My Followers

Wednesday, 4 July 2012

बाबासाहेबांना अभिप्रेत बौद्ध धम्म आणि धम्मक्रांती....!!!

बाबासाहेबांना अभिप्रेत बौद्ध धम्म आणि धम्मक्रांती....!!!
१४ ऑक्टोबर १९५६ ला आपल्या जीवनात एक सोनेरी पहाट उगविली आणि आम्ही खऱ्या अर्थाने माणूस झालोत.मानवतेच्या परमोच्च आविष्काराचा तो क्षण होता.बाबासाहेबांनी आपल्या पुर्वायुशीच्या पशुमय जीवनातून आपली सुटका केली.१४ ऑक्टोबर १९५६ नंतर बाबासाहेबांनी १५ आणि १६ ऑक्टोबर १९५६ ला सुद्धा चंद्रपुरात उपस्थित जनसमुदायाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली.आम्ही बौद्ध झालोत आम्ही माणूस झालोत.बाबासाहेब या वेळेस म्हणाले होते कि आम्ही काही धर्मांतर केले नसून आम्ही आमच्या धम्मात पुनर्प्रवेश करीत आहोत.म्हणजेच ज्या नाग लोकांनी बौद्ध धर्म जगविला, वाढविला तो धम्मच ते स्वीकारीत आहेत.बाबासाहेबांनी १३ ऑक्टोबर १९३५ ला येवले येथे धर्मांतराची घोषणा केली आणि २०-२१ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हिंदू धर्म त्यागून बौद्ध धम्माचा स्वीकार केला.या कालावधीत बाबासाहेब काय करीत होते? का बरे बाबासाहेबांनी २० वर्षे धर्मांतराची वाट पहिली? तर मित्रांनो बाबासाहेब या कालावधीत जगातील साऱ्या धर्मांचा चिकित्सक अभ्यास करीत होते.आपल्या अस्पृश्य बांधवांना स्पृश्य हिंदूंच्या दास्यातूनच नव्हे तर कर्मकांड,अंधश्रदधा,देव-बुवाबाजी या मानसिक गुलामगिरीच्या जंजाळातून काढून कर्मयोग,विज्ञानवाद आणि त्यांच्या उन्नतीसाठी,सर्वांगीण उत्कर्षासाठी आणि वर्षानुवर्षे दडपला गेलेला स्वाभिमान जागविण्यासाठी आवश्यक असणारा धर्म त्यांना द्यावा असा विचार बाबासाहेबांच्या मनात असावा.म्हणूनच घाईघाईने हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म स्विकारण्या ऐवजी स्वातंत्र्य,समता,बंधुत्व,करुना,अहिंसा आणि उच्च नैतिक मानवी मुल्यांची देन असलेला बौद्ध धम्म बाबासाहेबांनी स्वीकारून आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.बाबासाहेब केवळ दीक्षा देऊन थांबले नाहीत तर आपल्या नवदीक्षित बांधवांना धम्म चांगल्या रीतीने समजता यावा म्हणून धम्म ग्रंथाची निर्मिती केली आणि आपल्यालाबुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ दिला.२५०० वर्षाआधी बुद्धाने सांगितलेला धम्म काळाच्या ओघातही टिकून राहिला.बिंबिसार,अजातशत्रू, सम्राट अशोक, राजा मिलिंद,सम्राट कनिष्क,सम्राट हर्षवर्धन आणि गुप्त घराण्यातील बुधगुप्त,पाल आणि चोल वंशाच्या राजांनी बौद्ध धम्माला राजाश्रय दिला.या सोबतच बौद्ध पंडित उपाली,आनंद, सारीपुत्त,मोग्गल्लायन,नागार्जुन,अश्वघोष,वसुबंधू,दिग्नाग,धम्मकीर्ती,शान्तिरक्षित आणि नागसेन इत्यादींनी या धम्माला वाढविण्यासाठी प्रयत्न केले.भारतीय वैद्यकशास्त्राचा जनक जीवक आणि आयुर्वेदाचा जनक चरक हि सुद्धा बौद्ध धम्माचीच देन आहे.या सर्वांमध्ये बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी सर्वात जास्त योगदान हे सम्राट अशोकाचे आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबाचे दान धम्मासाठी दिले.आपला मुलगा महेंद्र,कुणाल ,मुलगी संघमित्रा, भाऊ तीश्यरक्षित आणि स्वतःसुद्धा भिक्षु बनून बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी,प्रसारासाठी वाहून घेतले.संपूर्ण जम्बुद्वीपात ८४००० स्तूप आणि विहाराची स्थापना त्याने केली.एवढेच करून तो थांबला नाही तर जन कल्याणकारी कार्यही अशोकाने केले.बुद्ध धम्मातील कल्याणकारी तत्वांचा अवलंब प्रत्यक्ष राज्यकारभार करतांना करून अशोकाने एक आदर्श आणि कल्याणकारी राज्य या जम्बुद्वीपामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये निर्माण केले.सम्राट अशोक हा कृषी संस्कृतीचाही जनक आहे.प्रवाशांसाठी उत्तम रस्ते,धर्मशाळा,रस्त्याच्या दोन्ही बाजूना झाडे लावणे,विहिरी खोदल्या,कृषी सिंचनाची सोय करून दिली.अशोकाचे राज्य म्हणजे जम्बुद्वीपातील जनतेसाठी सुवर्णयुग होते.त्यामुळे जगातील इतिहासकार अशोकाला जगातील महान राजांच्या श्रेणीत अशोकाला सर्वोत्तम महान राजा म्हणून संबोधतात.त्यानंतर सम्राट कनिष्क,मिलिंद आणि हर्षवर्धन हे राजे अशोकाच्या पाउलावर पाउल ठेवून राज्यकारभार करू लागले.या काळात या देशाची कला,संस्कृती,व्यापार,कृषी इत्यादी क्षेत्रात भरभराट झाली.खऱ्या अर्थाने मानवी उन्नतीचे,विकासाचे ते ‘सुवर्णयुग’ होते.नालंदा,तक्षशीला,वल्लभी,विक्रमशिला,ओदंतपुरी इत्यादी विश्वप्रसिद्ध विद्यापीठांची निर्मिती हि बौद्ध काळातच झाली.या विद्यापीठातून शिक्षण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यास संपूर्ण जगामध्ये ‘विद्वान’म्हणून मान्यता मिळत असे.स्थापत्य,वास्तुविद्या,वैद्यकशास्त्र इत्यादी क्षेत्रात जम्बुद्वीपाची भरभराट झाली.हा संपूर्ण इतिहास बाबासाहेबांसमोर होता.म्हणूनच मानवी जीवनाला उत्क्रांत करणाऱ्या धम्मामध्ये आपल्या बांधवांना दीक्षित करावे हिच मुख्य भूमिका बाबासाहेबांची असावी.परंतु २५०० वर्षापर्यंत प्रवाहित झालेल्या या धम्मात अनेक चुकीच्या गोष्टी घुसडण्यात आल्या होत्या.प्रत्येक धर्माचा एक धर्मग्रंथ असतो त्याप्रमाणे बौद्ध धम्माचा सुद्धा धम्म ग्रंथ आहे ज्याचे नाव आहे त्रिपिटक. जगातील सर्व उपलब्ध धर्म ग्रंथांपेक्षा मोठा हा धर्मग्रंथ आहे.बाबासाहेबांनी त्रीपिटकाचे वर्णन करतांना असे म्हटले आहे कि हा धर्मग्रंथ मला महासागरासारखा वाटला.त्यामुळे त्रीपिटकातील सर्वच्या सर्वच तत्वे आणि गोष्टी आपल्या अनुयायांना न सांगता बुद्धीसंगत,तर्कसंगत, आचरणाने प्रत्यक्ष जीवनात अनुभुत करण्यासारखे आणि मानवी जीवनाचे कल्याण ज्यामुळे साधू शकते अशाच गोष्टी आपण आपल्या बांधवांना द्याव्यात असे बाबासाहेबांना वाटले असावे.कारण काळाच्या ओघात त्रीपिटकामध्ये सुद्धा काही चुकीच्या गोष्टी जसे आत्मा,पुनर्जन्म आणि कर्मवाद सिद्धांत तसेच काही बुद्धाच्या पुनर्जन्माविशयीच्या जातक कथांचा सुद्धा समावेश करण्यात आला होता.या जर गोष्टी पारंपारिक बौद्ध धम्मातून उचलुन जर जशाच्या तशाच आपल्या अनुयायांनी स्वीकारल्या तर ते बौद्ध धम्म आणि इतर धर्मांमध्ये काही फरक करू शकणार नाहीत आणि परत अंधश्रद्धेच्या आहारी जातील हि भीती बाबासाहेबांना असल्यामुळे त्यांनी अतिशय सोप्या आणि विज्ञानवादी धम्माची पुनर्मांडणी ‘दि बुद्ध आणि धम्म’ मधून केली.बाबासाहेबांनी बुद्धवचन कोणते आहे हे ओळखण्यासाठी एक कसोटी सांगितलेली आहे. ती कसोटी अशी आहे कि बुद्धवचन तेच जे १)तर्कसंगत असेल,बुद्धीसंगत असेल. २) जे अनुभवाच्या कसोटीवर प्रत्यक्ष उतरेल ज्याचा जीवनात उपयोग होईल आणि जे ३) लोकहिताचे असेल,कल्याणकारी असेल.बाबासाहेबांनी या धम्मग्रंथामध्ये सिद्धार्थाच्या प्रव्रजेचे जे कारण दिलेले आहे ते सुद्धा पारंपारिक बौद्ध धम्म ग्रंथामधील कारणांपेक्षा वेगळे आहे.परंतु ते तर्कसंगत आणि बुद्धीसंगत असेच कारण आहे.सिद्धार्थ २९ वर्षाचा होतो आणि म्हातारा,रोगी आणि मृत व्यक्तीला बघून वैराग्य निर्माण होऊन प्रव्रजीत होण्याचा निर्णय घेतो हे कारण तर्कसंगत आनि बुद्धीला पटणारे नाही.परंतु बाबासाहेबांनी शाक्य आणि कोलिय यांच्यामध्ये रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून वारंवार होणारे युद्ध आणि शाक्यांच्या सभेत सेनापतीच्या युद्धाच्या प्रस्तावाला सिद्धार्थाने केलेला विरोध आणि त्यासाठी देश सोडून जाणे, देहांताची शिक्षा किंवा वडिलांचे राज्यपद हिरावून घेणे या तीनपैकी देश सोडून प्रव्रजीत होण्याचा निर्णय सिद्धार्थाने घेतला.परंतु पारंपारिक बौद्ध धम्मीय पहिले कारणच योग्य मानतात.म्हणून बाबासाहेबांच्या ‘दि बुद्ध आणि धम्म’ या पुस्तकाला विरोध करतांना हा बाबासाहेबांचा धम्म आहे म्हणून हिणविले.परंतु काही कालावधीने बाबासाहेबांच्या ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ याचा स्वीकार जगातील बहुतांश राष्ट्रांनी स्वीकारलेला आहे.बाबासाहेबांनी खाटमांडू मध्ये भरलेल्या बौद्ध धम्म संगीतीला संबोधित करतांना ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या विषयावर भाषण देताना बुद्धाच्या धम्मावर मार्क्सवादाचा प्रभाव होऊ नये यासाठी मार्क्सवाद हे जगातील समस्या सोडविण्यासाठी कसे निरर्थक आहे हे प्रतिपादित केले.मार्क्सने मजुरांच्या हुकुमशाहीचे समर्थन केले होते तर बुद्धाने शोषक व्यवस्था ती कुठलीही असो तिला विरोध केला होता.बुद्धाने स्वातंत्र्य,समता,बंधुत्व,सामाजिक न्याय,करुणा या उदात्त मुल्यांचा पुरस्कार करून नीतीमान आणि आदर्श समाज निर्माण झाला तर मनुष्याची दुःखातून मुक्तता होईल असे सांगितले.बुद्ध कसे लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत हे सुद्धा बाबासाहेबांनी पटवून दिले.
        १४ ऑक्टोबर १९५६ ला धर्मांतरित झालेले बाबासाहेबांचे बहुसंख्य अनुयायी हे अडाणी होते.परंतु बाबासाहेबांच्या शब्दांना प्रमाण मानून,बाबासाहेबांच्या २२ प्रतिद्न्या शिरसावंद्य मानून त्याप्रमाणे आचरण करण्यास सुरुवात केली होती.त्यानंतर बाबासाहेबांनी ज्या उच्च शिक्षित लोकांवर धम्माचा रथ पुढे नेण्याची जी जबाबदारी सोपविली होती ती पार न पाडता उच्च शिक्षित मंडळी हे गटातटाच्या राजकारणात गुंग झाले आणि सामाजिक आणि धम्म कार्याला गती देण्याऐवजी समाजकारणात आणि धम्मकार्यात हि राजकारण शोधू लागली.बाबासाहेबांनी बुद्ध धम्माच्या ऱ्हासाची कारणे खालील सांगितली होती
१) १२ व्या शतकात मुस्लीम आक्रमकांनी भारतावर केलेले आक्रमण आणि त्यांनी केलेली बुद्ध स्तूप आणि विद्यापीठांची केलेली हानी तसेच बौद्ध भिक्षूंच्या मोठ्या प्रमाणात केलेल्या कत्तली
२) योग्य प्रचारक न उरल्यामुळे
३) ब्राम्हणी धर्माने बौद्ध धर्मात केलेली सरमिसळ

बाबासाहेबांनी जो धम्म आपणास दिलेला आहे तो १) धम्म विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारा आहे, २) आचरण्यास सोपा आहे आणि ३) लोकांचे कल्याण करण्यास समर्थ आहे. ४)हा धम्म नीतिमत्तेवर आधारलेला आहे.4) मानवी प्रतिष्ठा जागविणारा आहे.
       आज धर्मांतराच्या ५५ वर्षानंतर आपण जर नवदीक्षित बौद्ध लोकांवर धम्माचा कोणता प्रभाव झाला हे जर बघितले तर निश्चीतच आशादायी चित्र आहे.आज ज्या स्वातंत्र्याची आपण कल्पना केली नव्हती ते स्वातंत्र्य आपण उपभोगीत आहोत.ज्वाजल्य स्वाभिमान आपल्या उरात आहे.आज भारतीय घटनेने दिलेल्या अधिकारामुळे आणि बौद्ध धम्म स्वीकारामुळे आपल्यातील अंधश्रद्धा बऱ्याच प्रमाणात दूर झालेली आहे.आंबेडकर बौद्ध समूहाने कर्मकांड,जुन्या रुढी,परंपरा याचा त्याग करून विज्ञानवादाची कास धरलेली आहे.आज बौद्ध समाजामध्ये सुशिक्षितांचे प्रमाण खूप आहे.स्त्रियासुद्धा भरपूर शिकलेल्या आहेत.त्यामुळे आज आपण ठामपणे म्हणू शकतो कि आपण धम्मामुळे स्वतंत्र झालोत,प्रगत झालोत,विज्ञानवादी झालोत नव्हे माणूस झालोत.हे एका बाजूला आशादायी चित्र आपणास दिसत असतांना सुद्धा दुसऱ्या जर बाजूने विचार केला तर निश्चितच काही गोष्टीत आम्ही आजही मागे आहोत हे मान्य करावे लागते.बाबासाहेबांचा धर्मांतर करण्यामागचा हेतू केवळ अस्पृश्य समाजाला बौद्ध करण्याचा नव्हता तर त्यांचे स्वप्न ‘सारा भारत बौधमय करण्याचे’होते; नव्हे सारे जग बौधमय बनविण्याचे होते.काही लोक म्हणतात कि बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारताला बौधमय बनविलेले आहे.हे काहि अंशी खरेही आहे.परंतु ज्या लोकांसाठी हे संविधान बनविलेले आहे ते खरेच बौद्ध झालेत काय? तर याचे उत्तर नकारार्थी असेच आहे.
ज्या लोकांच्या खांद्यावर हि जबाबदारी टाकली होती त्या शिक्षित समाजाने यासाठी काही प्रयत्न केले आहेत काय? तर याचे उत्तर आहे होकारार्थीहि आहे आनी नकारार्थीही आहे.काही प्रमाणात त्या दिशेने प्रयत्न झालेत.परंतु सामुहिक प्रयत्नाने असे प्रयत्न झालेत का असा प्रश्न आपण आपल्याला विचारला तर त्याचे उत्तर नकारार्थी असेच येईल.बाबासाहेबांनी धम्म प्रचारासाठी ज्या आवश्यक बाबी मानल्या होत्या त्यापैकी एक म्हणजे १) बौद्ध धम्माचा एक प्रमाणभूत ग्रंथ असणे २) बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी एक राष्ट्रीय स्तरावरील एक संस्था/संघटना असणे ३) या दोन्हीच्या रक्षणाची जबाबदारी एका सामाजिक संघटनेद्वारा व्हावी ४) प्रशिक्षित भिक्खू निर्माण करणारी राष्ट्रीय पातळीवर धार्मिक संस्था असणे इत्यादी होत.
यापैकी बाबासाहेबांनी प्रमाणभूत धार्मिक ग्रंथाची असणारी गरज ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या पुस्तकाच्या रुपात पूर्ण केली.दुसरे म्हणजे एक बुद्ध धर्माच्या प्रचारासाठी एक राष्ट्रीय पातळीवरील एक संस्था किंवा संघटना असावी हे बाबासाहेबांचे स्वप्न त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकले नाही.परंतु त्यांच्या हयातीतच त्यांनी या संस्थेची घटना तयार केली होती.ती संस्था म्हणजे ‘भारतीय बौद्ध महासभा’.आज ‘भारतीय बौद्ध महासभा’ हि राष्ट्रीय पातळीवरील संस्था बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी कार्यरत आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. तिसरी म्हणजे एक सामाजिक संघटन पाहिजे होते ते समता सैनिक दलाच्या रुपाने आज अस्तित्वात आहे.परंतु प्रशिक्षित भिक्खू निर्माण करणारी जी सेमिनरी पाहिजे होती ती आज तरी भारतात अस्तित्वात नाही.

१९८० नंतर बौद्ध समाजामध्ये एक अत्यंत वाईट प्रवृत्तीने शिरकाव केला तो म्हणजे धम्माच्या,समाजकारणाच्या कार्यापेक्षा राजकारणालाच ज्यास्त महत्व प्राप्त झाले.राजकारणाने बौद्ध समाजाचे धार्मिक आणि सामाजिक क्षेत्र पूर्णपणे ढवळून निघाले.आता लोकांना वाटायला लागले कि सत्तेशिवाय बौद्ध धम्माचा प्रचार अशक्य आहे.त्यामुळे सामाजिक आणि धार्मिक संघटनांना मजबूत करण्याऐवजी वेगवेगळ्या राजकीय संघटनाचा जन्म झाला.रिपब्लिकन पक्षाच्या गटासोबतच
धार्मिक संघटनांचे आणि सामाजिक संघटनांचे सुद्धा गट पडू लागले.त्यामुळे एकत्रित प्रयत्नातून होणारा धम्म प्रचार बंद पडला.१९८४ मध्ये रिपब्लिकन पक्षाला काटशह देण्याकरिता एका पक्षाची स्थापना करण्यात आली आणि सत्ताप्राप्ती हेच आंबेडकरी बौद्धांचे महत्वाचे कार्य आहे हे या पक्षाच्या प्रमुखाने सांगण्यास सुरुवात केली.आज या पक्षाच्या माध्यमातून अखिल भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलावर आधारित बी एस एफ हे संघटन कार्य करीत आहे.महाराष्ट्रातील बौद्धांनी केलेले धर्मांतर हे या लोकांच्या टीकेचा विषय आहे.धम्म परिवर्तन न करताही आपण बौद्ध बनू शकतो हा विषारी प्रचार या पक्षामार्फत केला जात आहे. याच काळात ध्यान,समाधी आणि विपस्सना या माध्यमातूनच बौद्ध धम्म समजून घेता येतो आणि प्रचार आणि प्रसार करता येतो असे मानण्यात येऊ लागले.बौद्धांची एकत्रित शक्ती हि अशी विखुरली गेली आहे.आज वेगवेगळ्या बौद्ध देशातील वेगवेगळे पंथ आपल्या पंथाच्या प्रचारासाठी भारतात खूप देणग्या देत आहेत.त्यामुळे बाबासाहेबांना अभिप्रेत धम्माचा प्रचार होण्याऐवजी बौद्ध धम्माच्या पारंपारिक पंथाचाच प्रचार होतो आहे.धम्माला आज एक प्रकारची ग्लानी आलेली आहे.या ग्लानीतून धम्माला बाहेर काढण्यासाठी काय करावे लागेल तर माझ्या मते प्रत्येक बौधाने ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या पुस्तकाचे सखोल वाचन करून तो समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे.बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतीद्न्यांचे पालन काटेकोरपणे आपल्या जीवनात केले पाहिजे.आणि आपल्या आचरणाने गैर बौद्धांच्या मनात एक आदर्श निर्माण केला पाहिजे.बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्धाचा धम्म हा उच्च नैतिक तत्वज्ञानावरच आधारलेला नसून त्यामध्ये आचरनालासुद्धा अतिशय महत्व आहे.त्या दृष्टीकोनातून प्रयत्न व्हायला हवेत.बाबासाहेबांनी सांगितलेली सम्यक समाधी आणि रजनीश,गोएंका किंवा अन्य कोणीही सांगितलेली ध्यान,समाधी किंवा विपस्सना यामध्ये अतिशय महत्वाचा फरक आहे.बाबासाहेबांनी सांगितलेली सम्यक समाधी म्हणजे योग्य प्रकारे समस्यावर केलेले चिंतन तर ध्यान, समाधी किंवा विपस्सनेत मुख्य प्रश्नांपासून मनाला दूर करणे होय.समस्यवर विचार न करता आपण त्या समस्येचे समाधान करू शकत नाही हे बुद्धाला समजल्यामुळेच बुद्धाने तपस्या आनी ध्यानाचा मार्ग त्यागून दुःख या प्रश्नाभोवती लक्ष केंद्रित करून दुःखमुक्तीचे कारण शोधून त्यावरील उपायही सांगितला.आजकाल बौद्ध समाजामध्ये ज्यांचा बौद्ध संस्कृतीशी काडीचाही संबंध नाही. आजकाल बौद्ध समाजाचे नेतृत्व ज्या राजकारण्यांच्या हातात आहे.अशांनी जपान,ब्रम्हदेश,श्रीलंका आणि तिबेट या देशातील भारतात येणाऱ्या देणग्यांचा ओघ बघून पारंपारिक महायानी आणि तांत्रिक पंथान्चासुद्धा स्वीकार करण्यास सुरुवात केली आहे.बाबासाहेबांना अपेक्षित धम्म क्रांतीच्या दृष्टीने हि गोष्ट निश्चितच भूषणावह नाही आणि ज्या समाजाला बाबासाहेबांनी अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढले त्या समाजाच्या प्रगतीसाठीसुद्धा मारक आहे.

त्यामुळे आंबेडकरी समूहाने ध्यान,समाधी किंवा विपस्सना मार्गाचा त्याग करुन सम्यक समाधीचा वापर आपल्या जीवनात करून समस्याचे निराकरण करावे.बाबासाहेबांनी ज्या मातृसंस्था दिलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातूनच धम्म प्रचाराचे आणि धर्मांतराचे कार्य हाती घ्यावे.आदर्श भिक्खू निर्माण करण्यासाठी एका बुद्धिस्ट सेमिनरीची अत्यंत गरज आहे.समाजाने अशी सेमिनरी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत.विहारामधून बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथांचे सातत्याने वाचन झाले पाहिजे.दुसरे म्हणजे बौद्ध सन,उत्सव हे मोठ्या उत्साहात पार पाडले पाहिजे. विहारासाठी राजकारण्यांकडून वर्गणी गोळा न करता आपल्या वर्गानितच विहार निर्माण करावेत.प्रत्येक विहारात एक ग्रंथालय असावा.गावोगावी भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा असाव्यात, समता सैनिक दलाच्या शाखा असाव्यात.आणि या धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी एकमेकांच्या सहकार्याने कार्य करून बाबासाहेबांना अभिप्रेत धम्म प्रचारित आणि प्रसारित करण्यासाठी प्रयत्न करावे असे मला वाटते.बाबासाहेबांच्या मते बुद्धाला अभिप्रेत असणारा भिक्खू हा केवळ उत्तम पुरुष न राहता तो एक समाजसेवकही असावा आणि लोककल्याणासाठी त्याने सतत चारिका करीत राहावे.अशा भिक्खुणासहकार्य करण्याचे काम समस्त बौद्ध समाजाचे असले पाहिजे.त्यासाठी आपण तन,मन आणि धनाने सहकार्य केल्यास बाबासाहेबांना अभिप्रेत धम्माचा भारतातच नव्हे तर इतर देशातही प्रचार होऊन बाबासाहेबांना अभिप्रेत धम्मक्रांती सुद्धा साधता येईल.
बाबासाहेबांना अपेक्षित बुद्धाचा धम्म......!!!
१) नीतिमत्तेवर आधारलेला आहे.२) बुद्धाचा धम्म सामाजिकता वाढविणारा आहे.३) बुद्धाचा धम्म प्रज्ञा,शील आणि करुणा या उद्दात मूल्यांवर आधारलेला आहे.४) स्वातंत्र्य,समता,बंधुता,सामाजिक न्याय या लोकशाहीवादि मूल्यांवर आधारलेला आहे.५) मनुष्याचे याच जन्मात कल्याण करणे हे धम्माचे उद्धिष्ट्य आहे. त्यामुळे कुठल्याही पराप्राकृतिक गोष्टीवर बौद्ध धम्म विश्वास ठेवत नाही.या धम्मामध्ये माणूस हा अग्रस्थानी आहे आणि त्याचे जीवन सुखी करण्यासाठी काय करावे हे धम्म सांगतो.६) बुद्ध धम्म विज्ञानवादी आहे.निसर्ग नियमांच्या विरोधात कुठलीही गोष्ट घडू शकत नाही हे बुद्ध धम्म सांगतो.निसर्ग नियमाच्या विसंगत कोणतेही वर्तन हे मनुष्याचा घात घडवून आणते यावर धम्माचा विश्वास आहे.७) उपासक आणि भिक्खू यांचेसाठी वेगवेगळा धम्म आहे.
बाबासाहेबांना अभिप्रेत धम्मक्रांती:जगाचे पुनर्निर्माण करणे होय.हे साध्य 
करण्यासाठी जगाचे पुनर्निर्माण
    १) त्यासाठी नवीन प्रकारचा धम्मप्रचारक निर्माण करणे
    २) बुद्धिस्ट सेमिनरी ची स्थापना
    ३) त्या सेमिनरी मध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि जगातील विविध धर्म आणि बौद्ध धम्म यांचा तौलनिक अभ्यास असा अभ्यासक्रम असेल.
   ४) सेमिनरी मधून बाहेर पडलेले लोक उच्च नैतिक मूल्यांना अनुसरण आचरण करतील आणि जगाच्या कानाकोपऱ्यात बौद्ध धम्माचा प्रचार करतील.
   या माध्यमातून बाबासाहेबांनी सांगितलेला बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल आणि बाबासाहेबांना अपेक्षित धम्मक्रांती जगभरात होऊन बौद्ध धम्माच्या उदात्त मूल्यांच्या आधारे जगाचे पुनर्निर्माण करता येईल जी आज काळाची आणि समस्त मानावजातीचीही गरज आहे.(Friendly Interaction - Blog)

No comments:

Post a Comment