माता भगिनींनी बदलायलाच हवे....!!!
भारतीय "संविधान दिन' नुकताच राज्यभर विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा केला. संविधानाचे शिल्पकार, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र कष्ट करून केवळ 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस इतक्या अल्पावधीत संविधाना लिहून पूर्ण केले. या संविधानाने देशाला बहाल केलेली लोकशाही ही आज जगात सर्वश्रेष्ठ आणि वंदनीय ठरली आहे. या संविधानाचे प्रत्येक पान अन् पान, कलम अन् कलम शुध्द तत्वज्ञानाने व्यापून टाकले आहे. आज देश वाटचाल करीत असलेला संविधानिक मार्ग हा बुध्द तत्वज्ञानाचा गाभा आहे. त्यामुळे कोणी-काहीही म्हटले तरी एक मात्र त्रिवार सत्य आहे. ते म्हणजे भारत आज बौध्दमय आहे.
तरीसुध्दा या देशाच्या मातीत हजारो वर्षापासून मूळ धरून बसलेला मनुवादी विचार संधी मिळेल तेव्हा डोके वर काढून संविधानावर, संविधानाच्या शिल्पकारावरती, त्यांनी दिलेल्या परिवर्तनवादी विचारावरती गरळ ओकण्याचे काम करीत असतो. "संविधान दिना'निमित्त आपण जेव्हा या सर्व बाबींचे स्मरण करतो तेव्हा एक गोष्ट ध्यानात येते की, संविधनाच्या माध्यमातून कोण्या एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या कल्याणाचा फक्त विचार न करता देशहिताला राष्ट्रीय एकात्मतेला अनन्यसाधारण महत्व दिले.
संविधानाच्या गाभ्यात स्त्री-पुरूष समानतेला तर अनन्यसाधारण महत्व दिले आहे. या स्त्री-पुरूष समानतेसाठी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून लढा दिला, नव्हे तर स्वतंत्र मजूर मंत्रीपदाचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून बाबासाहेब स्त्रीयांना जी समानता देऊ पाहत होते, हक्क, अधिकार देऊ पाहत हाते ते सर्व कोण्या एका जातीतील स्त्रियांसाठी नव्हे तर या देशातील संपूर्ण स्त्री जातीसाठी होते. पण आज किती स्त्रिया बाबासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात ? हा संशोधनाचा विषय आहे. "स्त्रीमुक्ती'चा टेंभा मिरविणाऱ्या संघटनांना, त्या संघटनेच्या पदाधिकारी महिलांना कसली मुक्ती हवी आहे ? महामानव बुध्दांनी, राष्ट्रपिता फुलें आणि युग प्रवर्तक बाबासाहेबांनी ती त्यांना केव्हाच देऊन टाकली आहे. ती स्वीकारण्याची मानसिकता तयार होणे गरजेचं आहे. हे झाले इतर महिलांचे. आपल्या माता-भगिनींचे काय ? या आमच्या माता भगिनी, भिमाच्या लेकी म्हणवून घेणाऱ्या आज हिंदू स्त्रियांचे अनुकरण करत आहेत. त्या हिंदू धर्मातील सण, व्रतवैकल्य यात गुरफटत असल्याने कुटुंबातही तेच संस्कार होत आहेत. त्यामुळेच आमचे उच्च विद्याविभाूषीत, डॉक्टरेट मिळविणारे आणि बाबासाहेबांच्या नावाने सुरू असलेल्या शैक्षणिक संस्थेत, सामाजिक विषयाचे प्रमुख कोल्हापूरसारख्या पुरोगामी जिल्ह्यात काम करणारे आमचे एक बांधव खास तुलसी विवाहासाठी बाजारातून "तुळस' विकत नेतात. (बाबासाहेबांच्या विचारांची त्यांना याद (व) करून देणे गरजेचे आहे आणि त्यामुळे याचा परिणाम आंबेडकरी चळवळीवर होऊ लागला आहे. हे चित्र बदलायचे असेल तर आपल्या माता भगिनींनी बदलायलाच हवे. त्यासाठी बुध्दाला शरण जायला हवे.
कार्तिकी एकादशीला तुलसी विवाह मोठ्या थाटामाटात गावा-गावात मोठ्या उत्साहात पार
पडतात. खेदाची बाब ही की हा तुलसी विवाह आपल्या समाजातही अनेक ठिकाणी पार
पाडतात. तुलसी विवाह साजरा करणाऱ्यांनी केला आहे का ? कधी तुलसी विवाहाच्या तत्वज्ञानाचा अभ्यास ? कोण तुलसी ? कोणाशी विवाह केला जातो तिचा ? आणि हे सर्व आपल्या सद्सद्विवेक बुध्दीला पटते का ?
का गावभर करतात म्हणून आपणही करायचे ? काय संबंध आहे आपला आणि तुलसीविवाहाचा ? हजारो वर्षे व्यवस्थेने आपल्याला गावकुसाबाहेर ठेवलं तेव्हा राहयला घर ते होते का आपल्याला ? घराचा पत्ता नव्हता मग दारी आणि दारातल्या तुळशीचं काय ? का करतोय हे आपण अनुकरण ? अहो आपल्या हजारो पिढ्या गावकी, तराळकी करण्यात गेली. लग्नाचे वय झाले तरी या गुलामगिरीतून हे कळायचं देखील नाही. काही काही वेळेला लग्ना अगोदरच इहलोकाची यात्रा संपवावी लागायची. त्यामुळे "रूई'च्या झाडाबरोबर त्या मृतदेहाचं लग्न लावले जायचे, असे जीवन जगायला भाग पाडणाऱ्या व्यवस्थेचा भाग असलेल्या प्रथा, रूढी, परंपरा याचे कोणत्या मुद्यावर आपण अनुकरण करत आहोत. का ती व्यवस्था पुन्हा रूजविण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. याचा विचार आज व्हायलाच हवा. खास करून आपल्या माता-भगिनींनी आपण हे सर्व फेकून द्यायला हवे. तुम्ही बदलला तर परिस्थिती नक्कीच बदलेल.
(विद्याधार कांबळे यांच्या ब्लॉग वरून साभार )
khup sundar
ReplyDeleteतू होऊ नको सीता त्या रामाची
ReplyDeleteलोक तुला अबला म्हणतील
लोक तुला अबला म्हणतील,
तू होऊ नको द्रोपदी त्या पांडवांची
लोक तुला वेश्या म्हणतील
लोक तुला वेश्या म्हणतील ,
तू हो जिजाऊ त्या शिवबाची
लोक तुला राजमाता म्हणतील,
लोक तुला राष्ट्रमाता म्हणतील,
तू हो सावित्री त्या ज्योतिबाची
लोक तुला क्रांतीज्योती म्हणतील,
लोक तुला क्रांतीज्योती म्हणतील...!!!