My Followers

Thursday, 16 March 2023

शिवकालीन महार समाज...

छ.शिवाजी महाराजांच्या लष्करात महाराना अस्पृश्य मानले जात नसे. पण पुढे पेशवाईच्या काळात लष्करातील लोकांत उच्चनीच जातिभेदाचे थैमान जास्त माजले. 

मराठ्यांच्या पायदळात अस्पृश्य वर्गातील सैनिक होते. या पायदळ सैनिकांना 'पाईक' म्हणून संबोधण्यात येत असे. या पाईकांपैकी जे महार असत त्यांना ('नाईक' किंवा 'नायक' चा अपभ्रंश) 'नाक' हे नावापुढे लावत असत, व जे मांग जातीचे होते त्यांना 'राऊत हे उपपद लावत असत. 

मराठ्यांच्या लष्कराच्या तोफा बैलगाडीतून समरांगणावर नेत असत, या तोफा बैलगाडीवर चढविणे, बैलगाड्या समरांगणावर नेणे तेथे तोफांची व्यवस्था लावून त्या डागणे व उडविणे ही कामे महार व मांग पाईकांना नेमून दिलेली होती. 

पायदळातील स्पृश्य वर्गीय अधिकारी घोड्यावर बसून समरांगणावर जात असत. प्रत्येक अधिकाऱ्याच्या दिमतीला दोन अस्पृश्य पाईक असत. एक घोड्याचा मोतद्दारव दुसरा घोड्याला दाणाचारा घालणारा. स्पृश्यवर्गीय अधिकारी व सैनिक हे जातिभेदाच्या व उच्चनीचतेच्या भावनेने पछाडलेले होते. ते अस्पृश्य-पाईकांना चांगल्या तऱ्हेने वागवीत नसत. तरीही अस्पृश्य पाईक ही मानहानी करून तेथेच रहात नोकरी सोडून जात नसत. कारण, हा एकच त्यांना पोटापाण्याचा व्यवसाय होता आणि ज्यांचे आपण मीठ खातो त्यांच्याकरता आत्मर्पण करण्याची नितिमत्ता अस्पृश्य समाजाच्या अंगी बाणलेली होती. शिवाय पायदळातील नोकरी ही महारांची जवळ जवळ वंशपरंपरागत हक्काची बाब झालेली होती. त्यामुळे लष्करी नोकरी म्हणजे अस्पृश्यांची मिरासदारी, असा एक सामाजिक द्वेषभाव दृढमूल झालेला होता.

श्री.छत्रपति शिवाजी महाराज यांनी महारांना जंगलातील मार्ग, डोंगरकिल्ल्यावर जाणार गुप्त उघड मार्ग यांच्यावर देखरेख करणे आणि डोंगरी गडातील लोकांना जळण व वैरण पुरविणे, या कामावर नेमलेले होते. ही कामे म्हणजे लष्कराच्या संरक्षणाच्या नाड्या होत्या. त्या छत्रपति शिवाजी महाराजांनी महारांच्या हाती दिल्या होत्या. 

यावरून हे स्पष्ट होते की, महाराज महार जातीच्या इमानदारीची नि:शंकपणे कदर करीत होते. याशिवाय गडमाचीवर महारांची वसती ठेवणे, हाही महाराजांनीच पायंडा पाडला. ही अवघड कामे करण्यासाठी महाराजांनी जसे महार कुटुंबाना वडिलोपार्जीत नोकरीवर ठेवले तसेच त्यांनी हजारो महार तरुणांना सैनिक म्हणून रणांगणावर शत्रूविरुद्ध लढविले. 

परंतु यासंबंधीचे स्पष्ट उल्लेख उच्च वर्णीय बखरकरांनी आपल्या बखरीत केलेले नाहीत. परंतु, महाराजांच्या नंतरच्या मराठेशाहीच्या काळात हजारो महारांनी जे शौर्य गाजविले त्याबद्दल त्यांना ठिकठिकाणी इनामी जमिनी सरदारकी व पाटीलकी दिल्याचे पुरावे अस्तित्वात असल्याचे दिसून आले.

स्पृश्यवर्णीय बखरकरांनी हा महारांच्या बाबतीत जो अन्याय केला, तितक्या तीव्रतेने इंग्रज ग्रंथकारांनी केलेला नाही. कारण त्यांना ऐतिहासिक दृष्टी होती. आणि ते जरी राज्यकर्ते होते तरी सद्गुणांचे चहाते होते, म्हणून त्यांनी स्वतःच्या इंग्रज लढवय्यांबद्दल जसे साग्र वर्णन केलेले आहे तसे इंग्रजेतर लढवय्यांबद्दल जरी केले नाही, तरी त्यांना अनुलेखाने मारलेले नाही. बऱ्याच महार शूर लढवय्यांबद्दल त्यांनी गौरवपर लिहून ठेवलेले आहे...

- ॲड.राज जाधव, पुणे...!

(संदर्भ - दि महार फ्लॉक पृष्ठ क्र.५९ - ६०, The Regimental History of the MAHAR M. G. Regiment, by Colonel Major General S. P. P. Thorat, DSO (1954), PAGE 3).

No comments:

Post a Comment