इकडंबी अर्धा, तिकडंबी अर्धा.....!!!
निबिड जंगले तुडवित आलो फोडोनिया टाहो
रथ समतेचा असा आणिला सांभाळूनी न्याहो....!
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सोनेरी सायंकाळी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जो तळमळीचा उपदेश केला होता. तो उपदेश वरील काव्यपंक्तीतून शांताराम नांदगावकर यांनी गाण्याच्या रुपात व्यक्त केला होता. बाबासाहेब म्हणाले होते, " मी हा रथ इथं पर्यंत आणला आहे, जर तुम्हाला तो पुढे घेऊन जाता आला नाही तरी तो तिथंच राहूदे पण किमान मागे तरी नेऊ नका' पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या उपदेशाचा कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आणि पर्यायाने समाजानेही किती गांभिर्याने विचार केला हा चिंतनाचा विषय आहे.
आज बऱ्याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, प्रबुद्ध हौसिंग सोसायटी, सिद्धार्थ को.ऑप. हौंसिंग सोसायटी आणि अशा कितीतरी वसाहतीउदयाला आल्या आहेत. नव्हे तर त्या स्थापन केल्या गेल्या आहेत. पूर्वाश्रमीच्या दलित वस्तीला आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर वगैरे नावे दिलेली गोष्ट वेगळी, पण आज शहरासारख्या ठिकाणी स्वत:ला सुशिक्षित, आंबेडकरवादी व बौद्ध म्हणवून घेणाऱ्यांनी हौंसिंग सोसायट्या निर्माण करून त्या सोसायटींना या महामानवांची नावे दिली आहेत. अर्थात या सोसायटीची नावे फक्त या महामानवांची आहेत. या सोसाटीमधील अगaदी हाताच्या बोटावर मोजण्याईतकी कुटुंबेच कट्टर बौद्ध आहेत. बाकी सर्व "इकडंबी अर्धा आणि तिकडंबी अर्धा अशा आवस्थेत असणारी आहेत.
परवा पुरोगामीत्वाचा उदोउदो करणाऱ्या याच कोल्हापूर जिल्ह्यातील एका शहरात जाण्याच योग आला त्या सोसायटीचे नाव होतं सिद्धार्थ हौसिंग सोसायटी. सोसायटीतील बहुतांशी मंडळी ही नोकरदार कांही निवृत्त कांही सेवेमध्ये असलेले. मी ज्या घरात गेलो ते होते "प्रबुद्ध निवास' आत प्रवेश केला साधरणत: सोळा बाय बाराच्या हॉलमध्ये अंतर्गत सजावटीच्या भरपूर वस्तू होत्या. समोर शोकेस होता. या शोकेसमध्येच टि.व्ही.वरती गणपतीचा फोटो होता. आता सांगा याला प्रबुद्ध निवास म्हणता येईल का? हे एक प्रतिनिधिक उदाहरण आज सर्वच ठिकाणी अशी सर्रास अवस्था अपल्याला दिसून येते आहे. याला काय म्हणावे? आज अशा सोसाटीमधील अनेक उच्चशिक्षित लोक, बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये, बौद्धांच्या कार्यक्रमाध्ये सामिल होतात. पण याचे वर्तन मात्र निर्बुद्धांसारखेच आहे. आणि मग प्रश्न निर्माण होतो. अशा सोसायटींना केवळ बाबासाहेबांचे, बुद्धांचे नाव देण्याच प्रयोजन काय? बाबासाहेबांनी आपल्या बावीस प्रतिज्ञा देताना मी हिंदू देवदेतांची पुजा करणार नाही. अशी जी एक प्रतिज्ञा दिली.त्या प्रतिज्ञेच काय? ज्यांनी आपलं उभं आयुष्य आमच्या साठी झीजवले.त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचे आपल्याकडून पालन होत नसेल तर जातीयवाद्याकडून केल्या जाणाऱ्या विटंबणेपेक्षा आपण केलेली ही बाबासाहेबांची विटंबणाच भयंकर नव्हे काय?
आज समाजात बौद्ध आडनावे लावून देवीला जाणारी, दरसऱ्यात नवरात्र बसणाऱ्यांची संख्या कमी नाही.ही खूप मोठी शोकांतिका आहे. बाबासाहेबांनी आपल्याला माणसात आणण्यासाठी या 33 कोटींना ठोकरले पण आमच्यातील हे इकडे भी अर्धा आणि तिकडे बी अर्धा अशाप्रवृत्तीच्या लोक त्या 33 कोटींना जवळ करून आंबेडकरी विचारांशी प्रतारणा करत आहेत...!!!
पुनर्संपादन - राज जाधव.....!
मूळ लेखक - विद्याधर कांबळे.....!
No comments:
Post a Comment