मीडिया म्हटलं की अजूनही अनेकांच्या डोळ्यासमोर पत्रकार येतात. आजकाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातलेही येत असतील इतकंच. पण मीडिया ही संकल्पना अनेकदा पत्रकारांपर्यंतच संपवली जाते. खरं तर, मीडिया क्षेत्राचा विस्तार प्रचंड आहे. नवनव्या कंपन्या, नवनवे प्रकार यामध्ये येत असल्याने हे क्षेत्र जोमाने विस्तारतंय. आतापर्यंत, जरा बरं लिहिता येणारे, पत्रकार होण्याची इच्छा असलेले, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी उत्सुक असलेले या क्षेत्रात येतात, हा समज होता. पण ज्या वेगाने हे क्षेत्र पंख पसरते आहे, त्या गतीने त्याच्या गरजाही बदलत आहेत आणि स्वरूपही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात हे केव्हाच आलं असावं.
कोलंबिया विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ लॉ’ या महान पदवीसाठी जगातील पाच पंडितांची निवड केली. त्यात प्रमुख नाव होते डॉ. आंबेडकर - एकमेव भारतीय. ‘भारतीय घटनेचे शिल्पकार, एक महान सुधारक, मानवी हक्काचे आधारस्तंभ असणारे महापराक्रमी पुरुष डॉ. बी. आर. आंबेडकर’ अशा शब्दांत सन्मानाने नाव पुकारले गेले तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात अंगावरील गाऊन सांभाळत ‘डॉक्टर ऑफ लॉ’ पदवीचा स्वीकार त्यांनी केला. संपूर्ण भारतातून विद्येचे महान यश एकाच व्यक्तीला का मिळाले, असा प्रश्न सहज पडतो.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्षमय जीवनातूनच त्यांची जीवननिष्ठा आकार घेत गेली आणि त्यातूनच त्यांची अन्यायाशी झुंज देण्याची वृत्ती वाढत गेली. अशा परिस्थितीत त्यांच्यात एका लढाऊ वृत्तीचा पत्रकार निर्माण झाला. बाबासाहेबांना अस्पृश्य वृत्तपत्रांची आवश्यकता का भासली याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. 1918 मध्ये ब्रिटिश सरकारने साउदबरो कमिशन भारतात पाठवले. या कमिशनने हिंदी लोकांच्या मताधिकारांसंबंधी प्रतिक्रिया जाणून घेण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे त्यांनी अनेक हिंदी मान्यवरांना चर्चेसाठी निमंत्रित केले होते; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सिडनेहॅम, मुंबई या सरकारी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करीत असल्यामुळे त्यांना निमंत्रण पाठवले नव्हते. या कमिशनपुढे आपले विचार मांडावेत आणि अस्पृश्यांना राजकीय हक्क, मतदानाचा अधिकार, निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहण्याचा अधिकार मिळावा म्हणून ते आग्रह धरणार होते. कारण त्या वेळी लोकांची स्वराज्याची मागणी अतिशय तीव्र झाली होती; परंतु त्या मागणीत अस्पृश्यांच्या अस्तित्वाला आणि स्वतंत्र प्रतिनिधित्वाचा विचार नव्हता. म्हणून त्यांनी या संदर्भात त्या वेळच्या गव्हर्नरशी पत्रव्यवहार करून कमिशनपुढे आपले विचार मांडण्याची परवानगी मिळवली. त्या वेळी त्यांच्या मनाला एक कल्पना शिवून गेली की, दलितांची बाजू मांडण्याकरिता, त्यांना त्यांच्या राजकीय हक्काची जाणीव करून देण्याकरिता एखादे पत्र त्यांच्याच मालकीचे असावे, जेणेकरून ते त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून स्वत:च स्वत:चे प्रतिनिधित्व उत्तम प्रकारे करू शकतील. याच त्यांच्या कल्पनेतून आणि भूमिकेतून मूकनायक या पत्राचा जन्म झाला. मूकनायक हे त्यांचे पहिले वर्तमानपत्र होय.
तत्पूर्वी मुंबईला कोल्हापूरचे राजे शाहू महाराज यांचे आगमन झाले असताना डॉ. आंबेडकरांनी आपली योजना त्यांच्यासमोर मांडली. शाहू महाराजांनी त्वरित 2500 रुपये मदत म्हणून त्यांना दिले आणि मूकनायक हे पाक्षिक 30 जानेवारी 1920 रोजी सुरू झाले. 'मूकनायक'चे डॉ. आंबेडकर स्वत: संपादक नव्हते. या पत्राच्या संपादकपदी विदर्भातील तरुण पांडुरंग नंदराम भटकर यांची नियुक्ती त्यांनी केली होती. मूकनायकात बाबासाहेबांनी अनेक अग्रलेख आणि स्फुटके लिहिली. पहिल्या अंकात आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी आपले मनोगत असे व्यक्त केले होते की, 'आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या आणि पुढे होणार्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती आणि तिचे मार्ग यांच्या खर्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी भूमी नाही आणि अनेक पत्रे विशिष्ट जातीचेच हितसंबंध पाहणारी आहेत. इतर अन्य जातींच्या हिताची त्यांना पर्वा नसते.' मूकनायकाच्या निर्मितीमुळे अवघ्या काही काळातच अस्पृश्य समाजात जनजागृतीचे अंकुर फुटायला सुरुवात झाली, असे बाबासाहेबांनी एका लेखात म्हटले आहे. दुसरे पत्र 'बहिष्कृत भारत' हे 3 एप्रिल 1927 रोजी सुरू झाले. याचे संपादक स्वत: बाबासाहेब होते. त्यांनी बहिष्कृत भारतमधून प्रखर विचार मांडले. त्यानंतर 'जनता' हे साप्ताहिक 1930मध्ये उदयास आले. हे पत्र 25 वर्षे म्हणजे 1930 पासून 1955 पर्यंत चालू होते. या पत्राचा उपयोग मुख्यत: बाबासाहेबांना त्यांची चळवळ व आंदोलन चालवण्याकरिता झाला. पुढे 4 फेब्रुवारी 1954 रोजी जनताचे नामकरण 'प्रबुद्ध भारत' असे करण्यात आले. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि त्यानंतर 'प्रबुद्ध भारत'चे एक संपादक मंडळ निर्माण करण्यात आले. 3 ऑक्टोबर 1957 रोजी भारतीय रिपब्लिकन पार्टी कार्यान्वित झाली आणि प्रबुद्ध भारत या पक्षाचे मुखपत्र बनले. हे पत्रसुद्धा 1961 मध्ये बंद पडले.
(संदर्भ - विविध वर्तमानपत्रातील वाचून अनुभवलेले लेख )
|
No comments:
Post a Comment