My Followers

Tuesday, 26 June 2012

जाणता राजा शाहू महाराज.......!!!


जाणता राजा शाहू महाराज.......!!! 


आज 26 जून राजर्षी शाहू महाराज यांची जयंती.फुले-शाहू-आंबेडकर हे आधुनिक महाराष्ट्राचे, पुरोगामी महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणावर जातवास्तवाचा मोठा प्रभाव असल्यामुळे महापुरुषांचा नामोल्लेख करतानाही अनेकांची अडचण होताना दिसते. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत काही वर्षापूर्वी ‘फुले-आंबेडकरांचा’महाराष्ट्र असा उल्लेख करायचे. हीच मंडळी कोल्हापुरात आल्यावर त्यात शाहूंचे नाव समाविष्ट करत. म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर शाहूंना फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने स्थान दिले जात नव्हते. राज्यकर्त्यांचेही यापेक्षा वेगळे काही नव्हते. परंतु कांशीराम-मायावती यांनी उत्तरप्रदेशातील सत्तेत असताना फुले-आंबेडकरांच्याबरोबरीने राजर्षी शाहूंना स्थान दिले, त्यानंतर महाराष्ट्राच्या पातळीवरही शाहूंचे नाव घ्यायला सुरुवात झाली आणि आज ते रूढ झाले. हे सगळे पुन्हा जाती-पातीच्या समाजकारणाशीच संबंधित आहे. महात्मा फुले माळी समाजाचे दैवत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे दैवत बनले. राजर्षी शाहू महाराज यांना स्वीकारणे मराठा समाजासाठी तेवढे सोपे नव्हते. आजही नाही. आजही मराठय़ांना शाहू महाराज अडचणीचेच वाटतात. देशात आरक्षण ही संकल्पनाच राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली, आपल्या संस्थानात मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बलांसाठी 50 टक्के आरक्षण लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय 1902 मध्ये घेतला होता. वेगवेगळ्या नावांनी काम करणाऱ्या मराठा संघटना आज शिवाजी महाराज,जिजाऊ यांची नावे घेतात, परंतु शाहू महाराज अनेकांना अडचणीचे वाटतात. कारण शाहू महाराजांना स्वीकारले, तर आरक्षणाचे समर्थन करावे लागते. आणि आरक्षणाचे समर्थन करून मराठय़ांचे संघटन करता येत नाही.


सामाजिक बंधुभाव, समता, दलित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला व क्रिडा, आरोग्य आदी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ज्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, आधुनिक भारताचे भाग्यविधाते, आरक्षणाचे जनक यशवंत जयसिंगराव घाटगे म्हणजेच छत्रपती शाहू महाराज, पारतंत्र्य, दुष्ट रूढी परंपरा, निरक्षरता, अज्ञान इत्यादी समस्यांनी ग्रासलेल्या काळात इ.स. १८७४ २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. शाहू महाराज नावाप्रमाणेच यशवंत राहिले. भारतमातेच्या पोटी अनेक थोरांनी, संतांनी, महंतांनी, राजांनी, महाराजांनी, समाज सुधारकांनी जन्म घेऊन भारतातील गोरगरीब दीन दुबळ्यांची मनोभावे सेवा केलेली आहे.

बहुजन हिताय बहुजन सुखाय हे सूत्र ध्यानात घूऊन शाहू महाराज राज्यकारभार पाहू लागले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याची फळे सर्व समाजाला चाखता यावीत म्हणून त्यांनी आपले सिंहासनच पणाला लावले. अज्ञान अंधश्रद्धा, निरक्षरता सामाजिक दुजाभाव, दारिद्रृय यात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी महाराजांनी आपला खजिना सताड उघडला. 


छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक बंधूभाव, समता, दलित, बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा, आरोग्य इ. क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांनी खूप परीश्रम घेतले. समाजातील गोरगरीब, दीनदुबळे, मागासवर्गीय, उपेक्षित व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देणारे ते एकमेव राजे होते. सुरूवातीस कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा कायदा लागू केला. समता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाने अस्पृश्यता निवारणाकरिता जातीभेद निर्मूलन बलुतेदारी पद्धतीवर बंदी आणली. स्त्री शिक्षण, देवदासी प्रथेचे उच्चाटन, महिला संरक्षण कायदा, विधवा पूनविर्वाह कायदा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन यासारख्या परीवर्तनवादी मुद्दे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे धाडस त्यांनी केले व त्यांची अंमलबजावणी होते की नाही ते स्वत: खात्री करून घेत असत. स्त्री हक्क स्वातंत्र्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन पत्नीला त्रास देणाऱ्या पतीसाठी शिक्षेच्या कायद्याची तरतूद केली. अनिष्ठ रुढी परंपरा उच्चाटनासाठी प्रयत्न केले. १९१७ मध्ये विधवा पूनर्विवाह कायदा व विवाहनोंदणी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.


शंभर वर्षापूवी शाहूराजांनी ज्या दूरदृष्टिने निर्णय घेतले, त्याच्या जवळपासही आजचे राज्यकर्ते जाऊ शकत नाहीत. मानवी जीवनाच्या विकासाचे असे एकही क्षेत्र नाही, ज्यासाठी महाराजांनी काम केले नाही. उस्ताद अल्लादिया खाँ साहेबांना त्यांनी कोल्हापूरला आणल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते असल्याचे त्यांनीच माणगावच्या परिषदेत जाहीर केले. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. राधानगरी धरण बांधून सिंचनाची सोय केली. कुस्तीला प्रोत्साहन दिले. कोल्हापुरात प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू करून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक कार्य केले. फासेपारध्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी राबवलेली बांधकाम योजना राज्यकर्त्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरणारी आहे. हे सगळे करीत असताना समाजातील विशिष्ट वर्गाशी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. संघर्ष करतानाही त्यांनी विकासाची वाट आणि तळागाळातील घटकांप्रती असलेली बांधिलकी याचा कधी विसर पडू दिला नाही. प्रस्थापितांनी त्यांच्या बदनामीच्या कहाण्या रचल्या. परंतु नव्या पिढीतल्या इतिहास संशोधकांनी त्या कहाण्या म्हणजे हितसंबंध दुखावलेल्या मंडळींनी रचलेली कुभांडे असल्याचे सिद्ध केले आहे.  

बहुजन व मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना परिपूर्ण शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा बौद्धिक, सामाजिक व आर्थिक विकास शक्य नाही हे महाराजांनी हेरले व ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावाला शाळांची निर्मिती केली व शिक्षण सक्तीचे केले, एवढे करून न थांबता त्यावरील शुल्क माफ केले. जे पालक आपल्या पाल्यांना रोज शाळेत पाठविणार नाही अशा पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतुदही केली. तसेच त्यांनी वसतीगृहे उभे केलीत, गरिब विद्यार्थ्यांसाठी तर त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. यामुळे बहुजन व दलित समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाचे दरवाजे खुले झालेत.

८ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहिरनामा काढला. २१ मे १९१९ रोजी आर्थिक दृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. १ जानेवारी १९१९ रोजी आज्ञा देवून प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील अस्पृश्य मुलांना स्पृश्य मुलांसारखीच समानतेची वागणूक द्यावी म्हणून शिक्षण खात्याला आदेश दिला. ३० सप्टेंबर १९१९ रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात. ६ जुलै १९०२ मागास जातींना नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली. २३ पेब्रुवारी १९१८ ला कुलकर्णी वतने बंद, तलाठी सुरू. आंतरजातीय विवाह कायदा १५ एप्रिल १९२० नाशिक येथे उदोजी मराठा विद्यार्थी वसतीगृहाचा कोनशिला समारंभ केला. १९ नोव्हेंबर १९२१ मध्ये रायगड येथे शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाला. तसेच सिंधूदुर्ग जिल्ह्य़ातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार ही केला. १६ फेब्रुवारी १९२२ दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते.

राजर्षी शाहू महाराजांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, लिंगायत आदी सर्वच जातीतील-पंथातील विद्वान, पंडीत, शिक्षित, अशिक्षित, मल्ल, शिकारी, गायक, चित्रकार, शाहीर, कारागिर, तमासगीर या सर्वावर निव्र्याज भावनेने प्रेम करून त्यांना त्यांच्या विकासासाठी व उद्धारासाठी सर्वप्रकारची मदत देत. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली व त्यानंतर ‘मूकनायक’ साप्ताहिक पूर्ववत सुरु राहिले.२० मार्च १९२० रोजी करवीर राज्यातील ‘कागल’ जहागिरीतील ‘माणगांव’ या ठिकाणी अस्पृश्यांची पहिली ऐतिहाकि परिषद शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीतून व प्रेरणेने आयोजित केली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब होते.

‘माझे राज्य गेले तरी बेहत्तर, अस्पृश्योद्धाराचे कार्य थांबविणार नाही’महाराजांच्या अशा कार्यामुळे अस्पृश्य जनता शाहूंना आपला त्राता, उद्धारक, मित्रच नव्हे तर प्रत्यक्ष देव मानीत होते. ह्य़ामुळे महाराज व बाबासाहेब याचा स्नेह वाढत गेला.


क्रूर रूढी आणि प्रथांना पायबंद, हुंड्यांची भयानक रुढी, दारुचे दुष्परीणाम, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक ऐक्य, स्वदेशीचा आग्रह व प्रचार, बालविवाहाचे दुष्परीणाम असे लोककल्याणकारी विषय घेऊन समाज घडविण्यासाठी महाराजांनी अथक परिश्रम घेतले. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली नाही. 

दुष्काळावर मात करण्यासाठी त्या काळी रोजगार हमी योजना सुरु केली आणि त्या योजनेतून रस्ते, तलाव, पूल बांधून घेतले. मजूरांच्या लहान मुलांसाठी शिशु संगोपन गृहे उघडली. अपंग, अनाथ, आजारी वृद्धांसाठी अनेक ठिकाणी निराधार आश्रम सुरु केले. प्लेग या भयानक रोगापासून स्वसंरंक्षण कसे करावे त्यावर काय उपाय करावे याची माहितीपत्रके छापून लोकांचे अज्ञान दूर केले. सामान्य गरीब जनता माणूसकीला पारखे झालेले दलित बांधव यांना जागृत करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे रहण्यास अथक प्रयत्न करुन महाराजांनी त्यांना प्रगतीप्रथावर नेले. अधर्मावर, दुष्ट आणि क्रूर रुढी परंपरांवर कठोर प्रहार करुन मानव धर्माचा, माणूसकीचा, सामाजिक समतेचा, लोककल्याणाचा वृक्ष त्यांनी बहरत ठेवला. राजा असूनही ते लोकांसाठी, समाजासाठी राजऋषीसारखे जगले. 

करवीर राज्याचे उत्पन्न कमी असल्याने नोकरशाहीच्या हातून शाहू महाराजांनी सत्तासूत्रे आपल्या हाती घेऊन प्रशासन यंत्रणेवर वचक बसविण्यासाठी ‘हुजूर कार्यालयाची’ स्थापना केली. महाराजांची ही कृती म्हणजे नोकरशाहीच्या मक्तेदारीला लावलेला सुरूंगच होता. ‘कुस्तीची पंढरी’ कोल्हापूरला बनविण्याचे श्रेय हे केवळ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनाच जाते. म्हणजे कोल्हापूरच्या मातीत ‘मल्लविद्या’ रुजविण्याचे, जोपासण्याचे व वाढविण्याचे काम त्यांनी केले. १८९५ साली ‘मोतीबाग तालीम’ची स्थापना केली. त्या ठिकाणी प्रवेशव्दारावर एक पाटीवर लिहीले होते. ‘पहिली शरीरसंपत्ती दुसरी पूत्रसंपत्ती व तिसरी धनसंपत्ती असेल तोच पुण्यवान’ म्हणजे महाराजांचे क्रिडा क्षेत्राविषयीची आस्था येथे दिसते. पुढे जाऊन ३१ जुलै १८९७ रोजी जेव्हा त्यांना पुत्ररत्न झाले. त्यावेळी त्यांनी एक जंगी स्पर्धा ठेवली होती. त्या स्पर्धेत देशभरातील सर्व मल्ल आले होते. असा हा महान कीर्तीवंत राजा राजर्षी शाहू महाराज ६ मे १९२२ ला अनंतात विलीन झाला. अशा थोर
लोकराजा राजर्षी शाहु महाराजांना जयंतीनिमित्त अँड.राज जाधव यांच्यातर्फे मानाचा मुजरा...!!!

5 comments:

 1. बहुजनांमधे शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे रयतेचे कैवारी बहुजनाचा पहिला मुलगा शिकला म्हणुन त्याची हत्तीवरुन मिरवणुक काढणारे लोकराजा राजर्षी शाहु महाराजांना जयंतीनिमित्त अँड.राज जाधव यांच्यातर्फे विनम्र अभिवादन...!!!

  ReplyDelete
 2. Absolutely Excellent. A king who understood the sentiments across all the strata of society, a King who despite of having all rights and means to live lavish life went to take over a mission of equality and justice. Shahu Maharaj is actually an idol for every Indian, but not celebrated as much as other leaders, obviously for the reasons you mentioned. Marathas don't celebrate him being a pro dalits and dalits don't consider him fully theirs. Anyways that's not going to bring any less honor to this true modern world king, as long as people like you remember him and celebrate him. Jai Hind!

  ReplyDelete
 3. Thank you...Prakash Pimpale...!!!

  ReplyDelete
 4. लोककल्याणकारी राजे…श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज यांची १३९ वी जयंती, यांच्या कार्य, कर्तुत्व आणि विचाराना मानाचा त्रिवार मुजरा...........!

  ReplyDelete
 5. i like it our memory history,jo itihas ko janta hai wahi itihas basakta hai.

  ReplyDelete