"ताकाला जाऊन गाडगं लपविणे‘ अशी एक म्हण आपण ऐकत आलो आहोत. माझा संबंध खेड्याशी आला असल्याने अशा प्रकारच्या म्हणींचा साठाच मेंदूत झाला आहे. ताकाला जाऊन गाडगं (म्हणजे भांडे) लपविणे, याचा अर्थ जो विषय बोलायचा आहे, मांडायचा आहे, तो न बोलता भलताच विषय काढून टाइमपास करणे. ताक घ्यायला गेल्यावर उगाच भांडे मागे लपवत बसला तर ते किती काळ लपून राहील?
काही म्हणी मानवी स्वभावाचे दर्शन घडविणाऱ्या प्रातिनिधिक म्हणी असतात. ताकाला जाण्याबाबतची ही म्हणसुद्धा मानवी स्वभागाचा उत्तम परिचय करून देणारी आहे. पोटातलं ओठात आणणारी... थेट बोलणारी माणसं फार कमी असतात. 90 टक्के व्यक्ती आपल्या भावना, विचार दाबणाऱ्याच दिसून येतात. लोक काय म्हणतील? या काळजीत. अशी माणसं मूळ विषयाला कधीच हात घालत नाहीत. "आता जातो नि एकदाचा सोक्षमोक्षच लावून टाकतो‘ अशा तोऱ्यात बॉसच्या केबिनमध्ये जाणारी माणसं आत गेल्यावर ताकाला जाऊन गाडगं लपवून ठेवतात. दुसराच विषय बोलत बसतात. काही केल्या मूळ विषय त्यांच्या जिभेवर येत नाही.
अशी दुहेरी व्यक्तिमत्त्वं घेऊन जगणारी माणसं सध्या सर्वत्र वाढली आहेत. दिसतं तसं नसतं, हे अशांच्या बाबतीत तंतोतंत लागू होणारं तत्त्व आहे. बरीच माणसं अशा दुहेरी व्यक्तिमत्त्वाच्या स्वप्नरंजनात पूर्ण आयुष्य काढतात. काहींना मात्र ते शक्य होत नाही. जे आहे ते प्रामाणिकपणे सांगून टाकावं, त्याचे परिणाम काय होतील त्याची पर्वा करू नये, या पंक्तीत मी स्वतःला ठेवत आलो आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन किंवा महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या कामानिमित्त मी राज्यभर फिरत असतो. मला सातत्याने एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे "तुम्ही देव मानता का हो?‘ या प्रश्नावर खरंतर ताकाला जाऊन गाडगं लपवून ठेवण्याची उत्तम संधी वारंवार मला मिळते. पण मी गाडगं साऱ्या जगाला दाखवत "देव मानत नाही,‘ असं जाहीर करीत असतो.
असं जाहीर करताना आस्तिक-नास्तिक वादात मी पडत नाही. कारण आपल्या समाजात शब्दांना वेगवेगळे अर्थ चिकटले असतात. त्यावरून काही अर्थ काढून समोरच्या व्यक्तीबाबत आकलन केले जाते. त्यामुळे त्याचे फायदे-तोटे दोन्ही मी सहन केले आहेत. फायदा असा, की देव मानत नाही म्हटले, की बुद्धिस्ट... आणि मूठभर डावे... विवेकवादी आपले मित्र बनतात, पण 80 टक्के लोक आपल्याबाबत पूर्वग्रहदूषित होऊन जातात.
देव न मानणारा म्हणजे राक्षस, असूर, अनैतिक, भोगवादी, कशाचीही भीती, बंधन नसणारा स्वैराचारी, अशी प्रतिमा लोकांच्या मनात तयार झालेली असते. लोक त्याच नजरेने पाहतात. व्यवहार करतात. अर्थात, जे दीर्घकाळ आपल्या सहवासात असतात त्यांचे पूर्वग्रह हळूहळू गळून पडतात. पण त्यांची संख्या फार कमी असते.
माणसाच्या जीवनात देवाची गरज आहे काय?, असा बुद्धिवादी थाटाचा प्रश्न विचारण्याची मला गरज वाटत नाही. त्यासाठी स्वतःच्या जीवनाचे सिंहावलोकन केले, की या प्रश्नाचे उत्तर मिळते. साधारणतः वयाच्या विसाव्या वर्षापासून मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या संपर्कात आलो. आज चव्वेचाळिशीच्या उंबरठ्यावर उभा आहे. या 23 वर्षांच्या मधल्या काळात माझ्यावर संकटे आली नाहीत असे नाही. हल्ला, जीवघेणा अपघात... नैराश्य, ताणतणाव... आर्थिक ओढाताण असे सगळे मित्र माझ्या सहवासात राहून गेले, पण मला अशा संकटकाळात देवाची आठवण झाली नाही. आपल्या जीवनात देवाचा काही रोल आहे, हे मला कधीच जाणवले नाही.
बरं, मी काही देवविरोधी वातावरणात अगदी कम्युनिस्ट घरातही वाढलेलो नाही. याउलट माझ्या दहा पिढ्यांत धार्मिक संस्कार अन् वारकरी संप्रदायाचं प्रस्थ आहे. लहानपणी उन्हाळ्याच्या सुटीत पोरगं रानावनात उनाडक्या करीत फिरेल म्हणून माझी बोळवण लागोपाठ तीन वर्षे एकेक महिन्यासाठी अध्यात्म प्रशिक्षण शिबिरात करण्यात आली होती. त्याकाळात तोंडपाठ केलेला हरिपाठ, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या, अभंग, भगवद्गीतेचा बारावा नि चौदावा अध्याय आजही जिभेवर आहे. असं असतानाही मला माझ्या जीवनात देवाचा रोल कुठेच सापडला नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत काम करणाऱ्या एकाही कार्यकर्त्याला "तुम्ही देव मानता का?‘, असा प्रश्न विचारला जात नाही. तुमच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीतील कारणमीमांसा शोधण्याची विवेकी शिकवण फक्त दिली जाते. जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची बुद्धिप्रामाण्यवादी विचारप्रक्रिया एकदा हातात आली, की तुमच्या जगण्यातून "देव‘ रिटायर्ड होतो, हे नक्की!
मला अनेकदा असेही प्रश्न विचारले जातात, की कोट्यवधी लोक, शास्त्रज्ञ, डॉक्टर देव मानतात. ते मूर्ख अन् तुम्हीच तेवढे शहाणे आहात का?, या प्रश्नाचे उत्तर मी नेहमी टाळतो. कारण हो किंवा नाही या शब्दात ते देता येऊ शकत नाही. ज्यांनी कुणी माणसाच्या जगण्याची आचारसंहिता तयार केली असेल त्यांनी माणूस नावाच्या बिथरलेल्या घोड्याला वठणीवर आणण्यासाठी देवाची भीती घातली असेल. त्याच्या ज्ञानकक्षा रुंदावल्या, की भीती गळून पडेल असे त्यांना वाटले असेल, पण ज्ञानकक्षा रुंदावल्या, की असुरक्षितता आत शिरेल हे त्यांना माहीत नसावं. मर्यादित आकलन, परिस्थितीला शरण जाणं आणि डोकं खाजवूनसुद्धा काही प्रश्न अनुत्तरित राहिले, की मला वाटतं देवाला उचक्या लागायला लागतात. कारण एकावेळी कोट्यवधी लोक आठवण करतात.
श्रद्धा, भावना, अध्यात्म यांचं एक विराट मार्केट आपल्याकडे तयार झालं हा भाग वेगळा, पण आपल्या मेंदूवर जळमटांचे थर चढायला लागले आहेत, हे कबूल केले पाहिजे. कडू गोळ्यांना साखरेचे आवरण लावले की लोकांना पचतात. त्या आवरणाचे काम देव नावाची संकल्पना समाजाच्या जीवनात करते, असे स्वामी विवेकानंद सांगायचे. त्यावर विश्वास ठेवता येतो. "देव त्याचीच मदत करतो, जो स्वतःची मदत करतो,‘ असं प्रसिद्ध विधान स्वामी विवेकानंद करतात याचा अर्थ खूप व्यापक आहे.
"प्रयत्नांती परमेश्वर‘ ही हाच आशय सांगणारी म्हण आहे. प्रयत्न करा, देव आपोआप यश देतो, हा प्रेरक अर्थ देणारे महापुरुष मोजता येणार नाहीत एवढ्या संख्येनं आपल्यात होऊन गेले. पण व्यक्ती आणि परमेश्वर यांच्यात डायरेक्ट व्यवहार झाला तर माझं काय?, असा विचार करणाऱ्या व्यवस्थेनं पुढचा हा सारा अनर्थ आपल्या प्रत्येकाच्या जीवनात करून ठेवला आहे.
मी देव मानत नाही म्हणून कुुणाचंही लक्ष नसताना चोरी करण्याची इच्छा होत नाही. पाप-पुण्य सगळं झूट आहे म्हणून अनैतिक कार्याकडे झेपावत नाही. उलट जे अहोरात्र देव-देव करतात त्यांनी नीतीशी फारकत घेतल्याचे, पुजाऱ्यांनी भक्ताला लुटल्याचे, बलात्कार केल्याचे मी पाहतो त्या वेळी माझ्या जीवनात देवाला स्थान नसल्याबद्दल समाधान वाटते.
- अनामिक, दै. सकाळ, दिनांक - गुरुवार, ८ जानेवारी २०१५
संदर्भ - http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?
मी देव मानत नाही म्हणून कुुणाचंही लक्ष नसताना चोरी करण्याची इच्छा होत नाही. पाप-पुण्य सगळं झूट आहे म्हणून अनैतिक कार्याकडे झेपावत नाही. उलट जे अहोरात्र देव-देव करतात त्यांनी नीतीशी फारकत घेतल्याचे, पुजाऱ्यांनी भक्ताला लुटल्याचे, बलात्कार केल्याचे मी पाहतो त्या वेळी माझ्या जीवनात देवाला स्थान नसल्याबद्दल समाधान वाटते.
ReplyDeleteदैवावर भरवसा ठेऊन वागू नका,जे काम करावयाचे असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा
ReplyDelete- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची बुद्धिप्रामाण्यवादी विचारप्रक्रिया एकदा हातात आली, की तुमच्या जगण्यातून "देव‘ रिटायर्ड होतो.
ReplyDelete