My Followers

Friday, 13 July 2012

अनिष्ट व अघोरी प्रथा विरोधी कायद्याचा मसुदा

अनिष्ट व अघोरी प्रथा विरोधी कायद्याचा मसुदा...!!!


उद्देश व कारणे यांचे निवेदन.
अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा व पिशा.बाधा इत्यादींमुळे तसेच, भोंदूबाबा यांच्याकडून समाजातील सामान्य जनतेचेमानसिक, शारीरिक वा आर्थिक नुकसान व शोषण होण्याच्या घटना फार मोठया संख्येने उघडकीस येत असून हे प्रमाण अत्यंत भयावह आहे.
जादूटोणा करणाऱ्या व्यक्ती, भोंदूबाबा यांचा आपल्याकडे अद्भूत व चमत्कारी उपाय किंवा शक्ती असल्याचा खोटा दावा आणि यांची समाज विघातक व नुकसानकारक कृत्ये यांमुळे समाजाची घडीच विस्कटण्याचा आणि अधिकृत व शास्त्रीय वैद्यकीय उपाय व उपचार यांवरील सामान्य जनतेच्या विश्वासाला तडा जाण्याचा धोका निर्माण झाला आहे आणि या अंधविश्वासामुळे व अज्ञानामुळे ते अशा
भोंदूबाबा आणि जादूटोणा करणाऱ्या व्यक्तींचा आश्रय घेत आहेत. अशा परिस्थितीत, जादूटोणा करणाऱ्या या व्यक्ती, भोंदूबाबा यांच्या कुटिल कारस्थानांना बळी पडण्यापासून सामान्य जनतेला वाचवणे व अशा अनिष्ट परिणामांना परिणामकारकरित्या आळा घालण्यासाठी आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी व या नुकसानकारक प्रथा, परिपाठ व रुढी, तसेच जादूटोण्यावरील विश्वास आणि अशा इतर अनिष्ट अघोरी प्रथा यांचा प्रसार रोखण्यासाठी उचित व कठोर सामाजिक व कायदेविषयक उपाय योजना करणे शासनाला अत्यावश्यक झाले आहे;

प्रस्तावित अधिनियमाची ठळक वैशिष्टये पुढीलप्रमाणे-

1 ''जादूटोणा करणे आणि अनिष्ट व अघोरी प्रथांचा अवलंब करणे'' या शब्दप्रयोगाची व्याख्या देऊन, भोंदूबाबायांच्याकडून करण्यात येणारा जादूटोणा, अवलंबिल्या जाणाऱ्या अनिष्ट व अघोरी प्रथा, तसेच, केली जाणारी अधिकृत व बेकायदेशीर वैद्यकीय औषधयोजना व उपचार यांच्या प्रचाराला व प्रसाराला प्रतिबंध करण्यात आला आहे या अधिनियमाअन्वये या गोष्टी करणे हा अपराध ठरविण्यास आलेला आहे आणि या अधिनियमाची जरब बसविण्यासाठी असे अपराध दखलपात्र व अजामीनपात्र ठरविण्यास आले असून, त्यासाठी, अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे;
2 या अधिनियमाच्या व नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन होत आहे किंवा कसे, याचा तपास करणे व त्याला प्रतिबंध करणे, तसेच या अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर परिणामकारकरित्या खटले चालविले जाण्यासाठी साक्षीपुरावे गोळा करणे, याकरिता, एक दक्षता अधिकारी असण्याची तरतूद करण्यात आली आहे;
3 जिने, या कायद्याच्या तरतुदींखालील अपराध केला आहे अशा व्यक्तीच्या दोषसिध्दी संबंधातील तपशील प्रसिध्द करण्यासंबंधीचे अधिकार न्यायालयाला प्रदान करू शकेल अशी सहाय्यकारी तरतूद करण्याचे प्रस्तावित केले आहे.
4 इतर अनुषंगिक व संबंधित बाबी.
वरील उद्दिष्टे साध्य करणे हा या विधेयकाचा हेतू आहे.
--चंद्रकांत हंडोरे, सामाजिक न्याय मंत्री. दिनांक 13 डिसेंबर 2005

अनुसूची

(1) भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला, दोराने किंवा साखळीने बांधून ठेवून मारहाण करणे, काठीने किंवा चाबकाने मारणे, पादत्राणे भिजवलेले पाणी प्यायला लावणे, मिरचीची धुरी देणे, छताला टांगणे, दोराने किंवा केसांनी बांधणे, त्या व्यक्तीचे केस उपटणे, व्यक्तीच्या शरीरावर किंवाअवयवांवर तापलेल्या वस्तूचे चटके देऊन इजा पोहोचविणे, उघडयावर लैंगिक कृत्य करण्याची
जबरदस्ती करणे, व्यक्तीवर अघोरी कृत्य करणे, तोंडात जबरदस्तीने मूत्र किंवा विष्ठा घालणे किंवा यासारख्या कोणत्याही कृती करणे.
(2) एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कार करुन त्यापासून आर्थिक प्राप्ती करणे, तसेच अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करुन लोकांना फसवणे, ठकवणे अथवा त्यांच्यावर दहशत बसविणे.
(3) अतिमानूष शक्तीची कृपा मिळविण्यासाठी ज्यामुळे जिवाला धोका निर्माण होतो किंवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात अशा अनिष्ट व अघोरी प्रथांचा अवलंब करणे; आणि अशा प्रथांचा अवलंब करण्यास इतरांना प्रवृत्त करणे, उत्तेजन देणे किंवा सक्ती करणे.
(4) मौल्यवान वस्तू, गुप्त धन, जलस्त्रोत यांचा शोध घेण्याच्या बहाण्याने वा तत्सम कारणाने करणी भानामती या नावाने कोणतेहीअमानुष कृत्य करणे आणि जारणमारण अथवा देवदेवस्की यांच्या नावाखाली नरबळी देणे, किंवा देण्याचा प्रयत्न करणे किंवा अशी अमानुष कृत्ये करण्याचा सल्ला देणे, त्याकरिता प्रवृत्त करणे, अथवा प्रोत्साहन देणे.
(5) आपल्या अंगात अतिंद्रिय शक्ती असल्याचे भासवून अथवा अतिंद्रिय शक्ती संचारली असल्याचा आभास निर्माण करुन इतरांच्या मनात भीती निर्माण करणे वा त्या व्यक्तीचे सांगणे न ऐकल्यास वाईट परिणाम होतील अशी इतरांना धमकी देणे.
(6) एखादी विशिष्ट व्यक्ती करणी करते, काळी विद्या करते, भूत लावते, मंत्रतंत्राने जनावरांचे दूध आटवते, असे सांगून त्या व्यक्तीबाबत संशय निर्माण करणे, त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती अपशकुनी आहे रोगराई पसरल्यास कारणीभूत आहे, इत्यादी सांगून वा भासवून संबंधित व्यक्तीचे जगणे मुश्किल करणे, त्रासदायक करणे वा कठीण करणे; कुठलीही व्यक्ती सैतान असल्याचे किंवा ती सैतानाचा अवतार असल्याचे जाहीर करणे.
(7) जारणमारण, करणी किंवा चेटूक अथवा यांसारखे प्रकार केले आहेत या सबबीखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे, तिची नग्नावस्थेत धिंड काढणे, किंवा तिच्या रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणे.
(8) मंत्राच्या सहाय्याने भूत पिशाच्चांना आवाहन करुन किंवा भूत पिशाच्यांना आवाहन करीन अशी धमकी देऊन एकूणच लोकांच्या मनात घबराट निर्माण करणे, मंत्रतंत्र अथवा तत्सम गोष्टी करून एखाद्या व्यक्तीस विषबाधेतून मुक्त करतो आहे असे भासवणे,
शारीरिक इजा होण्यास भूताचा किंवा अमानवी शक्तीचा कोष असल्याचा समज करुन देणे, लोकांना वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून, त्याऐवजी त्यांना अघोरी कृत्ये वा उपाय करण्यास प्रवृत्त करणे अथवा मंत्रतंत्र(चेटूक), जादूटोणा अथवा अघोरी उपाय करण्याचा आभास निर्माण करुन लोकांना मृत्यूची भीती घालणे, वेदना देणे किंवा आर्थिक वा मानसिक हानी पोहोचविणे.
(9) कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार करणे.
(10) बोटाने शस्त्रक्रिया करून दाखवतो असा दावा करणे किंवा गर्भवती स्त्रीच्या गर्भाचे लिंग बदल करून दाखवतो असा दावा करणे.
(11) (क) स्वत:त विशेष शक्ती असल्याचे अथवा कुणाचातरी अवतार असल्याचे वा स्वत:त पवित्र आत्मा असल्याचे भासवून किंवा त्याच्या नादी लागलेल्या व्यक्तीस पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती वा प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून, अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे;
(ख) मूल न होणाऱ्या स्त्रीला अतींद्रिय शक्ती द्वारा मूल होण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे.
(12) मंद बुध्दीच्या व्यक्तीमध्ये अतींद्रिय शक्ती आहे असे इतरांना भासवून त्या व्यक्तीचा धंदा व
व्यवसाय यासाठी वापर करणे.

No comments:

Post a Comment