My Followers

Saturday, 7 July 2012

क्रांतिकारक लोकशाहीर.......!!!


                      क्रांतिकारक लोकशाहीर.......!!!


जग बदल घालूनी घाव।
सांगून गेले मला भीमराव।
गुलामगिरीच्या या चिखलात।
रुतूनी बसला का ऐरावत।।
अंग झाडूनी निघ बाहेरी,
घे बिनी वरती धाव।
सांगून गेले मला भीमराव।।


‘जग बदल घालूनी घाव, मला सांगून गेले भीमराव’ असे म्हणणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सर्वसामान्यांच्या जीवन संघर्षाची चूड पेटविणारा हा जनसामान्यांमधील असामान्य प्रतिभावंत. जगण्यामागच्या वेदना आणि जगण्यामागचं तत्त्वज्ञान त्यांनी शब्दबद्ध केलं. ज्यानं विश्‍वरूपी गणाला सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आवाहन केलं. लोककलेच्या क्षेत्रातील तमाशा आणि त्यातील गण, गवळण, बतावणी आदी लोकशैलीची जोडणी करून त्यात नव्या युगाचा आशय भरला. असा युगप्रवर्तक शाहीर म्हणजेच अण्णाभाऊ साठे....!!!
     सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगांव इथे १ ऑगस्ट १९२० रोजी मातंग समाजातील भाऊ शिदोजी साठे आणि वालुबाई यांच्या पोटी आण्णांचा जन्म झाला. घरची परिस्थिती गरिबीची व हलाखाची होती. त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. अण्णाभाऊंचे खरे नाव तुकाराम. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव सिद्धोजी साठे. लहान भावंडे तुकारामला अण्णा म्हणत. नंतर त्यांच्या नावापुढे वडिलांचे नाव लागले आणि ते अण्णाभाऊ या नावाने ओळखले जाऊ लागले. लहानपणी अण्णा दिवसभर रानात हिंडत. मित्रांसमवेत पाखरं मारत हिंडणे हा त्यांचा आवडता छंद. वडील भाऊराव मुंबईत माळी काम करून गावाकडे असणा-या कुटुंबाचा चरितार्थ चालवत. मुंबईत राहत असल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व त्यांना समजले होते. त्यामुळे आपल्या मुलांनी शिकावे, असे त्यांना वाटे. गावाकडे आल्यावर एके दिवशी त्यांनी अण्णाला शाळेत घातले. त्या वेळी त्यांचे वय थोडे जास्तच होते.
      शाळेत गेल्यावर दुस-याच दिवशी गुरुजी त्याच्यावर संतापले. ते म्हणाले, कालपासून ही चारच अक्षरे तू गिरवतो आहेस, तरी तुला ती नीट लिहिता येत नाहीत. त्यावर अण्णांनी त्यांना आपण कालच शाळेत आलो असल्याचे आणि मन लावून शिकणार असल्याचे सांगितले. पण गुरुजींनी त्याला मारायचे ठरवले होते. घोड्याएवढा झाला आहेस आणि अक्षर काढता येत नाही, असे म्हणत मास्तरांनी अण्णांची उजव्या हातची बोटे सुजेपर्यंत मारले. दुस-या दिवशी अण्णांनी वर्गात येऊन गुरुजींच्या अंगावर मोठा धोंडा टाकला. त्यामुळे गुरुजी कोलमडले आणि विद्यार्थ्यांना सांगू लागले, पकडा त्या तुक्‍याला. पण तोपर्यंत अण्णा घरी पोचले होते. दुस-या दिवशी मास्तरांनी गावातील पंतांकडे तक्रार केली. पंतांनी अण्णा आणि त्यांच्या वडिलांना बोलवून घेतले. बरोबर अण्णांचे मामा फकिरा हेदेखील आले होते. पंतांनी अण्णांची सुजलेली बोटे पाहिली. ते म्हणाले, ''गुरुजी, तुम्हाला मुलं आहेत की नाही? गरिबाच्या पोराला तुम्ही एवढे मारले. स्वतःच्या पोराला एवढे मारले असते का? जर तुम्ही गावातील दुस-या कोणत्या पोराला एवढे मारले असते तर तुम्हाला गावातून पळून जावे लागले असते.''
     गुरुजी त्यावर काही बोलले नाहीत. तेव्हा फकिरा त्यांना म्हणाले, ''गुरुजी इंग्रजांनी आम्हाला गुन्हेगार ठरवलं म्हणून तुम्ही ठरवू नका. पोराला नीट शिकवा. नायतर भलतंच व्हईल.'' पंत म्हणाले, ''गुरुजी संत ज्ञानेश्‍वराने रेड्यामुखी वेद म्हणवला असे सांगितले जाते. तो रेडा प्रतीकात्मक होता. अज्ञानी, अशिक्षित समाजाला ज्ञान देण्याचे कार्य ज्ञानेश्‍वरांनी केले. तेव्हा तुम्ही आता ती भूमिका स्वीकारा. गरिबांच्या मुलांना दूर लोटू नका. उद्या शिकून ह्याच तुक्‍याचा तुकाराम होईल आणि विमानातून इंग्लंड अमेरिकेला जाईल. तो शिकला पाहिजे.”
      वर्चस्व आणि श्रेष्ठत्वाच्या कल्पनेतून हिंदू धर्माने काही जातींना गावाच्या बाहेर ठेवले होते. परिसरात कुठेही दरोडा पडला किंवा चोरी झाली की पोलिस लगेच या वस्तीत येऊन लोकांची धरपकड करायचे. अशा वेळी घरातील पुरुष-बायका दिवस दिवस डोंगरात जाऊन लपायचे. खालच्या जातीतील म्हणून गावात कुणाला शिवायचे नाही, हातात हात मिळवायचा नाही, हे अण्णांनी लहानपणीच पाहिले. अनुभवले. अगदी वर्गातही त्या काळी प्रत्येक जातीची मुले वेगवेगळी बसत. त्यामुळे अण्णांनी एक दिवस वडिलांना विचारले, ''तुमच्या म्हमईत जातीची शिवाशिव आहे का?” वडील म्हणाले, ''व्हय. चहाच्या हॉटेल मालकांनी फुटक्‍या कपबशा बाहेर ठिवल्या आहेत. त्यातच आपल्या जातीची माणसं भाईर बसून च्या पेत्यात. तसं बघाय गेलं तर आमाला कोनीच वळखत न्हाय, पन ह्यो जुना रिवाज हाय म्हनून आमी आपलं भाईर बसून पेतो. उगीच कोनाची खटखट नको म्हनून. इंग्रज सायेबाकडं ही शिवाशिव नसती. मी त्येंच्याकडं माळीकाम करायला गेलो म्हंजी ते मला तेंच्याच कपात च्या देत्यात. तेंच्याकडे एकच मानसाची जात. आमची मानसं नस्ती आडगी. म्हनूनच इंग्रज आमच्यावर राज्य करत्याती. अन्‌ आमी एका देशाचं असून आमी एकमेकाला शिवून घेत न्हाय.”

            आम्हीही ही माणसं आहोत, आम्हालाही सुखाने, स्वाभिमानाने व स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. या न्याय्य मागणीने अण्णा पेटून उठले. पुढे गावात राहून जगणे अवघड झाल्यामुळे भाऊराव सर्व कुटुंब घेऊन मुंबईला गेले. पुण्यापर्यंतचा प्रवास सगळ्या कुटुंबाने चालत केला. एकेका गावात तीन-चार दिवस राहत त्यांचा हा प्रवास चालू होता. मग पुढे खंडाळ्याचा कोळशाचा कंत्राटदार, कल्याणचा कंत्राटदार यांच्याकडे कष्टाची कामे करत सगळे जण रेल्वेने मुंबईला पोचले. मुंबईत भायखळ्याला एका चाळीत ते राहू लागले. त्या ठिकाणी अण्णा एका कपडे विकणा-या फेरीवाल्याकडे काम करू लागले. त्याची कपड्याची पेटी डोक्‍यावर घेऊन अण्णा त्याच्यामागे चालत असत. 

              वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास करुन ते मुंबईत आले. पण पुढे १९६३ मध्ये अण्णांनी मुंबई ते मास्को हा प्रवास विमानाने केला. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली. ते म्हणायचे, `आपण गलिच्छ वस्तीत रहात असलो तरी आपलं मन स्वच्छ असावे`. शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आणि अण्णाभाऊ साठे या तिघांनी १९४१, १९४२ मुंबई शहरावर अधिराज्य गाजविले. याच काळात बंगालमध्ये दुष्काळ पडला होता. त्यावर अण्णांनी `बंगालची हाक' हा पोवाडा रचला. संयुक्त महाराष्ट्रलढ्यात त्यांनी कामगार जागा करुन त्यांची एकजूट संघटना निर्माण केली. डॉ. आंबेडकरांच्या निधनानंतरचे त्यांचे कवन, `जग बदल घालूनी घाव, गेले सांगून भिमराव' प्रसिध्द झाले तर `फकिरा' ही कादंबरी डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अण्णांनी अर्पण केली होती. अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारी माणसे त्यांनी उभी केली. ग्रामीण पददलित लाचारीने जगणार्‍या माणसाचे साहित्य जीवन त्यांनी समाजासमोर उभे केले. फकिरा, माकडीचा माळ, मास्तर, गुलाम, भुताचा माळ, वारणेचा वाघ या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या. समाजाचा अचूक ठाव घेणारा लोकशाहीर म्हणून त्यांनी मान्यता मिळविली. 

            अण्णाभाऊंचं झोपडीवर अतिशय प्रेम होतं. ` जे जगतो तेच मी लिहितो` असं ते सांगत. ४५ कादंबर्‍या, १५० कथा, तीन नाटके, ११ लोकनाट्ये, ७ चित्रपटकथा व असंख्य लावणी पोवाडे असे त्यांचे साहित्य प्रसिध्द झाले. अण्णाभाऊ माटुंग्याच्या लेबर कँपमध्ये रहायचे. इथेच त्यांच्या प्रतिभेला बहर आला. कोणतीही ज्ञानाची शिक्षणाची परंपरा इथे त्यांना लाभली नाही. आज त्यांचे साहित्य अनेक देशी-विदेशी संस्थांच्या अभ्यासक्रमाचा भाग बनले आहेत. माटुंग्याच्या लेबर कँपमधील मंडळीं विशेषत: नाशिक, सातारा, नगर जिल्ह्यातून येऊन स्थायिक झाले होते. बहुतेक गिरण्यात, गोदीत, नगरपालिकेत नोकरीला होती. इथेच अण्णाभाऊंची नाळ कम्युनिस्ट पक्षाशी जोडली गेली. याच कँपच्या नाक्यावर `लेबर रेस्टॉरंट' होते. इथेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अड्डा होता. या रेस्टॉरंटमध्ये आण्णाभाऊंनी डासावर पोवाडा लिहिला होता. टिटवाळा येथे १९४४ साली झालेल्या शेतकरी परिषदेत लालबावटा कलापथकाची स्थापना झाली. इथेच शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ व गव्हाणकर एकत्र आले.

           फाळणीच्या पार्श्वभूमीवर ते कळवळून सांगतात. `द्या फेकून जातीयतेला । करा बंद रक्तपाताला । आवरोनी हात आपुला । भारतियांनो इभ्रत तुमची ईषेला पडली । काढा नौका । देशाची वादळात शिरली । धरा आवरुन एकजुटीने दुभंगली दिल्ली । काढा बाहेर राष्ट्रनौका ही वादळात गेली।`
         आजच्या काळातही ही लावणी उपयोगीच ठरते. त्यांचे `इनामदार` हे नाटक त्यात खेड्यातील `सावकारी पाश' शेतकर्‍यांभोवती कसे आवळले जातात. आणि गुन्हेगारीला प्रवृत्त होतात याचं चित्र स्पष्ट करते. आजही शेतकर्‍यांच्या होणार्‍या आत्महत्येच्या वेळी हे नाटक आठवून जाते. पण हे नाटक मराठीत फारसं चाललं नाही. हिंदी रुपांतर मात्र लोकांना भावले.
          अण्णांनी तमाशाला नवेरुप दिलं. पहिल्या नमनात मातृभूमी हुतात्मे, राष्ट्रपुरुष यांचा समावेश झाला, गणातील कृष्ण आणि गवळणी त्यांनी काढूनच टाकल्या. लावणी व तमाशा लोकशिक्षणाकडे वळविण्याचे श्रेय आण्णाभाऊंकडेच जाते. १९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती.
           १९४८, १९६१ साली त्यांनी रशियास जाण्याचा प्रयत्न केला त्यास यश आले नाही. पण जेव्हा ते रशियाला जाणार हे नक्की झाले तेव्हा आपल्या महाराष्ट्रातून प्रचंड आर्थिक मदत झाली. वाटेगावहून मुंबईत वडिलांच्याबरोबर पायी चालत आलेला आण्णा विश्वासाने एकटा विमान प्रवास करुन रशियाला गेला तत्पूर्वीच त्यांनी `चित्रा' ही कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली होती. `सुलतान` ही कथा लोकांना आवडली होती. तर `स्टालिनग्राडचा पोवाडा` रशियात लोकप्रिय झाला होता. या पार्श्वभूमीवर रशियात गेल्यानंतर त्यांचं प्रचंड स्वागत झालं. त्यांनी मुंबईची लावणी लिहून वास्तववादी भीषण अशा मुंबईच्या विषमतेचे दर्शन घडविले `फकिरा` कादंबरीच्या १६ आवृत्या निघून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त झाली. जगातील व भारतातील २७ भाषांमध्ये अण्णांच्या साहित्याचे भाषांतर झाले. १९४९ साली अण्णाभाऊंनी `मशाल' साप्ताहिकात `माझी दिवाळी` नावाची पहिली कथा लिहिली तिथून त्यांचा साहित्य प्रवास सुरु झाला. जगण्यासाठी लढणार्‍या माणसांच्या अण्णांभाऊंच्या कथा आहेत. ते १९५७ मध्ये झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. असा हा पददलितांच्या जीवनावर वास्तव लिहणारा साहित्यकार सांगली जिल्ह्यात जन्मला होता.
     देव-देवतांचे प्रस्थ माजवल्यामुळे हे देव दलितांच्या मानगुटीवर येऊन बसले, हा समाज अंधश्रद्धेत अडकला, असे ते सांगत. ज्यांनी हेतुपुरस्सर देव, पुराणे, वेद यांचे महत्त्व वाढवून स्वतःची पिढ्यान्‌पिढ्या पोळी भाजून घेतली, अशा प्रवृत्तींवर अण्णांनी त्यांच्या शाहिरीतून, लेखणीतून घणाघाती प्रहार केले. कलापथकाच्या माध्यमातून समाजात जागृती करण्याचे काम त्यांनी शेवटपर्यंत केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत डफावर थाप देत त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. अशा या महान व्यक्तिमत्त्वाचे १८ जुलै १९६९ रोजी निधन झाले..
(संदर्भ - मी वाचलेले लेख व नेट)

1 comment:

 1. जग बदल घालूनी घाव।
  सांगून गेले मला भीमराव।
  गुलामगिरीच्या या चिखलात।
  रुतूनी बसला का ऐरावत।।
  अंग झाडूनी निघ बाहेरी,
  घे बिनी वरती धाव।
  सांगून गेले मला भीमराव।।

  असे म्हणणारे लोकशाहीर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आज यांचा स्मृतीदीन... त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन....!!!

  ReplyDelete