मी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी "फुले-शाहू-आंबेडकर" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....!!!
बाबा गेले. सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतांतल्या अनाथांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळया दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुध्द जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जन्मभर आकाशपाताळ एक केले, असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदु समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला, त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते.
जुलूम आणि अन्याय म्हटला की आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. धमन्या- धमन्यांमधून त्यांचे रक्त उसळया मारुं लागे. म्हणूनच 'लोकसभे' त काल पंडित नेहरु म्हणाल्याप्रमाणे, 'हिंदु समाजाच्या प्रत्येक जुलूमाविरुध्द पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले.' हिंदु समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण ह्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशांत नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती. आणि ती शेवटपर्यंत खरी करुन दाखविली. जो तुमचा धर्म मला कुत्र्यामांजरापेक्षाही हीन रीतीने वागवतो, त्या धर्मात मी कधीही रहाणार नाही, असे कोटयवधी हिंदुधर्मियांना कित्येक वर्षापासून ते बजावत होते.माणसासारख्या माणसांना 'अस्पृश्य' मानणारी ती तुमची 'मनुस्मृति'मी जाळून टाकणार, असे त्यांनी सनातनी हिंदूना छातीवर हात मारुन सांगितले होते.
No comments:
Post a Comment