My Followers

Thursday, 30 August 2012

एक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....!!!

एक विद्रोही कवी...नामदेव ढसाळ....!!!  
नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते आहेत. महानगरीय जीवन आणि बोली भाषा या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखन त्यांनी केले आहे.दलितांचे,शोषितांचे जीवन स्वतः भोगलेला, अनुभवलेला हा सिद्धहस्त लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार आहे. त्यांनी दलित पँथर ही सशस्त्र संघटना १९७२ मध्ये सुरू केली.१९७३ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह गोलपीठा प्रकाशित झाला. यानंतर आणखी कवितासंग्रह मूर्ख म्हातार्‍याने डोंगर हलवले, तुझी इयत्ता कंची?, खेळ, आणि प्रियदर्शीनी प्रसिद्ध झाले. आपल्या विशिष्ट शैलीने मराठी कवितेच्या परंपरेत मोलाची भर घालणार्‍या आणि भाषिक दृष्टया प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरून मराठीला समृद्ध करणार्‍या मोजक्या साहित्यिकांपैकी एक प्रतिभाशाली कवी.

नामदेव ढसाळांच्या कविता ह्या सत्य परिस्थितीवर कडक  जहाल असे ताशेरे ओढणाऱ्या आहेत,  ढसाळांची लेखणी वरण भातावर पसरवलेल्या साजूक तुपासारखी नसून गोफणगुंडय़ातून सणसणत सुटणारे गोट्यांसाट्यांसारखी आहे. ती एका चळवळीची,भाकरीची, ऊन- चिकट रक्ताचे पाट पाहणार्‍या, सल्ली-डल्ली-बोटी वाल्यांची, अत्तदीपभवाच्या दिशेने नेणारी, कोणत्याही प्रकारची सेटलमेंट नाकारणारी कविता आहे. शेठ-सावकारांविरोधात उच्चारलेला जहाल यल्गार आहे. 

मित्रानो कवी नामदेव ढसाळांच्या कविता समजून घेण्यासाठी त्यांच्या कवितेत घुसावे लागते, त्यांच्या शब्दांना न समजता त्यांच्या एक एक शब्दांच्या मागे डोकावे लागते, चला तर मग आपणही काही निवडक कवितेत घुसून शब्दांच्या मागे डोकावूयात.....!!! 


--------------------------------------------------------------------------------
तिच्यासाठी (गोलपिठा) 

नरकात तिला ऋतू आला 

तिच्या ओटीपोटी लखलखीत बीजपण-- 

आभाळ मनातल्या मनात 

कुढणा-या माणसागत होत गेलं 

फ़िक्कट पिवळसर 

देणंघेणं नसताना 
ती रस्त्यातुन पैंजणत जाताना 
जंतूंच्या समस्त जमातीनं 
सहस्त्राक्ष गुढ्या उभारल्या 
असोशी वाहणा-या गटारांनी 
थम घेऊन--तिच्यासाठी 
प्रार्थना भाकली--दुवा मागितला

--------------------------------------------------------------------------------
- थोडा वेळ तरी.. -
काही माणसं असतात चारित्र्यवान
काही माणसं असतात चारित्र्यहीन
म्हणून पाऊस पडायचा राहत नाही ग्रीष्मातही झाडे जळायची राहत नाही.
जीवंतपणीच नरक वाट्याला आला मेल्यानंतरच्या स्वर्गाचं अप्रूप कशाला ? 
फारच जीव कोंडून गेला रे 
थोडा वेळ तरी गड्या उघड आकाशाची खिडकी
--------------------------------------------------------------------------------
-या कवितेला स्वतःचं अस्तित्व असू दे...-

या कवितेला स्वतःचं अस्तित्व असू दे,

जरी असलो आपण एकमेकांसाठी त्रयस्थ.

हातातील प्राजक्ताची फुलं कोमेजू न देणार वय होत ते.

ओठांचं थरथरनाऱ्या गुलाबांच्या पाकळ्यात रुपांतर होण्याचं वय होत ते.

क्षितीजाने महासागर प्राशून टाकण्याचं वय होत ते.

तरीही हा सारा अनुभव अस्पृश्याचाच राहिला.

जे काही घडायला पाहिजे होत ते या जन्मातच.

ज्या 'स्कूल' मधून मी आलो, त्याच्या सिलाबसमध्ये पुनर्जन्माला जागा नव्हती.

ना तू ज्युलीयट होती, ना मी रोमिओ,

तरीही आपण एका व्याकुळ प्रेमकथेतली पात्र होतो.
--------------------------------------------------------------------------------
मी मारले सूर्याचे रथाचे सात घोडे

वाल्मीकीची कार्बनकाॅपी व्हायचे नव्हते मला 
प्रपंचाच्या रगाडयाने केले मला पापाचे धनी 
बायकोला म्हणालो--'घे यातले थोडेसे वाटून' 
तिने कानांवर हात ठेवले! 
मुलालाही हीच वाक्ये म्हणून दाखविली 
त्याने तर अंगाला पान सुद्धा लावुन घेतले नाही 
वाल्मीकीने पापाचे ओझे वाहत वाहत अजरामर 
आर्षकाव्य तरी लिहिले. 
आणि मी? 
मी जगण्याचे ओझे येथपर्यंत वाहत आणले. 
हे जगण्याच्या वास्तवा 
आता तुच सांग मी काय लिहू?
--------------------------------------------------------------------------------
वडारी दगडांना स्वप्न देतात ..
मी फुलबाजा पेटवतो …
बापाच्या आयुष्यात उतरू नये म्हणतात …
उतरतो … कानाकोपरा खाजवतो …
वडारी दगडांना फुलं देतात …

मी बेंडबाजा वाजवतो …
चार स्त्रियांच्या कमानी देहातून ….
कातळलेला उभा पारशी ओलांडतो …
बापाचा रक्ताळलेला पुठ्ठा पाहतो ….
अंधाराच्या गोन्दणीत ओठ भाजेपर्यंत सिगार ओढतो , उसमडतो …
वडारी दगडांना गरोदर ठेवतात …
मी थकलेले घोडे मोजतो …
स्वतःला टांग्याला जुंपून बापाचे प्रेत हाताळतो , जळतो ….
वडारी दगडांना रक्तात मिसळतात
मी दगड वाहतो …
वडारी दगडाचं घर करतात …
मी दगड डोक्यात घालतो …. मी दगड डोक्यात घालतो …
--------------------------------------------------------------------------------
जातीव्यवस्थेने घातलेल्या मणामणाच्या बेड्या वागवत, मान खाली घालून चालत असलेल्या समाजात बाबासाहेबांनी स्फुल्लिंग चेतवलं आणि वणवा पेटला. याच वणव्याचा धगधगता झेंडा खांद्यावर घेतलेल्यांपैकी एक नामदेव ढसाळ. ढसाळ यांनी शब्दांचा अक्षरश: हत्यारासारखा उपयोग केला आणि शोषक व्यवस्थेचे वाभाडे काढले. 'तुझे बोट धरून चाललो आहे मी'मधल्या कविता अशाच धगधगत्या आहेत. 
हा भाकरीचा जाहीरनामा 
हा संसदेचा रंडीखाना 
ही देश नावाची आई 
राजरोस निजते कुबेराच्या सोबत 
किंवा 
तेच तेवढे आईच्या उदरातून आलेत? 
बाकीचे कुत्र्या-मांजराच्या! 
ही त्याची केवळ उदाहरणं. 
ढसाळांची कविता झाडा-फुलांच्या, वाऱ्या-ताऱ्यांच्या गोड-गुळचट बाता करणारी नाही. ती एका चळवळीची, बांधिलकीची कविता आहे. शोषकांविरोधात उगारलेल्या मुठीचा तो जहाल अविष्कार आहे. या संग्रहातल्या कवितांतून हा अविष्कार सतत भिडत राहतो. मात्र तो भिडत असतानाच कवी ढसाळ यांनी उगारलेल्या मुठीच्या शेजारीच आणखी एक बलदंड मूठ उभी ठाकते. ही मूठ असंख्य प्रश्नांची आणि त्यांचा रोख नामदेव ढसाळ यांच्याकडेच. 

--------------------------------------------------------------------------------
ढसाळ बाबासाहेबांना उद्देशून म्हणतात... 
तुम्ही तुमची असली व्यक्तिपूजा कुणाला करू दिली 
                                                            नाही 
                                           तुमच्या पश्चात हा गुन्हा केला आहे मी 
                                                तुम्ही दिलेली शिक्षा भोगून 
                                          माझा जन्म पवित्र होईल बाबासाहेब... 

बाबासाहेब आंबेडकर यांना व्यक्तिपूजा आवडत नव्हती, हे खरं. मात्र ढसाळ यांच्या या संग्रहातल्या कवितांची 'व्यक्तिपूजेची स्तोत्रे' म्हणून संभावना करणं शक्यच नाही. ही आहे एका महामानवाप्रती व्यक्त झालेली निखळ कृतज्ञतेची भावना. मनाचा अवकाश लख्ख करत तो विस्तारणारी कृतज्ञता. 

--------------------------------------------------------------------------------  एका कवितेत ढसाळ सवाल करतात... 
माझे वामपंथी पुरोगामी राजकारण कुठाय? 

कुठायत ते समविचारी खरे डावे? 
त्यावर त्यांचंच म्हणणं असं... 
ते बसलेयत संसदेत वर्गशत्रूबरोबर 
इथे प्रश्न उभा ठाकतो तो ढसाळ आज नेमकं कुठलं राजकारण करताहेत हा. 
या असल्या ओळींपेक्षा 
गड्या सोबत कर प्रवासासाठी पुढच्या 
माझ्या मार्गाभवती मोहाचे अरण्य पसरलेय 
मी पश्चातापाची प्रार्थना म्हणतो आहे 
क्षमा कर... विसरलो काही वषेर् 
तुझ्यावर कविता करणे... 
या ओळी कितीतरी अधिक सच्च्या आहेत. अर्थात, या अशा पश्चातापाच्या प्रार्थना म्हटल्या की जबाबदारी संपली, असं नाही. मनाला लागलेली टोचणी त्याने कमी होईलही कदाचित. वैचारिक बांधिलकी एकीकडे आणि प्रत्यक्षात चालत असलेल्या वाटा दुसरीकडे, या संघर्षातून मनाला होत असलेला काच कमी होईलही त्यातून. पण काही काळच. आणि अशा प्रार्थनांनाही अर्थहीन कर्मकांडाचं स्वरूप येण्याची भीती आहेच की. म्हणजे मनाला टोचणी लावणाऱ्या व्यवहाराची कबुली द्यायची, त्याबद्दल वाटणारी खंत खुलेपणाने मान्य करायची. पण पुढे काय? पुढे तोच आणि तसाच व्यवहार? त्यापेक्षा पश्चातापाची प्रार्थना म्हणण्याची वेळच येणार नाही, याची काळजी घेतली तर? 

-------------------------------------------------------------------------------- गोलपिठामधून नामदेव ढसाळांनी शोषित समाजाची जी वेदना मांडली, ती इतकी अस्सल होती की त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्यास कोणीही धजावणार नाही. त्यांच्या आयुष्यात ज्या विश्वात ते वावरले, तो त्यांचा मुंबईतील फॉकलंड रोडच्या वेश्यावस्तीतील भाग म्हणजे गोलपिठा. जिथे दारू, मटका आणि रांडबाजी शिवाय कोणी जीवन जगत नाही. जिथे कोंबडं कापावं इतक्या सहजपणे माणसे कापली जातात. जिथे दिवस रात्री सुरू होतो. ढसाळांच्या भाषेतच सांगायचे तर
"मनगटावरच्या चमेलीगजर्‍यात कवळया कलेजीची शिकार उरकून
शेवटच्या बसची वाट पाहणारे बाहेरख्याली लोक"


पदोपदी दिसतात. जिथे हिजड्यांची शरीरेही भोगली जातात. जिथे सर्व ऋतू सारखेच असतात.

"येथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच असतो
म्हणून फांदीला नुसता सांगाडाच लटकवून भागत नाही रे

इथे माण्सालाच माणूस खात असतो

आणि वाल्याच्या पाठीवरले वळ लपविले जातात रे"

अशा विश्वात, तरूण वयात आजुबाजूचे भयाण जीवन पाहून, अन्याय अत्याचार सहन करून हा एका खाटिकाचा मुलगा कविता लिहायला लागला. सोसलेले अत्त्याचार आग होऊन त्यातून बाहेर पडू लागले. लेखणी मशाल झाली, ज्यात अख्ख्या विश्वाला जाळून टाकण्याची ताकद होती. त्यामुळे तो ठणकावून म्हणतो
" जिवाचे नाव लवडा ठेवून जगणार्‍यांनी
खुशाल जगावे....

मी तसा जगणार नाही "

या विश्वात वावरूनही ढसाळांच्या जाणीवा बोथट झाल्या नाहीत. त्या दिवसेंदिवस धारदार होत गेल्या. त्या अगतिक झाल्या नाहीत, ज्वलंत झाल्या.
"मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीला
शिव्या देतो, तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो

इव्हन मी आईबापांनादेखील शिव्या देतो

बांबलीच्यानो इथे जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात

आता मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केलेत"

या कवितेत शोषणव्यवस्थेला सुरूंग लावण्याची धमक आहे. ती बेधडकपणे सांगते की
"तुमच्या गांडीचे कानवले कुरतडलेत ज्यांनी
त्यांच्या नाशासाठी मी पिकू घातलेय आढी"

हा दिलासा, हे आश्वासन ही कविता देते. त्यामुळे ती जवळची वाटते. स्वत:च्या वेदनेत इतरांना सामावून घेण्याची जबरदस्त ताकद या कवितेत आहे.
"शेटसावकारांची आय झवून टाकावी
नात्यागोत्याचा केसाने गळा कापावा

जेवणातून विष घालावे मूठ मारावी

रांडवाडे वाढवावेत: भाडखाव व्हावे"

पण ती पुढे म्हणते -
" नंतर उरल्यासुरल्यांनी कुणालाही गुलाम करून लुटू नये
नाती न मानण्याचा, आयभैन न ओळखण्याचा गुन्हा करु नये

आभाळाला आजोबा अन जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत

गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे

चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे"

इथे ही कविता विश्वात्मक होते. शेटसावकारांची 'आय झवण्याची' भाषा करणारे ढसाळ मला इथे आभाळासारखे वाटतात. इथे ढसाळ एका जातीपुरते मर्यादित रहात नाहीत, एका धर्मापुरते मर्यादित रहात नाहीत, एका राज्यापुरते, एका भाषेपुरते मर्यादित रहात नाहीत, एका देशापुरते मर्यादित रहात नाहीत तर जगात ज्या ज्या माणसाचे शोषण झाले आहे, मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, देशाचा असो त्याचे होऊन जातात. त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. कारण त्या इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते. तिला तिच्या अस्सल रूपात वहायला मिळते म्हणून ती प्रामाणिक वाटते. आणि ती प्रामाणिक असते म्हणून लोभसवाणी असते. (संदर्भ - धोंडोपंत, मि.पा.)
 ----------------------------------------------------------------------------

माणसाने पहिल्याप्रथम स्वतःला  (गोलपिठा) 

माणसाने पहिल्याप्रथम स्वतःला   

पूर्ण अंशाने उध्वस्त करुन घ्यावे 

बिनधास डिंगडांग धतींग करावी 

चरस गांजा ओढावा 

अफीन लालपरि खावी 

मुबलक कंट्री प्यावी - ऐपत नसेल तर 

स्वस्तातला पाचपैसा पावशेर डाल्डा झोकावा 
दिवसरात्र रात्रंदिवस तर्रर रहावे 
याला त्याला कुणालाही आयभयणीवरून 
गाली द्यावी धरुन पिदवावे... 
माण्साने जवळ रामपुरी बाळगावा 
गुपची फरशी तलवार शिंगा हॉकी बांबू 
ऍसिडबल्ब इत्यादि इत्यादि हाताशी ठेवावे 
मागेपुढे न पाहता कुणाचेही डेहाळे बाहेर काढावे 
मर्डर करावा झोपलेल्यांची कत्तल करावी 
माण्साला गुलाम बनवावे त्याच्या गांडीवर हंटरचे फटके मारावे 
त्याच्या रक्ताळ कुल्ल्यांवर आपल्या घुगर्‍या शिजवून घ्याव्या 
शेजार्‍याला लुटावे पाजार्‍याला लुटावे बँका फोडाव्यात 
शेठसावकाराची आय झवून टाकावी नात्यागोत्याचा 
केसाने गळा कापावा जेवणातून विष घालावे मूठ मारावी 
माण्साने कुणाच्याही आयभयणीवर केव्हाही कुठेही चढावे 
पोरीबाळींशी सइंद्रिय चाळे करावे म्हातारी म्हणू नये 
तरणी म्हणू नये कवळी म्हणू नयी सर्वांना पासले पाडावे 
व्यासपीठावरून समग्र बलात्कार घडवून आणावे 
रांडवाडे वाढवावेत : भाडखाव व्हावे : स्त्रियांची नाकं थानं 
कापून मुड्या गाढवावर बसवून जाहीर धिंडवडे करावेत 
माण्साने रस्ते उखनावेत ब्रीज उखडावेत 
दिव्याचे खांब कलथावेत 
पोलिसस्टेशने रेल्वेस्टेशने तोडावीत 
बसेस ट्रेन कार गाड्या जाळाव्यात 
साहित्यसंघ शाळा कॉलेजं हॉस्पिटलं विमानअड्डे 
राजधान्या इमले झोपड्या वखवखलेल्या भुकाळ वस्त्या 
यावर हातबाँब टाकावेत 
माण्साने प्लेटो आइन्स्टाइन आर्किमिडीस सॉक्रेटीस 
मार्क्स अशोक हिटलर कामू सार्त्र काफ्का 
बोदलेअर रेम्बो इझरा पाउंड हापकिन्स गटे 
दोस्तोव्स्की मायकोव्हस्की मॅक्झीम गॉर्की 
एडिसन मिडिसन कालिदास तुकाराम व्यास शेक्सपीअर 
ज्ञानेश्वर वगैरे वगैरेंना त्यांच्या शब्दांसकट गटाराचे 
मेनहोल उघडून त्यात सलंग सडत ठेवावे 
येसूच्या पैगंबराच्या बुद्धाच्या विष्णूच्या वंशजांना फाशी द्यावे 
देवळे चर्च मशिदी शिल्पे म्युझियम्स कुस्करुन टाकावे 
पंड्यांना बंड्यांना तोफेच्या तोंडी द्यावे त्यांच्या रक्ताने 
भिजलेले रुमाल शिलालेखावर कोरून ठेवावेत 
माण्साने जगातील सर्व धर्मग्रंथांची पाने 
फाडून हागायचे झाल्यावर त्यांनी बोचे साफ करावेत 
कुणाच्याही कुंपणाच्या काठ्या काढाव्यात आता हागावे मुतावे गाभडावे 
मासिक पाळी व्हावे शेंबूड शिंकरावे 
घाणेंद्रिये जास्त घाण करतील असे शेवटून घ्यावे 
जिकडे तिकडे वरखाली खालीवर मध्ये नरकच नरक 
उभारावेत..... अश्लील अत्याचारी व्हावे माण्सांचेच 
रक्त प्यावे डल्ली सल्लीबोटी खावी चर्बी वितळवून प्यावी 
टिकाकारांचे गुडसे ठोकावेत हमनदस्ती पाट्यावर 
वर्गयुद्धे . जातियुद्धे . पक्षयुद्धे . धर्मयुद्धे . महायुद्धे 
घडवून आणावी पूर्ण रानटी हिंस्त्र आदिम बनावे 
बेलाशक अराजक व्हावे 
अन्न न पिकवण्याची मोहिम काढावी अन्नावाचून पाण्यावाचून याला त्याला 
स्वतःलाही मारावे रोगराई वाढवावी वृक्ष निष्पर्ण करावेत कुठलेही 
पाखरू न गाईल याची दक्षता घ्यावी माण्साने विव्हळत किंकाळत 
लवकरात लवकर मरण्याचे योजाने 
हे सारे सारे विश्वव्यापू गळूप्रमाणे फुगू द्यावे 
अनामवेळी फुटू द्यावे रिचू द्यावे 
नंतर उरल्यासुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये लुटू नये 
काळागोरा म्हणू नये तू ब्राम्हण तू क्षत्रिय तू वैश्य तू शुद्र असे हिणवू नये 
कुठलाही पक्ष काढू नये घरदार बांधू नये नाती न मानण्याचा 
आयभैन न ओळखण्याचा गुन्हा करू नये 
आभाळाला बाप आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत 
गुण्यागोविंदाने आनंदाने रहावे 
चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे 
एक तीळ सर्वांनी करंडून खावा माण्सावरच सूक्त रचावे 
माण्साचेच गाणे गावे माणसाने 
-------------------------------------------------------------------------------- 
मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे
ये व माझा स्वीकार कर
सात घटकेचा मुहूर्त
आधीव्याधीनंतर
सर्वांगसुंदर प्रतिमासृष्टी
अश्विनीरुप ऋतुस्नात कामातूर लक्ष्मी
सर्पस्वरुप विष्णू उर्ध्वरेत स्खलित
सूर्याचे अनुष्ठान
हे शेष सूर्याच्या चेहऱ्या
हे कामेच्छेच्या माते
हे आदिती
माझ्या प्रियेचा दगड
मला अधिकच प्रिय आहे
4 वेद 18 पुराणं 6 शास्त्र
मी मारतो लंडावर
6 राग 36 रागिण्या मी खेळवतो उरावर
छान, या सुभगवेळी
तू संभोगेच्छा प्रदर्शित करतेस?
स्त्रीची कामेच्छा पुरी न करणं
कवी असल्यामुळे मी समजतो पाप

कोकिळा गातायत राजहंस गातायत

पानंफुलं झिम्माफुगडी खेळतायत
खरंच गं, तुझ्या अरण्यानं नवीन रंग धारण केलाय
द्वैत भावातल्या शुभाशुभाची सावली
जिथे नजर टाकतो तिथे अथांग शृंगार
अस्तित्वाच्या दर्पणात तुझा कैफ उभा
विस्ताराचे संदर्भ, नश्वर अनवरत जलधार
अराजकता, निरर्थकता
सरळ सोप्या प्रतिमांतून रुप घेणारं तुझं लावण्य
सत्याच्या अंतहीन रेषेला स्पर्श करणारा
आकाशानंतरचा विलुप्त स्वर्ग
अप्राप्य प्रेमाच्या गोष्टीअगोदरचा क्षुद्र दैनिक मृत्यू
ध्वनी वळणानंतर होत जातो पुष्कळ
नेपथ्याच्या जागी फेकलं जातं द्रवरुप
तीन वृक्षांच्या तीन तऱ्हा
कालोदयाबरोबरची चकोर वाढ
चंद्रकिरणांचं नृत्य
चंद्रकोरीवरली धूळ चोच मारुन एक चिमणी झटकते आहे
हिरवळीच्या चादरीत दवबिंदूंचा चेहरा लपलेला
सहस्त्रमुखांनी
हे सर्व पूर्वसमुद्राला मिळण्यापूर्वी
या नि:शेष साम्राज्यात मला माझ्या
अभिशप्त एकांतापर्यंत जाऊ दे
मी भ्रमणयात्री
या शहरातलं हे हवेचं तळं
तळ्यामधल्या न्हात्याधुत्या पोरी
खडतराची तुळई आणि उशी
गवत ढग आणि पाण्याचा विभ्रम
हिर्वा आशीर्वाद घेऊन माझा आत्मा निघाला आहे भ्रमणाला
दुपारी
जनावरांसारखं रवंथ करणं कदाचित नसावं त्याच्या
अंगवळणी
तुझी मर्जी ठेव उजेडावर
उजेड म्हंजे ज्याला मी म्हणतात
नाहीतर कोसळून जातील विद्यापीठातले बुद्धीजन्य वारस
आता काहीच हरवण्यासारखं उरलं नाही
आता काहीच मिळण्यासारखं राहिलं नाही
‘मारा’चा पाऊस सहन करणारी नुसती एक सशक्त पोकळी
आणि कुणाचीही भिंत चोरुन अंगावर चालत येणारा ज्ञानेश्वर
कल्पनेचा महारोग
बेंबी / मेंदू / फुफ्फुस यांतून
या सर्व रोगलागणीनंतरही
ही ज्ञानपीठं आनुवांशिक, त्यांच्या अंतरंगातून
झुलती घरं इच्छांची
ही बैठकीच्या जागेतली शापितं आणि गुपितं
भाषेचं वस्त्र भाषेचा साज भाषेचा रोग आणि
भाषेचा हातमाग
आठवणी बालपणाच्या आणि परिपक्वतेच्या
चालतो परंतु अंतर कापलं जात नाही
ही खोड जडतरातली
बिछान्याचं पातं
बिछान्याचे आयने
शाईच्या पंखातून प्रसवणारं समृद्धीचं नागरिकत्व
भविष्य होऊन जातं डोळ्यातलं गढूळ पाणी
कल्पनेच्या पंज्यात सापडतो निराशयाचा उंदीर
सार्वजनिक जागांचं गावठी माहात्म्य उठतं पेटून
लक्षवेधी सूचनेनुसार
नि:श्वास लागतो पिकू
दृष्टीक्षेप होतो प्रस्थापित
वर्ष, वर्षामागून वर्ष
परंतू शकत नाहीत मूळ जागी
कितीतरी गमावलं
कितीतरी कमावलं
वेळ करु शकत नाही सहाय्य
तू एक दुखरा क्षण ठेव माझ्यासाठी जपून
मी तुझ्यातून
फाटक्या भणंगासारखा निघून जाणार नाही
मुंबई, मुंबई
माझ्या प्रिय रांडे
मी तुला नागवून जाईन
कालचक्राची विलोभनीय रुपं
‘नशीब’ नावाचा दरोडेखोर त्यांवर प्रहार करणारा
“चार आनेकी मुर्गी
बारा आनेका मसाला”
शतकांच्या जखमांवर किती मलम चोळायचं?
 सुळावरच्या पोळ्या किती उपसायच्या?
किती ठेवायचे आठवणीत दगड?
प्रत्येक ठेचेत एक एक मृत्यू सहज आणि रगड
या भूमिगतपणातून व्हायचं असं प्रगट
मर्मात आवाज भिडू द्यायचा आकाशाला
समुद्राचा खवळता
वीज आणि ज्वालामुखी
ढगाची छत्री या समुद्रनवरीच्या माथ्यावर
वऱ्हाडी, करवल्या आणि करवले
ही वरात अशीच वाजत गाजत चाललेली
धुळीच्या चेहऱ्याला जखमी करणारा घोड्याचा नाल
ही मायावी पृथ्वी करु शकणार नाही आपलं कल्याण
पोटभर घालणार नाही जेवू खावू
पाशवी थैमानांचं आंधळेपण
आंधळा न्याय तीक्ष्ण नख्यांचा
या अगाध गहनतेत पेरलेलं दु:ख माझं
हे स्त्रोतफूल अनुपातातलं लोकोत्तर
सुलभत्या वैभवाचा होतो असा गर्भपात
भूतभविष्याच्या डोहात जाऊ दे मला बुडून
हजारो वर्षांपासून ही पाखरं कैदेत तडफडणारी
माणसांचा समुद्र, विशालतर बंदरं
कावळे बगळे पोहते पाणपक्षी
समुद्राची मुडप महिरप घडपडघडीची
काठ्या डोलकाठ्या उभारती शिडं आव्हानांची
सिंदबादच्या सफरी
नानाविध रुपं समुद्रखेळाची
सूर्य असा गुंजेसारखा होऊन जातो गडीगप्प पाण्यात
क्षितिजाच्या पलिकडे त्याला असं शोधायला निघायचं
आपल्याच रक्ताचे नि:स्पंद भोग असे राजरोस जागवायचे
दळणवळणाचे जाळे
ट्रेन, बसेस, डिलिव्हरी व्हॅन्स
सात लाख वाहनांनी प्रदूषित काळीकभिन्न झालेली तू
ओंजळभर पाण्यात आपण जीव द्यायचा काय?
हे असं नाकातोंडात पाणी
ही अशी नाकाबंदी
घ्या सुय्या पोत बिबं
बाये
हायका
डबा बाटली
कागद कपटा
हेपट्यावर हेपटा
ही मुंबई खरंच कोणाला उपाशी निजू देणार नाही
ही मुंबई खरंच कोणाला उपाशी मरु देणार नाही
कंच्या भूगर्भातील पुरुषार्थाशी ही रात्र
संग करु पहातेय?
सीमांत, देहांत
या गिरण्यांची बटनं
कोण ऑन करतात?
दुर्दम्य स्पर्शाचं रोरावणं
संकीर्ण वेदनांचा परावश चित्कार
या बीजांना कोणाच्या आज्ञेवरुन अंकुर फुटतात
संप मोर्चे निदर्शनं घेराओ
जमल्यास लुटुपुटूचा लाँग मार्च
जीवनातल्या विषाचा विलंब
सुखदु:खाचा तोळामासा
ना आत ना बाहेर
स्वच्छ निळ्यात, सताड चंद्र उभा
रोशनीची उन्नत लहर, नि:स्तब्धता
जागोजागी क्षार हरवलेल्या अदृश्य गंधाच्या लाटा
माझ्याच ओढाळ देहाचा तू एक अवयव
माझ्याच रात्रीचा तू एक विभाग
मी वेडा आहे तुझ्यासाठी
छप्पर फाडून तू खाली ये
जोपर्यंत रोपित करत नाहीस तुझं अभिजात प्रेम
मी भुकेला आहे तहानलेला आहे आणि निद्रानाशानं त्रस्तसुद्धा
मी मागतो आहे भीक खणानारळाची
धुतले तांदुळ आणि तांदुळज्याची भाजी
एक दुसऱ्याला स्पर्श करणारी आपली ऱ्हदयं
आजपर्यंत मी ठेवला नसेल तुझ्यावर विश्वास
आलो नसेन तुझ्या ढावळीत
चाटल्या नसतील जिभेनं अंतरंगातल्या जखमा
तुझा उदय होतो आहे
उद्या काहीही वाढून ठेवलेलं असू दे ताटात
मीही असा पोस मागायचं सोडून
धेडगा नाचवीन
भुईनळाची झाडं, हवाई डब्या आणि अॅटम
सनईसूर ताशा आणि लेझीमची घाई
रात्रंदिवस तुझ्याच इच्छेची विभिन्न रुपं
ही आत्मारामाची कंपनी
तिच्यात सर्वच कसं होत रहातं ठणठणपाळ
हरहुन्नरी संदेश जाऊ दे घरोघर
भिकेवरल्या हाकेची निर्लज्ज दारं जाऊ देत कोसळून
उभारली जाऊ देत गुढ्या तोरणं
होऊ दे एकदाचं सीमोल्लंघन
हे सूर गोंधळात टाकणारे
ही वेळ आकाशाला चावणारी
अग्निवृक्षाचं कारंजं
चमकणाऱ्या प्रपातात उडी घेणाऱ्या धबधब्या
तू माझ्या पकडीतून निसट आणि चालू लाग
तू जाऊ शकत नाहीस कुठेही
तू राहू शकत नाहीस कुठेही
वर्तमानाला होऊ दे पायाचा स्पर्श
पावसात गंजून गेलेलं लोखंड
बाजाराचा भंगार आणि जथ्था
कुत्र्याचे रेशमी डोळे, जीवनाच्या
धारणेला संचलित करणारे
सूर्याची कॉइल पाहते आहे उडू
झावळतीच्या तारखा
या म्हणीच्या मध्यावरला
मी आशीष
मला रस्त्याचे क्रॉस चालत नाहीत
दगड चिरडला जातोय
माणूस चिरडला जातोय
होतेय सर्वस्वाची खडी खडी
पाडली जातेय खडी
फोडली जातेय खडी
हवेतले तुटते मनोरे
दऱ्यांचे ओठ रक्तबंबाळ होणारे
प्रस्फोटित होणाऱ्या मूलभूत कल्पना
गिलोटिनची इंद्रियं
छातीच्या स्लाइस
बेंबीची भाकरी
वक्ष:स्थळाची दारू
हवेची मुलगी डोळ्यांत नाचरी
कुत्र्याच्या डोळ्यांतला काकुळतीचा घननिळा
लाल पिवळा हिर्वा सर
किती मजेचा
घडाघडीची इमारत
जीवशास्त्राच्या पानावरली हालचाल
बीजकोषांना काढलं जातंय सोलून
घातलं जातंय जखमांना खतपाणी
पिकू लागते भुवई
शांततेचं मोडून पडतं तंगडं, मुळं दुखावतात
अवकाशात ऋतू राहतात जळत
कारागृहाच्या, गजाआड जळतात मेणबत्त्या
दगड उगवू लागतात आत
हवेची तीक्ष्ण चोच खुपसली जाते
बाईच्या अंगात
टांगलं जातं वळचणीला पाणी
बीजकोष गातात साती आसऱ्यांच गाणं
निदर्शनं करुन झोपलेलं पाणी
होऊन जातं लेकुरवाळं
दृष्टीचं यंत्र
सुसंवादाचा फ्लास्क
या जडशीळ प्रकाशापेक्षा
हलकं आहे तुझ्या कामांगाचं वजन
माझ्या देहाच्या पेटीत
हे कसले क्षण बंद करुन ठेवलेयस?
अवकाशाची कशी करायची घडी?
कशी
नांदवायची ज्योत त्रिभुवनांची?
हीनदीन पूर्वीपासूनच्याच सुरुवाती / समाप्ती
वयाशिवाय वाहणारा वारा
धूळ प्रकाश ध्वनी यांचा कारखाना
संभ्रमात टाकणारे रंगनंग
आंधळेपणाचं दगडी गाढव
व्यापारी खेळवतात अस्वलं
घणाघात सर्व आर्थिक नसनाड्यांवर
फिरला जातोय शुभ्रतेवर पोचीरा
कटक्यानं पुसले जातात मुलाबाळांचे आक्रोश
राजवंशातले कावळे वाहून आणले जातात कासवाच्या पाठीवर
अरे कुणीतरी बघा
या मुलांची नखं वाढलीयत
सुस्वरांची दारं आणि प्रार्थनांचे गुडदे
खरीखुरी शीळ
कारंज्याच्या स्पर्शानं भिजून जाणारी
माझा अहंकार जातो आहे तुटून
मी तिचा हात पकडू इच्छितो
मी तिचा सहचारी होऊन चालू इच्छितो
आज 29 ऑगस्ट
सपंत आलेल्या पावसाच्या गोष्टी
कोसळ्याच तर अजूनही एकदोन सरी कोसळतील
आजही
ओल्या पंखावरली ओलीचिंब नक्षी घेऊन पक्ष्यांचे कळप
लहरा घेतील आजही,
एखाद्या बगिच्यात प्रेमाच्या नांवाखाली जोडपी
सांडतील सालंकृत धातू आजही
लालजर्द स्कॉच
रत्नजडिताचं झाड
छान
या दिवसाचं नामकरण करतेयस तू
तू माझा विहंगअमानुशतेचं पाणी
वस्त्र आणि अंग
या इच्छांना भर्जरी कपडे नेसवू नकोस
फॉस्फरसातून तय्यार होणारी माणसं
सुईचं घड्याळ, खांद्यांला स्पर्श करणारं,
या सर्वांना आग लागली तर तुझीही वाफ होऊन जाईल
हे खऱ्याखुऱ्या मुली
हे शृंगारिक लावण्यांमधल्या चंद्रावळी
या चतकोर सूर्याचा हट्ट सोड
पिवळं वादळ पंखांना इजा करणारं
त्यात हा असा रक्ताचा मुका ढोल
मी, चिरतृष्ण, तुला बहाल करु इच्छितोय
हिरवे जादूभरे नयन
त्यांत बॅक्टेरियाचे जंतू परंपरेला डिवचतात
पहाता पहाता संस्कृती निघते मोडीत
तू तुझी सर्व हाडं उघडी करुन टाक
रात्र उतरते आहे झाडावरुन खाली
दफनभूमीवर उगवलं आहे हिर्वं गवत
विद्युद्दाहिनीची चोच होऊ लागली आहे रेशमी
प्रत्येक शब्दाचं घातलं जातंय शवविच्छेदन
सत्याचा लुळा पाय घालू लागला आहे घोळ
बैठकीचं उत्सुक पाणी लागलं आहे आटू
या अंधारातल्या घोड्यांच्या खिंकाळ्या मी ऐकतो आहे
महाश्वेता झोपली आहे भुजांवर
तिला डिस्टर्ब नको
माझी आदिवासी छगुनी
आकाश आणि पृथ्वी
जन्म आणि मृत्यू
परमेश्वर आणि मनुष्य
उदय होतोय की अस्त
सर्व चेहरे सारखेच आहेत
सर्व नावं सारखीचं आहेत
जीवनाचं वाहन थांबता थांबत नाही
संपता संपत नाही
या भरंवश्याच्या जगात
बेभरंवश्याचा महोत्सव
शहर एक दगड
किंवा नावाचा चिरेबंद
गुलाबाचं स्वातंत्र्य
कायद्याचा खेळ
वायद्याची दारु
मेंदूत पसरते आहे शाई
ग्रंथालयं होतात खुन्यांचे संदर्भ
विद्यापीठं होतायत बेडुक-लोणच्यांच्या बाटल्या
हे सूर्या
या शहराला पिऊन टाक
हे पृथ्वी, या शहराला पोटात घे
हे पाण्या
या शहराला हवेत छिनून ठार कर
मनुष्य धूळ आणि हवेतला उत्तराधिकारी
ढगांच्या थिएटरात
मीठ चिवडणारे नाकतोडे
अंतर खणलं जातंय
अनुवंशिक रोगांना जागवलं जातंय
लक्ष्मी / सरस्वती पक्षपाती रांडा
आम्ही या म्हटलो त्या आल्या नाहीत
आमच्या खाली निजा म्हटलो
त्या निजल्या नाहीत
तू आमच्याशी इनाम राख
तू आमच्या बिछान्यांना जागव
अनंताची मुरली वाजव
तू आमच्या स्वप्नांना खेळव
तू आमच्या रेतांना अंकुर फोड
हे भटकभवाने
हे अतिशुद्रे
हे खंडोबाच्या मुरळे
हे नाचनारणे
हे हमदर्दी रांडे
मी तुझ्यातून फाटक्या भणंगासारखा
निघून जाणार नाही
तुझं सत्त्व फेडून घेईन
तू अल्लखनंदाचे दरवाजे वेडझव्यांसाठी खुले कर
मुंबई मुंबई, माझ्या प्रिय रांडे
मी तुला खेळवून जाईन
मी तुला असा खिळवून जाईन
- नामदेव ढसाळ
 -------------------------------------------------------------------------------- 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना वाहिलेली काव्यांजली 

अहं ब्रह्माास्मि। 

अस्मिन सस्ति इदं भवति। 

सतत चालले आहे महायुद्ध 

आत्मवादी-अनात्मवादी यांत। 

- म्हणे बीजातून फुटतो अंकूर 

म्हणे बीज होते म्हणून अंकूर फुटला 
अविनाशी दव्याचे पाठीराखे कुणी 
कुणी सर्व काही क्षणिकमचे पाठीराखे 
महाप्रतिभावंता 
मी शिकलो आहे तुझ्याकडून 
दु:खाचे व्याकरण जाणून घ्यायला 
सर्व दु:खाचे मूळ तृष्णा 
कुठून जन्मास येते, 
केव्हा तिचा क्षय होतो ते. 
सरकतो आहे माझ्या डोळ्यांसमोरून 
मनुष्यजातीच्या उत्क्रांतीचा प्रागैतिहास. 
दृष्टांत देणारी उत्क्रांत माणसांची रांग 
विहंगम- 
आणि एक बुटका केसाळ माकडसदृश्य 
त्याच्यानंतर दुसरा 
त्याच्यानंतर तिसरा- 
शून्ययुगापासून आण्विकयुगापर्यंत 
चालत बदलत आलेली माकडं की माणसं? 
करून जातायत माझं मनोरंजन 
प्रतीत्य समुदायाच्या पक्षधरा,- 
आता कळतो मला अष्टोदिकांचा अर्थ 
काय असतात दहा अव्याकृते 
आणि बारा निदाने 
काय असते निर्वाण- 
निर्वाण तृष्णेचा क्षय : दु:खाचा क्षय 
क्षणिकम आहे दु:ख; क्षणिकम आहे सुख 
दोन्ही अनुभव अखेर विनाशीच. 
बीज आधी की अंकूर 
बीज होते म्हणून अंकूर निर्माण झाला 
या गहनचर्चा माझ्या 
जिज्ञासेला डिवचतात 
धावती ट्रेन माझ्या सामान्य आयुष्याची 
मला प्रेषितासारखं बोलता येत नाही 
फक्त दिसतं पुढचं 
भविष्यातलं नाही, वास्तवातलं 
स्वप्नातलं नाही, वर्तमानातलं 
माणसाची प्रतिमा अधिक उजळ करणाऱ्या 
महापरिनिर्वाणोत्तर तुझं अस्तित्व 
जागृत ज्वालामुखी होऊन बरसते आहे 
आमच्यावर झिमझिम पावसासारखे 
उत्स्फूर्त लाव्हाचं उसळतं कारंजं 
ठिणगी ठिणगी फूल झालेलं 
काळाच्या महालाटेवर बसून 
कलिंगचं युद्ध हरलेला येतो आहे 
आमच्यापर्यंत. 
त्याच्या अंगावरली काषायवस्त्रे 
सूर्यकिरणांनी अधिक गडद केलेली. 
काळ किती विरोधी होता आमुच्या 
काळाचे किरमिजी जावळ पकडून 
तू बांधून टाकलेस त्याला 
आमच्या उन्नयनाला 
अंतर्यामी कल्लोळाला साक्षी ठेवून 
तुझे उतराई होणे हीच आमची 
जगण्याची शक्ती 
फुलांचे ताटवे झुलताहेत नजरेसमोर 
बहरून आलीयेत फुलाफळांची शेतं 
या फुलांवरून त्या फुलांवर विहरत 
राहणारी फुलपाखरं 
चतुर उडते -पारदशीर् पंखांचे- फुलाफांदीवर 
लँडिंग करणारे- 
काय त्यांची निर्भर ऐट- झुलत्या फुलांवर अलग थांबण्याची- 
रंगांची पंचमी फुलपाखरांच्या पंखांवर चितारलेली 
अमूर्ताची चिरंजीव शैली- डोळ्यांना रिझवणारी 
किती किती प्रयोग चित्रविचित्र रंगमिश्रणाचे 
चतुर हवेला खजिल करत अधांतरी तरंगणारे 
आम्ही -मी झालो आहे धनी - या गडगंज ऐश्वर्याचे 
अहाहा -झिंग चढली आहे ऐहिकाला 
नेमका हाच आनंद भोगता आला नाही- 
माझ्या बापजाद्यांना 
संस्कृतीच्या मिरासदारांनी केला त्यांच्यावर अत्याचार 
आणि केला अनन्वित छळ 
छळाच्या इतिहासाची सहस्त्रावधी वर्षं 
माझ्याही पिढीने यातले सोसले पुष्कळसे 
आमचे नारकीय आयुष्य संपवून टाकणाऱ्या 
आकाशातील स्वर्ग तू आणलास 
आमच्यासाठी ओढून पृथ्वीवर 
किती आरपार बदलून गेलं 
माझं माझ्या लोकांचं साक्षात जीवन. 
आमच्या चंदमौळी घरातील मडकी गाडगी 
गेलीयत- माणिक मोत्यांनी भरून 
रांजण- भरून गेलेयत पाण्याने 
कणग्या भरून गेल्यायेत 
अन्नधान्यांनी ओतप्रोत. 
दारिद्याचे आमचे शेतही गेले आहे 
कसदार पिकाने फुलून 
गोठ्यातील जनावरेसुद्धा आता नाही उपाशी मरत 
श्वान आमच्या दारातले इमानी 
भाकरीसाठी नाही विव्हळत. 
बळ आले तुझ्यामुळे आमच्या शिंक्यातील भाकरीला 
आता भूकेचा दावानल नाही आम्हाला सतावीत. 
चिमण्यांचा गोतावळा वेचीत राहतो 
विश्वासाने दारात टाकलेले दाणे. 
धीट चिमण्यांनी बांधले आहे आमच्या 
घराच्या आढ्याला घरटे 
खाली घरकारभारीण शिजवते आहे 
चुलीवर रोजचे अन्न. 
जळत्या ओल्या सुक्या लाकडांना 
घालते आहे फुंकर फुंकणीने 
तिचे विस्कटलेले केस आणि डोळ्यातले सुखीप्रंपचाचे अश्रू 
घरट्यात जन्म घेऊ लागलीत रोज नवी पिल्ले 
मांसाचा चिंब चिंब आंधळा गोळा 
पुकारतो आहे आपल्या आईला. 
अगं, चिमणीबाई बघ गं आपल्या पोराला 
घरातील म्हातारी पाहते आहे संसार चिमण्यांचा 
घरट्याबाहेर तरंगत लटकलेली 
चिमणी नावाची आई 
बाळाच्या चोचीत देते आहे चोच. 
किती अवर्णनीय आनंदाचे धनी आम्हाला केलेस हे महामानवा- 
कुठल्या उपमेने तुला संबोधू- 
प्रेषित म्हणू - महापुरुष कालपुरुष! 
किती उंच ठिकाणी आणून ठेवलेस आम्हाला 
आम्ही आता नाही उकरत इतिहासाची मढी 
सनातन शत्रूला आता सारे विसरून आम्ही लावले आहे गळ्याला- 
वैरात वैर संपत नाही हे सांगणाऱ्या आधुनिक बोधीसत्ता- 
ज्याला आदी नाही, अंत नाही अशा अंतरिक्षाला 
जाऊन भिडणारे तुझे कर्तृत्व 
कोण मोजणार उंची तुझी? 
मी -आम्ही जगतो आहोत या संक्रमण काळात 
तुझा सिद्धांत उराशी बाळगून 
प्रागैतिहासिक माणसांच्या अवस्था मनात ठेवून 
हा प्रतिसृष्टी निर्माण करणारा माणूस. 
विध्वंस करायला निघालाय आपल्याच निमिर्तीचा- 
हे आधुनिक बोधीसत्त्वा- 
शक्ती दे मला या विध्वंसक्याला 
वठणीवर आणायला. 
कोणी काहीही समजो मला 
तुझ्याविषयीची माझ्या मनातली श्रद्धा आहे अपार- 
कोणी घेऊ देत शंका 
अखेर माणूस शंकासूरच ना? 
मी गुडघे टेकून तुझ्या चैतासमोर 
या छोट्याशा विहारात 
कबुली देतो आहे माझ्या सर्व गुन्ह्यांची 
किती प्रसन्न वाटतं म्हणून सांगू? 
पश्चिमेचा विश्रब्ध समुद वाहतो आहे शांत 
मावळत्या सूर्याची काषाय किरणं- 
ललामभूत करून सोडताहेत चराचराला- 
हे माझ्या चैतन्या- 
बोल एखादा तरी शब्द माझ्याशी- 
मी शरण तुला... 
 हे महाप्रतिभावंता... 
--------------------------------------------------------------------------------
अँड. राज जाधव...!!! 

22 comments:

 1. Ad.Raj Jadhav Sir,
  Jaybheem...
  Really very nice collection.
  I SALUTES Your worship behind this.
  Many Many Thanks for the valuable contributions.

  Manohar Ahire,Nashik
  ahiremanohar3@gmail.com

  ReplyDelete
 2. good work & thanks for required information.

  ReplyDelete
 3. प्रेमाच्या आणि निसर्गाच्या कविता वाचणाऱ्यांना कदाचित हे ढसाळांनी मांडलेले वास्तववादी चित्र सहन होणार नाही.
  ढसाळांची पाणी ही कविता मिळाली तर जरूर वाचा.
  by the way लेख खरच आवडला.

  ReplyDelete
 4. कविता खुपच disturbing आहेत पण वास्तव आहे हे . एकदम सडेतोड अणि विद्रोही. शेअर केल्याबद्दल धन्यवाद..

  ReplyDelete
 5. वास्तववादी कविता ....

  ReplyDelete
 6. मानाचा, मनापासून, जय * भीम

  ReplyDelete
 7. कवी नामदेव ढसाळ च्या मते माणसाने कोणता गुन्हा करू नये

  ReplyDelete
 8. कवी नामदेव ढसाळ च्या मते माणसाने कोणता गुन्हा करू नये

  ReplyDelete
 9. प्रखर शब्दांत व्यक्त केलेली खंत.....
  खुपच छान!
  नागराज मंजुळेंचेही आवडते कवी आहेत नामदेव ढसाळ !

  ReplyDelete
 10. Asa kavi hone nahi..dhasalanchya kavita mhanje..julmachya andharat budalela ha desh,he gaon,he shahar..athavani cha dankhh asi meleli varsh punha..punha jagi karto..

  ReplyDelete
 11. अप्रतिम.. वास्तववादी समाज्याच्या विद्रोही कविता.

  ReplyDelete
 12. खूप सुंदर ...धन्यवाद

  ReplyDelete
 13. महाकवी नामदेव ढसाळांची कविता म्हणजे सामाजिक धार्मिक राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीवर भाष्य करणारी वैश्विक मूल्य असणारी श्रेष्ठ कविता आहे, असा कवी ना झाला ना पुन्हा होणार....

  ReplyDelete
 14. Namdeo dhasal is one of the great dalit poet he present the reality of dalit community in India and this poem talk about the untouchablity and so on ( Thank you sir for uploading all this poem )

  ReplyDelete
 15. दादा खूप छान संग्रह केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करतो

  ReplyDelete
 16. खूपच आभारी आहे आपला हा संग्रह केल्याबद्दल

  ReplyDelete