My Followers

Friday 27 July 2012

अंधानुकरण करू नका रे....!!!

अंधानुकरण करू नका रे....!!! 

एकदा एका राजाचा हत्ती अचानक लंगडायला लागला. बरेच वैद्य, उपचार झाले पण हत्तीच्या चालण्यात काही फरक पडेना. राजा खूपच चिंताग्रस्त झाला. याच दरम्यान त्या नगरीत भगवान बुद्धांच्या भिक्खूसंघाचे आगमन झाले होते. त्यामुळे कोणीतरी राजाला हत्तीच्या लंगडण्याविषयी भगवान बुद्धांना भेटण्याचा सल्ला दिला. राजाने तथागतांची भेट घेतली.

      भगवान बुद्धांनी परिस्थिती पाहिली आणि हत्तीचा माहुत बदलण्यास सांगितले. तथागतांचा उपदेश मानून राजाने माहुत बदलला आणि काय आश्चर्य?  हत्ती व्यवस्थित चालू लागला. राजाला आश्चर्य वाटले. राजाने तथागतांना विचारले, तथागत अनेक वैद्यांच्या औषधोपचाराचा हत्तीवर परिणाम झाला नाही. मात्र आपल्या केवळ उपदेशाने हत्ती व्यवस्थीत चालू लागला याचे रहस्य काय? तेव्हा तथागत म्हणाले, "रहस्य काहीच नाही, या हत्तीचा जो माहुत तो लंगडत चालत होता. आणि हत्ती त्याचे अनुकरण करत होता. त्यामुळे हत्तीचा माहुत बदलणे गरजेचे होते.

     आपली अवस्था अशीच आहे. आपण सद्‌सद्‌ विवेक बुद्धीने विचार न करता अशा अनेक बाबींचे अंधानुकरण करीत आहोत, त्यामुळेच आपली वाटचाल लंगड्या हत्ती प्रमाणे सुरू आहे. आपली वाटचाल सुव्यवस्थीत होण्यासाठी आपला माहुत सदाचारी असला पाहिजे.

     बोधीसत्व डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला हा सदाचाराचा, माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा मार्ग दिला. पण आपण मात्र करंटे. आज आपली वाटचाल विरुद्ध दिशेने सुरू आहे. आम्ही जयभीम बोलो या स्तंभातून अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकला आहे. अशा कितीतरी घटना रोज घडतात की जिथे आंबेडकरी विचार आपणच पायदळी तुडविण्याचे काम करीत आहोत. हे थांबणार आहे की नाही? हे आता प्रत्येकांने स्वत:लाच विचारले पाहिजे. त्यानुसार वाटचाल केली पाहिजे.

      आजकाल विवाहसमारंभामध्ये प्रत्येकजण आप-आपल्या ऐपती प्रमाणे, इच्छेप्रमाणे, विधीवत ही कार्य पार पाडत आहेत. सन 1956 नंतर डॉ. बाबासहेबांनी दीक्षा दिल्यापासून बौद्ध समजून समाजात हे विधी बौद्ध पद्धतीने केले जाऊ लागले. आचरणाने नसेना पण विवाहावेळी मात्र धम्माची लोकांना आठवण होऊ लागली आणि विवाह बौद्ध पद्धतीने होऊ लागले. (विवाह बौद्ध पद्धतीने झाला की बाकीच्या गोष्टी सगळ्या हिंदू पद्धतीने पार पाडल्या जाऊ लागल्या) अर्थात सर्वच असे करतात असे नाही. योग्य धम्माचरण करणाऱ्यांची संख्या भलेही कमी असेल पण आहे हे ही नसे थोडके. पण ज्यांना धम्माचरण करावयाचे नाही त्यांनी बौद्ध पद्धतीने विवाह करण्याचे ढोंग तरी नक्कीच करून नये.

     मे महिन्यामध्ये पुण्याला एका मित्राच्या लग्नाला जाण्याचा योग आल्याने तेथील प्रकार मला पहाता आला. हा विवाह हिंदू पद्धतीने करीत होते. अर्थात बौद्ध पद्धतीने करण्याचे उगीच ढोंग करीत नव्हते. ही जरी चांगली गोष्ट असली तरी, विवाह मंडपात डॉ. बाबासाहेब आणि बुद्धांची प्रतिमा मांडण्याचे प्रयोजन काय? हे मात्र समजत नव्हते. डॉ. बाबासाहेबांमुळे 'मधुर' आणि "अवि'(ट) असे जिवन जगण्याचे दिवस आले असताना अशा वेळी त्या उद्धारकर्त्याच्या विचाराचे विस्मरण होणे हा कृतघ्नपणा नव्हे काय? जर बौद्ध म्हणून घेण्यास, त्या पद्धतीने जीवन जगण्यास अडचण वाटत असेल तर बाबासाहेबांची प्रतिमा लावण्याचा अधिकार यांना दिला कोणी? अशा कृतघ्न लोकांनी बाबासाहेबांचे नाव देखील घेऊ नये. 

No comments:

Post a Comment