पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड...!!!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिष्य व त्यांच्या चळवळीचे सरसेनापती दादासाहेब गायकवाड यांचे पूर्ण नाव भाऊराव कृष्णराव गायकवाड. दादासाहेब गायकवाड हे बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू मित्र आणि जवळ्चे सह्कारी होते. त्यांनी बाबा साहेबांबरोबर अनेक कामांत सह्भाग घेतला होता,परंतु विशेष कामगिरी म्हणजे मार्च २ इ.स. १९३० चा काळाराम मंदिर सत्याग्रह. हा लढा अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या पुढाकाराने चालू करण्यात आला होता. काळाराम मंदिर हे नाशिक मधील प्रसिद्ध रामाचे मंदिर आहे. दलित समाजातील तळमळीचे कार्येकर्ते.स्वातंत्र्य लढयात आणि दलितांच्या अनेक आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग. रिपब्लिकन पक्षाचे खुप वर्षे काम केले. त्या पक्षाचे माजी अध्यक्ष. अनेक वर्षे आमदार आणि खासदार म्हणून अनुभव. प्रबुध्द भारत या नियतकालिकाच्या संपादनात सहभाग. डॉ. आंबेडकर बरोबरीने बौध्द धर्माचा स्वीकार.
डॉ. आंबेडकरांसारखा विद्वान राजकारणपटू नेता दलितांना लाभला होता, पण नेता कितीही मोठा असला तरी त्याचे कार्यकर्ते व अनुयायीच त्याच्या कार्याचा व विचारांचा प्रसार आणि प्रचार करु शकतात. त्या काळी दलितांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यंत नगण्य होते. हा सर्व समाजच ज्ञान, शिक्षण, पैसा यापासूनच केवळ वंचित होता, अस्पृश्यता होतीच. या अशा समाजातूनच जी काही मोजकी तरुण मंडळी बाबासाहेबांना मिळाली त्यात दादासाहेब गायकवाड अग्रगण्य होते.
दादासाहेबांचे शिक्षण जेमतेम मॅटिर्कपर्यंत, वडील खेडेगावातील शेतकरी, पण योगायोगाने कोर्टाच्या कामासाठी नाशिकला आलेल्या बाबासाहेब आंबेडकरांची दादासाहेबांशा, ते ज्या शाहू छत्रपती विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक होते तेथे गाठ पडली आणि त्यातून एक निष्ठावंत, कळकळीचा, नेक आणि कष्टाळू कार्यकर्ता व पुढे नेता निर्माण झाला.
बाबासाहेबांचा त्यांच्यावर इतका विश्वास व जवळीक होती की, भाऊ रावांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट ते करीत नव्हते. महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, भारतीय मजूर पक्ष व पुढे दलित फेडरेशनची स्थापना, मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आणि ऐरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना, पाकिस्तानातून भारतात येणार्या दलित निर्वासितांना इतर सवर्ण हिंदूंकडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी खास अधिकार्यांची नेमणूक आणि आपल्या अंतकाळाच्या सुमाराला १४ ऑकटोबर १९५६ ला केलेले बैद्ध धम्म प्रवर्तन या सर्व कामात दादासाहेब गायकवाडांवर त्यांची भिस्त होती. ''माझे चरित्र कोणी लिहिले तर त्याचा निम्मा भाग भाऊ राव गायकवाडांवर असेल. माझे कार्य खेडोपाडी, तळागाळात नेण्याचे श्रेय हेही त्यांचेच आहे'' असे गैरवोदगार बाबासाहेबांनी त्यांच्याबद्दल काढले आहेत. ४० वर्षे बाबासाहेबांच्या सहवासात राहिल्यामुळे दादासाहेबांना आपल्या कार्याची दिशा निश्चित करता आली.
त्यांची खरी कसोटी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरची. बाबासाहेबांचे निधन अचानक व अनपेक्षितपणे झाले. त्यामुळे समाज आणि नेतेही संभर्मित झाले. या वेळी वडील भावाप्रमाणे दादासाहेबांनी सर्वांना सावरले व आपल्या नेत्याने दर्शविलेल्या दिशेने वाटचाल सुरु केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभाग होता. अनेक प्रांतांच्या विधानसभाव केंद्रात आंबेडकरी चळवळीतील नेते आमदार- खासदार झाले. स्वत: दादासाहेब खासदार झाल्यानंतर त्यांनी लोकसभा दलित आणि बैद्धांच्या प्रश्नांवर जागविली. भूमिहीनांच्या देशव्यापी जेलभरो आंदोलनात तीन लाख साठ हजार माणसे तुरुंगात गेली व तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी तत्वत: भूमिहीनांच्या मागण्या मान्य केल्या. स्वत: दादासाहेबांनी आपल्या नाशिक जिल्ह्यातील कर्मभूमीत शाळा, वसतिगृह व त्यातल्या त्यात मुलींसाठी स्त्री-शिक्षणाची सोय या गोष्टी केल्या.
जानेवारी १९७६ च्या एका स्मरणिकेत दादासाहेबांना उद्देशून कुसुमाग्रजांनी एक कविता लिहिली-
'हे पांथा, अंध तिमिर उजळण्यास...
जाळित निज जीवन तू....
हात दुर्बला दिलास....
दलितांच्या मुक्तीचा आशापथ उजळला...!!!
No comments:
Post a Comment