शौर्य... धैर्य... पराक्रम... कर्त्यव्य... माणुसकी... याचे अमूल्य असे उदाहरण...
ऑगस्ट १९४७ मध्ये महार बटालियनला दिल्लीला नेण्यात आले, दिल्लीतील जी मुसलमान कुटुंबे पाकिस्तानात जाणार होती; त्यांना आगगाड्यातून सिमेवर सुरक्षितपणे पोहोचविण्याचे काम बटालियनला करावे लागले.
२२ आगगाड्यातून २५-३० हजार मुसलमानांना सुरक्षितपणे नेण्याचे अवघड कार्य या जवानांनी केले. या बाबतीत यांना प्राण धोक्यात घालून मुसलमान निर्वासितांचे रक्षण करावे लागले...
याबद्दलची दोन उदाहरणे उल्लेखनीय आहेत,
११ सप्टेंबर १९४७ ला दिल्लीहून अत्तारीला, आगगाडी मुसलमान निर्वासीतांना घेऊन चालली होती. महार मिडियमगनची एक तुकडी सुभेदार के. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली, आगगाडीचे रक्षक म्हणून आगगाडीतील निरनिराळ्या डब्यात बसवली होती. रेल्वे लाईनवर कोणीतरी अपघाताचे कारस्थान अगोदर केल्यामुळे जलंदर शहराच्या नंतर गाडी रूळावरून घसरली तेव्हा आसपासच्या भागातून शेकडो हिंदू व शीख लोक हातांत काठ्या, तलवारी व भाले घेऊन मुसलमान प्रवाशांना मारण्यासाठी धावून आले.
सुभेदार गायकवाड यांनी आपल्या सैनिकांना या हल्लेखोरांवर गोळ्या झाडण्याचा हुकूम दिला. सर्व डब्यांतून दोन्ही बाजूनी गोळ्यांचा वर्षाव होत असलेला पाहून हल्लेखोर पळून गेले व दूर उभे राहिले. हे हल्लेखोर परत गाडीवर चाल करतील हे ओळखून सुभेदाराने गार्डाला आगगाडी परत जालंदर शहराला नेण्यास हुकूम दिला. जालंदरच्या स्टेशनावर पुनः दुसऱ्या थव्याने आगगाडीवर हल्ला केला. तेव्हांही सुभेदाराने सैनिकांना गोळीबाराचा आदेश दिला, तेव्हा हल्लेखोरांचा जमाव दूर पळाला व तेथे उभे राहून आम्ही मुसलमानांना कापणार अशा घोषणा देऊ लागला. असा हा प्रकार तीन दिवस चालू होता. मुसलमान प्रवासी आगगाडीच्या डब्यात जीव मुठीत घेऊन तीन दिवस अन्न-पाणी व झोप यांच्याशिवाय गप्प बसून राहिले होते. मुले, भूक व तहान यांनी व्याकूळ होऊन रडत होती. सुभेदाराने, स्टेशनपासून दूरच्या ठिकाणी पाणी आणण्यासाठी सैनिकांच्या दोन तुकड्या पाठविल्या. त्यांनी जेव्हां पाणी आणले तेव्हां ते सर्व प्रवांशांना पिण्यास दिले. सुभेदार गायकवाड यांनी प्रसंगावधान व धैर्य दाखवून निर्वासित प्रवासी मुसलमानांचे प्राण वाचविले. चौथ्या दिवशी आगगाडी, रेल्वेलाईन दुरुस्त झाल्यावर जालंदरच्या पुढे निघून इष्ट स्थळी मुसलमान प्रवाशांना पोहचविले.
.........................................................................
दुसरी गाडी मुसलमान प्रवाशांना घेऊन त्याच मार्गाने चालली होती, त्यावेळी जोराचा मुसळधार पाऊस आला. पावसामुळे जालंदरजवळची रेल्वे लाईन उध्वस्त झाली. सुभेदार के. मोरे यांच्या नेतृत्वाखाली या गाडीचे रक्षण करणेचे काम होते. सुभेदार के. मोरेही गाडीत होतेच. जालंदरला गाडी असलेली पाहून शेकडो हिंदू व शीख हल्ला करण्यास धाऊन आले आणि सांगू लागले तुम्ही तुमचे सैनिक बाजूला घ्या आम्ही सर्व मुसलमानांची कत्तल करतो."
सुभेदार मोरे उत्तरले की तुम्ही हल्ला केला तर मी माझ्या सैनिकांना तुमच्यावर गोळ्या झाडण्याचा हुकूम देईन व तुम्हां सर्वांना भुईसपाट करीन,
सुभेदार मोरे हल्लेखोरांचे व यांचे कडाक्याचे बोलणे १५-२० मिनिटे चालले हल्लेखोर ऐकत नाहीत असे पाहून मोरे यांनी सैनिकांना फायरींगसाठी तयार व्हा असा जोरात ओरडून हुकूम दिला; तेव्हा हल्लेखोर पळून गेले.
रेल्वेलाईन दुरुस्त झाल्यानंतर गाडी, ५ दिवसांनी इष्ट स्थळी पोहोचली. या दोन महार लष्करी पथकांच्या नायकांनी आपल्या कर्तव्यावर नितांत निष्ठा ठेऊन हजारो-लाखों मुसलमानांना पाकिस्तानच्या हद्दीवर नेऊन सोडले.
तत्कालीन परिस्थिती अतिशय भयावह अशी होती, दोन्ही बाजूकडून अमर्याद अश्या कत्तली सुरू असताना... स्वत:चा जीव धोक्यात घालून महार बटालियनने आपल्या कर्तव्यात कोणताही कसुर केला नाही...
- ॲड.राज जाधव, पुणे...!
( संदर्भ - अस्पृश्यांचा लष्करी पेशा, पृष्ठ क्र.७२-७३)
No comments:
Post a Comment