My Followers

Wednesday, 4 July 2012

युद्ध की बुद्ध....!!!

युद्ध की बुद्ध....!!!

               
‘बुद्ध की धरती, युद्ध न चाहे, चाहे अमन परस्ती’ हे गीत गुणगुणत असताना नकळत मनात विचार येवून गेला कि खरच आजच्या या परिस्थिती मध्ये बुद्ध हवा आहे. नाहीतर या वर्चस्वाच्या लढाई मध्ये पुन्हा पुन्हा युद्ध होतील. त्याला मग एकाच पर्याय आहे... बुद्ध...बुद्ध....बुद्ध....सारया विश्वाला बुद्ध हवा...!!! 
      युद्धामध्ये निर्णायक असतो व्यक्ती,शस्त्र कधीही निर्णायक असत नाही.पण व्यक्तीचं हे निर्णायक स्वरूप सामान्य माणसाच्या बुद्धी बाहेरचे ठरण्याची शक्यता बहुतांशी खरी ठरते व मग सामान्य माणूस युद्धाचा निर्णायक म्हणून शस्त्राला मान्यता देतो.शस्त्र एकदा हातात धारण केले कि,स्वतःचे नंपुसकत्वही लपविता येते व बलाढ्य शत्रूचा निप्पातही करता येतो! क्लुप्त्या-धूर्तता-दगाबाजी करून युद्धही जिंकता येते व युद्ध जिंकण्याचे निर्णायकत्व शस्त्राला देऊन शस्त्रांची महापुजाही बांधता येते.युद्ध जिंकणारे वीर आपले श्रेष्ठत्व गोंजारीत स्वतःच्या वीरत्वावर मोहित होत असताना,हेच युद्ध हजारो स्त्रियांना वैधव्याचे दान करून लाखोंच्या ओंजळीमध्ये पितृहीनतेचे महादान देत असते.पण एकदा हातात शस्त्र धारण केले,की त्याची निष्पत्ती हिंसेतच दृष्टिगोचर होणार,आणि एकदा या मार्गावर पाउल टाकले की,हिंसेचे उदात्तीकरण करावे लागणार हा साधा हिशोब आहे.

          आपल्या देशामध्ये,माणसाचा मनुष्यत्वाकडे जाणारा मार्ग बंद करून टाकताना माणसाचे जे अति सामान्यीकरण येथील पुराणांनी कथांनी-महाकाव्यांनी गौरवान्वित केलेले दिसते.हे अतिसामान्यीकरण करण्याची प्रक्रिया अर्थातच हिंसेचे उदात्तीकरण करण्यात झाली.भारतीय पुराण-कथा-काव्ये-महाकाव्ये यामध्ये वावरणारे नायक-खलनायक हे डावपेच,धूर्तपणा,कारस्थाने करून येनकेनप्रकारे युद्ध जिंकण्याकरिता धडपड करताना दिसतात,ते हिंसेच्या उदात्तीकरणाच्या प्रक्रियेमुळेच.महाभारताच्या युद्धाची कथा,कल्पित जरी असली, तरी ती हिंसेच्या उदात्तीकर्णाचीच निर्मिती आहे.या कथेत कोण श्रेष्ठ आहे या चर्चेला बाजूला सारले तरी ती सारी कथा सामान्य माणसांच्या युद्धनीतीचे एक उदाहरण ठरते.या कथेमध्ये गांडीव धनुष्य आहे,सुदर्शन चक्र आहे,भीमाची गदा आहे,.....अशी अनेक शस्त्रे जी लढणार्यांना गौण ठरवितात,म्हणजे क्षत्रिय हे जर शक्तिशाली ठरत असतील तर ते त्यांच्या हातातील शस्त्रांमुळे आणि जर या शस्त्रांचे सन्हारकत्व वाढवायचे असेल व संहारक शस्त्र मिळवायचे असेल तर क्षत्रियांनी तपश्चर्या करावी,मग कुठला ब्राम्हण वा ब्राम्हण देवता,अतिशक्तीशाली शस्त्र त्यांना देऊन,त्यांना चक्रवर्ती राजा होण्यास मदत करेल...अशा क्लुप्त्यांनीच व्यक्तीला सामान्य बनवून विशिष्ट वर्गाची .कुण्या एका कथेमध्ये शत्रूंना जिंकायचे असेल तर अमक्या-तमक्या ऋषीच्या अस्थीपासून शस्त्र बनविल्यासच ते शक्य होईल असा सल्ला,त्यानुसार कार्य व मग त्या ऋषीने देवाच्या रक्षणासाठी उदार अंतःकरणाने स्वतः पत्करलेला मृत्यू.मग त्या ब्राम्हण ऋषीच्या अस्थीपासून शस्त्र निर्मिती व शत्रूवर विजय.अशा तऱ्हेने ब्राम्हण व शस्त्र यांचा संबंध दाखवून हिंसेचे उदात्तीकरण करण्यात आले आहे.
         जेथे सामान्य माणसाचे युद्धशास्त्र हे शस्त्राशिवाय मूल्यहीन ठरते,तेथे श्रेष्ठ पुरुष आपले युद्ध जिंकतांना शस्त्राचा वापर करण्याचे टाळतात.युद्ध भूमीवर वावरताना ते एकटेच असतात; पण त्यांच्या ठायी असते हजारो शस्त्रधारी सैन्याचे बळ आणि म्हणूनच हातात शस्त्र धारण न करताही ते महायुद्ध जिंकतात.कलीन्गाचे युद्ध लढल्यानंतर विजयश्री खेचून आणणारा सम्राट अशोक स्वतःच्या विजयावर मोहित होऊ शकला नाही.सामान्य माणसांच्या अभिलाशांनी घडविलेली हिंसा त्याला आनंदित करू शकली नाही.तो उद्विग्न झाला, बुद्धाला शरण गेला आणि मग युद्धाचे निर्णायकत्व व्यक्ती केंद्रित केले,की हिंसा टाळूनही युद्ध जिंकता येते, हे उमगताच त्याने राजा म्हणून राज्य करतानाही शस्त्राचा वापर टाळला.राजमुकुट धारण केल्याच्या आठ वर्षानंतर अशोकाने कलीन्गाचे युद्ध केले.या युद्धानंतर तब्बल अडीच वर्षे त्याला क्रियाशील भिक्षु व्हायला लागली.पण या अडीच वर्षानंतर तो शस्त्राशिवायहि राज्य कारभार करणारा श्रेष्ठ राजा म्हणून गौरविला जाण्याप्रत श्रेष्ठ झाला.हे सर्व तथागताला शरण गेल्यानंतरच होऊ शकले.
         तथागत.....अखंड आयुष्य युद्धभूमीवर वावरणारा हा महायोद्धा! मनुष्यत्वाचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याकरिता,हिंसेविरुद्ध अहिंसेचे शस्त्र धारण करणारे तथागत,आपल्या आयुष्याच्या रणांगणावर जेतेच ठरतात ते त्यांच्याकडे असलेल्या पोलादी मनामुळे.हिंसक अन्गुलीमालच्या हिंसेविरोधात तथागत जेव्हा उभे ठाकतात तेव्हा,अंगुलीमाल शस्त्र धारण करूनही दुबळाच ठरतो.अहिंसेच्या शस्त्राने अन्गुलीमालच्या मनातील हिंसेचा शिरस्छेद करणारे तथागत श्रेष्ठच ठरतात.येथे जिंकणारा गर्विष्ठतेने मोहरून जात नाही,तर हरणारा मानास्तापाने,दुक्खाने,अपमानाने कोसळूनही पडत नाही.युद्ध हरणाऱ्या नेपोलियन बोनापार्टला सेंट हेलेना येथे मिळालेली कैद,वा हरणाऱ्या हिटलरला करावी लागलेली आत्महत्या,हि या युद्धाची निष्पत्ती नाही तर येथे अन्गुलीमालला मिळते शरण, माणुसकीची,सम्यक जीवनमार्गाची.आयुष्याचा नरक करणाऱ्या हिंसेच्या पाशात,गुरुदक्षिनेच्या ब्राम्हणी षड्यंत्रात अडकलेला अंगुलीमाल,तथागताची शरण मिळताच या जहरी पाशातून मुक्त होतो.गार्ग आणि मैत्रायानीचा हा पुत्र हिंसेची अस्थायी कात टाकून माणुसकीच्या-करुणेच्या स्थायीत्वाची शरण स्वीकारतो.अन्गुलीमालसारखा हिंसक व्यक्ती तथागताच्या अहिन्सेपुढे गर्भगळीत होतो.त्याच्या हिंसक अहंकाराचा क्षणात पराभव होतो.अहिंसेची हि शक्ती एकट्या अन्गुलीमालच्या बाबतीतच आपणास दिसते असे नाही; तर राजगृहाजवळ वास्तव्य करून राहणाऱ्या व वाटसरूंना लुटणाऱ्या पाचशे डाकुंना वाममार्गापासून परावृत्त करून सम्यक मार्गाकडे आणतांनाही बघावयास मिळते.

घडवाया हे जगत नवे,
बुद्ध हवा का युद्ध हवे ?
सहस्त्र योजने इथे लोटली
मानवताही त्यात लोपली
दया-शांती का शांत झोपली
विझले अवतीभवति दिवे
बुद्ध हवा का युद्ध हवे ?
भयाण वादळ दिशांत दाही
अंधारातील बिकट वाट ही
किरण आशेचा कुठेही न लवही
पथ उजळाया थटती थवे
बुद्ध हवा का युद्ध हवे ?
त्रिखंडात हा अमुचा प्यारा
वैभवशाली शांती मनोरा
स्वातंत्र्याचा उज्ज्वल तारा
                                                              आज सारया विश्वा बुद्ध  हवे...!!! 

(द्वितीय महायुद्ध आणि डॉक्टर आंबेडकर या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून लेखक मार्शल Adv. Vimalsurya चिमणकर )

No comments:

Post a Comment