रेषांचा जादुगार....आर. के. लक्ष्मण..!
इस्पितळातल्या खोलीतील
सारी यंत्रे एकाक्षणी झाली
नि:शब्द...आणि नि:रेघ.
तेव्हाही तो तिथे होताच...एकटा.
टाचा उंचावत अधूनमधून
खोलीत डोकावणारा.
छत्रीच्या वाकड्या दांडक्यावर
रेलून कसलीतरी वाट बघणारा.
बिटबिट्या डोळ्यांनी सतत
काहीतरी शोधणारा.
डोईला टक्कल, कानावर केस...
जाडभिंगी चष्मा, बावळा वेश
मळखाऊ सदऱ्यावर चौकड्यांचा कोट
धुवट धोतर, नि खपाटीला पोट
हातात छत्री नि पायात चपला...
ओळखले पटकन, मनात म्हटले,
...अरे, हा तर ‘कॉमन मॅन’ आपला!
किती ठिकाणी भेटायचा...
भर गर्दीत किंवा आरामखुर्चीत.
जिवंतांच्या कोल्हाळात.
प्रज्ञावंतांच्या कोंडाळ्यात.
पुढाऱ्यांच्या गोतावळ्यात.
भरगच्च न्यायालयात.
आळसावलेल्या पोलिसठाण्यात.
खमंग राजकीय बैठकांत...
जाहीर सभांमध्ये कोपऱ्यात
किंवा कधी कधी...
चक्क पार्लमेंटातही!
जाऊन बसलो शेजारी,
ठेवला खांद्यावर हात
थोपटल्यासारखे केले सांत्वनार्थ :
‘‘जन्मदात्याचं छत्र जाणं
आहे क्लेशदायक कबूल,
पण आपण सगळी सटवाईची लेकरे,
भाळावरची रेघ थांबेल -तिथे संपणारे.
पण तुलाच आता सावरायला हवं.
उरलेलं सारं आवरायला हवं.
नमस्कारासाठी उभं राहायला हवं.’’
खिशातून रुमाल काढत
त्याने नाक शिंकरले, म्हणाला,
‘‘बाप होता...गेला! आता काय?’’
धीराचे चार शब्द सांगून
म्हटले त्याला शेवटी :
‘‘वर्षानुवर्षं पाहातोय तुला,
तू असा जन्मादारभ्य म्हातारा!
तुलाही आता जपायला हवं!’’
नेहमीप्रमाणे तो बसला गप्प
मग हातातल्या छत्रीची
चाळवाचाळव करीत म्हणाला :
आता उरलो मीच...
आणि नुसता नाही उरणार,
...पुरुन उरीन!’’
गुढघे चोळत अस्वस्थपणे बसला उठून,
म्हणाला, रुमालाची घडी कॉलरीत टाकून
‘‘चला, इथलं सगळं संपलंय...निघतो!’’
थोडेसे रागावून म्हणालो त्याला :
‘‘इतकं काय अडलंय? जन्मदाता गेला,
आणि तू बाहेर जातोस?’’
त्यावर हसत म्हणाला कॉमन मॅन :
‘‘अरे, बाबा रे, तुझं जगणं म्हंजे
भाळावरची रेघ, पण माझं?
माझं आख्खं अस्तित्वच रेघेचं!
जाऊ दे मला!’’
एवढे बोलून त्यानं जोड्यात
सरकवले पाय, छत्री घेतली, निघाला...
त्याच्या पाठमोऱ्या अस्तित्वाकडे
पाहून का कुणास ठाऊक,
भडभडून आले...
डोळे पुसून म्हणालो हसत-
‘‘हे कॉमन मॅन!,
गड्या, तुला मरण नाही!’’
पाठमोरा कॉमन मॅन थबकला, वळला, छत्री रोखत मिस्किलपणे म्हणाला, ‘‘यू सेड इट!’’
(दै.सकाळमधील आर.के.लक्ष्मण यांना ब्रिटीश नंदी यांनी वाहिलेली श्रध्दांजली)
संपादन - अॅड.राज जाधव.....!