण आम्ही कायदे वाईट असल्यामुळे यातना भोगतो आहोत असे नव्हे, तर वाईट शासनामुळे आम्हाला यातना भोगाव्या लागत आहेत. हे शासन केवळ हिंदू जातींच्या हाती असल्यामुळे वाईट झाले आहे. हे हिंदू शासनातही सामाजिक पूर्वग्रह घेऊन जातात व तत्वत: अस्पृश्यांना मिळावयास हवा असणारा लाभ कोणते तरी कारण दाखवून त्यांना मिळू देत नाहीत. जिथपर्यंत तुमचे शासन चांगले नाही तिथपर्यंत केवळ चांगले कायदे तुमचे कल्याण करू शकणार नाहीत. अस्पृश्यांपैकी काही लोक सरकारी नोक-यांच्या पदावर जेव्हा जातील. तेव्हाच खरे तर तुम्हाला चांगले शासन मिळेल. कारण हे लोक, हिंदू अधिकारी अस्पृश्यांशी कशा त-हेचे आचरण करत आहेत यावर नजर ठेवून त्याला आळा घालतील व काही टवाळकी करण्यापासून त्यांना रोखतील. याशिवाय केवळ राखीव जागांसाठी मागणी करणं पुरेसे नाही. तर या राखीव जागा ठराविक काळाच्या आत भरल्या जाव्या असा आग्रह धरणंही अत्यंत आवश्यक आहे. केवळ राखीव जागांपेक्षाही याचे महत्त्व अतिशय आहे. कारण तुम्ही काळ निश्चित केल्याशिवाय राखीव जागा अस्तित्वात येणारच नाहीत. काहीतरी कारणे दाखवून टाळाटाळ केली जाईल व अर्थातच नेहमीच्याच पण अर्तक्य कारणामुळे आपल्यामध्ये कोणी लायक उमेदवारच सापडणार नाही! आपणा सर्वांना माहीतच आहे, की नेमणूक करणारा अधिकारी जर एखादा हिंदू असेल, तर अस्पृश्यांमध्ये कोणीही योग्य उमेदवार नसतोच! 

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, केंदीय आणि प्रांतिक शासनामध्ये अस्पृश्यांना प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी तुम्ही आग्रह धरला पाहिजे. हे मूलभूत उपाय आहेत. ज्या लोकांच्या हाती ही मूलभूत शक्ती आहे ते परिस्थितीला हवी तशी वाकवू शकतात. अत्यंत भयावह अशा सामाजिक चेष्टांनाही ते आळा घालू शकतात व केवळ तेच सामाजिक, राजकीय व आर्थिक बाबतीत हितकर असे बदल घडवून आणू शकतात. या गुरुकिल्लीच्या जागी आपले प्रतिनिधी ठेवण्यात आलेच पाहिजेत असा आग्रह अस्पृश्यांनी धरला पाहिजे. या वेळी ही गोष्ट आश्वासनांवर किंवा रुढींवर मुळीच सोपवली जाऊ नये. परिस्थितीनुरूप हिंदूंनी दिलेल्या वचनावर मुळीच विश्वास ठेवू नये. यासंबंधी घटनेमध्ये तरतूद केली जावी, यावर दक्षतेने तुम्ही लक्ष दिले पाहिजे. अस्पृश्यांनी जिच्यासाठी आग्रह धरावा अशी एक शेवटची मागणी आहे. हिंदूंच्या खेड्यांव्यतिरिक्त अस्पृश्यांच्या स्वतंत्र व विभक्त अशा नवीन वसाहती स्थापन करण्याच्या योजनेसंबंधी मी बोलत आहे. इतक्या हजारो वर्षांपासून अस्पृश्य लोक हिंदूंचे दास व गुलाम होऊन का राहिले आहेत? माझ्या मते या प्रश्नाचे उत्तर हिंदू खेड्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमध्ये आहे. हिंदूंच्या या प्रत्येक खेड्याला अस्पृश्यांची एकेक लहानशी वसाहत जोडलेली आहे. त्या खेड्यातील हिंदूंच्या लोकसंख्येच्या मानाने अस्पृश्यांची संख्या फारच लहान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, या अस्पृश्यांच्या वसाहतीजवळ आर्थिक साधने नाहीत आणि प्रगतीची त्यांना संधीही नाही. ही कायमची भूमिहीन लोकांची वसाहत असते. अस्पृश्य असल्यामुळे ते कोणतीही वस्तू विकू शकत नाहीत. कारण अस्पृश्यांपासून कोणीही काहीही विकत घेत नाही. ही वसाहत पूर्णत: कंगालांची, पोटासाठी हिंदू लोकांवर अवलंबून असलेली वसाहत असते. ती भिक्षेवर किंवा क्षुल्लक मजुरीवर काम करून कसाबसा उदरनिर्वाह करत असते. अशा परिस्थितीत अस्पृश्य शेकडो वर्षे केवळ अवमानित अवस्थेत का राहिले असतील याची कल्पना सहज करता येण्यासारखी आहे. जिथपर्यंत सध्याच्या रूपात ही खेडेपद्धती अस्तित्वात आहे तिथपर्यंत अस्पृश्यांना स्वातंत्र्य प्राप्त होणार नाही. मग ते सामाजिक असो की आर्थिक. सामाजिक आणि आर्थिक पारतंत्र्यामुळे त्यांच्या निर्माण झालेला हीनगंड कधीही नाहीसा होणार नाही. म्हणूनच ही खेडेपद्धती मोडून टाकली पाहिजेय या खेडेपद्धतीमुळे हिंदूंनी अस्पृश्यांवर गुलामगिरीची जी मगरमिठी बसवली आहे तितून अस्पृश्यांची मुक्त होण्याची खरी इच्छा असेल तर त्यांना हा एकच मार्ग मोकळा आहे. 

केंदीय सरकारच्या खर्चाने केवळ अस्पृश्यांसाठी नवीन स्वतंत्र वसाहती स्थापन करण्याची तरतूद घटनेतच झाली पाहिजे. याबद्दलची आग्रह धरावा अशी माझी सूचना आहे. सरकारच्या मालकीची शेती करण्याजोगी बरीचशी जमीन आहे व ती अजून कोणाच्याही ताब्यात नाही. अस्पृश्यांची नवीन खेडी निर्माण करण्याच्या योजनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ही जमीन राखून ठेवली जाऊ शकते. लोकांकडे पडीक असलेली खाजगी मालकीची जमीनही सरकार विकत घेऊ शकते व तिचा उपयोग या उद्देश्यपूर्तीसाठी करू शकते. सध्याच्या राहण्याच्या ठिकाणापासून या नव्या गावी जाण्यासाठी व स्वतंत्र शेतकरी म्हणून स्थायिक होण्यासाठी अस्पृश्यांचे मन वळवणे कठीण नाही. याला काही वेळ लागेल, पण त्यामुळे काही बिघडत नाही. हे इतके महत्त्वाचे आहे की, खुद्द घटनेनेच केंद सरकारवर ही योजना अमलात आणण्याची जबाबदारी टाकली पाहिजे. 

अस्पृश्यांच्या समस्येसंबंधी माझे विचार व भावना मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. मला आशा आहे की, तुम्ही यावर नीट विचार कराल. 

घटना समितीचा अवलंब करणं अयोग्य असेल तर मग आपण कोणता मार्ग सुचवू शकता असे मला विचारण्यात आले होते. परंतु माझा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे. जातीय प्रश्नावर तोडगा काढणे कठीण आहे, याला कारण या प्रश्नावर तोडगा काढणे अगदीच अशक्य आहे, अगर घटना समिती राबवली गेलेली नाही, हे नाही. हे कोडे सोडवणं अशक्यप्राय झाले आहे. त्याला कारण, ते कोडे सोडवण्यासाठी ज्या मार्गांचा अवलंब केला आहे ते सर्व मूलत: चुकीचे आहेत. या वर्तमान मार्गात दिसणारा दोष हा की, हे कोडे सोडवताना तत्त्वांचा स्वीकार न करणं या एकाच तत्त्वाचा स्वीकार यासाठी करण्यात आला आहे. एक धोरण चुकीचे ठरले तर दुसऱ्या धोरणाचा अवलंब करावयाचा. या धरसोडीच्या धोरणामुळे जातीय प्रश्न म्हणजे एक इंदजालच निर्माण झाले आहे. जिथे तत्त्व नाही. तिथे एक विशिष्ट धोरण चुकीचे आहे हे सांगण्यासाठी मार्गदर्शक ठोकून असणार. जिथे तत्त्व नाही तिथे एखादे नवीन धोरण यशस्वी होील याबद्दल खात्री तरी कशी वाटणार! 

अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावा या मागणीचा पुरस्कार करण्यात आला व ती मान्यही झाली. एखादी जमात अल्पसंख्याक आहे की बहुसंख्याक याचा विचार न करता, तिला स्वतंत्र मतदार संघ देण्यात यावा अशा प्रकारची मागणी केली असता, तीही मान्य केली गेली. नंतर लोकसंख्येच्या तत्त्वावर स्वतंत्र प्रतिनिधीत्वाची मागणी करण्यात आली तीसुद्धा मान्य झाली. इतर अल्पसंख्याकांना धाब्यावर बसवून स्वतंत्र मतदारसंघयुक्त बहुसंख्य जमात अशी कायद्याद्वारे मान्यता देण्यात यावी अशा प्रकारचा हट्ट धरला असता तोही पुरवण्यात आला. इतर बहुसंख्य जमातीने राज्यकारभार केलेला खपत नाही, कारण तो पक्षपाती राज्यकारभार आहे. यास्तव अशा बहुसंख्य जमातींची छाटाछाट करून तिला तिच्या बरोबरीने मागणी केली. अशा शाश्चत सांत्वनप्रिय धोरणापेक्षा दुसरे कोणतेही वेडगळ धोरण नाही. 

स्पष्टच बोलावयाचे झाले तर जी जमात हा डावपेच खेळते तिला बिलकूल दोषी ठरवता येत नाही. तिचा फायदा होतो म्हणूनच ती यामध्ये भाग घेते, मर्यादा घालण्यास काही तत्त्वे नाहीत म्हणूनच ती हा डावपेच खेळते आणि तिची अशी खात्री असते की आणखीही आपण फायदेशीर काही मागितले तर ते मिळेल. उलटपक्षी अशी एक जमात आहे, की जिची आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीची स्थिती आहे, सामजिकदृष्ट्या जी अगदी हीन दर्जास पोहोचली आहे आणि शैक्षणिकदृष्ट्या तर ती फारच मागासलेली आहे व इतरांकडून निर्लज्जपणे होणारे जुलूम तिला निमूटपणे सहन करावे लागत आहेत. ज्याबद्दल त्यांना कधीही पश्चात्ताप झालेला नाही, जिच्यावर समाजाने तरतूद केलेली नाही, न्यायदान, न्याय्य वागणूक व समान संधीविषयी जी नेहमी उदास असते अशा जमातीला संरक्षण देण्याच्या बाबतीत अगदी नकार दर्शवण्यात आला आहे. याचे कारण तिला संरक्षणाची आवश्यकता नाही हे नसून ज्या गुंडाला हक्काचा मक्ता दिला आहे, तोच यात लक्ष घालीत नाही. एक कारण असेही दाखवले जाते की, ही जमात राजकीयदृष्ट्या चांगली सुसंघटित नाही, म्हणूनच तिच्या मागण्यांना मान्यता मिळत नाही आणि हा त्यांचा थापेबाजीचा उपक्रम यशस्वी रीतीने पार पडत राहतो. 

' एकास हात व दुसऱ्यास लाथ' हे जे वर्तन आज पाहावयास मिळत आहे, त्याचे कारण हे आहे, की ज्या जमातींचा जातीय प्रश्नात समावेश होत आहे. त्यांना बंधनकारक किंवा अधिकारयुक्त अशा कोणत्याच तत्त्वाचा अवलंब करण्यात आलेला नाही. या कमतरतेमुळे अगदी घातूक परिणाम झालेला आहे. यामुले समाजाला आपले मत स्पष्टपणे पुढे मांडणे अगदी अशक्यप्राय झालेले आहे. कोणत्या धोरणाचा अंगीकार केला आहे तो जाणू शकतो. शिवाय एक धोरण चुकीचे ठरून दुसरे सूचवले जात आहे याची देखील तो खूणगाठ बांधू शकतो. एक धोरण चुकीचे का ठरले? व दुसरे धोरण तरी यशस्वी होईल का? या प्रश्नांची उत्तरे समाज बिलकूल देऊ शकणार नाही, कारण हे इंदजाल त्याला अगदी अगम्य आहे. जातीय प्रश्नांवर तोडगा काढण्याचा जो मार्ग मी सूचवत आहे तो दोन गोष्टींवर आधारभूत आहे. 

जातीय प्रश्न सोडवायचा असेल तर ज्यामुळे अगदी शेवटचाच निश्चयात्मक निर्णय बाहेर पडेल, अशा कार्यकारण तत्त्वांची व्याख्या करणं अत्यावश्यक आहे. 

ज्या कार्यकारण तत्त्वांचा अवलंब करावयाचा असेल ती तत्त्वे नि:पक्षपातीपणे व निर्भयपणे सर्व पक्षांना सारखी लागू केली पाहिजेत. 

जातीय प्रश्नांवर तोड काढण्यासाठी माझ्या मनात ज्या गोष्टी घोळत होत्या त्या मी आपणासमोर मांडल्या आहेत. अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्टस फेडरेशनला त्या बंधनकारक नाहीत, इतकंच नव्हे तर त्या व्यक्तीश: मलासुद्धा बंधनकारक नाहीत. त्या गोष्टी तुमच्या पुढे मांडून मी फक्त एक नूतन मार्ग दाखवला आहे. यापेक्षा अधिक काहीही केलेले नाही. मी जी तत्त्वे प्रतिपादिली आहेत त्यावर माझ्या योजनेपेक्षा फारच भर दिला आहे. त्या तत्त्वांचा जर अंगीकार केला तर माझी अशी खात्री आहे, की जातीय प्रश्नावर तोड काढण्यासाठी जो गोंधळ माजला आहे तो बराचसा कमी होईल. 

(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३ मधून साभार)

Saturday 22 December 2012

बाबासाहेबांनी भूमी सुपीक केलीय.........!

बाबासाहेबांनी भूमी सुपीक केलीय.........!


(नव्या पिढीला ' बौद्ध ' म्हणून राखीव जागेचा फायदा घेता येत नसे तेव्हा नोकरी लागावी म्हणून बौद्धाचं 'हिंदू-महार' कसं करावं, हे तंत्र त्यांना शिकवलं जात होतं. तुम्ही धर्मांतरित झालात , हे थांबवणं आमच्या हातात नसलं तरी तुम्हाला पुन्हा 'महार' बनवणं मात्र आमच्या हातात आहे, असं काँग्रेसनं दाखवून दिलं आणि चळवळीचा मोठा अपमान केला, पण या अपमानातून बाहेर काढण्याचं काम मात्र विश्वनाथ प्रताप सिंगांनी केलं, अशी मांडणी करताहेत भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख...) 

/photo.cms?msid=2672804भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेकरांनी मे महिन्यात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची मुंबईत स्थापना केली. नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेबांनी या संस्थेचं 'भारतीय बौद्ध महासभा ' असं नामकरण केलं. मे १९५६ मध्ये लंडनच्या ब्रिटिेश ब्रॉडकास्टिंग कॉपोर्रेशनने बाबासाहेबांचं एक भाषण प्रसिद्ध केले. या भाषणाचा विषय होता , ' मला बौद्ध धम्म का आवडतो ?' त्या भाषणात काही बाबी त्यांनी मांडल्या. ते म्हणतात , प्रज्ञा , करुणा आणि समता ही तत्त्वं कोणत्याही धर्मात आढळत नाहीत. तथागत म्हणतात , अंधश्ाद्धा ,चमत्कार , देव नि आत्मा समाजाचं भलं करू शकत नाहीत तर समाजाला या गोष्टी अंध:कारात ढकलून देतात. तथागत गौतमबुद्धांनी आपलं तत्त्वज्ञान जनतेच्या भाषेत म्हणजे त्याकाळच्या पाली भाषेत मांडलं , तर वैदिकांनी ठरविक वर्गाची जहागिरी असलेल्या संस्कृत भाषेत आपलं तत्त्वज्ञान मांडलं. म्हणून बुद्धाचं तत्त्वज्ञान जगभर प्रसिद्धी पावलं. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं , त्याचं भारतीय व्यवस्थेत कोणीही पूर्णपणे विश्लेषण केलेलं नाही , आणि मी म्हणतो , हे जाणीवपूर्वक केलेलं नाही. हा माझा इथल्या व्यवस्थेवर आरोप आहे. सामाजिक विषयावर अनेक पी.एचडी. घेण्यात आल्या , पण त्यांच्याही विश्लेषणात बाबासाहेबांचा बौद्ध धम्म स्वीकारणं व त्याच्या परिणामाची चर्चा केली गेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारण्यापूवीर् या देशात लोकांनी मुसलमानांची राजवट , छोट्या छोट्या विभागातील राजांची राजवट , अशोकाची राजवट , ब्रिटिशांची राजवट यांचा अनुभव घेतला होता. भारताचा एकतेचा आणि शांततेचा काळ हा अशोकाच्या कालावधीतच दिसतो. उरलेल्या कालावधीत एकमेकांशी लढणं , एकमेकांना संपवणं , मोगलांचा ,ब्रिटिशांचा संघर्ष , त्यात एकमेकांवर कुरघोडी करणं याच गोष्टी दिसतात. त्याकाळी राजांच्या भांडणांची कारणं कोणत्या देवाला कोण मानतो वगैरे असायची. जातीच्या अहंकारातून कत्तली केल्या जायच्या. त्याकाळी वैदिक परंपरा विरूध्द संतपरंपरा , असा तो लढा होता. पण या दोन्ही विचारसरणींना हिंदू या शब्दाने संबोधल्यामुळे ना सामाजिक विचारसरणी बदलली, ना त्यामुळे असलेली एकमेकांबद्दलची द्वेषभावना. अशा व्यवस्थेत बाबासाहेबांनी , स्त्री-पुरुष भेद मिटवणारा , एकमेकांचा आदर करायला शिकवणारा , समाजात सामंजस्य निर्माण करणारा , बुद्धिप्रामाण्यावादी , विज्ञाननिष्ठ असा बौद्ध धम्म स्वीकारला आणि देशाला मानवतेचा चेहरा प्राप्त करून दिला.

भारतीय समाजव्यवस्थेत जो वर्ग गुलामीत आणि अस्पृश्यतेत जीवन जगत होता , त्याला बौद्ध धम्मामुळे एक नवसंजीवनी मिळाली. याचंच प्रत्यंतर आपल्याला कालांतराने बघायला मिळालं. ज्यांनी बौद्ध धम्म आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्या वर्गाची शैक्षणिक , सामाजिक , आथिर्क प्रगती झाली. ज्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला नाही , त्यांची प्रगती मंदावली. याचं मुख्य कारण म्हणजे मनूच्या सामाजिक जातिव्यवस्थेने नुसतं आथिर्क गुलाम केलं नव्हतं , तर मानसिक गुलामही केलं होतं. बौद्ध धम्म स्वीकारल्यामुळे त्यांनी स्वत:ला मानसिक गुलामीतून मुक्त केलं. मी माणूस आहे आणि माणसाचे काही निसर्गदत्त अधिकार आहेत , ते उपभोगणं हा माझा अधिकार आहे. मी इतरांपेक्षा कमी नाही. म्हणून मला बरोबरीने वागवलं गेलं पाहिजे. अशारितीने तो स्वत:ला घडवत गेला आणि प्रगतीशील झाला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याअगोदर नवीन व्यवस्थेत समाज एकसंध राहावा म्हणून बौद्ध महासभेच्या खांद्यावर नवी संस्कृती , नवी परंपरा , नवी रूढी निर्माण करण्याची जबाबदारी दिली होती. ज्याचा आधार समता आणि बंधुत्व असेल. हे काम बाबासाहेबांच्या नंतरही ही संस्था करीत आहे. याही संस्थेला बदनाम करण्याचं , पर्यायी संस्था उभी करण्याचं काम अनेकांनी केलं. परंतु बौद्ध अनुयायांनी ते हाणून पाडून बौद्ध महासभा ही त्यांची मातृसंस्था मानली आणि तिने दिलेले कार्यक्रम प्रथा , व्यवस्था मान्य केल्या. बौद्ध महासभेच्या आज अठरा राज्यात संघटना असून तिने धर्मांतर सुवर्ण महोत्सवी वर्षात अनेक संकल्प केले , त्यापैकी अनेक तडीस नेले. सोलापूर , परभणी , अहमदनगर , नांदेड येथे दीक्षेचे कार्यक्रम करून विविध मागास जातीतील हजारोंना बुद्ध धम्माची ओळख पटवून दिली. महाराष्ट्रात आज ५००० बौद्धाचार्य , एक हजार शिक्षक आणि दहा हजार समता सैनिक दलाचे सैनिक समतेचा संदेश देत आहेत. देशभरातील बौद्ध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी , बौद्ध महासभेने अल्प दरात सहलींचं आयोजन केलं , आतापर्यंत सुमारे वीस हजार लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. या संकल्पवर्षात स्वत:च्या जागा घेऊन महाविहार निर्माण करण्याचं कार्य महाराष्ट्रात सहा ठिकाणी मूर्त रूपात पहायला मिळतंय , तर माता रमाई स्मारक मु. पो. वणंद ,तालुका दापोली , जि. रत्नागिरी येथे आकारास येत आहे. बौद्ध महासभा विविध चोवीस कार्यक्रमातून धम्माची शिकवण देत आहे. आज असंख्य कार्यकतेर् बौद्ध महासभेत योगदान देतात. त्यांच्या संस्थेकडून काहीही अपेक्षा नसतात. ते समपिर्त भावनेतून काम करतात. आपल्यावर उद्या काही आरोप होऊ नयेत म्हणून ज्यांनी ज्यांनी धर्मांतर केलं त्या सर्वांचे ' मी स्वेच्छेने धर्मांतर केले ', असे संस्थेने फॉर्म भरून घेतले आहेत. धम्मदीक्षेचे कार्यक्रम आजही सुरू आहेत. मध्यंतरी साहित्यिक लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या विमुक्तांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याचं आम्ही स्वागत करतो. त्यांनी स्वीकारलेल्या बौद्ध धम्मावर काहींनी टीका केली , हेतूबद्दल शंकाही उपस्थित केल्या. पण आम्ही त्यांच्या हेतूबद्दल शंका न घेता त्यांच्या कृतीचं समर्थन करतो. त्यांच्यासोबत जे दीक्षित झाले आहेत , त्या भटक्या विमुक्त समाजातील लोकांची सर्वांगीण शैक्षणिक , सामाजिक आणि आथिर्क प्रगती व्हावी म्हणून बौद्ध बांधवांनी प्रयत्नशील राहायला हवं. या व्यवस्थेने भटक्या विमुक्त समाजाला न्याय तर दिला नाहीच उलट त्यांना राहाण्याचं ठिकाणही नाकारलं. त्यांना कोणत्याही सामाजिक आणि आथिर्क प्रगतीचा लाभ झालेला नाही. ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यांनी आपली सामाजिक , आथिर्क , शैक्षणिक आणि राजकीय ' आयडेन्टिटी ' निर्माण केली. त्याच आयडेन्टिटीशी आपली नाळ जुळली तर आपली सुद्धा प्रगती झाल्याशिवाय रहाणार नाही , असं लक्ष्मण मानेना वाटते. त्यांचं हे वाटणं शुद्ध स्वरूपाचं आहे , असं मी मानतो. 

१९५६ ला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि इकडे काँग्रेसने जातीच्या आधारावर मिळणाऱ्या बौद्धांच्या सवलती बंद केल्या. धम्मदीक्षेच्या विरोधात वातावरण निर्माण केलं गेलं असताही दीक्षेचे समारोह चालूच राहिले. नवीन पिढी उदयास आली , तिला ' बौद्ध ' म्हणून राखीव जागेचा फायदा घेता येत नसे. त्यावेळी आम्ही अनेकांना नोकरी लागावी म्हणून बौद्धाचं ' हिंदूमहार ' कसं करावं हे तंत्र शिकवत होतो. हे करीत असताना मनाला सतत टोचणी होती की , आपण चळवळीशी प्रतारणा करीत आहोत. हे बदललं पाहिजे असं सतत वाटायचं. काँग्रेसने काय केलं ? तर तुम्ही धर्मांतरीत झालात , हे थांबवणं आमच्या हातात नसलं तरी तुम्हाला पुन्हा ' महार ' बनवणं हे मात्र आमच्या हातात आहे , असं दाखवून दिलं आणि चळवळीचा मोठा अपमान केला. या अपमानातून बाहेर काढण्याचं काम विश्वनाथ प्रताप सिंगांनी केलं. 

माझी त्यावेळी कवाडे आणि गवई यांच्याशी चर्चा झाली होती. मी त्यांना एकच म्हणालो , की या पापात मी सहभागी नाही. तुम्ही दोघं त्या पापाचे भागीदार आहात. समाजाला थुंकायला लावलं आणि चाटायला लावलं काँग्रेसनं. तुम्ही त्यांच्याबरोबर आहात. उद्या व्ही. पी. सिंगांची सत्ता येईल , न येईल , पाच वर्षांमध्ये आमदार , खासदार होऊ किंवा न होऊ याची फिकीर नाही , पण या माणसानं बौद्धांच्या सवलती देण्यासाठी घटनादुरुस्ती करून आपल्याला पुन्हा स्वाभिमान दिला. बाबासाहेबांनी आपल्याला जो सन्मान दिला होता , तोच या माणसानं आपल्याला पुन्हा प्राप्त करून दिला. म्हणून काहीही झालं तरी माझ्याबरोबर एकही माणूस जरी आला नाही तरी एक निवडणूक मी त्यांच्याबरोबर जाईन. मी त्यावेळी ठाम भूमिका घेतली. त्या पूवीर्च्या गेल्या चाळीस वर्षात प्रत्येक हॅण्डबीलवरची पहिली मागणी कोणती होती ? तर बौद्धांच्या सवलतीची! ती सोडवणाऱ्याच्या पाठीमागे जाणार नसाल आणि ज्यांनी थुंकी चाटायला लावली त्यांच्यामागं जाणार असाल तर माझ्या मते तो सर्वात मोठा ' वैचारिक भ्रष्टाचार ' आहे. निदान मी तरी तो करणार नाही , हे माझ्यापुरतं मी ठरवलं. प्रश्ान् चळवळीच्या विश्वासार्हतेचा आहे. सत्ता म्हणजे सर्वस्व आणि आपण सत्तेसाठीच राजकारण केलं पाहिजे ही जी काही चुकीची संकल्पना समाजामध्ये रूढ झालेली आहे , ती आपण बदलणं आवश्यक आहे. गवई १५ वर्षं सत्तेत होते , नव्हे स्पीकर होते. तरीही त्यांना कधी बौद्धांच्या सवलतीचा प्रश्ान् सोडवता आला नाही. दादासाहेबांनी भूमिहीनांचा सत्याग्रह केला नसता आणि डाव्यांनी मदत केली नसती तर कदाचित महाराष्ट्र शासनानंही हा प्रश्ान् सोडवला नसता. तेलंगणाची चळवळ बिहारपर्यंत येऊन थडकली होती. तेलंगणा ते औरंगाबाद , औरंगाबाद ते नगर , नगर ते नाशिक , नाशिक ते दिंडोरी आणि दिंडोरी ते सुरत असा या चळवळीचा प्रवास सुरू होता. याला ब्रेक लावायचा असेल तर त्यातून बौद्धांना बाहेर काढा , हे सूत्र यशवंतराव चव्हाणांना समजलं होतं. त्यामुळे १९६० मध्ये त्यांनी भूमिका घेतली की , घटनाबाह्य असेल तर असेल पण मी महाराष्ट्रापुरत्या बौद्धांना सवलती देतो. डाव्यांबरोबर ज्यावेळी दादासाहेब गेले त्यावेळी त्यांनी अँन्टी काँग्रेस राहूनच महाराष्ट्रापुरता बौद्धांच्या सवलतींचा प्रश्ान् सोडवला. केंदामध्येसुद्धा बौद्धांचा प्रश्ान् अँन्टीकाँग्रेस राहूनच सोडवता आला. 

आजची रिपब्लिकन चळवळ एकजातीय दिसते. पण बाबासाहेबांनी आपल्या चळवळीला कधीही एकजातीय बनू दिलं नव्हतं. १९३७ साली स्वतंत्र मजूर पक्षाने विधानसभेसाठी स्पृशास्पृश्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यापैकी अनंतराव चित्रे , भाऊसाहेब गडकरी , शामराव परुळेकर या स्पृश्य उमेदवारांनी विजय मिळविला होता. पण आज मायावती कांशीराम यांनी आम्हीच हा पहिला प्रयोग केला आणि करतोय , असे दावे ठोकले. महाराष्ट्रात आम्ही भारिप-बहुजन महासंघाच्या माध्यमातून बहुजन राजकारणाला गती देऊन यशस्वी केलंय. आदिवासी , बंजारा , धनगर , कोळी समाजाचं नेतृत्व आम्ही विधानसभेत पाठवलं. स्थानिक स्वराज्य संस्थेत तर आम्ही ' मायक्रोस्कोपिक ' कम्युनिटीलाही सत्तेत नेऊन बसवलं आहे. मूळात आज ज्या चळवळी आहेत त्या स्वत:च्या व्यक्तिगत स्वार्थासाठी उभ्या राहिल्या आहेत. रामदास आठवले यांनी आथिर्क निकषांवर आधारित आरक्षण देण्यासाठीच्या जाहीरनाम्यावर सही का केली ? पंढरपूरमधून स्वत:ला खासदार व्हायचंय म्हणून ? म्हणजे एका पंढरपूरच्या सीटसाठी चळवळीशी प्रतारणाच नाही , तर आंबेडकरी चळवळीशी फारकत घ्यायची वेळ आली तरी चालेल. संपूर्ण आंबेडकरी समाजाला मी मूर्ख बनवू शकतो , या भावनेतूनच हा विश्वास आला आहे. आता गवईंच घ्याना. काँग्रेसने त्यांना एवढं वापरलं आणि आता जाता जाता गव्हर्नर केलं. ते गव्हर्नर झाले त्यात आनंद आहे मला ; पण त्यांच्या गव्हर्नरशीपचा समाजाला काय फायदा आहे ? चळवळीचे कोणते प्रश्ान् सुटले ? समाजाचे काय प्रश्ान् सुटले ? 

१९६५ च्या निवडणुकीत बिगर काँग्रेसी सरकार आलं. उत्तर प्रदेश आणि पंजाब या दोन राज्यात आर. पी. आय.चा सहभाग होता. महाराष्ट्रातील चळवळ काँग्रेसच्या दावणीला बांधल्यामुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली तीच परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये बी. पी. मौर्य काँग्रेसमध्ये गेल्यानंतर झाली होती. नेतृत्त्वहीन झालेल्या समाजाला कांशीरामांच्या निमित्ताने नेता मिळाला. त्या नेतृत्वाच्या पाठीमागं तो राहिला आणि पुन्हा सत्तेत गेला. त्यामुळे ते जे त्यांचं यश सांगतात ते त्यांचं नाही. मुळात ती भूमी बाबासाहेबांनी आणि त्यावेळच्या कार्यर्कत्यांनी सुपीक केली होती. त्यामध्ये बी. पी. मौर्यांचासुद्धा सहभाग होता. म्हणून त्यांना चरणसिंग सरकारच्या वेळी खासदार होता आलं , सत्ता मिळवता आली. तोच नेता काँग्रेस पक्षात गेल्यानंतर नेतृत्वहीन झालेल्या चळवळीला नेतृत्व मिळालं , ते बाबासाहेबांचं होतं. मग ते आर. पी. आय.चं होतं की बी. एस. पी.चं होतं याची समाजानेने पर्वा केली नाही. तो समाज सत्तेत गेला. 

कांशीराम आणि मायावती हे केव्हाही आंबेडकरवादी नव्हते. कांशीराम यानी जो विचार मांडला तो करुणेचा नव्हता तर द्वेषाचा होता. ते नेहमीच म्हणत , जे खाली आहेत , त्यांना वरती आणायचं आहे आणि जे वरती आहेत त्यांना खाली आणायचं आहे. त्यातून त्याना कायम एक संघर्ष अपेक्षित होता. त्या दोघांनीही स्वत:ची चळवळ उभी करण्यासाठी बाबासाहेबांचा वापर केला. आणि बाबासाहेबांच्या नावाने त्यांनी आपली स्वत:ची ' थिअरी ' मांडली. पुणे कराराचा धि:कार हा त्यातला त्यांचा आवडता कार्यक्रम. ब्रिटिशांच्या राजवटीत स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन होणार आणि त्यामार्फत विकासाच्या कामांना सुरूवात होणार आणि नेमक्या अशा वेळी मागासवगीर्य प्रतिनिधी निवडून आले पाहिजेत , या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. या मागणीला म. गांधींनी विरोध केला. नंतर समझोता होऊन पूनापॅक्ट निर्माण झाला. या पुनापॅक्टचा धिक्कार करणारा कार्यक्रम बीएसपीकडून आखला जातो. भारताला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी , मी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सोडतो , असं जाहीर केलं. त्याची त्यांनी कारणंही दिली. बाबासाहेब म्हणाले , ' आम्हीच उद्याचे राज्यकतेर् आहोत. तेव्हा त्या राज्यामध्ये आपलं वेगळेपण ठेवण्यापेक्षा , अलिप्ततावादी राहाण्यापेक्षा त्या व्यवस्थेत सामील होऊन त्याचं नेतृत्व करण्याची संधी आपण घालवून देता कामा नये. ' आज कांशीराम आणि मायावतीचे अनुयायी याच पुनापॅक्टचा विरोध करीत आहेत. ज्या पुनापॅक्टमुळे शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण लागू झालं. त्याचा धि:कार करायचा असेल तर त्यांनी या कराराच्या माध्यमातून मिळालेल्या शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं जे आरक्षण मिळतंय त्याचा त्याग करावा , असं आवाहन आपल्या अनुयायांना का केलं नाही ? पुनापॅक्टचा फक्त राजकीय संदर्भ घेऊन त्याचा निषेध करणं याचाच अर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुनापॅक्टचे ' व्हिलन ' आहेत , असं चित्र ते उभं करू पाहात आहेत. अशी अनेक उदाहरणं आणि त्यांचा कार्यक्रम यामार्फत ते बाबासाहेबांना ' रिप्लेस ' करून कांशीराम यांना मोठं करू पाहात आहेत. उत्तरप्रदेश सरकारच्यावतीने मुख्यमंत्री मायावतींनी जो कार्यक्रम घोषित केला , त्यामध्ये बारापैकी अकरा योजना कांशीरामांच्या नावाने व फक्त एक योजना माता रमाईच्या नावाने दिसते. उत्तरप्रदेशातील आंबेडकरपार्कचा प्रचार मायावती यांनी इतर राज्यात तसंच उत्तर प्रदेशातील निवडणुकीत वापरला आणि मतांची गणित मांडली. त्याच मायावतींनी आंबेडकरपार्कचं रूपांतर कांशीराम पार्कमध्ये धडाक्याने सुरू केलंय. त्यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ' रिप्लेस ' करण्याचं काम जोरात सुरू आहे. 

भारतीय राजकारणात आता एक व्यक्ती आणि त्याची 'लिडरशिप' मान्य होणार, अशी काही परिस्थिती नाही. लोक, आता मी या जातीचा आहे , असं म्हणत नाहीत तर मी अमुक समाजाचा आहे, असं म्हणतात. देशाच्या एकतेसाठी ही 'फेज' मी चांगली मानतो. परंतु देशाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींसाठी ही अत्यंत वाईट बाब आहे. जातीतून समाजाकडे होणारं परिवर्तन हे संघर्षमय परिवर्तन आहे. या संघर्षमय परिस्थितीत ज्याला कुणाला अंतविर्रोध सांभाळता किंवा कमी करता येतील अशांचं नेतृत्व टिकून राहील. यामध्ये उपेक्षित समूह , दलित समूह यांना आपण सत्तेवरती आलो पाहिजे , ही इच्छा आहे. आणि त्यासाठी पहिल्यांदा ते काहीही करण्यास तयार आहेत , जे आज आपल्याला उत्तरप्रदेशमध्ये दिसतंय. जेव्हा या उत्तरप्रदेशातील उपेक्षित आणि दलित समूहाला कळून चुकेल की आपल्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही , तेव्हा ते बाहेर पडलेले असतील आणि ते नव्या पर्यायाच्या शोधात असतील. हा जो संघर्षमय काळ आहे तो बोटीतल्या तुटलेल्या होकायंत्रासारखा आहे. ही बोट भरकटत आहे. पंतप्रधानपदाचं स्वप्न बघणारे आणि दाखवणारे 

यांच्याकडे नवीन होकायंत्र नाही. हे जे ' पोलिटिक्स ऑफ ग्रिमिक्स ' आहे , ते फार काळ चालणार नाही. तेव्हा मायावतींनी पंतप्रधान झाल्यावर मी बौद्ध धम्माची दीक्षा घेईन , असं म्हणणं म्हणजे , दीक्षांतरित लोकांना आकषिर्त करण्यासाठी दाखवलेलं गाजरच होय....!

लेखक - अॅड. प्रकाश आंबेडकर.........!  

संपादन अँड. राज जाधव...!!! 

Thursday 20 December 2012

रमास पत्र......!

रमास पत्र......! 

रमा.... ! 

कशी आहेस रमा तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो. आणि डोळयापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळयासमोर उभे राहिले. 

       दुःखांच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत. या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो आहे रमा ! पण मी झुंज देतो आहे. माझी बौध्दिक शक्ती परमवीर झाली होती जणू ! खूप भावना मनात दाटून आल्या आहेत. खूपच हळवे झाले आहे मन. खूपच व्याकूळ झाले आहे मन! आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली. यशवंताची आठवण आली. 

      मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस. मी नको म्हणत होतो तरी तुझे मन तुला धरवले नाही. तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता. तू पाहत होतीस. तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेनं तू ओथंबून आली होतीस. तू शब्दांनी बोलत नव्हतीस; पण तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नसते तेही सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळयातील आवंढा तुझ्या ओठापर्यंत येऊन थडकत होता. ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळयातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती. 

     आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झाले आहे. जीवात कालवाकालव होत आहे. कशी आहेस रमा तू ! आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो तो? त्याचे संधीवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा ! आपली चार मुलं आपल्याला सोडून गेलीत. आता आहे फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्त्वाचा आधार आहे आता. त्याला आपण जपलं पाहिजे. यशवंताची काळजी घे रमा ! यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत. तोवर ते जागे राहत. मला ती शिस्तच त्यांनी लावली. मी उठलो, अभ्यास सुरु केला की ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई. त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला. याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे. माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत. त्यांनी रात्रीचा दिवस केला. अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळे आली. फार फार आनंद वाटतो रमा आज. रमा यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे. 

       रमा, वैभव, श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभोवती पाहते आहेसच. माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागे लागलेली असतात. त्यांची जीवनं जिथून सुरु होतात तिथच थांबलेली असतात. या लोकांची आयुष्ये जागा बदलीत नाहीत. आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्याजवळ दुःखांशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्रय, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकटे आपल्याला सोडीत नाहीत. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत. 

      मागे अंधारच आहे. दुःखाचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे. 

       आपणाला दुनिया नाही. आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपडयांची काळजी घे. त्याची समजूत घाल. त्याच्यात जिद्द जागव. मला तुझी सारखी आठवण येते. यशवंताची आठवण येते. 

      मला कळत नाही असं नाही रमा, मला कळतं की तू दुःखांच्या या वणव्यात स्वतः करपून जात आहेस. पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होते आहेस. पण रमा मी तरी काय करु ! एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्रय. दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा. वसा ज्ञानाचा ! 

      मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचे यावेळी भान नाही; पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे. तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस. आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवीत आहेस. म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे. 

      खरं सांगू रमा, मी निर्दय नाही. पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी सादही घातली, तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा ! मी कळवळतो. पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी ! म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुला, यशवंतालाही कधी झळा पोचतात. हे खरं आहे; पण यावेळी रमा मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेली आसवे पुसतो आहे. सुडक्याला सांभाळ रमा. त्याला मारु नको. मी त्याला असे मारले होते. त्याची आठवणही कधी त्याला करुन देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे. 

      माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना पार जाळून-पुरुन टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत. 

     रमा ! तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळयात आसवं आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकूळ झाली आहेस. 

     रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर? तू मनःसाथी म्हणून मिळाली नसतीस तर? तर काय झालं असतं? केवळ संसारसुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गोवऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे, मुंबईत कोण पसंत करील. घराला ठिगळे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे, एवढयाच काडयाच्या पेटीत महिना निभला पाहिजे, एवढेच ध्यान्य, एवढेच तेलमीठ पुरले पाहिजे हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर? तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्या वेळी लगेच ओहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा ! माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता, सगळीच मोडतोड झाली असती. सगळाच मनःस्ताप झाला असता. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. जप स्वतःला जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेन काळजी करु नकोस.
             सर्वांस कुशल सांग.....! 
कळावे,
तुझा....भीमराव.....! 
लंडन, ३० डिसेंबर १९३०

(यशवंत मनोहर यांच्या 'रमाई' या पुस्तकातून साभार) 

अँड. राज जाधव...!!!