My Followers

Thursday, 1 November 2012

भिम कविता.....!

भिम कविता.....! 
बाबासाहेबांवरील काही निवडक कवींच्या कवितांचा संग्रह केलेला आहे, कविता वाचून स्फूर्ती आली पाहिजे हाच उद्देश...!  

मित्रा ,

त्यांनी त्रिशुलाचे वाटप 

धर्मरक्षणासाठी केले म्हणे 

तू मात्र भेगाळलेल्या जमिनीत 

पंचशील पेरीत बसलास 

त्यांना धर्मासाठी 

माणसे कापलेली चालतात 

तू मात्र माणसांसाठी 

धर्म बाजूला सारत गेलास 

ते काढतीलच त्रिशूल बाहेर कधी नं कधी 

धर्मयुद्धासाठी 

तोवर तू शांत बस 

पण त्रिशुलाच्या टोकावर 

माणसं तरंगू लागतील तेव्हा 

तुझ्या अंगणातील बोधीवृक्षाला 

तू तलवार टांगून ठेव .

 कवी मच्छिंद्र चोरमारे, नागपूर...!

______________________________________________________

लाजतो कशाले ??


मह्या भीमाच्या नावावर

तू मरू रायले खिशाले 

मंग 'जय भीम' घालतानाच 

भऊ, लाजतो कशाले ?

भिमामुळे तं मिळाली तुले 
बगला, गाडी-माडी
तुही बायको बी नेसू रायली आज टकाटक साडी 
अन भिमामुळे तं मिळाली तुला खुर्ची बसाले. मंग .....
भिमामुळे तं भाऊ तुहा

पोरगा साळत जाऊ रायला 

अन कालरशिपच्या भरवशावर

सायब व्हयून ऱ्हायला

सुटा-बुटाच्या डरेसात लावतो पेन खिशाले . मंग....
शायनीत हिंडू रायला 

अन करू रायला थाट

भिमामुळ तं गेला भाऊ

तुह्यावाला सारा बाट

मांजरावाणी राहत होता, आता पिळू रायला मिशाले. मंग....
ज्याच्यामुलं गड्या 

तू सुखानं जगू रायला

त्या भीमा-बापाशीच कामून 

फटकून वागू रायला ??

बोला ना 'जय भीम' जोराने, ताण पडू दे ना घशाले.
मंग 'जय भीम' घालतानाच 
भाऊ, लाजतो कशाले ?


 कवी शेख बिस्मिल्ला, मु.पो. सोनोशी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा

_______________________________________________________
माझा भीमराणा 
नव्हता कोणा समान माझा भीमराणा...!
ना गांधी समान ना नेहरू समान
ना कधी गांधीसारखा दहावीत नापास झाला
ना कधी नेहरू सारख्या त्याने पोरी फिरवल्या
असा होता माझा भीमराणा...!
ना गांधी सारखा हडकुळा
ना नेहरू सारखा काटकुळा 
धिप्पाड देहयष्टी स्पष्ट वक्ता 
असा होता माझा भीमराणा ...!
लढला तो जीवनभर दलितांसाठी
पण कधी हाती तलवार या बंदूक घेतली नाही
ना टिळकांसारखी अंधश्रधा बाळगली (गणपती बसवून)
असा होता माझा भीमराणा....!
पांडित्यपूर्ण शैली त्याची भाषणाची 
दमदार  लेखणी कसदार वाक्य रचना
कधी उपोषणास ना बसला
कारण रोजच त्याला उपवास घडत असे
१ चाय आणि १ पाव खावून राहावे लागे
मग वेगळा उपवास करायची गरज काय
पण कधी ना हरला ना कधी झुकला
असा होता माझा भीमराणा...!

कवी - विनोद पवार
_______________________________________________________

बापाचा बाप
बापाचा  बाप भीम माझा होता
झाला नाही तैसा आजवर नेता //
अस्पृश्य जनता होती अंधारात
क्रांती केली ऐसी आणली माणसात
कार्य ऐसे कोणा जमणार ना आता // १ //
अंधरूढी अंधश्रद्धा गाडील्या भीमाने
मनूच्या मनुस्मृतीला जाळिले भीमाने
दिधला ज्याचा धम्म तो बुद्ध होता // २ //
ज्ञानाचा सागर होता भीम माझा
जगात त्याचा होई गाजावाजा
घटना ऐसी लिहिली तो बुद्धिदाता // ३ //
बावीस प्रतिज्ञा औषध दिधले
सन्मार्गाने जगण्या पाळा ते वदले
विनोदा तो होता आपला मार्गदाता // ४ //
कवी - विनोद पवार
__________________________________________________
मातीचे सोने झाले भीमा तुझ्या मुळे


जीवनात सुख आले भीमा तुझ्या मुळे

 ज्वलंत  संघर्षाची चाखतो आम्ही गोड फळे

मानवा बुद्ध नीतीशी भीम पर्व हे जुळे

१४ ऑक्टोबरचा सोहळा महान

नाग लोकांची ती भूमी झाली पहा पावन
नील नभात नीला शालू ल्याली
आनंदाने रजनी निळी निळी झाली
अवतार घडले इथे देवांचे लाख जथे
तरीना मुक्ती पथे नाही कल्याण इथे
भीमाने वळविले विश्व हे बुद्धा कडे
भीम रायाने शिंपले पहा अमृताचे सडे

कवी - विनोद पवार
___________________________________________________
तुझ्यामुळे भीमा
तुझ्यामुळे भीमा सुख मिळे आम्हा
बुद्ध धम्माचे मंथन कळाले
सुख समृद्धी आंदन मिळाले ||
जाती यतेची हि लढाई तुम्ही जिंकिली
ज्ञानाची क्षितिजे सारी तुम्ही तोडिली
तुमच्या ज्ञानापुढे गगन हे ठेंगणे
तुम्हा हृदयाचे स्पंदन कळाले ||१ ||
देशाची घटना लिहून झाला घटनाकार
भाग्य देशाचे या थोर झाला शिल्पकार
घटना लिहिली अशी आहे बावनकशी
आम्ही घटनेला वंदन हे केले || २ ||
सनातनी हिंदुनी केले होते हैराण
माणूस न्हवे माणसातील होते सारे हैवान
बुद्धा शरण जावून विनोदा बौद्ध करून
बौद्ध धम्माचे इंधन तू दिधले || ३ ||

कवी - विनोद पवार
_______________________________________________________
काल रात्री स्वप्नात मह्या 'बाबा' आले,
मह्याकडे पाहताच 'धीरगंभीर' झाले.

बाबा म्हणाले, ' नागाच्या वंशजा आज काय विशेष माहित आहे तुला,
म्या म्हणल, 'बाबा माफ करा कालच 'गुरु पोर्णिमे' चा दिवस झाला,

'तुळसीच्या लग्नात' जेवुन हात धुतले की,
तितक्यातच 'मोहरम' आला '.

हातातल 'पुस्तक' दाखवत बाबा म्हणाले,
हे काय 'ओळखतोस' का या पुस्तकाला ?
मला वाटल बाबा आता घेतात माही 'शाला',
म्या बाबाला प्रामाणिकपणे म्हणलो,
माहित नाय बाबा थोडा शरमेने कंणलो,

बाबा म्हणाले, 'नागा हे तुझ्या मुक्तीच व्दार,
तुकारामाचा 'अभंग', शिवाजीची
'तलवार'
कबीराचा 'दोहा', बसवेश्वराचा
'सत्कार'
फुले, पेरीयारची 'कडक वाणी', शाहुचे 'सरकार'
जिजाऊची 'ममता' अन् बिरसाचा 'अधिकार'

एव्हढ सगळ ऐकाच पुस्तकात
म्या म्हणल बाबा,
याच नाव तरी काय ?
अन् तुम्ही सांगता ते कितपत खर हाय ?

बाबा म्हणाले,
'नागा, याचं नाव 'भारताचे संविधान'
फुटेल मुक्याला 'वाचा' अन् बहिर्याला 'कान',
दांभिकाला 'रट्टा' अन् स्त्रियांना
'आत्मसम्मान'
गरीबाला 'प्रेमाची साथ' अन् दुबळ्याला 'प्रथम स्थान',

मला आश्चर्य वाटलं,
मग म्या म्हणल बाबा,
'संविधान असतांना का हो
'खैरलांजी' घडावा,
'बाबरी मस्जिद' पाडुन का भाऊ आपसात लढावा,
शेतकर्याला 'आत्महत्या' करण्याचा प्रसंग का पडावा,
'स्त्रि-दलित अत्याचार' यात देह का सडावा,
'भ्रष्ट्राचाराच्या' पायी का आमचा पाय आडावा,
अन् 'गरीबाच्या पदरी' का तिरस्काराचा धोंडा पडावा

बाबा थोड्या वेळासाठी 'नाराज झाले'
पाहताच त्यांच्या 'डोळ्यात अश्रु' आले
म्या म्हणल बाबा, रडताय का तुम्ही ?
चुक झाली का माझी, गलत बोललो का मी ?

बाबा म्हणाले, नागा तुझ बरोबर आहे,
या सर्व गोष्टीची मलाही खंत आहे,

पण नागा,
'संविधान किती चांगले असेल तरी नाही फायदा होईल,
'मनुवादी' असतील चालवणारे मग ही 'मनुस्मृती' च राहिल,
मनुच्या राज्यात सर्व काही
'अराजक' होईल,
प्रत्येकजण 'अत्याचारात लाचारीत' राहील,

पण,
जर का 'बहुजन' संविधान आपल्या हातात घेईल
मग पुन्हा 'मुलनिवासि' यांचे राज्य येईल

तेव्हा राहणारच नाही कुणी
'तहानलेला उपाशी' ,
शेतकरी घेणारच नाही
'आत्महत्येची फाशी',
मग विषयच राहणार नाही
'अन्ना-केजरीवाल' पाशी,
'समीक्षा' करणार्याला 'अटल' दाखवु 'बिहार काशी',

मग 'साध्वी' चा नाद हटेल अन्
'स्वंय सेवका' चा पडदा फाटेल,
'कसाब' ला मृत्युदंड अन् पुन्हा
'अफजल' ला भिती वाटेल

'राजा अशोक-शिवाजीं' च्या स्वप्नाला साकार करु,
'भगवा निळा हिरव्या' रंगाला
'एकच रंगाचा' सार करु,

मग कोणी मनुच 'बाळ' तुम्हाला विभागणार नाही,
'रामदास' ला 'आठवेल' शहाणपण सत्तेसाठी झुकणार नाही,
'नक्षलवादी आतंकवादी' बुद्ध चरणी 'बंदुक' अर्पण करतील,
'विचारवादी' बनुन हक्क स्वाभिमानाने जगतील,

मग म्या म्हणल, 'बाबा हे केव्हा होईल,'
बाबा उद्गारले
'नागा,
विभागलेला 'मुलनिवाशी' जेव्हा एकत्र येईल,
अत्याचार करणार्याचा विरोध होईल,
जेव्हा 'संविधानाची माहिती' प्रत्येकापर्यत जाईल,
तेव्हाच 'बळीच राज येईल'
तेव्हाच 'बळीच राज येईल'

बाबाच्या 'डोळ्यात' आता एक
'तेज' वाटले,
खरच, राजेहो मला संविधानाचे
'महत्व पटले',

पण,
पाहताच बाबा....'अदृश्य' झाले,
अरे हे काय माझे 'स्वप्न' तुटले,

पण, 'बाबाच्या स्वप्नाला' आपण तुटु द्यायच नाही,
संविधानाच महत्व समजावुन देवु ठायी ठायी,
चला एकत्र होवुन 'अन्याया विरुद्ध लढु',
आता,
'बळीच राज्य आणल्या शिवाय राहायच नाही...,!'
आता,
'बळीच राज्य आणल्या शिवाय राहायच नाही.....!'कवी: अभय भिमराव नागवंशी (नाग)
_________________________________________

आरक्षण

हे चिडवती बिनडोक , आरक्षणाच्यावरून

गेलो पुढे पहा आम्ही , ते शिक्षण घेवून ||

धुंद होवून प्रशासन करू, बदलू अवघ्या विश्वाला

भिमारायाने दिला आम्हा, स्पुर्ती रसाचा तो प्याला

त्या ज्ञानाच्या सागरा आम्ही गेलो या न्हावून || १ ||

फार कष्ट करून आम्ही, अशी मेहनत घेतली

फक्त आरक्षण घेवून, नाही सवलत लाटली

स्वाभिमानाने जगतो रे पाणी रक्ताच करून || २ ||

माणसाला माणसात, भीम बाबाने आणिले

तेव्हा गुणगान विनोदा, साऱ्या जगाने गायिले

लाज बाळगा तुम्ही थोडी नका दावू रे बोलून || ३ ||

कवी - विनोद पवार

_________________________________________

कोहिनूर हिरा
धन्य झाले माता पिता जन्माला भिवा, तो योग हा आला
१४ एप्रिल या दिनी जन्माला कोहिनूर हिरा ||
जाती यतेचा रे बळी तो बालपणी ठरला
चीड त्याच्या मनी आली पण नाही घाबरला
सडे तोड उत्तर तो देई भटाना, ज्ञान शक्तीच्या जोरा || १ ||
हक्क देण्या दलितांना खूप खूप शिकला
समाज्याच्या भल्यासाठी कधी नाही विकला
दलितांना दलितांचे हक्क ते दिले, सुटला थंड वारा || २ ||
नियतीचा खेळ पहा तो घटना भीमान लिहिली
अस्पृश्य हिणवनाऱ्यांची तोंडे काळी काळी जाहली
बौद्ध धम्म स्वीकारुनी केली ती क्रांती, विनोद पवारा || ३ ||
कवी - विनोद पवार
__________________________________________________

बुद्धं शरणं गच्छामी

अशक्य होते शक्य केले ,

माझ्या भीमरायानी

धम्म दिला तो आम्हा बुद्धाचा
बुद्धं शरणं गच्छामी //
एक , एक ना भले दोन,
दोन, दोन ना भले तीन
तिघांना हि गुरु मानले
बुद्ध फुले कबीर जाणले
चवदार तळे खुले केले
मनुस्मुर्तीला रे जाळली
जातीयता त्यांनी गाडली
शांती ने ती क्रांती केली , लढला रण मैदानी // १ //
सुख , सुख ना मिळाले
दु:ख पदरी ते आले
माणसाला माणूसपण दिले
घटना लिहून हक्क मिळविले
गांधीला जीवदान दिले
अन्यायाला वाचा फोडली
बडव्यांची ती वाचा पळाली
बुद्धीने ते युद्ध केले , विनोद रण संग्रामी // २ //

कवी - विनोद पवार
______________________________________________

वंदन

चला करू सारे वंदन भीमराया

ओ राया पडतो पाया आलो गुणगाया

तुझ्या सावलीची आहे छत्रछाया //

नियतीने तो सूड कसा उगविला

झिडकारीले ज्याला तो घटनाकार झाला

घटना अशी लिहिली देशा चालवाया //१//

झाले साकार जीवन तुझ्या जन्मामुळे

आला प्रकाश जीवनी तुझ्या येण्यामुळे

भौतिक या जगाचा विकास साधावया //२//

आठवा जयभीम करा समतेची चाल

भीम ऋण आठवा रे विनोदाचे हे बोल

चला व्हा आता सज्ज सत्ता गाजवाया //३//

कवी - विनोद पवार

____________________________________

शिल्पकार

विश्वात नाव गाजे भीमाचे घटनाकार

घटना अशी घडविली , ठरला तो शिल्पकार //

घटना बदलण्यासाठी लावाल हात कोणी

कापून टाकू हात खरी करू हो वाणी

सिंहाचे छावे आम्ही नाही कुणा भिणार //१//

तो रात दिन झटला घटना बनविण्यासाठी

रक्षण करूया तिचे घेवून हाती काठी

जगात नाही अशी ना कोणी ती लिहिणार //२//

आले किती रे गेले ना झाला त्या समान

भीमाच्या पेनावरती आहे देशाची कमान

विनोदा असा नाही कोहिनूर तो होणार //३//


_________________________________________________

जय भीम

माझ्या भीमाचे कार्य अनमोल


जय भीम बोल गड्या जय भीम बोल //
जय भीम म्हणण्यासाठी लाजतो कशाला

मग जीव दे जावुनिया जगतो कशाला
जय भीम श्वासात आमच्या आत खोल // १ //
आदर्श जीवन जय भीम जगण्याचा मार्ग
शील समाधी करुणा हा प्रज्ञेचा मार्ग
जय भीम ओळख आपली आहे बोल // २ //

नुसताच पोकळ जय भीम काहींच्या मुखात
तेहत्तीस कोटि देव असती देव्हाऱ्यात

त्यांनी बुद्ध धम्म वाचा रे सखोल // ३ //
जय भीमची गर्जना हि घुमू दे जगात
भीमाच नाव हे दुम दुमू दे जगात
बुद्ध धम्म विनोदा अनमोल // ४ //

कवी - विनोद पवार
_______________________________________________
संग्रह - अँड. राज जाधव...!!!  ________________________________________________

5 comments:

 1. अतिशय सुंदर कविता

  ReplyDelete
 2. चांदण्याची छाया कापराची काया
  माऊलीची माया होता माझा भीमराया....

  चोचीतला चारा देत होता सारा
  आईचा उबारा देत होता सारा
  भीमाईपरी चिल्यापिल्यावरी
  पंख पांघराया होता माझा भीमराया....

  बोलतात सारे विकासाची भाषा;
  लोपली निराशा आता...लोपली निराशा ;
  सात कोटीमधी विकासाच्या आधी
  विकासाचा पाया होता माझा भीमराया....

  झाले नवे नेते मलाईचे धनी ;
  वामनाच्या मनी येती जुन्या आठवणी;
  झुंज दिली खरी रामकुंडावरी;
  दगडगोटे खाया होता माझा भीमराया....

  ReplyDelete
 3. नमस्कार सर , बाबासाहेबांचे विचार लोकांनपर्यंत पोहचवण्याचे काम आपण करत आहात हया बदल आपल्याला मानाचा जय भिम बाबासाहेब नेहमी म्हणायचे माझ्या आंदोलनाला खरे यश हे माझ्या शाहिरान मुळे त्यांच्या विद्रिही लेखणी मुळे मिळाले आहे त्यामुळे आण्णांभाऊ साठे ,शाहीर अमर शेख सारख्या विद्रोही लेखकांचे संग्रह आपण लोकांपर्यंत पोहचवू शकलात तर फार आनंद होईल धन्यवाद जय भिम

  ReplyDelete