My Followers

Monday, 12 September 2016

अॅट्रॉसिटी अॅक्ट: 'सरसकट गैरवापर' हे अर्धसत्य...!

अॅट्रॉसिटी अॅक्ट: 'सरसकट गैरवापर' हे अर्धसत्य...!


कोपर्डी बलात्कार घटनेचा निषेध करण्यासाठी मराठवाडा आणि खानदेशात मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चे निघत आहेत. निषेधाचा हा मार्ग लोकशाहीसंमत आहे, त्यामुळे कुणी विरोध करण्याचे कारण नाही. मात्र, आरोपींना फाशीची शिक्षा ठोठवा आणि अॅट्रॉसिटी कायदा शिथिल करा... या मोर्च्यातून येणाऱ्या दोन मागण्या न्यायव्यवस्था आणि कायदेमंडळावर अविश्वास दर्शविणाऱ्या आहेत. या परिस्थितीत ज्या उद्दिष्टांनी अत्याचारविरोधी कायदा अस्तित्वात आला, ती उद्दिष्टे सफल झालीत का? या कायद्यान्वये शोषितांना खरोखरच न्याय मिळाला का? मुख्य म्हणजे, या कायद्याचा सूडबुद्धीने गैरवापर करणारे, होऊ देणारे नेमके कोण आहेत? कोणत्या वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे आहेत?... आदी फारशा चर्चिल्या न जाणाऱ्या प्रश्नांची राज्याचे माजी पोलिस महानिरीक्षक सुधाकर सुराडकर यांनी कार्यसेवेतल्या अनुभवांच्या आधारे केलेली ही उकल...
१९५५ मध्ये आपल्याकडे नागरी हक्क संरक्षण कायदा मंजूर झाला. प्रत्यक्षात त्याचे नियम अस्तित्वात येण्यासाठी १९७५ साल उजाडावे लागले. त्यातून दुसरे-तिसरे काही नाही तर समाजाची आणि व्यवस्थेची मानसिकता प्रतिबिंबित होते. ही मानसिकता बदलली नाही, म्हणूनच हा कायदा करावा लागला. दलित, आदिवासी, भटके या सर्व मागासवर्गीयांविरोधात होणाऱ्या अन्याय-अत्याचारांच्या विरोधात हा कायदा आहे. एकट्या दलित अत्याचारविरोधातला नाही. तरीही या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, मागासवर्गीयांवरील अत्याचार कमी होत नाहीत, हे देशातील राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आणि सर्व राज्यांच्या मागासवर्गीय आयोगांनी वेळोवेळी केलेल्या अभ्यास अहवालांवरून सिद्ध झाले आहे. या कायद्याखाली दाखल तक्रारींपैकी अवघी २ ते ३ टक्के प्रकरणे शिक्षेपर्यंत पोहोचत असल्याचे त्यातून दिसले आहे. त्यामुळेच २०१६मध्ये हा कायदा अधिक कडक करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या. मात्र, आजही शहरात जाणवत नसेल, पण ग्रामीण भागातील स्पृश्य-अस्पृश्यतेची मानसिकता कायम आहे. अगदीच स्पष्ट सांगायचे तर, अत्याचार प्रतिबंध कायद्याचा सरसकट गैरवापर होत आहे, हे अर्धसत्य आहे. हा गैरवापर दोन्ही समाजातील पुढारी करत आहेत, हे पोलिस अधिकारी म्हणून माझ्या आतापर्यंतच्या अनुभवातून मी ठामपणे सांगू शकतो. त्यातही या कायद्याचा गैरवापर दलित पुढाऱ्यांपेक्षा सवर्ण पुढारीच अधिक प्रमाणात करत आले आहेत.
मी मुंबईत पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत होतो, त्या वेळी मोरारजी देसाई पंतप्रधान होते. त्यांचा मुंबई दौरा होता. त्या वेळी रिपब्लिकन पक्षाने त्यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याचे ठरविले. मी त्यांना विनंती केली, मोर्चा कशाला काढता, तुमचे निवेदन द्या, आम्ही तुम्हाला पंतप्रधानांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करतो. हा निरोप घेऊन मी पंतप्रधान देसाईंपर्यंत गेलो, तर ते म्हणाले, ‘इन लोगों को हमने बहोत सर चढा रखा है।’ आता दलितांबद्दल देशाच्या पंतप्रधानांची अशी मानसिकता असेल तर इतरांची काय असेल, याची आपण कल्पना करू शकतो.

दुसरे उदाहरण आहे ते कोर्टाचे. उल्हास जोशींनी माझ्या विरोधात टाडा कोर्टात केस केली. त्यांची तक्रार होती की, मी खोटी माहिती दिली. मी माझी बाजू मांडली. कोर्टाने ती तक्रार फेटाळली. पण कोर्ट म्हणाले, ‘तुमच्या विरोधात कोण कशी तक्रार दाखल करेल?’ मी मागासवर्गीय असल्याची किनार त्याला होती. खरे तर माझ्या विरोधात खोटी तक्रार दाखल करणे, हा अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा होतो. पण न्यायव्यवस्थेबद्दल असलेला आदर म्हणून मी पुढे गेलो नाही, पण कोर्टाची मानसिकताही अखेर तीच होती.
तिसरा अनुभव वरिष्ठ नेत्यांचा. दिवगंत नेते गोविंदराव आदिकांनी एका भाषणात म्हटले, पूर्वीची बारा बलुतेदारी व्यवस्था चांगली होती, महार गावचा मोबाइल होता... इत्यादी. तेव्हा रिपब्लिकन पक्षाने त्यांच्या विरोधात मोर्चा काढला. आदिकांच्या विरोधात दलित अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. पोलिस अधीक्षक गोंधळले. त्यांना कळेना, काय करावे. मी सल्ला दिला, या केसमध्ये कोणाच्याही विरोधात कोणताही अत्याचार झालेला नाही; पण लोकांना लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मोर्च्यास परवानगी द्या, त्यांची तक्रार स्वीकारा आणि अत्याचार होत नसल्याने गुन्हा दाखल करता येणार नाही, असे त्यांना नम्रपणे उत्तर द्या. पोलिस अधीक्षकांनी त्यानुसार पावले उचलली. पण पुढे माझे सर्व वरिष्ठ अधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून मला निरोप येऊ लागले की, आदिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण त्या सगळ्या मंडळींना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आदिक नको होते. अगदी स्पष्टपणे सांगायचे तर, राजकारणाचा भाग म्हणून या कायद्याचा गैरवापर केला जात होता. मी तो करू दिला नाही. पण प्रकरण तिथेच संपले नाही. विरोधी पक्षांनी दलित आमदारांना हाताशी धरून त्यांच्यामार्फत ही तक्रार दाखल करण्यासाठी दबाव आणला. शेवटी हे लोक कोर्टात गेले. तिथेही त्यांचा अर्ज फेटाळलाच गेला. थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते यांच्या पातळीवर दलितांना पुढे करून या कायद्याचा गैरवापर होत असेल, तर गावपातळीवरील स्थानिक राजकारणाची आपण कल्पनाच करू शकतो. खरे तर पोलिस अधिकारी ठाम राहिले तर या कायद्याचा चांगला वापरही होतो आणि गैरवापरही टाळता येतो. पण आज बहुतांश पोलिस अधिकाऱ्यांनाच या कायद्याची नेमकी माहिती नाही. औरंगाबाद हा अत्यंत संवेनशील जिल्हा. तिथे नियुक्ती झाल्यावर मी पहिले काम काय केले असेल, तर ते म्हणजे सर्व पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या कायद्याची माहिती दिली. परिणामी, कायद्याचा गैरवापर दूर, उलट दलित आणि सवर्ण यांच्यातील दरी कमी करण्यातच त्याची मदत झाली. अत्याचाराच्या तक्रारी एक तृतीयांश दराने कमी झाल्या. हा अत्याचारविरोधी कायदा खूप व्यापक आहे. फक्त जातीवाचक शिवीगाळ एवढा मर्यादित नाही. पाणी, जमीन या सन्मानाने जगण्याच्या घटकांशी तो निगडित आहे. तरीही सर्वाधिक तक्रारी या कायद्यातील कलम ३(१)(१०) या जातीवाचक शिवीगाळीबद्दलच्या असतात. औरंगाबादच्या पोलिसांच्या प्रशिक्षणात मी पोलिसांना प्रथम हीच माहिती दिली. तेथील बहुतांश तक्रारी मूळ गायरान जमिनी, वतनाच्या जमिनी यांच्याशी संबंधित होत्या. मूळ तक्रारींचा पोलिसांनी सक्षमपणे निपटारा केला की, कोणत्याही कायद्याचा गैरवापर करण्याचा प्रश्न उद‌्भवतच नाही.
उलट, जो गैरवापर करत असेल किंवा गैरवापर करण्यास प्रोत्साहित करत असेल त्याच्या विरोधात कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात हवी, अशी शिफारस मी २०१६च्या सुधारणेत केली आहे. गैरवापर, मग तो याच काय कोणत्याही कायद्याचा होत असेल तर संबंधितांस शिक्षा करण्याची तरतूद आहेच. त्याची अंमलबजावणी चोख होत नाही, उलट अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्याच्या गैरवापराबद्दल आवई उठवली जाते, ती चुकीची आहे. माझा अनुभव हेच सांगतो, की या कायद्याचा गैरवापर बहुतांश वेळा सवर्ण पुढारी करतात. या कायद्याचा गैरवापर करण्यासाठी सवर्ण दलित नोकरांचा वापर करताना दिसतात. त्याचे हातावर पोट असते. तो मालकाच्या विरोधात किंवा मर्जीविरोधात काही करू शकत नाही.
या कायद्याविरोधात कारवाई न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला सहआरोपी करण्याची जाचक अट यात आहे, हा यावरील आणखी एक आक्षेप आहे. मुळात आतापर्यंत राज्यात एकाही पोलिस अधिकाऱ्याविरोधात ही कारवाई झालेली नाही. याचे एक मुंबईतील उदाहरण पाहा. डॉ. हिरानंदानींचा मला निरोप आला. त्यांच्या कॉलेजमधील एका दलित प्राध्यापिकेने वरिष्ठ प्राध्यापकांच्या विरोधात अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत तक्रार दिली होती. ज्यांच्या विरोधात तक्रार होती, ते कमालीचे धास्तावले होते. मी तिथे गेलो. चौकशी केली तेव्हा कळले, अपंगांसाठीच्या राखीव जागा भरण्याचे आदेश कॉलेजला आले होते आणि त्यासाठी सर्वात कनिष्ठ म्हणून त्या प्राध्यापिकेला कामावरून कमी करण्यात आले होते. कोणत्याही प्रकारचा अत्याचार त्यात झाला नव्हता. पण तरीही ज्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती, ते प्रचंड घाबरले होते. पुढे अधिक खोलात गेल्यावर कळले, त्या कनिष्ठ प्राध्यापिकेस हा सल्ला देणारा त्यांच्याच कॉलेजातला एक वरिष्ठ सवर्ण प्राध्यापकच होता, ज्यांचे त्या इतर सहकाऱ्यांसोबत काही भांडण होते. असा सारा प्रकार. त्यामुळे गावातील राजकारण असो वा कामाच्या ठिकाणचे परस्परसंबंध, या कायद्याचा गैरवापर करवून घेणाऱ्यांमागे नेमके कोण आहेत, हे सत्य वेळोवेळी बाहेर येण्याची गरज आहे.
आज गावपातळीवरील आर्थिक, सामाजिक गणिते बदलली आहेत. एकेकाळी जमीनदार असलेले आज शेतमजूर बनले आहेत. ज्यांच्याकडे जमिनीचा तुकडाही नव्हता, त्यांच्याकडे जमिनी आल्या आहेत. त्यामुळे मूळच्या जातीवादी मानसिकता उफाळून येतानाही दिसत आहेत. अशा परिस्थितीत या कायद्याची प्रकर्षाने गरज असल्याचे दिसते आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे, हा काही यावरचा उपाय नाही. त्यापेक्षा दलित आणि सवर्ण अशा सर्वांनीच हा कायदा समजून घेण्याची गरज आहे, तेव्हाच गैरवापर थांबेल. हा कायदा योग्य आहेच. त्याचा उद्देश दलित, सवर्ण असा भेदभाव करण्याचा किंवा कोणावर अन्याय करण्याचा अजिबात नाही. पण हा कायदा अनेकांना समजलेलाच नाही. कोपर्डीच्या घटनेचा या कायद्याशी काही संबंध नाही, हे सगळ्यांनाच पूर्णपणे ठाऊक आहे. तरीही निव्वळ राजकारणासाठी त्याचा गैरवापर सुरू आहे. हा प्रकार सलोखा राखणारा नव्हे, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारा परिणामी, समाजाला अस्वस्थतेकडे नेणारा आहे.

- माजी पोलिस महानिरीक्षक सुधाकर सुराडकर..!
दिव्य मराठी शब्दांकन : दिप्ती राऊत (divyamarathirasik@gmail.com)

"अॅट्रोसीटी" प्रकरणात प्रथम वर्दी (FIR) हा एक महत्वाचा घटक

"अॅट्रोसीटी" प्रकरणात प्रथम वर्दी (FIR) हा एक महत्वाचा घटक 


अट्रोसिटी बाधित व्यक्तीने गुन्हा घडल्यास तात्काळ अत्याचाराची प्रथम वर्दी (FIR) पोलिसांत द्यावी, कोणत्याही कारणास्तव उशीर होता काम नये, कारण एफआयआर" करण्यास उशीर झाला तर त्याचा अर्थ बनावट खबर दिली म्हणून आरोपीला फायदा देण्याबाबत उच्च न्यायालयाने अनेक निर्णय दिलेले आहेत, त्यामुळे उशिरा फिर्याद द्याल तर आरोपी सुटू शकतो.
एफआयआर देताना तुम्ही देत असलेली खबर व्यवस्थित आणि काळजीपूर्वक द्या, अत्याचारित व्यक्तीचे संपूर्ण नाव, वय पत्ता आणि जात नमूद करावी, गुन्ह्याची तारीख, वेळ, स्थळ अचूक हवे, त्याचप्रमाणे अत्याचार करणारांची देखील जात नमूद करावी, कारण गुन्हा करताना आरोपी व्यक्तीस सादर व्यक्ती अनुसूचित जाती / जमातीची होती हे माहित असणे व जात बघूनच गुन्हा घडला" असे कोर्टास अपेक्षित असते.
परंतु अज्ञानामुळे फिर्यादी खबर व्यवस्थित देत नाही, परिणामी एफआयआर वीक होते, आणि या सर्व बाबींची पूर्तता न झाल्यामुळे अनेक प्रकरणात आरोपीला फायदा देऊन सोडून देणारे विशेष न्यायालयाचे, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आहेत.
म्हणून खबर देताना / एफआयआर नोंदवताना त्यात खालील गोष्टी समाविष्ठ करण्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे, आणि या गोष्टी अत्याचारित व्यक्तीने एफआयर मध्ये नमूद कराव्यात -

1) आरोपीस "पीडित व्यक्ती" अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची आहे हे माहित होते.
2) आरोपीने "पीडित व्यक्तीवर तो अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची आहे म्हणून अत्याचार केला
3)पीडित व्यक्ती अज्ञान असेल तर त्याच्या पालकाने किंवा नातेवाईकाने फिर्याद नोंदवावी
4)घटना घडताना कोण साक्षीदार असतील तर त्यांची नवे द्यावीत, (पोलीस सांगतात, साक्षीदार सवर्ण किंवा एस्सी/एसटी व्यतिरिक्त हवा, असे कायद्यात कुठे हि नाही ) कोणीही साक्षीदार चालतील. (परंतु खोटे बाकदार देऊ नका, न्यायालयात आरोपीला त्याचा फायदा होईल.
5) फिर्याद देण्यास उशीर झाला असेल तर, योग्य खुलासा करून स्पष्टीकरण द्या, कोर्टात कारण योग्य असल्यास विलंब माफ करू शकते.
6) घटना जशी घडली असेल तशीच लिहावी, रंगवून लिहू नये, खोटे लिहू नये.
7) पोलीस फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत असेल, धमकावत असतील तर जवळील एसीपी कार्यालयात पोलिसांविरुद्ध लेखी तक्रार द्या.
8)फिर्यादीची / एफआयआरची एक प्रत पोलिसांकढुन घ्या, (विनामूल्य असते)
9) एफआयआरची प्रत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, एसपी, कलेक्टर,नोडल ऑफिसर यांनी देखील पाठवा.
10) राजकीय हेतूसाठी कोणी खोटी फिर्याद देण्यास सांगत असेल तर तसे करू नका कायद्याने गुन्हा आहे, आणि तसे केल्यास टी व्यक्ती चिडून तुमच्यावर खरोखर अत्याचार करू शकते.
11) खोटी तक्रार देणे म्हणजे अत्याचारास प्रोत्साहन देणे होय.
12) अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांनी जर एखाद्याचा "खोटी तक्रार करण्याचा उद्देश" निदर्शनास आल्यास त्यास मज्जाव करावा
13) पीडित व्यक्ती रक्ताने माखला असेल तर त्याने ते कपडे पोलिसांत जमा करावे, जप्ती पंचनामा करून घ्यावा.
14) पीडित व्यक्तीवर / साक्षीदारांवर कोणी दबाव टाकत असेल, बहिष्कार करत असेल, दमदाटी करत असेल तर हि बाब जिल्हा समाज कल्याण अधिकारी, एसपी, कलेक्टर, नोडल ऑफिसर यांनी कळवा, संरक्षण अथवा पुनर्वसनाची मागणी करा.
15) सीआरपीसी सेक्शन 195 - अ साक्षीदारास धमकी दिली तर फिर्याद नोंदवत येते.
16) पीडित जखमी व्यक्तीने मेडिकल करताना सरकारी दवाखान्यात मेडिकल ऑफिसरला गुन्हा कास घडला, गुन्ह्यात कोणते हत्यार वापरले याची माहिती द्या. त्याची नोंद एमएलसी रजिस्टर करून घ्या.
सर्वात महत्वाचे
17) पीडित व्यक्तीने फिर्याद दिल्यानंतर आरोपीने दरोडा/ खंडणीची खोटी क्रॉस कम्प्लेंट दिल्यास, तो देखील दुसरा अत्याचारच होय, म्हणून या अत्याचाराबाबत सुद्धा दुसरी फिर्याद सादर करावी, त्याची कल्पना एसपीला द्यावी.
जर वरील मुद्दे पीडित व्यक्तीने एफआयआर मध्ये घेतल्यास आरोपीस शिक्षा होण्यास नक्कीच मदत होईल, आरोपी सुटणार नाहीत, आणी कायद्याचा गैरवापर होतोय हा बागुलबुवा देखील निर्माण होणार नाही...

- अॅड.राज जाधव, पुणे...!


संदर्भ - 
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) नियम 1995
नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 
नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1977 
कु. तेजस्वी चावरे (एफआयआर कसा नोंदवावा),  

"अॅट्रोसीटी" समज गैरसमज...?

"अॅट्रोसीटी" समज गैरसमज...?


संविधानाने सर्व भारतीयांस सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय व समान संधी प्रदान करुन सर्वांना समान हक्क व अधिकार दिले, त्यामुळे अनुसूचित जाती, जमातीतील लोक शिकु लागले, जागृत होऊ लागले,
परिणामी ते आपल्या मुलभुत हक्काविषयी आपली मते मांडु लागले त्यासाठी झगडु लागले, परंतु त्या मुळे संरमजंमशाहीवृत्तीला धक्का पोहचु लागला,
उदा. अनुसूचित जातीचे लोक अस्पृश्यतेसारख्या प्रथेस विरोध करतात, आपल्याला समानधिकाराची मागणी करतात, मुलभुत हक्कासाठी वेठबिगारीची कामे करण्यास नकार देतात, अशावेळी समाजातील प्रभावी, बलशाली वर्गाचा व सरंमजामीवृत्तीचा प्रखर क्रोध ओढवुन घेतात.
यातुनच अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या लोकांवर अन्याय व अत्याचार केले जातात.
वेळेनुसार अनुसूचित जाती जमाती मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपड करु लागल्या, तसतसे त्यांचेवर अत्याचार वाढु लागले, अस्तित्वात असणारा नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 व भारतीय दंड संहिता, 1860 यातील तरतुदी जातीय अत्याचारास अळा घालण्यास, प्रतीबंध करण्यास कमी पडु लागल्या, परिणामी जातीय आणी अमानवीय वृत्ती ठेचुन काढण्यासाठी संसदेने "अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अनिधियम 1989" हा प्रभावी कायदा पारित केला व त्याचप्रमाणे "अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक नियम 1995" अमलात आणले...
आज कायद्याला सत्तावीस वर्षे होऊन गेली तरीही कायद्याची योग्य अमंलबजावणी न झाल्यामुळे आजही काही ठिकाणी अत्याचार घडतंच आहेत, राष्ट्रीय अपराध ब्युरोने जाहीर केलेली अत्याचाराची आकडेवारी विचार करण्यासारखी व भयावह आहे,
याची भारत सरकाने गांभीर्याने दखल घेऊन, कायदा आणखी कठोर व्हावा म्हणून हल्लीच "अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अनिधियम, दुरुस्ती 2015" व "अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक, दुरुस्ती नियम 2016" आमलात आणले आहेत, व त्यांचे अंमलबजावणीस सुरुवात देखील केलेली आहे.
आता गंमत पहा... सरकार म्हणते 27 वर्षात योग्य अमंलबजावणी न झाल्यामुळे अत्याचारात वाढ झाली, त्यामुळे यावर विचारविनिमय करुन, अधिनियमात (Act) मागील वर्षी 2015 व यावर्षी नियमात (Rules) 2016 साली दुरुस्ती केली आहे...
आणि इथे काही लोक संधीसाधु नेत्यांच्या भावनिक आव्हानाला बळी पडुन, कायद्या रद्द करण्याची मागणी करत आहे, त्यामुळे या विषयाला गंभीरीत्या घेऊन, यावर सर्वांनी आपली सद्सदविवेकबुध्दी वापरुन विचार केला तर आपआपसांत तेढ निर्माण होणार नाही.

- अॅड.राज जाधव, पुणे...!

Saturday, 10 September 2016

अत्याचार प्रतिबंध कायद्याची वैधता न्यायालयात सिद्ध झाली आहे...!

अत्याचार प्रतिबंध कायद्याची वैधता न्यायालयात सिद्ध झाली आहे...!

अनुसूचित जाती-जमातीवर होणाऱ्या जातीय अत्याचारांचे स्वरूप दिवसेंदिवस अधिकाधिक अमानवीय आणि बीभत्स होत असल्याचे मागील काही महिन्यात देशात घडलेल्या अनेक घटनांवरून दिसून येते. एकीकडे अनुसूचित जाती-जमातीवर होणारे वाढते अत्याचार रोखण्यासाठी या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी अजा/जच्या संघटनाकडून केली जाते. तर दुसरीकडे तथाकथित उच्चजातीय समूहाकडून अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याचा गैरवापर होत असल्याबाबत मोठी ओरड केली जाते असे दिसून येते. मनुवादाचे महाराष्ट्रातील विनापगारी सामाजिक पोलीस असलेल्या जातीकडून तर सद्या हा कायदाच रद्द करावा अशी मागणी केली जात आहे. यास भर म्हणून धनगर समाजाचे लेखक संजय सोनवणी सारख्या लोकांनीही हा कायदा घटनाविरोधी आहे, त्यास न्यायालयात आव्हान देणार असे वक्तव्य केले आहे. उच्चजातीचे हिंदू तसेच बहुसंख्य दलित नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा असा गैरसमज आहे की, या कायद्याची निर्मिती दलितांना न्याय देण्यासाठी केली गेली आहे. हा गैरसमज रुजविण्यात राज्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे.

त्याचप्रमाणे जातीय कारणावरून गुन्हा घडला नसला तरी वैय्यक्तिक सुडापोटी या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरणारे अनुसूचित जाती/जमातीचे काही लोकही यास तेवढेच जबाबदार आहेत. यामुळे या कायद्याची निर्मिती दलितांना न्याय देण्यासाठी केली गेली आहे, हा गैरसमज सर्वप्रथम दूर करणे आवश्यक आहे.गुन्हेशास्त्राच्या भाषेत बोलायचे तर अनुसुचीत जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ हा कायदा गुन्हेगारास वैय्यक्तिक दंडात्मक कारवाई ( punitive ) करण्याच्या तत्वावर आधारित नसून सामाजिक जरब बसविण्याच्या ( Deterrent ) तत्वावर आधारित आहे हे समजून घेतले पाहिजे. हे समजून न घेतल्यामुळे अनुसूचित जाती/जमातींच्या काही स्वार्थी लोकांकडून या कायद्याचा अवाजवी वापर आणि आणि गैरवापर सुरु झाला आहे. तर अत्याचार करणारे उच्चजातीय दबंग लोक या कायद्याविरोधात अवाजवी कांगावा करीत आहेत. यामुळे हा कायदा अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचारांना आळा घालण्यास कुचकामी ठरतो आहे. नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 तसेच अनुसुचीत जाती / जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा 1989 या कायद्याची निर्मिती करण्याचा उद्देश अनुसूचित जाती/जमातींना न्याय देणे नव्हे तर जातीय वर्चस्वाच्या भावनेने अनुसूचित जाती-जमातीवर अत्याचार करणाऱ्या उच्चजातीयांना सामाजिक जरब बसविणे ( Deterrent ) असा होता. 

हे या कायद्याचे विधेयक संसदेत मांडताना जी स्पष्टीकरणात्मक टिप्पणी ( Statement Of Objects and Reasons ) देण्यात आली होती त्यावरून दिसून येते.या स्टेटमेंटमध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, " अनुसूचित जाती/जमातीचे लोक त्यांच्यावर लादण्यात आलेल्या भेदभावाच्या रूढीविषयी आवाज उठवितात, किंवा नियमानुसार किमान वेतन देण्याची मागणी करतात, किंवा वेठबिगारीची काम करण्यास नकार देतात तेव्हा उच्चं जातीचे म्हणविणारे लोक त्यांना मारहाण करून किंवा अन्य प्रकारे दहशत बसवितात. अनुसूचित जाती-जमातीचे सदस्य जेंव्हा आपल्या स्वाभिमानाची आणि हक्काची गोष्ट करतात किंवा आपल्या महिलांचा सन्मान जपण्याची कृती करतात तेव्हा प्रभावशाली म्हणविल्या जाणाऱ्या जातींचा अहंकार दुखावला जातो. या कारणांमुळे अनुसूचित जाती-जमातीच्या सदस्यांना घृणित पदार्थ खायला लावणे, सामूहिक हत्या करणे, उदरनिर्वाहाच्या साधनांची नासधूस करणे, त्यांच्या महिलांचा मुद्दाम अपमान करणे यासारखे निंद्य प्रकार या प्रभावशाली जातीकडून मोठ्या प्रमाणावर केले जातात. प्रभावशाली जातींकडून अनुसूचित जाती/जमातीविरुद्ध केल्या जाणाऱ्या अशा निंद्य कृत्यांना परावृत्त करण्यासाठी विशेष कायद्याची तरतूद करणे आवश्यक झाले आहे.

"अनुसूचित जाती/जमाती ( अत्याचार प्रतिबंध ) कायद्याची घटनात्मक वैधता उचलून धरताना अनेक राज्यांच्या उच्चं न्यायालयांनी व सर्वोच्च न्यायालयानी उद्देश व कारणाच्या टिपणीत नमूद केलेली ही वस्तुस्थिती वारंवार अधोरेखित केली आहे. अनुसूचित जाती/जमातीं (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ हा घटनाविरोधी आहे, समानतेच्या तत्वाचे उल्लंघन करणारा हे मुद्दे यापूर्वीही उपस्थित करण्यात आले आहेत. त्या आधारे सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. यामुळे मराठा नेते आग्रह धरतात म्हणून हा कायदा रद्द होणार नाही किंवा किंवा संजय सोनवणी सारखा एखादा व्यक्ती म्हणतो म्हणून हा कायदा घटनाविरोधी ठरत नाही हे लक्षात घेतले पाहिजे.जातीय अत्याचार रोखण्यात नागरी हक्क संरक्षण कायद्याचे अपयशभारतातील ब्राह्मणी समाजव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या पिढ्यान्पिढ्याच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय शोषणामुळे अनुसूचित जाती/जमातींना ज्या अमानवीय अवस्थेत जीवन जगावे लागत आहे त्या स्थितीत बदल करण्यासाठी घटनेच्या निर्मात्यांनी घटनेमध्ये त्रिमीतीय (त्रिभूज) स्वरुपाची योजना अंतर्भूत केली आहे. त्यानुसार घटनेमध्ये योजलेले उपाय थोडक्यात पुढीलपमाणे आहेत. अ) संरक्षण - समानतेच्या तत्वाची प्रतिष्ठापना करण्यासाठी आणि संस्कृतीने लादलेली अयोग्यता नष्ट करण्यासाठी कायदेशीर तरतूद. यामध्ये शारीरिक अत्याचार, हिंसाचार करणाऱयास कठोर शिक्षा देण्याची तरतूद, मनुष्यत्वाची पातळी हिनत्वाला पोचविणारे, परंपरेने लादण्यात आलेले व्यवसाय, रुढी कायद्याने नष्ट करणे, दलित दुर्बल घटकांच्या सदस्यांना त्यांच्या श्रमाची योग्य किंमत मिळावी, त्यांना आपली आर्थिक उन्नती करता यावी व आपल्या मालकीच्या संसाधनांचा उपभोग घेता यावा, त्यांच्या हितसंबंधाची जपणूक करता यावी याचे नियमन करणारी देखरेख करणारी घटनात्मक आयोग, संस्था इ.ची निर्मिती करणे इ. ब) सकारात्मक तरतम भाव (compensatory discrimination) - शासकीय नोकऱया, शिक्षण संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, विधीमंडळे, संसद यामध्ये राखीव जागांची तरतूद. क) विकासात्मक बाबी- अनुसूचित जाती/जमाती व पुढारलेल्या जाती यामधील आर्थिक विषमतेची दरी भरुन काढण्यासाठी संसाधनांचे न्याय्य वाटप.घटनाकारांनी आखलेल्या या त्रिमितीय धोरणाचे राज्याच्या नितीनिर्देशक, धोरणात्मक व्यवहारात प्रतिबिंबन होणे अभिप्रेत होते. परंतु स्वातंत्र्यानंतर या देशाची सत्ता ज्यांच्या हातात गेली ते राज्यकर्ते घटनाकारांच्या संकल्पनेशी इमान राखू शकले नाहीत. घटनेतील तरतुदींच्या अनुषंगाने काही कायदे अस्तित्वात आणण्यात आले, परंतु पूर्णत: उच्च जातींच्या हातात असलेल्या न्याय व्यवस्थेने या कायद्याच्या मूळ संकल्पनेलाच सुरुंग लावण्याचे वर्तन केले. याचे उत्तम उदाहरण म्हणून अस्पृश्यता प्रतिबंध कायदा 1955 चे देता येईल.1955 मध्ये भारतीय संसदेने घटनेच्या अनुच्छेद 17 मधील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी हा कायदा संमत केला. या कायद्याच्या आधारे तामिळनाडू (तेव्हाच्या म्हैसूर) सरकारने त्या राज्यातील सर्व हिंदू देवालये सर्व जातीच्या लोकांसाठी खुली केली. यास गौड सारस्वत ब्राह्मणांनी आक्षेप घेतला. प्रकरण उच्च न्यायालयात गेले. तेव्हाच्या मद्रास उच्च न्यायालयाने यामध्ये असा निर्णय दिला की, कायद्यानुसार सर्व जातींच्या लोकांना मंदिरात प्रवेश देण्याचा अधिकार शासनाला आहे. परंतु मंदिरातील देवाच्या मूर्तीची पूजा करण्यासाठी मूर्तीजवळ जाणे, मूर्तीला वाहिलेली दानदक्षिणा स्वीकारणे, दानविधीचे नियम तयार करणे या बाबी धर्माच्या अंतर्गत बाबी असल्याने त्यावर गौड सारस्वत ब्राह्मणांचा अधिकार आहे. त्यांच्या या अधिकारावर शासनाला आक्रमण करता येणार नाही. म्हणून मंदिराच्या गाभाऱ्यात गौड सारस्वत ब्राह्मणांशिवाय इतर कोणालाही प्रवेश करता येणार नाही. (वेकंटराम देवरु विरुद्ध म्हैसूर राज्य AIR 1958. (SC - 253)) अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आलेला हा कायदा भारतातील शासनयंत्रणा व न्यायंत्रणा यांनी मिळून निष्पभ केल्यामुळे 1976 मध्ये या कायद्यामध्ये सुधारणा करुन आणखी कठोर तरतुदी करण्यात आल्या व त्याचे नामकरण नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 असे करण्यात आले. या कायद्यातील महत्वाच्या तरतुदीनुसार 
1. अस्पृश्यतेच्या कारणावरुन धार्मिक विषमता लादणे. 
2. सामाजिक अयोग्यता लादणे. 
3. मंदिरे, इस्पितळे आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारणे . 
4. धार्मिक विधी व तत्सम कार्य करण्याचे नाकारणे. 
5. सक्तीचे श्रम करावयास लावणे. 
6. त्यांचे हक्क उपभोगू न देता अपमान करणे या बाबी गुन्हा समजल्या गेल्या व त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली. 

हा कायदा अस्तित्वत येऊनही पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समजल्या गेलेल्या जातींवर होणाऱया अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढच होत गेली. उच्च जातीय राज्यकर्त्यांनी व निर्ढावलेल्या ब्राह्मणवाद्यांनी हा कायदा पुरता निष्प्रभ करुन टाकला. नागरी हक्क संरक्षण कायद्याद्वारे भारतातील अस्पृश्यतेच्या रुढींवर अंकुश बसविण्यास शासन पूर्णपणे अपयशी ठरले. भारतातील कित्येक राज्यात अजुनही अस्पृश्यतेच्या कारणावरुन दलितांना मंदिरात प्रवेश नाकारणे, घृणीत व्यवसाय करावयास भाग पाडणे, श्रमाचा योग्य मोबदला न देणे, सावकारांनी दिलेल्या कर्जावर अस्पृश्यांना इतरांपेक्षा जास्त व्याज आकारणे इ. अस्पृश्यतेचे असंख्य प्रकार बिनबोभाट सुरु आहेत. यामुळे या कायद्यापेक्षा कठोर कायदा पारित करून अस्पृश्यता पाळणारास जरब बसविणे व जातीय वर्चस्वाचा हेतू मनात ठेऊन सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांचे मानवीय अधिकार नाकारण्यास प्रतिबंध करणे यासाठी अनुसूचति जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 ची निर्मिती करण्यात आली आहे. हा कायदा केवळ महाराष्ट्रातील मराठ्यांना डोळ्यासमोर ठेऊन पारित करण्यात आलेला नाही. यामुळे एखाद्या प्रांतातील एखाद्या प्रभावशाली जातीने या कायद्याच्या विरोधात कितीही मोठा मोर्चा काढला तरी या कायद्याचा पुनर्विचार होणे शक्य नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

अनुसूचित जाती/जमातीं (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ घटनाबाह्य नाही. वरिष्ठ जातींच्या अन्याय अत्याचारामुळे जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या अनुसूचित जाती-जमातींना आणखी भयग्रस्त करण्यासाठी अनुसूचित जाती/जमातीं (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ घटनाबाह्य असल्याचा कांगावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा कांगावा करणारे संजय सोनवणी हे सुद्धा मराठा जातींच्या दहशतवादाच्या छायेत जगणाऱ्या धनगर जातीचे आहेत.( अलीकडे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे कट्टर विरोधक असलेले अनिवासी भारतीय निओ लिबरल संजीव सभलोक यांनी स्थापन केलेल्या स्वर्ण भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. ) संजय सोनवणी यांच्या म्हणण्यानुसार अट्रोसिटी कायदाच घटनाबाह्य आहे. हा कायदा जातीव्यवस्थेला खतपाणी घालणारा, भारतीय नागरिकांना दुभंगणारा व घटनेच्या आर्टिकल १७ चे उल्लंघन करणारा आहे.अनुसूचित जाती/जमातीं (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ घटनेच्या आर्टिकल ३५ तसेच आर्टिकल १४ चे उल्लंघन करणारा आहे.यामुळे कायद्याला ते आव्हान देणार आहेत. प्रस्तुत मुद्द्यावर अनुसूचित जाती/जमातीं (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ ला यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.अजाज ( अ प्र ) कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारे पहिले प्रकरण राजस्थान उच्च न्यायालयातील जय सिंग व इतर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया व इतर हे होते.( (AIR 1993 Rajasthan 117) या प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळून लावली. 

त्यानंतर 1994 साली रामकृष्ण बालोथिया व इतर यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात विशेष रजा याचिका दाखल करून या कायद्यातील कलम 18 मुळे ( या कलमानुसार अत्याचार करणाऱ्या आरोपीला कोणत्याही न्यायालयाने अटकपूर्व जामीन देऊ नये अशी तरतूद आहे ) संविधानातील अनुच्छेद 14 व अनुच्छेद 21 चा भंग होतो.यामुळे अनुसूचित जाती/जमातीं (अत्याचार प्रतिबंध) कायदा संपूर्णपणे नाही परंतु या कायद्यातील कलाम 18 संविधानविरोधी आहे असा निर्णय दिला होता. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या या निकालाविरुद्ध तत्कालीन मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. या अपिलावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सुजाता मनोहर व न्यायमूर्ती जीवन रेड्डी यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरविला आणि अनुसूचित जाती/जमातीं (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ ची घटनात्मक वैधता अधोरेखित केली.( AIR 1995 SC 1198 ) त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयात दाखल झालेल्या रिट पिटिशन क्रमांक 12240 / 1994 [2005] , जी.कृष्णन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या प्रकरणात अनुसूचित जाती/जमातीं (अत्याचार प्रतिबंध) कायद्यातील कलम 3 घटनाबाह्य ठरविण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणावर मद्रास उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू व न्यायमूर्ती इब्राहिम कलिफुल्ला यांनी विस्तृत सुनावणी घेतली व हा कायदा घटनेतील कोणत्याही अनुच्छेदाचे उल्लंघन करीत नाहीत हे स्पष्ट करून संबंधित याचिका दिनांक 17/06/2005 रोजी निर्णय देऊन फेटाळली.

यानंतरही अनेक प्रकरणामध्ये या कायद्याची घटनात्मक वैधता तपासून पाहून कायद्याच्या वैधतेबद्दल न्यायालयांनी स्पष्ट निर्वाळा दिला आहे. यामुळे महाराष्ट्रातील मराठा जातीय नेते म्हणतात यासाठी किंवा कोणी एखादा उपटसुत म्हणतो यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या कार्यकर्त्यांनी व लेखक,बुद्धिजीवी तसेच अन्य नेत्यांनी भयभीत होऊन विरोधकांना प्रतिक्रिया देण्याचे टाळले पाहिजे.

लेखक - सुनील खोब्रागडे...!