My Followers

Friday, 10 August 2012

आजच्या पुरुषांसाठी सप्तपदी धोकादायक का आहे?

आजच्या पुरुषांसाठी सप्तपदी धोकादायक का आहे?

हिंदू विवाह कायद्यात लग्न कायदेशीर ठरण्यासाठी आवश्यक मानला गेलेला सप्तपदी हा विधी आवश्यक आहे का? हा प्रश्न मला अनेक वर्षे सतावत आहे. आणि सध्या तरी माझे असे मत आहे की हा विधी व त्याच्या अभिप्रेत अर्थाकडे गंभीरतेने बघितले तर नक्कीच धोकादायक आहे. विशेषत: पुरुषांसाठी तो जास्त धोकादायक आहे.


सप्तपदी या विधीचा उगम झाला तेव्हाची सामाजिक परिस्थिती (लग्नसंस्था) आणी काळाच्या ओघात या विधीचे अस्तित्व टिकून राहणं हे मला खूप विसंगत वाटतं...फ्रिट्स स्टाल या लेखकाचे "रिच्युअल्स अँड मंत्राज- रूल्स विदाउट मीनिंग" नावाचे एक पुस्तक मोतीलाल बनारसीदास या प्रकाशकानी प्रसिद्ध केले आहे. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतले "रिच्युअल इज़ ट्रान्समिटेड नॉट ओन्ली विदाउट मीनिंग, बट ऑफन विदाउट लँग्वेज" हे वाक्य लक्षात घेतले तर सप्तपदी हा लग्नाला कायदेशीर 'पूर्णत्व' आणि 'अर्थ' देणारा विधी आजच्या काळात टाकाऊ का आहे ते समजायला मदत होईल.


पुरातन काळापासून ते अगदी परवा-परवा पर्यंत म्हणजे चॅनेल संस्कृती आपल्यावर येउन आदळे पर्यंत "स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर:" ही साक्षात्‌ अर्जुनाला पडलेली चिंता तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनात घट्टपणे रुतून बसली होती. यातील सर्वात गमतीचा भाग म्हणजे भगवंतानी "मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम्‌" असे पुढे एके ठिकाणी म्हणून (पर्यायाने वर्णसंकर पण आपल्याच अध्यक्षतेखाली चालतो) अशी स्वत:च कबुली दिली आहे. सांगायचे तात्पर्य असे की, वर्णसंकराची आणि अनौरस प्रजेच्या जबाबदारीची भीति यामुळे सप्तपदीच्या वेळी घेतली जाणारी नातिचरामिची शपथ अस्तित्वात आली असावी असा सर्वसाधारण तर्काला पटणारा कयास आपल्याला बांधता येतो.


मुळात लग्न म्हणजे काय? तर भारतापुरते बोलायचे झाले, तर असे सांगता येईल दोन भिन्न लिंगी व्यक्तीनी एकत्र राहण्याचा निर्णय घेणे आणि कामजीवन उपभोगून समाजाला मान्य अशा पद्धतीने प्रजोत्पादन करणे. मनुष्यप्राण्याखेरीज अन्य कोणत्याही समाजप्रिय प्राण्यात अशी कामजीवन सुरू करण्यासाठी सामाजिक मान्यता घेतली जात नाही. मनुष्यप्राण्याच्या बाळाना दीर्घकाळ संगोपनाची गरज असते. ही गरज योग्य तर्‍हेने पूर्ण व्हावी यासाठी संगोपनासाठी आवश्यक असलेल्या श्रमांची विभागणी नैसर्गिक रितीने म्हणजे 'गुणकर्म विभागश:' अशी झाली. अन्न गोळा करणे, शिकार करणे, शत्रुच्या हल्ल्यापासून आपल्या टोळीचे रक्षण करणे ही कामे पुरूषांच्याकडे आणि प्रजेचे संगोपन स्त्रीया करू लागल्या. शारिरीक ताकदीमध्ये पुरुषांच्या तुलनेत निसर्गत: कमी पडल्यामुळे चूल आणि मूल यांच्याशी 'बांधली गेलेली' कालची स्त्री पोषण-रक्षण करण्याची वस्तू बनली. हे बहूतेक सर्वांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे सर्वांना ठाउक असते. पण 'आजची स्त्री पुरुष-प्रधान व्यवस्थेचा बळी आहे' या घोषणाबाजीमध्ये वास्तव बर्‍याचवेळा दूर सारले जाते.


असो. आजची स्त्री मात्र पूर्ण वेगळी आहे. ती एक तर मुक्त आहे किंवा मुक्त होण्यासाठी धडपडत आहे, मग ती समाजाच्या कोणत्याही थरातील असो. या धडपडीचे मी जेव्हा त्र्ययस्थपणे निरीक्षण करतो तेव्हा मात्र ही धडपड, आटापिटा नैसर्गिक श्रमविभागणीच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी आहे का असा प्रश्न पडतो. बरं, स्त्री आज जेव्हा नैसर्गिक जबाबदार्‍याना लाथ मारून, झिडकारून काही मिळवायचा प्रयत्न करते तेव्हा तीच्या मुक्तीचा उदो-उदो होतो. पुरूषाने त्याची नैसर्गिक जबाबदारी झटकली किंवा ती पुरी करण्यात तो कमी पडला तर तो मात्र समाजाच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या छी-थूला आणि प्रसंगी शिक्षेला पात्र ठरतो.


नुकताच घडलेला एक प्रसंग. पुण्यात डॉक्टर मंडळीनी विवाहसंस्थेच्या भवितव्याविषयी आयोजित केलेल्या एका चर्चासत्राला उपस्थित राहिलो होतो. मंचावर काही वकील आणि काही डॉक्टर उपस्थित होते. त्यात एका वकीलीण बाईनी त्यांच्याकडच्या एका घटस्फोटासाठी आलेल्या (कोकणस्थ ब्राह्मण) मुलीची गोष्ट सांगितली. ही मुलगी घटस्फोटासाठी आपला अपत्यावरचा हक्क सोडायला तयार झाली होती. वकीलीण बाईना या मुलीचे मोठ्ठे कौतुक वाटले होते, कारण तिने मातृत्वाच्या हक्कावर पाणी सोडण्याचे औदार्य/धाडस(!) दाखवले (पण मातृत्वाची जबाबदारी तीने झटकली यात मात्र वकीलीण बाईना काहीही गैर वाटत नव्हते). ही़च बाजू उलटी असती म्हणजे एखाद्या पुरुषाने आपल्या अपत्यावरचा हक्क सोडायचा ठरवला तर मात्र संपूर्ण कायदे-यंत्रणा त्या पुरुषाला ओरबाडण्यासाठी, झोडपण्यासाठी खडबडून जागी झाली असती.


थोडक्यात सांगायचे झाले तर पुरुषाच्या प्रत्येक चूकीला समाज कठोरपणे शिक्षा करतो पण मुक्त स्त्रीच्या चुकीला (खुनासारखे अपवाद वगळता) कोणतीही शिक्षा नाही. मुक्त स्त्री कशालाही बांधिल नाही.


ज्या विधीना सद्यस्थितीमध्ये फारसा अर्थ नाही अशा विधीद्वारे विवाहाचे बंधन एखादा पुरुष जेव्हा स्वीकारतो, तेव्हा तो 'सप्तपदी' सारख्या विधीमुळे तो कोणते धोके स्वत:वर ओढवून घेतो याचा तटस्थपणे विचार प्रत्येक विवाहेच्छु पुरुषाकडून व्हावा असे मला वाटते.


१. पुनर्जन्म या कल्पनेला वैज्ञानिक आधार काही नाही. मनुष्यप्राणी निसर्गत: एकनिष्ठ राहण्यासाठी निर्माण झाला नाही. एकनिष्ठता ही समाजाने स्वीकारलेली कल्पना आहे. केवळ धार्मिक कल्पना म्हणून सातजन्म एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणे कितपत योग्य आहे?


२. पुरूष जेव्हा त्याच्या भावनिक, शारिरीक गरजा पूर्ण न झाल्याने कुटुंबाची सीमारेषा ओलांडतो तेव्हा तो 'बाहेरख्याली' ठरतो. पण याच कारणांसाठी स्त्री जेव्हा कुटुंबाची सीमारेषा ओलांडते तेव्हा मात्र ती 'शोषित' असते. अशा स्त्री पासून वेगळे व्हायचे असले तरी तीच्या नवर्‍याला तीची पूर्ण व्यवस्था करून मगच वेगळे होता येते.


३. एखादी व्यक्ती एखाद्या समूहाचे सदस्यत्व जेव्हा स्वीकारते तेव्हा त्या समूहाचे नियम नवीन सद्स्यावर बंधनकारक असतात. पण आधुनिक मुक्त स्त्री मात्र याला अपवाद आहे. संपूर्ण कुटुम्बाने, शक्य असो वा नसो, तिच्या कलाने घेतले नाही तर 'छ्ळ झाला, छ्ळ झाला' म्हणून ऊर बडविण्यास मुक्त स्त्री मोकळी असते. इतकेच नव्हे तर कायदा पण तिच्या मदतीला पूर्ण ताकदीनीशी उभा राहतो. मुक्त स्त्री कपटी, ढोंगी, क्रूर असू शकते हे मात्र कायदा मानत नाही. तसं असते, 'मॅन इज गिल्टी अण्टील प्रुव्हन इनोसंट' हे तत्त्व मार्गदर्शक तत्त्व म्हणून कायद्याने स्वीकारले नसते.


४. एखादे लग्न परिचयोत्तर होत असेल तर ते पूर्ण विचारांती होत आहे असे मानून एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणे तर्क-सुसंगत ठरते पण जेव्हा 'स्थळे बघून' विवाह जुळवले जातात तेव्हा आपण ज्या मुलीबरोबर सात जन्म एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणार आहोत ती मुलगी, विशेषत: कायदे एकतर्फी असताना, आपल्या जबाबदार्‍या पूर्ण पाडेल याची कोणतीही खात्री नसताना, पुरुषाने अशी शपथ घेणे हे आत्मघातकीपणाचे निदर्शक आहे, असेच माझे स्पष्ट मत आहे.


हिंदुविवाह कायद्यानुसार म्हणजे धार्मिक रितीरीवाजानुसार होणारे लग्न जेव्हा मोडते तेव्हा, कुणाला पटो अथवा न पटो पुरुषांचे लचके, कायद्याच्या मदतीने जास्त तोडले जातात. त्यासाठी सतराशेसाठ कायदेशीर मार्ग उपलब्ध असतात. कारण कायद्याच्या दृष्टीने तुम्ही अग्नी, देव, ब्राह्मण यांना साक्षी थेवून घेतलेली शपथ मोडत असता. याला एक महत्त्वाचा पर्याय आहे तो म्हणजे लग्न, स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली म्हणजे सह्या ठोकून करणे. यात तुम्ही जोडीदाराचा कायदेशीर पती अथवा पत्नी म्हणून स्वीकार केलेला असतो. कोणतीही शपथ यात नवरा-नवरीने घेतलेली नसते. खरं तर 'स्थळे बघून' होणार्‍या लग्नांसाठी हाच सर्वोत्तम पर्याय सद्यस्थितीमध्ये उपलब्ध आहे. पण समाजाच्या आणि कुटुंबाच्या दडपणामुळे हा पर्याय अजुनही तितकासा रूळलेला नाही.


थोडक्यात स्त्री खरोखर 'बद्ध' होती तेव्हा सप्तपदी या विधीला अर्थ होता(?), आजच्या संदर्भात हा विधी पुरुषांसाठी नक्कीच धोकादायक आहे.


अँड. राज जाधव...!!! 
(या लेखाचे मूळ लेखक "राजीव उपाध्ये" हे असून, सदर लेख हा  राजीव उपाध्ये  यांच्या ब्लॉग वरून संस्कृती रक्षकांचे प्रबोधन करण्याच्या हेतूने घेतलेला आहे.) 

2 comments:

  1. आपल्याला हा पण लेख कदाचित आवडेल - http://rajeev-upadhye.blogspot.in/2008/09/blog-post_12.html

    प्रतिक्रियेबद्दल आभार!

    राजीव उपाध्ये

    ReplyDelete
  2. लेख वाचला, आवडला देखील, पण परिपूर्ण असा नाही वाटला...(हे तुम्हास सांगण्या इतका मी मोठा नाही), कारण हा विषय एवढ्या मोठा आणि गंभीर आहे, त्यामुळे कदाचित थोडक्यात आटोपून घेतलेला विषय पूर्ण असा नाही वाटला. तुमची लेखणी आणि कार्य असेच उजाळत जाऊ....धन्यवाद...!!!

    ReplyDelete