My Followers

Thursday, 12 July 2012

लोकशाहीर विठ्ठल उमप...!!!

लोकशाहीर विठ्ठल उमप...!!!
लोककला आणि शाहीरांचा विषय कुठे निघाला तर असं होऊच शकत नाही की त्या चर्चेत विठ्ठल उमप यांचं नाव घेतले जाणार नाही. त्यापेक्षाही जास्त प्रेक्षकांच्या लक्षात ते राहिले ’जांभुळ आख्यान’ या लोकनाट्यातल्या त्यांच्या सादरीकरणाने. मात्र, आता या लोककलेच्या महापूजकाची दिपज्योत शनिवार  २७ नोहेम्बेर २०१० रोजी मालवली आणि आपण लोककलेतील या महानायकाला नेहमीसाठी मुकलोय. 
विठ्ठल उमप यांचा जन्म जुलै १५, इ.स. १९३१ रोजी मुंबईमधील नायगाव येथे झाला. उमप लहानपणापासूनच आंबेडकरांच्या चळवळीकडे आकर्षित झाले होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर दलितांमध्ये लोकगीते आणि पदनाट्यांमार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत होते.
एका दलित कुटुंबात जन्म झाल्याने त्यांच्या वाट्याला संघर्ष अटळ होता. त्यांनी त्यांच्या सुरवातीच्या काळात अनेक समस्यांना तोंड दिले. माणूस कितीही मोठा कलाकार असला तरी पोट भरण्यासाठी त्याला दोन पैसे लागतातच. त्यांनी पोट भरण्यासाठी चणेफुटाणे विकले, हमाली केली, मिळेल ते काम केलं. तरीही त्यांनी कलेच्या या महासागरात स्वत:ला झोकून दिले.


लोककलेच्या सेवेसाठी आयुष्य वेचणा-या शाहीर विठ्ठल उमप यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. अलीकडच्या काळात विहीर, टिंग्या या चित्रपटांमध्येही विठ्ठल उमप यांनी छोटेखानी भूमिका साकारल्या. लवकरच प्रदर्शित होणा-या गजेंद्र अहिरे यांच्या ‘ सुंबरान’ या चित्रपटातही त्यांची भूमिका आहे. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातूनही त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडतं. विठ्ठल उमप यांच्या निधनामुळे मराठी लोककलेची, रंगभूमीचं मोठं नुकसान झाल्याची भावना सांस्कृतिक वर्तुळात व्यक्त होतेय. संपूर्ण आयुष्य समाजासाठी जगलेल्या या शाहिरानं शेवटचा श्वासही एका सामाजिक कार्यक्रमातच घ्यावा, हा योगायोगच म्हणावा लागेल. आता त्यांची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांचे चिरंजीव आदेश, नंदेश आणि उदेश यांच्यावर आहे.
विठ्ठल उमप हे नाव घेतले की डोळ्यापुढे येते ते 'जांभुळ आख्यान' या लोकनाट्यातल्या त्यांच्या बेहतरीन अदाकारी. एकदा मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात त्यांनी 'जांभुळ आख्यान' सादर केले तेव्हा प्रयोग संपल्यानंतर मंत्रमुग्ध झालेले विक्रम गोखले प्रेक्षकांतून आले आणि त्यांच्या पाया पडले. भल्याभल्यांनी अचंबित व्हावे अशी त्यांची ती द्रौपदी होती. या भूमिकेसाठी त्यांना म. टा. सन्मान पुरस्कार मिळाला. इथवर पोचायला त्यांना वयाची पंच्याहत्तरी गाठावी लागली. त्यांना बालवयात काय काय करावे लागले नाही ? त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी चणेफुटाणे विकले, हमाली केली, पडेल ते काम स्वीकारले. जन्मजात दारिद्र्यावर अनेकांनी मात केली. 
त्यांच्यातल्या उत्तुंग अभिनय गुणांनी त्यांनी लोककलेला जगाच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून दिले. उमपांचे वैशिष्ट्य असे की ते कवीही आहेत , संगीतकार आणि अभिनेतेही. त्यांनी अनेक गजल , कविता , गीते आणि पोवाडे लिहिले आहेत. या बिगरकोळ्याने ' ये दादा हावर ये ' म्हणत कोळी गीतांच्या ध्वनिमुदिका लोकप्रिय केल्या. आकाश-वाणीवरून हजारो गीते पेश केली. गोंधळ , भारुड , जागरण घालावे ते विठ्ठलदादांनीच. ' फू बाई फू ' गाताना किंवा ' कृष्णा थमाल रे ' पेश करताना ते गाणे असे काही रंगवत नेतात की अर्धा अर्धा तास श्रोता हलत नसे. १९८३ साली आयर्लंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकसंगीत महोत्सवात उमपांनी भारताला प्रथम क्रमांक मिळवून दिला होता. रंगभूमीच्या मुख्य धारेत त्यांनी ' अबक दुभक तिभक ', ' खंडोबाचं लगीन ', ' बया दार उघड ' अशी नाटके गाजवली. अनेक अपमान , अवहेलना सोसतानाही चेहऱ्यावरचे हसू न हरवलेल्या या कलावंताने अनेक मान-सन्मानही मिळवले आणि आपले श्रेष्ठत्व सिध्द केले. वामनदादा कर्डक , कृष्णा शिंदे , माशेलकर , पोवळे या पिढीतल्या उमप यांनी कव्वालीचे जंगी सामने गाजविले. संत तुकडोजी महाराजांच्या परंपरेचे एकतारी , दिमडीवरचे भजन , नाथांची भारूडे , उर्दू शायरी , जानपद गीते , पाळणे , पोवाडे , कोळीगीते अशा विविध प्रकारचे गायन व काव्यलेखनही उमप यांनी केले.म्हणूनच शाहीर फक्त शाहीर राहीले नाहीत तर ख-या अर्थाने लोककलेचा ' विठ्ठल ' ठरले. 
कवी, संगीतकार आणि अभिनेता अशा भूमिका साकारणार्या या बहूरूपी कलाकाराने लोकसंगीताला घरा घरात नेऊन पोहचविले.त्यांनी कोळी गीते, आंबेडकरी जलसे, पोवाडे, गोंधळ, जागरण असे विविध कलाप्रकार सहज हाताळले आणि लोकप्रिय केलेत. एवढंच काय तर १९८३ साली आयर्लंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकसंगीत महोत्सवात उमपांनी भारताला प्रथम क्रमांक मिळवून दिला होता. अनेक अपमान, अवहेलना सोसल्यावरही त्यांनी कलावंताने अनेक मान-सन्मानही मिळवले आणि लोककलेवरील आपले श्रेष्ठत्व वारंवार सिध्द केले.
कव्वाली असो वा अभंग...कोळीगीत असो वा लावणी...कलेच्या सर्व प्रांतात मुक्त संचार करणारे, परंपरा आणि नवता यांचा सुरेख आणि सुरेल संगम असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लोकशाहीर, ‘ जांभूळ आख्यान ’ कार विठ्ठल उमप यांचं शनिवार  २७ नोहेम्बेर २०१० रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. नागपुरात दीक्षाभूमीजवळ बुद्ध टीव्ही वाहिनीच्या लाँचिंग विठ्ठल उमप यांच्या प्रमुख उपस्थितीत होत होतं. त्यावेळी गौतम बुद्धांच्या मूर्तीला शाहिरांनी वाकून प्रणाम केला आणि विराट जनसागरासमोर ‘जय भीम’ चा जोरदार नारा दिला. तेव्हाच चक्कर येऊन ते विचार पिठावर कोसळले. त्यांनी रंगमंचावरच अखेरचा श्वास घेतला. स्टेजवर जय भीम म्हणतच त्यांनी आपला देह ठेवला. हे दृश्य पाहून सगळ्यांच्याच काळजात धस्स झालं. शाहिरांना तातडीनं उपचारासाठी नेण्यात आलं, पण तोवर त्यांची प्राणज्योत मालवली...
कलावंताला कोणतीही जात, धर्म नसतो. लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी कोणत्याही जाती, धर्माला जवळ केले नाही. महात्मा गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने ते प्रेरीत होते. ते स्वत:च एक विचार होते. सर्व जातीधर्मासाठी त्यांनी काम केले. त्यांच्यासारखे गाणे तर सोडाच परंतु या जगातून जाणे सुद्धा कोणाला जमणार नाही, अशा या लोकसंगीताच्या महानायकाला अभिवादन....!

1 comment:

  1. त्यांच्यासारखे गाणे तर सोडाच परंतु या जगातून जाणे सुद्धा कोणाला जमणार नाही,

    ReplyDelete