सत्यशोधक समाज...!!!
महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाज स्थापन केला. या समाजाच्या स्थापनेला आज 154 वर्षे पूर्ण होत आहेत. या समाजाची ध्येये, उद्दिष्टे समजून घेतल्यावर हा समाज पुन्हा उभा राहणे गरजेचे आहे हे लक्षात येते. महात्मा फुले यांनी 1851 मध्ये पुणे येथे मुलींची पहिली शाळा काढून आपल्या कार्याचा आरंभ केला असला तरी कोणतेही काम व्यक्तिकेंद्री करण्यापेक्षा त्याला संघटनात्मक रूप दिले तर ते अधिक लोकांपर्यंत पोहोचवता येते या प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना संघटनेची आवश्यकता भासू लागली. यातूनच त्यांनी आपल्या पुण्यातील रामशेठ उरवणे, धोंडीराम कुंभार, तुकाराम हणमंत पिंजण, रामचंद्र भालेकर आदी निवडक सहका-यांबरोबर चर्चा करून सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
सत्यशोधक समाजाची ध्येय, उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती. (1) ब्राह्मण, भट, जोशी, उपाध्ये यांच्या दास्यत्वातून शूद्रातिशूद्रांना मुक्त करणे.(2) ब्राह्मण, भट जोशी, उपाध्ये यांनी आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारे हजारो वर्षांपासून चालवलेली शूद्रातिशूद्रांची लूट थांबवणे. (3) समुपदेश व विद्येद्वारे शूद्रांना त्यांचे अधिकार समजून देणे. (4) धर्म आणि व्यवहारासंबंधी ब्राह्मणांच्या बनावट व कार्यसाधक ग्रंथांपासून शूद्रांची मुक्तता करणे. चार आणे वर्गणी भरून बेलभंडार उचलून मी समाजाची तत्त्वे पाळीन अशी शपथ सत्यशोधक समाजाच्या सभासदाला घ्यावी लागत असे. दोन वर्षात समाजाचे 232 सभासद झाले होते. ब्राह्मणी व्यवस्था नाकारणे सोपे असते, पण त्याला पर्यायी व्यवस्था उभी करणे हे अवघड असले तरी महात्मा फुले यांनी ते करून दाखवले. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर लगेच 25 डिसेंबर 1873 रोजी सीताराम जबाजी आल्हाट व राधाबाई ग्यानोबा निंबणकर यांचा विवाह ब्राह्मणाशिवाय घडवून आणला. या घटनेने कार्यकर्त्यांना बळ मिळाले आणि त्यातून त्यांनी ब्राह्मणांशिवाय विवाहाचा सपाटा लावला. हे विवाह कायदेशीर आहेत की नाही याचीही खातरजमा सत्यशोधक समाजाने करून घेतली होती.
हरतालिकांचे घेणे, उपोषण, गणेश चतुर्थीनिमित्त उत्सवी उत्साह अशा चाली सत्यशोधक समाजाने बंद केल्याच, पण ब्राह्मणांशिवाय पिंडदान, उत्तरकार्य, वास्तुशांती असे कार्यक्रम धडाक्यात राबवले. ब्राह्मणांशिवाय कार्यक्रम करायचा हे ठीक आहे, पण विधी करायचा तर त्यासाठी काही पर्यायी व्यवस्था हवी म्हणून त्यांनी ‘पूजाविधी’चे पुस्तक तयार करून त्यात तो कसा करावा याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यामुळे कोणतेही कार्य करताना कार्यकर्त्यांना अडचण येत नव्हती. विधीप्रसंगी शिक्षणासाठी दान देण्याची पद्धत त्यांनी रूढ केली होती.
महात्मा फुले हे ध्येयाने पछाडलेले व्यक्तिमत्त्व होते म्हणूनच ते पक्षाघाताने आजारी असतानाही ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ पूर्ण करू शकले. त्यातून त्यांनी मानव मुक्तीचा विचार दिला. महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांचे सहकारी कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, डॉ. विश्राम रामजी घोले यांना ही चळवळ गतिमान करता आली नाही. नेत्याने उभ्या केलेल्या चळवळी त्याच्या मृत्यूनंतर अनुयायांच्या प्रयत्नांतून अधिक विकास पावल्याची उदाहरणे जवळजवळ नाहीतच. त्याचे कारणही आपल्या विभूतिपूजेत वा कार्यकर्त्यांचे अपयश हे असते. सत्यशोधक समाजही त्याला अपवाद ठरला नाही. सत्यशोधक समाजाला जेधे-जवळकरांनी ऊर्जितावस्था दिली, असे इतिहासकार मानतात; पण त्यांनी समाजाचा विचारच मारून टाकला. सत्यशोधक समाजाची तत्त्वे अंगीकारताना गणपती उत्सव साजरा करणे महात्मा फुले यांना मान्य नव्हते. या उत्सवात शूद्रातिशूद्रांनी सहभागी होऊ नये, असे सत्यशोधक समाजाचे मत होते. महात्मा फुले यांच्यानंतर त्यांचा हा विचार बाजूला ठेवण्यात आला. गणेशोत्सवासाठी मेळे काढले गेले. या उत्सवात सहभागी होताना ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद उभा करण्यात आला. त्या वादाने महाराष्ट्राचे झालेले नुकसान हा चर्चेचा स्वतंत्र मुद्दा आहे. मात्र या सर्व घडामोडींमुळे सत्यशोधक समाजाची दिशा भरकटली ती कायमचीच. आज भारतीय समाज पुन्हा दैववाद आणि धर्मवादाने बेभान झालेला आहे. ब्राह्मणांशिवाय त्याचे पानही हलत नाही. तरुणाई तर जितकी वेगाने विज्ञानाचा वापर करते तितक्याच वेगाने ती धर्म व दैववादात बुडत चालली आहे. हा युवक आपल्या समस्यांचे गा-हाणे घेऊन पायी शिर्डीला जातो आहे. दिवसरात्र रांग लावून सिद्धिविनायकासमोर नतमस्तक होतो आहे. त्याला त्यातून सोडवायचे असेल तर पुन्हा एकदा सत्यशोधक समाज उभा राहणे गरजेचे आहे....!!!
( संदर्भ - मोतीराम कटारे )
No comments:
Post a Comment