My Followers

Wednesday 1 August 2012

अंधश्रद्धेला मूठमाती कधी देणार?

अंधश्रद्धेला मूठमाती कधी देणार?
श्रद्धा, अंधश्रद्धा हा विषयच मुळात इतका डोकेखाऊ आहे कि तो सहजसहजी कोणाच्या डोक्यात उतरावयचा म्हणजे दगडावर डोके आपटून घेण्यासारखे आहे. विशेषतः बहुजन समाज ही बाब समजून घ्यायलाच तयार नाही. नव्हे तोच समाज यात अधिकाधिक अडकलेला दिसतो. त्याला श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक कळत नाही, असेच आजू बाजूचा विचार केला तर दिसते. अंधश्रद्धा मुळात जन्माला आली कशी? याचे मार्मिक उत्तर म्हणजे भीती, निसर्गाच्या विविध रुपांमुळे तो भयबीत होत होता. वीज चमकली, आग लागली, पाउस पडला किंवा आला नाही, भूकंप झला, पूर आला, वादळ सुटले की, आपल्या हातून काही तरी घडले म्हणूनच असे घडले असा तो विचार करी. मग या पासून बचाव करण्यासाठी तो वेगवेगळ्या युक्त्या करू लागला. मग त्या रौद्र रूपांच्या शक्ती त्याने देवदेवता म्हणून निर्माण केल्या. त्यांना मानवी रूप पण कल्पनेने त्यावर कलाकुसर करून प्रतिमा निर्माण केल्या आणि त्यांना तो पुजू-भजू लागला. त्यात दोन गट पडले. एक डोळे असून अंधच राहिला आणि दुसरा डोळ्यांचा योग्य वापर करू लागला आणि त्या भीतीपोटीच अंधश्रद्धेचा उगम झाला.

इथे जशा हजारो जाती-पोटजाती आहेत त्याचप्रमाणे अनेक रितीरिवाज आहेत आणि कर्मकांडेही तशीच भन्नाट आहेत. बहुजन समाजातील देवदेवतांना कोंबडे, बकरे, मटन, दारू लागते तर उच्च वर्णांच्या देवदेवतांना दुध, तुप, मध लागते. ही विषमता दिसते. श्राद्ध विधी किंवा पितृपक्षातील विधी करण्यासाठी लागणाऱ्या आधीच्या सर्व चांगल्या विधी उच्च वर्णांच्या आणि शेवटच्या सर्व विधी बहुजनांच्या असे का? जितेपणी नाही गोडी मेल्यावर बंधने तोडी, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. मी म्हणतो, घासला (पिंडाला) कावळ्यानेच का शिवायचे? दुसरे पक्षी किंवा इतर प्राणी का नको? का आपले पूर्वज फक्त कावळ्याच्याच जन्माला गेले? इतर पशु-पक्षी त्यांना वर्ज्य का? प्रत्येक गोष्टीत विज्ञान असते? हे तुम्हा-आम्हाला माहीत असतांना जमीन राखून त्यावर दिवा ठेवला, तर दिव्याच्या उष्णतेमुळे आणि जमिनीतल्या उष्णतेमुळेते सारवण वाळते. वाळलेल्या त्या भागाला तळे जातात तेंव्हा आपले बांधव काय म्हणतात? मेलेला माणूस सापाच्या जन्मात गेला किंवा अनेक प्रकाराने ते पेटवून देतात. अहो, माणसाला मातीत पुरले तर त्याचे विघटन होते. प्रेत जाळले, तर त्याची राख होते, हे सत्य का स्वीकारले जात नाही?
अंधश्रद्धा ही श्रद्धेच्या लखलखीत विस्तावावर्ची राख आहे. ही राख झटकली गेली पाहिजे. आपल्याकडे अंधश्रद्धेविरुद्ध दंड थोपटण्याऐवजी अंधश्रद्धा प्रचारकांसमोर दंडवत घालण्याची रीत आहे. भारताचे बहुजन पुढारी देखील मागे नाहीत. सर्वत्र बुवाबाजीचा सूळसुळाट झालेला आहे. चमत्कार तिथे हमखास नमस्कार मिळत आहे. प्रत्येकाच्या मनात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यान विषयीचे वादळ असते. काहींना प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धा वाटते. आणखी काहींना श्रद्धेशिवाय माणूस जगणे अशक्य असे वाटते. सारासार बुद्धी गहाण पडली की, अंधश्रद्धा निर्माण होते. ती बळकट करण्यासाठी एकमेकांना दाखल्यांची देवाणघेवाण केली जाते.
धर्म किंवा भारताची धार्मिक स्थिती लक्षात घेतली तर असे दिसते की, ब्राम्हण लोकांनी समाजावर धार्मिक आणि आर्थिक वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न परंपरेने चालविला होता. लोकांमध्ये धर्माची भीती रुजवून नानाविध, धार्मिक विधी पार पाडण्यास लोकांना भाग पडले जात असे. कर्मकांड, जपतप, होमहवन, उद्यापन, सत्यनारायण आदी प्रकारांना चालना दिली जात असे. परिणामतः जातीयवाद निर्माण झाला. ईश्वर, उपास्ना, देवपूजा, देवदर्शन फक्त ब्राम्हनांसाठीच, प्रवचन फक्त ब्राम्हनांनीच करावे, असा दंडक होता. शिक्षण आणि ग्रंथ पठ्ठण्णादी अधिकार ब्राह्मणेत्तरांना नसल्यामुळे समाजात अंधश्रद्धा फोफावली होती. विवेकाला आणि मानवतावादाला समाजात कोणतेही स्थान नव्हते. अनेक प्रकारची रोगशांती, वास्तुशांती, ग्रहशांती, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, मुहूर्त अशी त्याची स्वरूपे होते.
लोक एवढे धर्मभोळे व अंधश्रद्धाळू होते की, निसर्गात घडणाऱ्या घटनांकडे तो जादूटोणा झाला, म्हणूनच बघत असत. समाजात नरबळी देण्याची प्रथा होती. इंग्रज राजवटीच्या काळात याचे अस्तित्व जारा कमी वाटत असले, तरी आजही आधुनिक युगात त्या नरबळींचे अस्तित्व टिकून आहे. परवाचेच उदाहरण घ्या ना, नालासोपाऱ्यात सख्या काकूने आपल्या दोन लहान निरागस पुतण्यांना मारून टाकले. अंगात येणे हा प्रकार सर्रास दिसून येतो. अशा प्रकारचे अंगात येणे हा हिस्टेरिया किंवा फोबियाचा प्रकार असू शकतो. घरात कमी लेखत असले तर आपली सिद्धता, अस्तित्व दाखवून देण्यासाठी अंगात देवी आल्याचे भासविले जाते. घरातली मंडळी आपसूकच घाबरून जातात. जावेच्या अंगात भूत आहे ते पडवून लावण्यासाठी तिचे केस आणि हात जाळले, तेंव्हाच तिच्यावर मानसिक उपचार केले असते तर तिने त्या चिमुरड्यांचा बळी घेतला नसता. परंतु वैद्यकीय सल्ल्याऐवजी ते अंधश्रद्धेच्या मार्गावर गेल्याने नुकसान झाले.
तीन वर्षांपूर्वी रत्नागिरीत पाच जणांचा गुप्त बळी घेतला गेला. खोल दरीत त्यांचे मृतदेह फेकून देण्यात आले. एका डॉक्टर पती-पत्नीने एका भोंदू बाबाच्या सांगण्यावरून आपल्या लहान मुलाचे रक्त सरळ मोठ्या मुलाला चढवले का तर तोही हुशार होईल. पण त्या डॉक्टर असलेल्या माता-पित्याला रक्तगट हा नियम माहित नसावा? परिणामतः दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. अशा कितीतरी घटना आजच्या घडीला घडत आहेत. भारतीय माणूस व्यक्तीपूजेवर जास्त विश्वास ठेवतो.

जन्म-मृत्यू जगण्याच्या अधिकारातून तो सजीव आपल्या परीने जगात असतो. त्याला माणूस कसा अपवाद असेल? निसर्गाने माणसाला अधिक काय दिले असेल, तर ती विवेकबुद्धी होय. त्या बळावर तो निसर्ग चक्र हाताळू लागला. आजच्या विज्ञान युगाला माणूस हेच विसरला आहे. तो पुन्हा अंधश्रद्धेच्या गर्तेत बुडत चालला आहे. बाबा, बापू, अंम, बुवा, भागात यांचा तो चेला बनला आहे. अनेक धातूंच्या, ग्रहांच्या आंगठ्या हातात घातल्या. मनगटावर या त्या बुवा, बापू, अम्माने बांधलेले गंडे दोरे बांधू लागला आहे. अभ्यासऐवजी, प्रयत्नांऐवजी तो अशा प्रयत्नांना तासनतास बसत आहे. मंदिरांच्या समोर रांगा लावून ताटकळत उभा असतो. लग्न कार्य निघाल्यावर आजही तो बोकड कापतो, कोंबडे उतरवून टाकतो. अमुक केले नाही म्हणूनच अपघात झाला, म्हणूनच घरात भांडणे होत आहेत असे तो मानतो. संगणकाची कार्यशाळा सुरु असतांना तो सत्यनारायणाची पूजा घालतो. दुचाकी-चारचाकीला शनिवारी न चुकता मिरच्या-लिंबू बांधतो. घरात काळ्या बाहुल्या टांगतो. बहुजन समाज आणि बौद्ध समाज यांच्या बाबतीत हे जास्तच अनुभवास येत आहे. आंबेडकरी चळवळ अशा थंडावलेल्या दिसतात. वर भिंतींवर डॉ. बाबासाहेबांचा तथागत बुद्धांचा फोटो आणि समोर गणपतीची आरास दृश्य बघवत नाही.
आपण जेंव्हा अन्गुलीमालाची गोष्ट वाचतो, तेंव्हा त्यातून काय सूचित होते. त्यात तथागत बुद्ध म्हणतात की, माणूस ज्या वेळी विकाराधीन होतो, तेंव्हा तो आपली विद्या, ज्ञान, विवेक विसरतो व दृष्ट कृत्य करण्यास प्रवृत्त होतो. अंधश्रद्धेचे मूळ या विचारांतूनच आपल्या लक्षात येते. माणसातील विकारांना बळकटी ही अविवेकातून जन्माला येते. मला जे मिळवायचे आहे ते मी माझ्या पद्धतीनेच मिळवेन असा तो विचार करतो. तो चांगल्या-वाईट तत्वांना विसरलेला असतो आणि त्यातूनच तो आपले समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो. आपण जे काही करत आहोत ते वाईट कृत्य आहे याची त्याला जाणीव नसते. म्हणून सामाजिक मागासलेपणा निर्माण होतो. अज्ञानात तो असल्याने त्याच्या ज्ञानचक्षुंचे दरवाजेच बंद असल्याने तो वाईट करण्यास पुढे सरसावतो. हे तत्व अंगुलीमाल बुद्ध त्याच्या सानिध्यात असल्यामुळे त्याच्यात झालेला बदल याचा परिचय या गोष्टीतून होतो.बुद्धांचा हा विचार विलक्षण सामर्थ्याचा आहे. त्याचा प्रभाव अन्गुलीमालावर पडतो आणि तो त्यापासून प्रवृत्त होतो. 
आज समाजामध्ये अशा प्रकारच्या विचारांची पुन्हा एकदा गरज आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. प्रयोग करून समाज मनाचा ठाव घेणाऱ्या संस्था आहेत. पण होते काय यांची चर्चासत्रे बंदिस्त हॉलमध्ये होतात. प्रयोगशाळा, कॉलेजात होतात. मोठमोठे विचारवंत आपले विचार मांडतात, याचा उपयोग कित्पत होतो? या लोकांनी, संस्थांनी, झोपडपट्टीचा भाग, खेड्या खेड्यांतून, शहरातील बकाल वस्त्यांमधून असे प्रयोग करायला हवेत. या विभागामधून थोडेसे जरी फिरलात तर तुम्हाला बरेच काही जाणवेल, दिसेल. दर चार-दोन घरांमधून अंगात येणारी स्त्री दिसेल. देव-देव्हारे दिसतील. मोठ्या आवाजात टेप रेकॉर्डर तत्सम गाणी शुरू असतात. शाळा-कॉलेजात जाणाऱ्या मुलांचा अभ्यास होत नाही. आई-वडील एकतर अशिक्षित किंवा अर्धशिक्षित असतात. शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारा कुणी गेला तरी काहीही उपयोग होत नाही. समाजाला काबूत ठेवणारी रूढी, धर्म, सण, उत्सव या धारदार शस्त्रांचा राजकारणी नेहमीच वापर करतात. दुसरीकडे देवाचे दलाल जागोजागी उभे राहून अध्यात्माच्या मार्गाने त्रस्त झालेल्या लोकांचे दुभंगलेले व खचलेले मन अचूक हेरतात. कारण आपल्या समजाएवढे सोपे असलेले लोक अन्य कुठेही नाहीत. प्रश्न विचारण्याची तुमची चिकित्सक बुद्धीच मारून टाकली जाते. जनसमुदायाच्या विरोधात सत्याच्या बाजूने आवाज उठवण्याची कृती वाढली, तरच समाजाचे कल्याण होईल, अन्यथा माणसाची मती बधीर करणाऱ्या जीवघेण्या अंधश्रद्धेने या समाजाचा विनाश अटळ आहे. तथागत बुद्धांनी दाखविलेल्या विज्ञानवादी धम्म आणि डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा खरच का कमी पडत आहेत? का तुम्ही अजूनही शिक्षित आंबेडकरी बांधव ते समजावून सांगण्यास कमी पडत आहात? याचा विचार करण्याची नक्कीच वेळ आली आहे. खरोखरच आपण अंधश्रद्धेला मूठमाती देणार आहोत का? आत्मा-परमात्मा, मोक्ष या संकलपनांमधून बाहेर पडलो, तरच हे सर्व शक्य आहे. अन्यथा सर्व स्तरातील समाजाला ही अंधश्रद्धा मूठमाती देईल, हे निर्विवाद सत्य आहे.
(लेखक - प्रा. डॉ. श्रीरंग कुडूक)

No comments:

Post a Comment