My Followers

Saturday, 28 July 2012

संवाद....!!!!

संवाद....!!!!
भगवान गौतम बुद्धांना एकदा शिष्याने विचारले, तथागत जगात सर्वश्रेष्ठ असे काय आहे? त्यावर तथागत म्हणाले, जगात सर्वश्रेष्ठ आहे संवाद ! कारण संवादच माणसाला घडवतो. माणसाला एकत्र आणतो तो संवादच. हा सुसंवादच आज होत नसल्यामुळे कुटुंब, समाज, राज्य आणि वेगवेगळ्या देशांसमोरही अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांवर सुसंवाद हाच उपाय आहे.

   महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दर रविवारी एकत्र आलेच पाहिजे असे जे सांगितले ते यासाठीच. कारण एकत्र आल्याशिवाय संवाद होणार नाही, संघटना होणार नाही. आज अनेक गावांगावांत दर रविवारी एकत्र येण्याचा जो उपक्रम सुरू आहे. तो गौरवास पात्र असाच आहे. काही काही गावात मात्र याचे चित्र अतिशय विदारक आहे. काही ठिकाणी तर मोठ्या हौसेने दर रविवारी एकत्र येण्याचा उपक्रम सुरू केला. त्यासाठी बुद्धमुर्ती प्रतिष्ठापणा केल्या. पण प्रतिष्ठापनेनंतर  या मंडळींना परत विहारात यायला वेळच मिळत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे एकत्र येणाऱ्यांची संख्या ही दोन अंकीही नसते. डॉ. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी (हा विषय समाजाशी संबधीत असल्यामुळे समाजाच्या कल्याणासाठी असे लिहिलं आहे. खर तर बाबासाहेबांचे योगदान देशहितासाठी खूपच मोठं आहे.) वाहिले. तथागत बुद्धांनी अखंड मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या राजवैभवाचा त्याग केला. किती प्रचंड योगदान आहे हे. एक बाबासाहेब झाले आणि कोटी कुळे उद्धारली. आपण मात्र आठवड्यातील एक रविवारी एक तास देऊ शकत नाही. होऊ शकतो आपण आंबेडकरवादी? शकतो आपण स्वत:ला भीम अनुयायी? आज कित्येक गावात समाज मंदिरात, सांस्कृतिक हॉलमध्ये या महापुरुषांच्या मुर्त्या, प्रतिमा धुळखात आहेत. त्यांची आठवण आपल्याला येते ती एखाद्या कार्यक्रमादिवशीच. आपण कोणतेही योगदान न देता "समाज कधी सुधारायचा नाही' अशी दूषणे समाजाला देत असतो. समाज म्हणजे तर कोण? आपण एक-एक व्यक्ती, कुटुंब मिळूनच समाज बनत असतो. आपण सुधारलो, आपण योगदान दिले तर समाज नक्की सुधारेल. यासाठी गरज आहे ती सुसंवादाची आणि त्यासाठी एकत्र येण्याची. 

    संवादाची जशी आपल्याआपल्यात गरज आहे तशी ती इतरांच्या बरोबर संवाद साधण्याचीही आहे. आंबेडकरी चळवळ व्यापक बनविण्यासाठी ब्राह्मणेतर बहुजन समाजाला आपल्या सोबत घेतले पाहिजे. आजपर्यंत या ब्राह्मण्यवाद्यांनी बहुजन समाजाला आपल्यासोबत घेतले पाहिजे. आजपर्यंत या ब्राह्मण्यवाद्यांनी बहुजन समाजाच्या मेंदूवर ताबा मिळऊन त्यांना आपल्या विरोधात उभे केले. पण आज काही प्रमाणात हे चित्र बदलले आहे. संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, या सारख्या बौद्धेतर संघटना ब्राह्मण्यवाद्यांच्या विरोधात उभ्या ठकल्या अर्थात हे सर्व श्रेय आंबेडकरी चळवळीचेच आहे. इथून पुढील काळातही ब्राह्मणेतर बहुजन समाजाला वास्तव इतिहास सांगण्याचे काम या चळवळीतील वडीलबंधू म्हणून आपली जबाबदारी आहे. पण आपण कोणाशी संवादच साधू पहात नाही. त्यामुळे चळवळीला मर्यादा येत आहेत. आपली चळवळ सर्वसमावेशक होऊ शकत नाही. असाच किस्सा परवा एका गावात घडला.

   त्या गावातील काही युवक प्रबोधनाचा कार्यक्रम घेऊ इच्छित होते. त्यासाठी त्यांना अशा कार्यक्रमांचा, चळवळीचा प्रचंड अनुभव ससल्यामुळे आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांचे सहकार्य हवे होते. त्यासाठी बहुजन समाजातील युवक बौद्ध समाजात आले. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलविली. बैठकीला बराच वेळ कोणीच नसल्याने हे पाच-सहा तरुण समाजमंदिरात "किणी किणी' बसले होते. काही वेळाने बौद्ध युवकांनी हजेरी लावल्याने बैठकीतला "किणी किणी' पणा निघून गेला. आणि संवाद सुरू झाला.

    संवाद सुरू झाला असताना एक तरुण मध्येच उभा राहिला आणि म्हणाला," तुम्ही आम्हांला बाबासाहेब शिकऊ नका. आम्ही बाबासाहेबांचा सखोल अभ्यास केला आहे. या देवाची शपथ (बुद्धमूर्तीकडे हात करून) बाबासाहेब आमच्या एवढे तुम्हांला माहीतच नाहीत'. तेव्हा ते बहुजन समाजातील ते तरुण म्हणाले, "आम्हांला डॉ. बाबासाहेब आणखी समजून घ्यावयाचे आहेत. म्हणून आम्ही आलो आहोत'. पण हा कार्यकर्ता ऐकायला तयार नव्हता. काही वर्षापूर्वी या कार्यकर्त्याने धम्मदीक्षा घेतली होती. पण आजही देवाला नवस करण्याचे या महाशयाचे सुरूच असते. कोणाला समजू नये म्हणून रात्री दहानंतर त्यांनी नुकतेच मारुतीला दंडवत घातले होते. एवढेच नव्हे तर बुद्धाला देव मानून त्यांनी याच बैठकीत शपथ घेतली. हे महाशय समाजाचा "दीप' स्तंभ असल्यासारखे त्याबैठकीत विरोध करीत होते. काही कार्यकर्ते मात्र म्हणाले, "ज्यांना सहकार्य करायचे आहे ते थांबा बाकीचे निघून जा.' असे म्हणताच हे महाशय निघून गेले. सांगण्याचे तात्पर्य आज आपण चळवळीला व्यापक स्वरूप देण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यकता आहे ती सुसंवादाची. बाबासाहेब इतरांना सांगण्याची.
अँड. राज जाधव...!!! 
(विद्याधार कांबळे यांच्या ब्लॉग वरून साभार 

No comments:

Post a Comment