My Followers

Friday 11 January 2013

“गड आला पण सिह गेला”......!

“गड आला पण सिंह गेला”......!

गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य नवमी) रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. समोर असलेल्या ध्येयाकडेच सर्व मावळ्यांची नजर होती..
कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा.
भयाण रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता चढणे दिवसासुध्दा अशक्य होते. तानाजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले.
एकच ध्यास होता तानाजींच्या मनात “कोंढाणा” आणि त्यासाठी ते देहभान विसरून लढत होते, झटक्यासरशी शत्रूंची तुकडी कापून काढत होते.. शत्रूशी बेभान होऊन लढत होते आणि अशातच तानाजींच्या हातातील दहाल निखळून खाली पडली, अशा बिकट परिस्थितीतही त्यांनी  डाव्या हातावर तलवारीचे वार घेत लढू लागले.. हातावर वार बसत होते पण याची भ्रांत स्वराज्याच्या आणि शिवरायांच्या मावळ्याला थोडीच होणार.. हात रक्तबंबाळ झाला होता तरीही वाकत नव्हता..  शेवटी समोर उदयभान येऊन उभा टाकला.. मग काय हर हर महादेव अशी सिंहगर्जना करत अक्षरशः वीर तानाजी उदयभानावर तुटून पडले..
दोघामध्ये तुंबळ युद्ध सुरु झाले, आधीच घायाळ झालेल्या वाघावर असंख्य वार होऊ लागले.. अंगावर होत असलेल्या बचावासाठी होते काय तर रक्ताने माखलेला हात.. तरीही तानाजी मागे हटले नाहीतच…. गर्जना करत होते, वार घालत होते.. मनामध्ये शिवराय, एकाच ध्येय एकाच ध्यास “कोंढाणा”
खूप काम होते अजून करायचे, उदयभानाला आसमंत दाखवायचा…. कोंढाणा काबीज करायचा…. शिवरायांना गड जिंकल्याचा निरोप धाडायचं…. मोहीम फत्ते करायची…. जबाबदारी संपवून घरी जायचे…. घरी पाव्हन-रावळ थांबलेली…. रायबाचे लगीन…. रायबाला शिवरायांच्या सेवेत स्वराज्याच्या सेवेत रुजू करायचं…. खूप खूप काम होती….  पण कोंढाण्याला पाहिजे होते तानाजी…. 
उदयभानावर शेवटचा वार करून शेवटी उदयभानाला निपचित पाडूनच या वाघाने शिवरायांच्या मावळ्याने स्वत:चे प्राण सोडले.
गड अजून यायचा बाकी होता.. मात्र त्यांच्यामागुन ‘सूर्याजी मालुसरे’ आणि ‘शेलारमामा’ यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला.
गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना आजच्याच दिवशी म्हणजेच ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.
तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसऱ्या दिवशी राजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी समजल्यावर महाराजांना खूप दुःख झाले.
महाराज म्हणाले, “गड आला पण सिंह  गेला”.
अत्यंत दुःखी अश्या राजांनी आपल्या तानाजीचे शव त्यांच्या ‘उमरठ’ (पोलादपुरजवळ) या गावी पाठवले. ज्यामार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता ‘मढेघाट’ या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा ‘विरगळ’ स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारक सुद्धा उभे केले गेले आहे....!

नकळत छातीकडे हात जात आपण म्हणतो, "मुजरा सुभेदार".....!  

संदर्भ - शिवसंकल्प...दिनेश सूर्यवंशी, आणि मराठा इतिहासाची दैनिदिनी.....!   

संपादन अँड. राज जाधव...!!! 

No comments:

Post a Comment