My Followers

Friday 12 October 2012

१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....!

१४ आक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन....!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन सोहळा घडवून आपल्या ५ लक्ष अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली, दुसर्‍या दिवशी दिनांक १५.१०.१९५६ रोजी मार्गदर्शन करणारे ऎतिहासिक, स्फुर्तिदायक व ओजस्वी भाषण दिले. बाबासाहेब त्या भाषणात म्हणाले होते की, 

"आम्ही हिंदू धर्मत्यागाची चळवळ १९३५ पासून येवले येथे एक ठराव करुन हाती घेतली. मी.हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही, अशी प्रतिज्ञा मी मागेच  केली होती आणि काल मी ती खरी करुन दाखविली. मला इतका आनंद झाला की- हर्षवायुच झाला आहे. नरकांतून सुटलो असे मला वाटते."

पुढे बाबासाहेब म्हणतात की, ’मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौध्द धर्मात यावयाचे आहे, त्यांनी जाणीवेने आले पाहिजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी, आपली हिंदू नावाच्या नरकातून सुटका केली,  मात्र ह्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे स्मरण म्हणून ह्या सोहळ्याचा पहिला वर्धापन दिन हा १९५७ साली १४ अक्टोबर रोजी न घडविता ३ अक्टोबर १९५७ रोजी पाळण्यात आला व नंतर बौद्ध समाजात १४ अक्टोबर १९५६ चे स्मरण सोडून कोणत्याही तारखेला सोहळा साजरा करण्याची प्रथा पाळण्यात आली. व यासाठी दोषी नेमके कोण ?  

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी घडून येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याची जबाबदारी आपल्या अनुयायातून राजकीय नेत्यावर न सोपवता हि सर्वस्व जबाबदारी त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक कार्य करणाऱ्या आपल्या अनुयायांवर सोपवली होती. यात प्रामुख्याने वामनराव गोडबोले, मा. डो. पंचभाई,  पं. रेवाराम कवडे, तू. क. पाटील, भदंत आनंद कौसल्यायन यांचा समावेश होता.   

१४ आक्टोंबर १९५६ रोजी सर्व १४ ऑक्टोबर या तारखेचेच समर्थन करीत होते, वामनराव गोडबोले म्हणत, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर साठी सारखी प्रतीक्षा केली व बुद्धाचा व १४ ऑक्टोबरचा मेळ साधला". नंतरच्या काळात सुद्धा बी. सी. कांबळे, राजाभाऊ खोब्रागडे यांनी सुद्धा  १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याचा विचार मांडला परंतु, स्मारक समितीच्या वतीने हे विचार राजकीय प्रेरणेतून असल्यामुळे धुडकावून लावण्यात आले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणलेल्या १४ ऑक्टोबरच्या बौद्ध धम्मदीक्षा सोहळ्यात त्यांचे सर्व राजकीय अनुयायी सुद्धा उपस्थित असले तरी त्यांचा सर्व कल केवळ राजकारणाकडे होता, म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षेच्या दुसऱ्या दिवशीच १५ ऑक्टोबर १९५६ रोजी शाम हॉटेल मध्ये, आपल्या राजकीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन पर भाषणात म्हणतात, 
"एकंदर मला असे दिसते कि, तुम्हाला राजकारण प्यारे आहे, कोणत्याही गोष्टी पेक्ष्या राजकारणाची तुम्हाला जास्त आवड दिसते, माझे तसे नाही.मला धर्म जास्त प्यारा आहे, त्यासाठीच मी माझी शक्ती वेचणार आहे." (बौद्ध दीक्षा विशेषांक -प्रबुद्ध भारत - बी.सी.कांबळे )

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर आपल्या ५ लक्ष अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली, त्यानंतर १६ ओव्तोबर १९५६ रोजी चंद्रपूर येथे आपल्या दोन लक्ष अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली, यानंतर बौद्ध धम्मदीक्षेचा कार्यक्रम १६ डिसेंबर १९५६ रोजी ठरलेला होता. परंतु ६ डिसेंबर १९५६ साली काळरात ठरली,  आपले बाबासाहेब आपणास पोरके करून कायमचे निघून गेले, बाबासाहेबांचे महापरीनिर्वान झाल्यामुळे हा धम्मदीक्षा सोहळा रद्द झाला.     

बाबासाहेबांच्या नंतर नेत्यांचे संपूर्ण लक्ष बुद्ध धम्म दीक्षा सोहळे, धर्मांतर या ऐवजी मे १९५७ मध्ये होणाऱ्या निवडणुकाकडे लागले, १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाने भरघोस यश संपादन केले, महाराष्ट्रातून ६ आणि अन्य राज्यातून ३ असे शे. का. फेडरेशनचे  ९ खासदार दिल्लीत पोहचले, विधानसभेच्या निवडणुकीतही १६ उमेदवार निवडून आले. बाबासाहेबांच्या जनतेने भरघोस यश संपादन करून दिल्यावर नेते भारावून गेले व समविचारी लोकांची जवळीक साधून व्यापक स्तरावर रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात यावी या विचारला सोडून कालचे महार आजचे बौद्ध अशी रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची आखणी करण्यात आली. सामाजिक समतेचा विचार मागे पडला. 
      
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी घडवून आणलेला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा पहिला वर्धापन दिन सोहळा  हा १४ अक्टोबर १९५७ रोजी घडवायला हवा होता, परंतु त्या दिवशी न विजयादशमी होती, न दसरा. त्यामुळे सुट्टी न्हवती गर्दी जास्त झाली नसती.  ३ अक्टोबर १९५७ रोजी विजया दशमी होती आणि दसरा देखील होता,  दसरा हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस होता. त्यामुळे राजकारण्यांनी गर्दीच्या दृष्टीने ३ ऑक्टोबर रोजीच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा पहिला वर्धापन दिन साजरा केला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा दिली, त्याचा वर्धापन दिन आपण भारतीय पंचांगाप्रमाणे वा तिथीप्रमाणे  ३ ऑक्टोबर १९५७ रोजी विजयादशमी व दसऱ्याच्या तिथीला का म्हणून घडवून आणावा ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा तिथी नुसार नाही तर १४ ऑक्टोबर आणि विजयादशमीचा मेळ घालून वाट पाहून हि तारीख निवडली, परंतु राजकीय स्वार्थापोटी नेत्यांनी बाबासाहेबांनी निवडलेल्या तारखेचे राजकारणच केले. या संदर्भात नामदेवराव नागदेवते यांनी लिहिले आहे कि, रिपब्लिकन पक्षाच्या सर्व उलाढाली विजयादशमीच्या दिवशी घडत गेल्यामुळे व त्याला  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने पाठींबा दिल्यामुळेच तोच दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन मानल्यामुळे हा चुकीचा पायंडा रूढ झालेला दिसतो." 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर आपल्या ५ लक्ष अनुयायांना समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय यावर आधारित बौद्ध धम्माची दीक्षा दिली, असमानतेने बरबटलेल्या हिंदू नामक गचाळ मानसिकतेतून कायमची मुक्ती करून घेतली, हजारो वर्षे लादल्या गेलेल्या गुलामगिरीच्या बंधनातून मानवमुक्तीचा इतिहास घडविला. जुने बुरसटलेले परंपरावादी मूल्य झुगारून बुद्धाच्या वैज्ञानिक दृस्तीकोनातून नवीन जीवन मूल्याचा अंगीकार केला.       

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी घडवून आणलेल्या धम्म्क्रांतीची  या दिवसाची व तारखेची नोंद सर्व जगाने घेतली.  बाबासाहेबाच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस, बाबासाहेबांच्या एका हाकेवर ५ लक्ष लोकांनी आपला जुना धर्म झुगारून लावला. भारतात दोन हजार वर्षांनी प्रथमच भयमुक्त वातावरणात बुद्धम, सरणंमगछ्यामी..निनांदनारा दिवस, म्हणूनच १४ ऑक्टोबर ह्या तारखेला अनन्य साधारण महत्व आहे.

१४ अक्टोबर १९५६ पूर्वी भारतीय बौद्धात विजयादशमी महत्व होते. विजयादशमी हि बौद्ध सम्राट अशोक यांच्या जीवनात घडलेली एक महत्वपूर्ण घटना आहे. त्याने कलिंग विजय मिळविला तो दिवस सण म्हणून साजरा करण्याची प्रथा पडली, किलिंग विजयानंतर त्याने बौद्ध धम्माचा स्वीकार करून विजयादशमी साजरी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे देखील लक्षात घेवूनच १४ ऑक्टोबर रोजी येणारी विजयादशमी चा मेळ साधला. यासाठी त्यांनी धर्मांतराच्या घोषणेनंतर तब्बल २१ वर्षे  अभ्यास केला. प्रत्येक वर्षीच्या १४ ऑक्टोबर रोजी  धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापन दिन येतो, मात्र  प्रत्येक वर्षी दसरा व विजयादशमी येत नाही, १४ ऑक्टोबर हि तारीख असून  दसरा व विजयादशमी या तिथी आहेत, आपणास या तिथीच्या मागे पाळण्याची गरजच काय ? 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बरीच प्रतीक्षा केल्यानंतर हा दिवस निवडला, त्या दिवशी रविवार होता व विजयादशमी देखील होती, आणि अशोक विजयादशमीचे  महत्व कमी करण्यासाठी त्यामागे १५ व्या शतकात जोडलेला हिंदू धर्माचा सण दसरा पण होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केल्यापासून हिंदू ब्राह्मणांची झोप उडाली होती, बाबासाहेबांना तश्या प्रकारची धमकीचे पत्रे येत असावीत व याच कारणास्तव ते फारच सावध फिरी ठेवून पूल टाकत होते. दि.२३ सप्टेंबर १९५६ रोजी त्यांनी दिल्लीतून अगदी छोटी बातमी प्रसारित केली होती, "दसऱ्याच्या दिवशी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे मी बौद्ध दीक्षा घेणार आहे."
     
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरला धम्म दीक्षेसाठी केव्हा येणार आहेत याची कल्पना कोणालाही न्हवती, या संदर्भात बाबासाहेबांनी अत्यंत गुप्तता पाळली, शे.का.फे.च्या नेत्यातील राजकारणाचा उताविळपणा आणि बुद्ध धम्माविषयी अज्ञानता  लक्षात घेवूनच बाबासाहेबांनी सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी नागपूरचे वामनराव गोडबोले यांना सोपवली. दि ११ ऑक्टोबर १९५६ रोजी सकाळी १० वाजता बाबासाहेब विमानाने नागपूरला आले, गोडबोले, सदानंद फुलझेले, आकांत माटे, रेवाराम कवाडे बाबासाहेबांना घ्यायला गेले होते. 

दि.१२ ऑक्टोबर १९५६ ला बाबासाहेबांनी घोषित केले कि, बौद्धधर्माची दीक्षा घेणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांनी पांढरी वस्त्रेच परिधान करावी, २१ वर्ष वरील तरुणांना व इतरांना १ रुपया रीतसर पावती घेवून नावाची नोंद करावी लागेल.  दि.१२ ऑक्टोबर १९५६ सायंकाळी ६ वाजता हॉटेल शाम मध्ये कार्यकर्ते जमा झाले, चर्चा सुरु झाली, "एका कार्यकर्त्याने विचारले,"बाबासाहेब आम्ही आपणाबरोबर जर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तर मग निवडणुकीसाठी रिझर्व सीट वर आम्हाला कसे उभे राहता येईल ?
बाबासाहेबांनी त्या कार्यकर्त्याकडे कटाक्ष टाकला, आणि काहीश्या संतापाच्या आविर्भावाने ते म्हणाले, 
"ज्यांना रिझर्वेशन बाबत काळजी वाटते त्यांनी खुशाल जावे, ज्यांना माझ्याबरोबर बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे, त्यांनी माझेबरोबर राहावे...! (मी पाहिलेले बोधिसत्व - बिक्षु सुमेध - पृष्ठ ८४ )          

दि. १३ ऑक्टोबरच्या पहाटे च्या सुमारास काही राजकीय गुंडांनी धम्म दीक्षा विधीचा मंडप जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु समता सैनिक दलाचे सेनानी तुळशीराम वानखेडे  व  समता सैनिक दलाच्या सैनिकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. दि. १३ ऑक्टोबर ला पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना बाबासाहेब म्हणले,
"शतकानुशतके सवर्ण हिंदुनी आणि विशेषता ब्राह्मणांनी आमच्याशी गैरव्यवहार म्हणून ज्यांच्या नाकाला घाण असेल, तो प्रत्येकजण बौद्ध होईल, बौद्ध धर्म हा विश्व धर्म आहे, माझे क्षेत्र मला केवळ अस्पृश्यापुरतेच मर्यादित करावयाचे नाही.संपूर्ण भारतात धम्मचक्र घडून आणायचे आहे."     
    
१४ ऑक्टोबर १९९६ रोजी नागपूरच्या लोकमत वृत्तपत्राने "१४ ऑक्टोबरचे स्मरण" या मथळ्याखाली आपला अग्रलेख लिहला होता. त्यात त्यांनी लिहले, " ४० वर्षापुर्वी  आजच्या दिवशी नागपूर शहरात एक अपूर्व क्रांती घडली, त्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लक्षावधी अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग केला. हिंदू धर्माने त्यांच्यावर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन त्यांनी अश्याप्रकारे केले. योगायोगाने तो दिवस विजयादशमीचा होता. हिंदुधर्मीय तो दिवस विजयोत्सव म्हणून पाळतात. पण त्या दिवसापासून १४ ऑक्टोबर हि तारीख मागे पडून विजयादशमीचा दिवस  हाच धम्म चक्र प्रवर्तन दिन म्हणून पाळण्याची प्रथा सुरु झाली. हिंदू धर्माच्या प्रभावाखालून हा समाज मानसिक दृष्टया अजूनही निघू शकलेला नाही हेच यावरून सिद्ध होते." 

नागपूर येथे १३ ऑक्टोबर १९५६ रोजी सायंकाळी बाबासाहेबांनी , "मला संपूर्ण भारतात धम्मचक्र प्रवर्तन घडवून  आणायचे आहे." अशी घोषणा करून १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ऐतिहासिक असे धम्म चक्र प्रवर्तन घडवून आणले, ह्याच दिवशी सम्राट अशोकाची विजयादशमी होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,बुद्धाच्या महापारीनिर्वानाला २५०० वर्षे पूर्ण झाली होती, आणि म्हणूनच दीक्षा देतेवेळी बाबासाहेब बोलले, "आज माझा नवा जन्म होत आहे, असे मी मानतो."     
  
"जगात अनेक क्रांतिकारी महापुरुष झालेत परंतु हिमालया पेक्षाही उत्तुंग व्यक्तिमत्व, शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद आणि फक्त आपल्या बुद्धी कौशल्यावर सर्व जगाला आपल्या कार्तत्वाकडे आकर्षित करण्याची सत्याची कसोटी, हि तथागत बुद्धानंतर केवळ  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच स्वकर्तुत्वाने मिळविली......!"   

माझी तमाम बौद्ध बांधव, नेतेमंडळी, कार्यकर्ते, सामाजिक, सांस्कृतिक मंडळांना विनंती आहे कि,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर आपल्या ५ लक्ष अनुयायांना अमानावतावादी हिंदू धर्माचे अविचार झुगारून  समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय यावर आधारित बौद्ध धम्माची दीक्षा दिली. १४ ऑक्टोबर १९५६ हा दिवस इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरून ठेवला आहे मग धम्मचक्र प्रवर्तन दिन हा विजयादशमी किंवा दसरा या तिथीला साजरा न करता १४ ऑक्टोबर या ऐतिहासिक दिवशीच साजरा करावा...!  

लेखक अँड. राज जाधव...!!! 

संदर्भ - 
१. विजया दशमी कि दसरा, बबन लाव्हात्रे,
२. मी पाहिलेले बोधिसत्व - बिक्षु सुमेध, 
३.बौद्ध दीक्षा विशेषांक, प्रबुद्ध भारत - बी.सी.कांबळे )
४. लोकमत वृत्तपत्र,
५.दै.सम्राट मध्ये वाचलेले विविध मान्यवरांचे लेख    

         
      १४ ऑक्टोबर - धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेछ्या .........! 

3 comments:

  1. barobar ahe tuz mhanan pan ajun hi aplya lokanchya magutivarun hindu dharamacha pagada gela nahi ahe.....ajun hi te lok hindunchay ritiravajan pramanech vagatat....tyanche sarav san sajare karatat...phakat te lok navala baudhha ahet.....ani apale nete pan tasach vagatat....matansathi lachar hotat....khar sangayach tar ajuanhi baraych lokana dr. babasaheb ambedakar kalale nahi ahet...phakat kalal ahe te aarakshan...baki kahi nahi...

    ReplyDelete
  2. १४ लाच असावा धम्मचक्र प्रवर्तन दिन....!

    डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी रविवार , १४ ऑक्टोबर रोजी धम्मदीक्षा घेतली होती . त्यांनी हिंदूधर्मियांच्या पंचागातून दसरा हा मुहूर्त पाहिला नव्हता . त्यामुळे दसऱ्याला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याचे कोणतेही प्रयोजन नसून १४ ऑक्टोबरलाच हा सोहळा साजरा केला जावा , असे प्रतिपादन आंबेडकरवादी साहित्यिक व विचारवंत राजा ढाले यांनी केले .

    अहिंसेला आज जगभरात अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे . परंतु , डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी एकीकडे अणुबॉम्ब निर्माण होत असताना शांतीचा संदेश देणारा धम्म स्वीकारला होता , असे ते म्हणाले . सरकारवर ताशेरे ओढताना ते म्हणाले , सरकार सर्वधर्मसमभावाचे पालन करत असताना दुसरीकडे मात्र , आंबेडकरवाद्यांना अस्पृश्यतेची वागणूक देते . सरकारने ही अस्पृश्यता दूर करून १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुटी जाहीर करावी .

    फुले आंबेडकर विचारधारातर्फे शनिवारी विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सावित्रीबाई फुले सभागृहात धम्मक्रांती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले . त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते . समाज विज्ञान संस्थेच्या डॉ . प्रा . विशाखा कांबळे , निमंत्रक बबन बन्सोडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती . नंदकुमार कांबळे , स्नेहदीप पाटील , साराभाई वेळुंजकर , जयंत भालेराव हे प्रमुख वक्ते होते .

    बाबासाहेबांनी जो धम्म सांगितला , त्यांनी सामाजिक क्रांती सोडून राजकीय क्रांतीकडे वाटचाल आरंभली आहे . घटनेचा मुख्य आधार बुद्ध विचार आहे , असे स्नेहदीप पाटील म्हणाले . बुद्ध धर्मामुळे भारत ओळखला जातो . बुद्ध् ‍ व आंबेडकरांना समजून घेतले पाहिजे , असे नंदकुमार कांबळे म्हणाले . साराभाई वेळुंजकर यांनी १४ ऑक्टोबरलाच का धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करावा , याबद्दल विस्तृत विवेचन केले....! (Oct 14, 2012, म . टा . प्रतिनिधी , नागपूर)

    ReplyDelete
  3. १४ ऑक्टोबरचे लॉजिक आपल्या समजायला खूप उशीर झाला आहे, असे वाटते आपल्या सच्चा आंबेडकर अनुयायांनी जर ही खबरदारी घेतली असती तर आपल्याला एक हक्काचा सण मिळाला असता दसरा या हिंदूच्या सणांमुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन झाकोळला जातोय , खरा गोंधळ तर तेंव्हा होतो लंकाधीश रावण ह्यांना आदर्श म्हणून मानणारे आपण त्यांचा विवेक,समता, सितेचे शील विषयक भूमिका आणि संशयी राम आणि रावणाचे दहन ,राम नायक नसून खलनायक वाटायला लागतो प्रचंड वैचरीक कोंडी होते wh question निर्माण होतात आणि तिथे बुद्धिवादी विचरांचा जन्म होतो १४ ऑक्टोबरलाच का धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करून कदाचित हे झाले नसते आज नागपुरचे रूप वेगळे आहे कुठे शस्त्र पूजन आणि दीक्षाभूमी शांत धम्म एक युद्ध तर एकीकडे बुद्ध

    ReplyDelete