My Followers

Saturday, 20 January 2018

सोनई दलित हत्याकांड !

सोनई दलित हत्याकांड !

"माझ्या पोराचे तुकडे या डोळ्यांनी पहाव लागल,
मला म्हातारीला आता हे दुख सहन होत नाय.
मराठ्याच्या पोरीसंग प्रेम करून माझ्या पोरान गुन्हा केल्ता का?
ते दोघ बी लगीन करणार होते, पर त्या लोकांनी तेला मारून टाकल ,
ती माणस नायीत हैवान हायीत"

- कलाबाई घारू ( मृत सचिन घारू याची आई)

ही कलाबाई यांची वेदनामय आणि संतप्त प्रतिक्रिया, केवळ प्रतिक्रिया नाही. तर तो थेट सवाल आहे, भारतीय संस्कृतीच्या नावाखाली पोसलेल्या सरंजाम जातीय विकृतींना, हिंसक धर्मवादाचे विष पेरलेल्या ब्राह्मणी विचारांना, लोकशाहीचा डांगोरा पिटणाऱ्या बुद्धिमंतांना, 'फार वाईट झाले' म्हणत जातीय अहंकारात आंधळ्या होणार्या समाजाला. त्यांचा थेट सवाल आहे, माणसाचे माणूसपण नाकारणाऱ्या या सकल ब्राह्मणी व्यवस्थेला! कलाबाईच्या सवालाने इथल्या पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या समाजाचा खरा भयाण, अमानुष चेहरा समोर आला आहे, असंवेदनशीलतेच्या धुक्यात हरवलेल्या अहमदनगर मधील सोनई दलित हत्याकांडाचा हा सत्यशोधन रिपोर्ट.

जातीयवादाचे बळी-
नवीन वर्षाची सुरवात होत असताना अहमदनगर मधील सोनई येथे संदीप थनवर, सचिन घारू आणि राहुल कंधारे या तीन मेहतर ( वाल्मिकी) जातीच्या तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडात आरोपी असलेले रमेश,पोपट, प्रकाश, गणेश ( सर्व दरंदले ), अशोक नवगिरे, दरंदले यांचा भाचा संदीप कुऱ्हे आणि अशोक फलके यांना आजपर्यंत अटक करण्यात आली आहे. हत्येमागील कारण अगदी स्पष्ट आहे, सचिन घारू व दरंदले यांची मुलगी यांचे एकमेकांवर प्रेम होते, परंतु सचिन हा दलित ( मेहतर जातीचा ) आणि दरंदले यांची मुलगी ही मराठा जातीची( कथित उच्च) असल्याने दरंदले यांना हे प्रेमसंबंध मान्य नव्हते, त्यांच्या लग्नाच्या निर्णयाने दरंदले यांच्या खोट्या प्रतिष्ठेला यामुळे धक्का बसणार होता. (विशिष्ट व्यक्तीवर जाहीर आरोप करणारं एक वाक्य काढून टाकलेलं आहे. - संपादक)

संदीप, सचिन आणि राहुल-

संदीप, सचिन आणि राहुल हे तीनही युवक नेवासा फाटा येथे असलेल्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान च्या शाळा आणि महाविद्यालयात रोजी-रोटीसाठी सफाईचे काम करीत होते, त्यांच्या उत्पन्नाचे तेवढेच एकमेव साधन होते. संदीप हा अनेक वर्षापासून या संस्थेत सफाईचे काम करीत होता व त्याचा आंतरजातीय विवाह झाल्यानंतर आपल्या पत्नी व एक वर्षाच्या मुलासह कर्मचारी निवासात राहत होता. संदीपने दीड वर्षापूर्वीच सचिनला देखील याच संस्थेत कामाला लावले व त्याला देखील कर्मचारी निवासात घर मिळाले होते, त्याची आई व तो तिथे राहत होते. राहुल मात्र हत्येच्या ५ दिवसापूर्वीच नवीन कर्मचारी म्हणून संस्थेत आला होता व त्याला होस्टेलवर एक छोटी रूम मिळाली होती. संदीप सर्वांचा प्रमुख होता. याच महाविद्यालयात दरंदले यांची मुलगी शिकत होती व तेथेच सचिन आणि तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले, ते दोघेही एकमेकांना भेटत असल्याची त्याची माहिती दरंदले यांना मिळाली. तेव्हा दरंदले यांनी सचिनला तिचा विचार सोडून दे नाहीतर जीवानिशी जाशील अशी धमकी दिली होती . कलाबाई घारू सांगतात कि सचिनला धमकी दिल्याचे सचिननेच त्यांना सांगितले होते तेव्हा सचिन घाबरलेला होता, तरीही त्याने लग्न करण्याचे ठरवले होते. या धमक्यानंतरही ते दोघे भेटत होते हे लक्षात आल्यावर या प्रकरणावर चर्चा करायला दरंदले यांनी अशोक नवगिरे यांच्या कडून संदीपला सचिनसह येण्याचा निरोप पाठवला. दरंदले, संदीप आणि अशोक हे तिघेही मित्र होते, संदीप, सचिन आणि राहुल अशोकने दिलेल्या निरोपानुसार दरंदले यांना भेटायला गेले.

भारतीय सेनेत जवान असलेला संदीपचा भाऊ पंकज थनवर सांगतो कि " १ जानेवारी ला दुपारी ४ पर्यंत दोघांचे फोन लागत नव्हते, वहिनी पूर्ण घाबरलेली होती, त्याच वेळेस पोलिसांकडून तिघांची हत्या झाल्याची बातमी आम्हाला कळाली,याचा खूप मोठा धक्का आम्हाला बसला कारण संदीपचा स्वभाव खूप शांत होता, त्याचे कुणाशी भांडण पण नव्हते"

आरोपी रमेश आणि प्रकाश यांनी स्वताहून पोलीस स्टेशनला जाऊन सेफ्टी टंक साफ करताना संदीपचा बुडून मृत्यू झाल्याचा रिपोर्ट दिला . पोलिस तपासासाठी आले तेव्हा त्यात सेफ्टी टंक मधून त्यांनी ६ फुट उंची असलेल्या संदीपचा मृतदेह बाहेर काढला, २च फुट भरलेल्या सेफ्टी टंक मध्ये ६ फुट माणूस बुडून कसा मरेल? याचा संशय आल्याने पोलिसांनी रमेश दरंदले यांची चौकशी केली तेव्हा दरंदले यांनी संदीप बरोबर आलेल्या दोघांनी ( सचिन आणि राहुलने) त्याला मारून त्यात टाकून पळून गेल्याचे खोटे सांगितले पण पोलिसांनी आजूबाजूचा परिसर तपासला तेव्हा कोरड्या विहिरीचा त्यांना संशय आला त्यात पोलिसांना डोक, हात आणि पाय नसलेले मृत शरीर सापडले, बाजूलाच त्यांचे इतर अवयव देखील पुरले होते, प्रथम सचिन आणि राहुल यांचा मृतदेह ओळखण्यात अडचणी आल्या, कोणता मृतदेह कोणाचा आहे हे कळेना परंतु सचिनच्या छातीवर दरंदले यांच्या मुलीचे नाव गोंदलेले होते त्यामुळे सचिन आणि राहुल यांच्या मृतदेह ओळखता आले. कडबा कापण्याच्या विळ्याने दोघांचे तुकडे करण्यात आल्याचे लक्षात आले, त्या वेळेस रमेश, पोपट आणि प्रकाश (सर्व दरंदले) यांना अटक करण्यात आली. भा.द.वि.च्या ३०२ च्या कलमाखाली खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला पण त्याच वेळेस दलित अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत कोणताही गुन्हा नोंद पोलिसांनी केला नाही. हा गुन्हा ५ दिवसांनी नोंदवण्यात आला.

पोलिसांच्या तपासावर संशय -

१) पोलिसांनी FIR मध्ये दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा हत्या झाल्यावर ५ दिवसांनी दाखल केला हा उशीर का झाला याचे उत्तर पोलिसांकडे नाही

२) हत्येचा गुन्हा नोंदवत असताना हत्येचा हेतू आणि कारणांचा उल्लेख मात्र पोलिसांनी त्यांच्या FIR मध्ये केलेला नाही.

३) हत्या करण्यासाठी आरोपींनी त्या तीन दलित तरुणांना बोलवून घेतले म्हणजे हा हत्येचा कट पूर्व नियोजित होता याचा ही उल्लेख आणि त्या अंतर्गत कलम पोलिसांनी लावले नाही.

४) सचिनच्या छातीवर दरंदले यांच्या मुलीचे नाव गोंदलेले होते पण मृतदेहाच्या पंचनाम्यात पोलिसांनी त्याचा उल्लेख करायला टाळाटाळ केली आहे.
५) दि.१ रोजी जेव्हा या प्रकरणाला वाचा फोडली गेली तेव्हा जिल्हा पोलिस प्रमुख रावसाहेब शिंदे हे मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना संरक्षण दिले गेले आहे असा दावा करीत होते, मात्र गावातील राजकीय दबाव व भीतीमुळे संदीपचे कुटुंबीय हे त्यांच्या नातेवाईकांकडे मालेगाव, नाशिक व सचिन ची आई त्यांच्या मुलीकडे एरंडोल, जळगाव येथे सुरक्षेच्या कारणाने निघून गेले होते.

६) मृत कुटुंबियांचे जवाब पोलिसांनी नोंदवून घेतले नाही.तशी गरजही त्यांना वाटली नाही.

७) जिल्हा पोलिस प्रमुखांनी १ महिना होऊ पर्यंत या हत्याकांडाची माहिती गृहमंत्र्यांना दिली नव्हती, आणि पालकमंत्र्यांनी देखील मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची माहिती पुरवली नव्हती.

८) जिल्हा पोलिस प्रमुख,जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री या सर्व दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महिनाभरानंतर देखील घटना स्थळाला आणि मृत कुटुंबियांच्या परिवाराची भेट घेतली नव्हती.

९) महिनाभर या प्रकरणातील तपासात कोणतीही प्रगती झाली नाही. दि.७ फेब्रुवारी रोजी गणेश दरंदले आणि अशोक फलके यांना अटक झाली मात्र या हत्याकांडात अनेक लोक असण्याची शक्यता आहे.
या सर्व तृटी नाहीत तर हे जाणून-बुजून झाले आहेत. स्थानिक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या राजकीय नेत्यांचे या प्रकरणात दबाव आहे. त्यामुळे मानव हक्क चळवळीच्या कार्यकर्त्या मनीषा टोकले यांनी कलम ४ नुसार कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलिसांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे.

मीडियाची परिणामकारक व प्रभावी भूमिका -

पंकज थनवर (in military suit)

हत्याकांड झाल्यावर अहमदनगर जिल्ह्यात या प्रकरणाबाबत चर्चा झाली होती मात्र काही दिवसांनी त्याबाबत कोणत्याही बातम्या बाहेर आल्या नाही. पोलिस तपास चालू आहे असे सांगत होते जवळ जवळ दुर्लक्ष करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न राजकीय नेते, जातीय संघटनांचे नेते आणि पोलीस मिळून करत होते. परंतु मानवी हक्क चळवळीच्या कार्यकर्त्या मनीषा टोकले, प्रियदर्शनी तेलंग, सिद्धार्थ शिंदे, राजस्थान काळे, संदीप म्हस्के यांनी हे प्रकरण लावून धरले व आय.बी.एन.लोकमत या लोकप्रिय मराठी वृत्त वाहिनीतून त्यात घमासान चर्चा झाली.तसेच अनेक वृत्त वाहिन्यांनी या बातमीला प्रसिद्धी दिली त्यामुळे ते प्रकरण महाराष्ट्राला आणि देशाला कळू शकले. मिडीयाच्या या परिणामकारक आणि प्रभावी भूमिकेमुळे गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घातले तसेच निवृत्त न्यायाधीश व राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी.एल.थूल यांनी देखील येथे भेट देऊन हत्येच्या कारणाला केंद्र करून तपास करण्याचे आदेश दिले.

सी.आय.डी. तपासाचा सावळागोंधळ-
दि.५ फेब्रुवारी रोजी गृहमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास हा सी.आय.डी कडे सोपवला असल्याची घोषणा केली तर दि.१० रोजी पालकमंत्री बबनराव पाचपुते आणि मंत्री लक्ष्मनराव ढोबळे यांनी सी.आय.डी तपासावर मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल असे सांगितले त्यामुळे सरकार या प्रकरणात गंभीर तर नाहीच पण दिशाभूल करीत असल्याचे समोर आले आहे.

मराठा जात-संघटनांची प्रतिक्रिया -
हत्याकांडाची महिनाभरानंतर सगळीकडे चर्चा सुरु झाल्यावर आणि नागरिकांचा दबाव वाढायला लागल्यावर मराठा संघटनेचे नेते संभाजी दहातोंडे यांनी "मराठ्यांना बदनाम करू नका" अश्या प्रकारे उलटाच पाढा वाचला. इतर वेळी याच संघटना दलित अत्याचार विरोधी कायद्याला तीव्र विरोध करीत असतात. फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ कायम दलित-बहुजन यांना मित्र असल्याचे सांगत असतात पण या घटनेचा विरोध करण्यासाठी मात्र या संघटना रस्त्यावर का उतरल्या नाहीत? असा प्रश्न विचारला जात आहे. सोनई येथे गावात गेल्यावर काही मराठा जातीतील लोक दरंदले यांच्या मुलीवर ज्यांची हत्या झाली आहे ते दलित मुल बर्याच दिवसापासून लैंगिक अत्याचार करीत होते अश्या अफवा पसरवीत होते परंतु या हत्येच्या केवळ काही दिवस अगोदर राहुल कामावर नवीन कर्मचारी म्हणून रुजू झाला होता, तसेच दरंदले यांच्या मुलीने याबाबत कोणताही जबाब पोलिसांना दिला नाही, तसेच सचिन ने स्वताच्या छातीवर त्या मुलीचे नाव गोंदलेले होते आणि ते लग्न करणार होते, सचिनचे तिच्यावरील प्रेम आणि बाकीच्या घटना पाहता ही अफवा जाणीव पूर्वक पीडितांना सहानभूती मिळू नये आणि या अत्याचार विरोधी आंदोलनाचे नैतिक खच्चीकरण करता यावे यासाठी काही जातीयवाद्यांचे कारस्थान आहे.

"त्या"मुलीचे काय झाले?
दरंदले यांच्या मुलीला पोलिसांनी २ वेळा जबाब नोंदवायला बोलावले होते पण भीती आणि मानसिक दबावाखाली तीने कोणताही जबाब दिला नाही, संदीपचे कुटुंबीय जेव्हा घटना स्थळ पाहण्यासाठी गेले तेव्हा त्यांना पाहून ती बेशुद्ध पडली असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. जे लोक खोट्या जातीय प्रतिष्ठेसाठी तीन दलित युवकांचा खून करू शकतात ते आपल्याला ही मारून टाकू शकतात याची भीती असल्याने तीने काहीही बोलण्यास नकार दिला आहे. पण तीचे अश्रू बरेच काही सांगून जातात.

पंकज थनवर याच्या सरकारकडे मागण्या-

संदीपचा भाऊ पंकज याने सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत
१) राजकीय दबाव प्रचंड असल्याने या प्रकरणाचा तपास एक तर सी.आय.डी. कडे द्यावा किंवा संवेदनशील, निरपेक्ष आणि प्रामाणिक पोलिस उप-अधीक्षक या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमावेत.
२) या प्रकरणाचा खटला हा अहमदनगर जिल्ह्याबाहेर नाशिक किंवा जळगाव जिल्ह्यात चालवला जावा.
३) हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा.
४) या खटल्यात मृत व्यक्तींच्या बाजूने सरकारी वकील उज्ज्वल निकम नियुक्त व्हावेत.
५) कुटुंबियांना खटला पूर्ण होईपर्यंत जिल्ह्य बाहेरही संरक्षण द्यावे. पुनर्वसनाची मागणी
या दलित हत्याकांडात जे तरुण मारले गेले ते तीघेही घरातील कर्ते आणि कमावते होते, संपूर्ण कुटुंब त्यांच्यावर अवलंबून होत. त्यांच्या हत्येने त्यांच्या कुटुंबियांचा आधार गेलाय, समाज कल्याण खात्याकडून दिली गेलेली मदत पुरेशी नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निधीतून प्रत्येक कुटुंबाला किमान १० लाखाची मदत करावी, संदीपची पत्नी ही शिकलेली आहे आणि तिच्यावर त्यांच्या एक वर्षाच्या मुलाची जवाबदारी ही आहे त्यामुळे सरकारने तिला नौकरी द्यायला हवी. सचिन घारू याला कुणीही भाऊ नाही त्यामुळे तिची आई आता मुलीकडे एरंडोल जळगाव येथे राहते आहे तिलाही सरकारने उत्पादनाची साधने द्यावीत किंवा त्याच गावात जमीन द्यावी जेणे करून त्या मुलीच्या आधाराने जगू शकतील. आरोपींना शिक्षा आणि पुनर्वसनाशिवाय कुटुंबियांना आणि जातीयवादाला बळी पडलेल्या तीनही तरुणांना न्याय मिळणार नाही.

Honour killing (?)

Honour killing या शब्दाला माझा आक्षेप आहे, त्यामुळे या प्रकरणाला मी Honour killing म्हणणार नाही किंवा तसा शब्द वापरणार नाही. कारण प्रतिष्ठेसाठी बळी (?) म्हणजे कोणाची प्रतिष्ठा? आणि कशाच्या आधारावर? तर त्याचे उत्तर याच संकल्पना मधून सुचित होते कि उच्च जातीय लोकांची प्रतिष्ठा आणि ती देखील जातीच्या आधारावर. मग जे लोक दलित-बहुजन स्त्री-पुरुष आहेत आणि जात-उतरंडीत खालच्या स्तरावर आहे त्यांना माणूस म्हणून प्रतिष्ठा- आत्मसन्मान- अस्मिता नाही काय? हा शब्द जातीय उतरंडीमुळे होणार्या अत्याचारावर बोळा फिरवतो आणि स्त्रीला तिचा जोडीदार निवडीच्या स्वातंत्र्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे याला जातीयवादातून झालेली हत्याच म्हणावे लागेल.मनुस्मृती मधील ३/१२ चा श्लोक हा शूद्रांना उच्च वर्णातील स्त्रीशी विवाह करण्याला बंदी करतो हे लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे या शब्दाच्या वापरातून जात-पित्रुसत्तेने निर्माण केलेले संरचनात्मक दुय्यमत्व आणि शोषणाकडे दुर्लक्ष होते आणि धर्म-राजकीय-सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक अश्या सर्व घटकांशी याचा संबंध नाही असे सुचित होते.परत्नू अश्या जातीय अत्याचाराची बीजे ही याच ब्राह्मणी व्यवस्थेत आहे हे लक्षात घ्यावे लागेल.

आपण काय करू शकतो?

१) आपण या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना याबाबत कायम विचारणा करू शकतो, न्याय मिळावा यासाठी आंदोलने, मोर्चे यातून नैतिक दबाव सरकारवर आणावा लागेल.
२) सरकारकडे कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी आग्रह धरावा लागेल.शक्य असल्यास आपण त्यांना मदत करू शकता.
३) सर्वात महत्वाचे अश्या प्रकारच्या कोणत्याही अत्याचाराबाबत कायम आवाज उठवावा लागेल, आंतरजातीय-धर्मीय विवाह करणाऱ्याना पाठींबा, संरक्षण आणि प्रतिष्ठा द्यायला हवी. संघटीतपणे अश्या जातीयवादाच्या हिंसाचाराविरोधात आणि ब्राह्मणी व्यवस्थेविरोधात एकजूट होऊन लढा उभारावा लागेल.
पंकजशी या विषयावर माहिती घेताना तो भावनाशील झाला आणि शेवटी म्हणाला "देशाचं संरक्षण करताना आम्ही जात-धर्म विसरून आपल कर्तव्य पार पाडीत असतो. पण जर याच जाती-धर्मांमुळे आमच्या कुटुंबियांच्या हत्या होत असतील तर मग आम्ही देशाचे रक्षण का करायचे? आम्ही शत्रूच्या सैनिकाला पकडल्यावर देखील त्याचे देखील हात,पाय आणि डोक तोडून टाकण्याइतकी अमानुष शिक्षा आम्ही त्याला देत नाही, माणूस म्हणून जर समाज जगूच देत नसेल तर काय करायचं? त्यांची ताकद खूप आहे, आम्हाला न्याय मिळाल का? पंकजच्या या प्रश्नच उत्तर माझ्याकडे नाही, तुम्ही देऊ शकता का त्याच्या प्रश्नाला उत्तर.
( हा रिपोर्ट लिहिताना मानवाधिकार चळवळीच्या मनीषा टोकले यांच्याशी झालेल्या चर्चेची मदत झाली)
-------------------------------------


लेखं- कुणाल शिरसाठे.

(अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा कार्यकर्ता.)

No comments:

Post a Comment