My Followers

Friday 27 July 2012

आर्यअष्टांगिक मार्ग....!!!

आर्यअष्टांगिक मार्ग....!!!

अष्टांगिक मार्ग म्हणजे स्वत:नेच स्वत:चा मार्गदर्शक बनणे होय. येथे कोणीही मध्यस्थ नाही. आपणच सर्व काही आहे.

धम्मपदाच्या एकशेसाठाव्या गाथेमध्ये म्हटले आहे की,

‘अत्ताहि अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया।

अत्तनाव सुद्न्तेन नाथं लभति दुल्लभं ॥’

याचा अर्थ आपणच आपला मालक आहे. कोणी आपला मालक असु शकत नाही. स्वत:चे निग्रह करणारा दुर्लभ स्वामीत्व प्राप्त करीत असतो. 

‘अत्त दिप भव’ म्हणजे स्वयंप्रकाशीत व्हा, असे भगवान बुध्दाने सांगितले आहे. आपणासच स्वत:चा उध्दार करायचा आहे. दुसरा कोणी आपला उध्दार करु शकत नाही. स्वत:चे जीवन पायरी पायरीने घडवायचे आहे. अष्टांगिक मार्गाचे पालन करुन आपण आपले जीवन उत्तमरितीने घडवू शकतो. 

यो च बुध्दञ्च धम्मञ्च

संङ्घ सरणं गतो ।

चत्तारि अरियसच्चानि

समपञ्ञाय पस्सति ॥

दुक्खं दुक्ख्समुप्पादं

दुक्खस्स च अतिक्कमं ।

अरियञ्चट्ठङ्‍कि मग्ग

दुक्‍खुपसगामिनं ॥

एतं खो सरणंम खेमं एतं

सरणमुत्तमं ।

एतं सरणमागम्म सठबङक्‍खा

पमुच्चति ।।

याचा अर्थ म्हणजे बुध्द, धम्म आणि संघाला शरण जाणे, चार आर्यसत्यांना म्हणजे दु:ख, दु:खाची कारणे, दु:खाचा निरोध आणि दु:खाचा निरोध करण्याचा मार्ग, यासाठी आर्यअष्टांगिक मार्ग प्रज्ञेद्वारे योग्य प्रकारे जाणून घेणे हेच कल्याणकारी उत्तम शरण होय. हेच शारण ग्रहण केल्याने मनुष्य सर्व दु:खापासून मुक्त होतो.

बुध्द, धम्म आणि संघाला शरण जाणे म्हणजे बुध्दाचे जे गुण आहेत त्याचे अनुसरण करणे, धम्माला आपल्या जीवनात उतरविणे आणि संघामध्ये असलेले गुणाचे अनुसरण आपल्या जीवनात करणे होय. आर्यअष्टांगिक मार्ग जो दु:खमुक्तीचा मार्ग आहे त्याला आपल्या जीवनात उतरविणे, त्या मार्गावर आरुढ होणे, हेच आर्यअष्टांगिक मार्गाचे अनुसरण होय. 

आर्यअष्टांगिक मार्ग हा पाली ‘अरियअठठाङिगक-मग्ग’ याचा पाकृत अनुवाद आहे.

चार आर्यसत्यामधील चवथे आर्यसत्य म्हणजेच आर्यअष्टांगिक मार्ग होय. आर्यअष्टांगिक मार्ग हा मनुष्याला प्रकाश देणारा आहे. आपले संपुर्ण श्रेष्ठतम जीवन आणि व्य्क्तीमत्व घडविणारा मार्ग होय. या मार्गानुसार जीवन जगले तर आनंद प्राप्त होतो. जीवन सुखी आणि समाधानी बनते.

भगवान बुध्दाने सर्वप्रथम सारनाथ येथे पाच परिव्राजकांना मध्यम मार्ग म्हणजेच आर्यअष्टांगिक मार्गाचा उपदेश दिला. त्यांनी आर्यअष्टांगिक मार्गाचे महत्व समजावून सांगितले. तसेच त्यांचे अंतिम शिष्य सुभद्र यांना सुध्दा आर्यअष्टांगिक मार्गाचा उपदेश दिला. महापरिनिब्बाण सुत्तामध्ये भगवान बुध्द सुभद्राला म्हणतात, सुभद्र, ज्या धर्म विनयामध्ये आर्यअष्टांगिक मार्ग उपलब्ध नाही तेथे प्रथम श्रमण - श्रोतापन्न, द्वितीय श्रमण - सकृदागामी तृतीय श्रमण  अनागामी व चतुर्थ श्रमण अहर्त उपलब्ध होत नाही. ज्या धर्म विनयामध्ये आर्यअष्टांगिक मार्ग उपलब्ध होतो तेथे प्रथम श्रमण - श्रोतापन्न, द्वितीय श्रमण - सकृदागामी तृतीय श्रमण अनागामी व चतुर्थ श्रमण  अहर्त उपलब्ध होतो. याप्रमाणे भगवान बुध्दाने सांगितलेला आर्यअष्टांगिक मार्ग हा सत्याचा मार्ग असून तो अत्यंत श्रेष्ठतम आणि महत्वपुर्ण आहे.

आर्यअष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी अशा आठ अंगाचा अंतर्भाव होतो.

आर्यअष्टांगिक मार्गाचे दृष्टिमार्ग आणि भावनामार्ग असे दोन प्रमुख भागात विभाजन केलेले आहे. दृष्टिमार्गात अंतिम सत्यतेच्या प्रथम अनुभवाचा किंवा अंतिम सत्यतेच्या अंतर्दृष्टिचा समावेश होतो. भावनामार्गात सत्यतेच्या या दृष्टिनुसार किंवा अनुभवानुसार आपल्या व्यक्तित्वाच्या आणि जाणिवेच्या सर्व बाबतीत आणि सर्व पातळ्यावर आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा समावेश होतो. म्हणून आर्यअष्टांगिक मार्गातील हा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा अधिक मोठा व अधिक गुंतागुंतीचा आहे. कारण की, अष्टांगिकमार्गाच्या या दोन भागापैकी पहिल्या भागात केवळ सम्यक दृष्टीच्या एका अंगाचा समावेश होतो. मात्र दुसर्‍या भागात सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी अशा सांत अंगाचा समावेश होतो. 

आर्यअष्टांगिक मार्गातील प्रत्येक मार्गाला पायरी असे म्हणता येत नाही. कारण पायरी म्हटले की, जस-जसे आपण एक एक पायरी ओलांडून वर वरच्या पायरीवर जातो तस-तसे मागच्या पायर्‍या सोडत जात असतो. आर्यअष्टांगिक मार्गामध्ये सर्वच मार्गाचे पालन करावयाचे असते. कोणताही मार्ग सोडायचा नसतो. म्हणून प्रत्येक मार्गाला पायरी न म्हणता ‘अंग’ किंवा ‘अवयव’ किंवा ‘शाखा’ असे म्हणता येईल. आर्यअष्टांगिक मार्ग याचा अर्थ आठ निरनिराळ्या मार्गाचा किवा आठ पृथक टप्प्यांचा मार्ग असा होत नाही. तर त्याचा अर्थ आठ अंगाचा किंवा आठ अवयवाचा किंवा आठ शाखांचा असा होतो.

आर्यअष्टांगिक मार्गाचे पालन करतांना आपण आपल्या अस्तित्वाची आणि जागृतीची उच्चतम स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतो. आर्यअष्टांगिक मार्ग हे एक धार्मिक जीवन असून ती मानवाच्या विकासाची, जीवन फुलत जाणारी एक प्रक्रिया आहे. एखाद्या वृक्षाप्रमाणे त्याची वाढ होत जाते. एखादे रोपटे जमिनीत लावल्यानंतर त्याला उन, वारा, पाणी, खते इत्यादी पोषक द्रव्ये मिळाल्यावर काही काळानंतर त्याचे रुपांतर वृक्षात होत जाते. त्याला फुले, फळे लागतात. त्या वृक्षांच्या फुला-फळांचा व सावलीचा आस्वाद सर्व प्राणी घेत असतात. असाच काहीसा प्रकार आर्यअष्टांगिक मार्गाचे पालन करतांना अनुभवाला येत असतो. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधीच्या पालनामुळे आपल्या अस्तित्वाची निरनिराळे अंगे बदलून जात असतात. आर्यअष्टांगिक मार्गाच्या अनुसरनामुळे भावना बदलतात, श्रध्दा बदलते, दृष्टी बदलते, वाणी बदलते, कर्म बदलतात, जीवनयापनाची पध्दत बदलते,, मनाला उत्तम वळण लावते, सतत जागृतीत राहण्याची सवय लागते, मनाची एकाग्रता वाढवते. म्हणूनच मानवाच्या सर्वोत्तम कल्याणाचा मार्ग सुकर होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २२ प्रतिज्ञेचे पालन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानी अकराव्या प्रतिज्ञेत सांगितले की, मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करीन.

अष्टांगिक मार्गाचे प्रज्ञा, शील व समाधी असे तीन विभाग पडतात.

प्रज्ञा

१) सम्यक दृष्टी

२) सम्यक संकल्प

शील

३) सम्यक वाचा

४) सम्यक कर्मांत

५) सम्यक आजीविका

समाधी

६) सम्यक व्यायाम

७) सम्यक स्मृती

८) सम्यक समाधी 

शील, समाधी आणि प्रज्ञा याबाबतीत भगवान बुध्द म्हणतात-

सीले पतिपठठाय नरो सपञ्‍ञो

चितं पञ्‍ञंच भावयं।

आतापि निपको भिक्खु

सो इमं विजटयो जटं ॥

जो मनुष्य प्रज्ञावान आहे, वीर्यवान आहे, पंडित आहे, भिक्खु आहे तो शीलांचे आचरण करीत असतांना चित्त (समाधी) आणि प्रज्ञा यांची भावना करुन ह्या जटांना (जगातील दु:खाच्या प्रश्‍नाला) सोडवू शकतो.


अँड. राज जाधव...!!! 

(आर.के.जुमळे, यांच्या ब्लॉग वरून साभार )

No comments:

Post a Comment