My Followers

Friday, 27 July 2012

ती ऐतिहासिक बैलगाडी... डॉ. बाबासाहेबांच्या मिरवणुकीची साक्ष...!!!

ती ऐतिहासिक बैलगाडी... डॉ. बाबासाहेबांच्या मिरवणुकीची साक्ष...!!!

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर जिल्ह्यातील तडवळे (ढोकी) येथील महार-मांग वतनदार परिषदेसाठी आले असता त्यांची ज्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली ती ऐतिहासिक गाडी आजही जतन करून ठेवली आहे. ही गाडी सध्या महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, पुणे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्या ताब्यात असल्याची माहिती त्यांनी स्वत: दै. "वृत्तरत्न सम्राट'ला दिली.

परमपूज्य बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या ज्या भूमिला स्पर्श झाला त्यांनी ज्या ज्या वस्तू वापरल्या अशा वस्तूंना, भूमींना आज ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहेे. त्यामुळेच आंबेडकरी जनतेबरोबरच संपूर्ण देशवासीयांच्या दृष्टीने अशा बाबींना ऐतिहासिक महत्व आहे. अशा वस्तू, भूमींचे जतन, संवर्धन करणे ही आंबेडकरी जनतेची जबाबदारी आहे.

दि. 23 फेब्रुवारी 1941 रोजी सोलापूर जिल्हा व मोंगलाई मराठवाडा भागातील महार-मांग वतनदार परिषद तडवळे (ढोकी) येथे आयोजित केली होती. या परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 22 फेब्रुवारीलाच म्हणजे एक दिवस अगोदर तडवळे येथे हजर झाले होते. तडवळे स्टेशनवर डॉ. बाबासाहेब उतरल्यानंतर परिसरातील प्रचंड जनसमुदायाने त्याचे रेल्वे स्टेशनवर स्वागत केले आणि पुष्पमाळांनी सजविलेल्या 50 बैलगाडींच्या ताफ्यासह त्यांची प्रचंड मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हलगी, नगारे, तुताऱ्या, शिंगे, बॅंड या वाद्यांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी मिरवणुकीत सामील झालेल्या प्रचंड जनसमुदायातून "आंबेडकर कौन है, दलितोंके राजा है ।' अशा घोषणा दिल्या जात होत्या. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या गाडीत बसले होते ती मूळ गाडी आजही जतन करून ठेवली आहे. ती गाडी मारवाडी समाजातील एका व्यक्तीची होती. त्यांच्याकडून ती गाडी बापू माळी नावाच्या व्यक्तीने विकत घेतली होती. त्यानंतर ती येथील 1941 साली ग्रामपंचायतीने ताब्यात घेतली व आजतागायत झाकून ठेवली होती. तीच गाडी कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी बरेच प्रयत्न करून तेथील नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत यांच्या सहकार्याने ताब्यात घेतली आहे. 
ती ऐतिहासिक बैलगाडी डॉ. बाबासाहेबांच्या मिरवणुकीची साक्ष

No comments:

Post a Comment