बाबासाहेबांचे महानिर्वाण...!!!
भारताच्या राजकीय, सामाजिक व वैचारिक क्षितिजावर प्रखर तेजाने चमकणारे, आपल्या ज्ञानगंगेने अस्पृश्यांप्रमाणेच स्पृश्यांनाही पुनीत करणारे भारताचे तपोनिधि व भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी निद्रावस्थेंतच देहावसान झाल्याचे गुरुवार ता. ६-१२-५६ रोजी सकाळी सहा वाजता आढळून आले! ही दुःखद वार्ता कानी पडताच सारा भारत विव्हळ झाला. ‘भारतातील हिंदु समाजातल्या अनिष्ट रुढींविरुध्द केलेल्या बंडाचे प्रतीक’ असे उद्गार डॉ. बाबासाहेबांना श्रध्दांजली वाहताना नेहरुंनी ता. ६-१२-५६ रोजी लोकसभेत काढले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पार्थिव देह गुरुवार ता. ६-१२-५६ रोजी रात्री सव्वा तीन वाजता सांताक्रूझ विमानतळावर आणण्यात आला. हजारों लोकांनी तेथे त्यांच्या पार्थिव देहाला अभिवादन केले. दुपारी तीन वाजल्यापासून विमानतळावर लोकांची रीघ सुरू होती. तीनच्या सुमाराला सुमारे वीस हजार लोक विमानतळावर हजर होते. ही गर्दी सारखी वाढतच होती. मुंबईत त्यादिवशी दुपारपासूनच रस्त्याच्या दोन्ही बाजूस जागोजाग लोकांचे थवे उभे होते. या सर्वांच्या चेहेऱ्यांवर दुःखाची दाट छाया पसरलेली होती. अस्पृश्य समाजांतील स्त्रिया तर टाहो फोडून रडत होत्या. ‘आता आम्हाला कोण विचारणार?’ या आर्त वाणीने त्या एकमेकांकडे असहायतेने पहात होत्या. बाबासाहेबांच्या देहावसानाची बातमी पसरतांच मुंबईच्या बहुतेक सर्व गिरण्यांहून स्वयंस्फूतीने कामगार बाहेर पडले व त्यांनी अंतःकरणाच्या तळमळीने दुखवटा व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृति गेले काही दिवस बरी नव्हती. ते मंगळवारी राज्यसभेच्या बैठकीस हजर होते. बुधवारी मध्यरात्री ते झोपावयास गेले तेव्हा त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे दिसले नाही. गुरुवारी सकाळी सहा वाजता त्यांचा नोकर चहा घेऊन गेला तेव्हा त्यांचे प्राण पंचत्वांत विलीन झाले होते. निधन समयी त्यांचे वग पासष्ट वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच पंतप्रधान नेहरु, दळणवळण मंत्री श्री जगजीवनराम, राज्यसभेचे उपसभापती श्री. कुष्णमूर्ति राव आदींनी अलीपूर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रध्दांजली अर्पण केली. लोकसभा व राज्यसभा यांचे कामकाज त्यादिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृत्यर्थ तहकूब करण्यात आले.
विमानतळ ते ‘राजगृह’...!!!
त्या दिवशी पहाटे सांताक्रूझ विमानतळावरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शव दादर येथील हिंदू कॉलनीतील ‘राजगृह’ या त्यांच्या निवासस्थानी आणले जात असताना मुंबईतील व उपनगरांतील जनतेने त्यांना जी भावनापूर्ण श्रध्दांजली वाहिली तशी यापूर्वी अन्य नेत्यास क्वचित वाहिली असेल.
विमानातून डॉ. बाबासाहेबांचा पुष्पाच्छादित पार्थिव देह बाहेर काढताच विमानतळावरील डॉ. बाबासाहेबांच्या आप्तेष्ट स्त्रिया ओक्साबोक्शी रडू लागल्या. पुरुष मंडळींनासुध्दा आपले अश्रू आवरणे कठीण झाले. बाबासाहेबांचा पार्थिव देह घेऊन येणारे इंडियन एअर लाईन्स कार्पोरेशनचे खास विमान पहाटे दोन वाजता सांताक्रूझ विमानतळावर उतरले. त्यावेळी विमानतळावर पंचवीस हजार स्त्री-पुरुष उपस्थित होते. डॉ.बाबासाहेबांच्या अखेरच्या दर्शनाची संधि मिळावी म्हणून विमानतळाबाहेरील जागेत त्यांनी दोन रांगा केल्या होत्या. खुद्द विमानतळावर बाबासाहेबांचे आप्तष्ट व आचार्य मो. वा. दोंदे, बाबासाहेबांचे चिरंजीव यशवंतराव, श्री. बी. सी, कांबळे, श्री. मधु दंडवते, श्री. आर. डी. भंडारे व शेडयूल्ड कास्ट फेडरेशनचे आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. विमानांतून बाबासाहेबांचे शव बाहेर काढल्यावर त्याला पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सिध्दार्थ आर्टस व सायन्स कॉलेज, सिध्दार्थ लॉ कॉलेज, सिध्दार्थ कॉमर्स कॉलेज, शेडयुल्ड कास्ट्स फेडरेशन व भारतीय बौध्द महासभा यांच्यावतीने पुष्पहार घालण्यात आले. त्यानंतर नगरपालिकेच्या ऍम्ब्युलन्समध्ये शव ठेवण्यात आले व तेथून मूक मिरवणुकीस प्रारंभ झाला.
डोळयांत अश्रू, हातात फुले...!!!
सांताक्रूझ विमानतळ ते ‘राजगृह’ या पाच मैलांच्या रस्त्यावर ठिकठिकाणी दुतर्फा हजारो स्त्री-पुरुष नागरिक त्या दिवशी दुपारपासून आपल्या प्रिय नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी रात्रीची आणि थंडीची पर्वा न करता उभे होते. डॉ. बाबासाहेबांना घेऊन येणाऱ्या ऍम्ब्युलन्सची वाट पहात अफाट जनसमुदाय कित्येक तास तिष्ठत होता. त्यांच्या डोळयांत अश्रु आणि हातात फुले किंवा हार होते. सारा समुदाय अत्यंत शिस्तबद्व होता. ऍम्ब्युलन्सच्या पुढे पोलिसांची मोंटार होती. परंतु त्या मोटारीतून शिस्त व शांतता राखण्याच्या सूचना दिल्या. जाण्यापूर्वीच शिस्त आणि शांतता राखली जात होती.
सांताक्रूझ विमानतळ ते ‘राजगृह’ या पाच मैलांच्या रस्त्यावर ठिकठिकाणी दुतर्फा हजारो स्त्री-पुरुष नागरिक त्या दिवशी दुपारपासून आपल्या प्रिय नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी रात्रीची आणि थंडीची पर्वा न करता उभे होते. डॉ. बाबासाहेबांना घेऊन येणाऱ्या ऍम्ब्युलन्सची वाट पहात अफाट जनसमुदाय कित्येक तास तिष्ठत होता. त्यांच्या डोळयांत अश्रु आणि हातात फुले किंवा हार होते. सारा समुदाय अत्यंत शिस्तबद्व होता. ऍम्ब्युलन्सच्या पुढे पोलिसांची मोंटार होती. परंतु त्या मोटारीतून शिस्त व शांतता राखण्याच्या सूचना दिल्या. जाण्यापूर्वीच शिस्त आणि शांतता राखली जात होती.
बाबासाहेबांचा चेहरा सर्वांना दिसावा म्हणून ऍम्ब्युलन्समध्ये खास प्रकाश योजनेची व्यवस्था करण्यात आली होती. सांताक्रुझ ते दादर हे पाच मैलांचे अंतर एरवी मोटारीने वीस मिनिटात तोडता येते.परंतू सर्वांना बाबासाहेबांचे अखेरचे दर्शन मिळावे व त्यांना पुष्पाजंलि वाहता यावी म्हणून ऍम्ब्युलन्सचा वेग अगदी कमी करण्यात आला होता. ऍम्ब्युलन्सने रात्री अडीच वाजता सांताक्रुझ सोडले. परंतु ती दादरला राजगृहात येईपर्यत पहाटेचे पांच वाजले होते. या एकाच गोष्टीवरुन सांताक्रुझ, कुर्ला, सायन, माटूंगा, दादर येथील नागरिक किती मोठया संख्येने उपस्थित होते त्याची कल्पना येईल.
राजगृहापाशी...!!!
बरोबर पाच वाजून पाच मिनिटानी ऍम्ब्युलन्स राजगृहाशी आली. तोपर्यत तेथे रात्रभर साडेतीन लाख लोक ऍम्ब्युलन्सची वाट पहात बसून होते. ‘बुध्दं सरणं गच्छामि’ ची प्रार्थनाही तेथे सतत चालू होती. ऍम्ब्युलन्स राजगृहापाशी येताच लोकांनी इतकी गर्दी केली की, पांच सात मिनिटे पोलिसांना व समता सैनिक दलाच्या सैनिकांनी ती आवरणे अशक्य झाले. तथापि नेत्यांच्या विनंतीस मान देऊन सर्वांनी पूर्ववत् शिस्त शांतता स्थापन केली. बरोबर सव्वा पाच वाजता मेणबत्त्यांच्या मंगल प्रकाशात व उदबत्त्यांच्या सुवासांत डॉ. बाबासाहेबांचे शव ऍम्ब्युलन्समधून उतरविण्यात आले. त्यावेळी तेथे असलेले लाखो लोक धाय मोकलून रडत होते. अर्ध्या तासानंतर डॉ.बाबासाहेबांच्या पार्थिव देहाचे अत्यंदर्शन घेण्याची जनतेस मुभा देण्यात आली. विमानतळावर उपस्थित असलेल्या हजारों लोकांपैकी अनेक लोक चालत आले होते. दुपारी तीन वाजल्यापासून ते विमान येईल म्हणुन ते वाट पहात होते. विमानतळावरील एक हमाल म्हणाला ”आज खरोखर माझी डयुटी नाही. परंतु बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन जवळून घेण्याची संधी मिळावी म्हणून मी डयुटीवरचा पोशाख घालून आलो आहे.’ विमानतळावरील दुसरा एक अधिकारी म्हणाला, ”अापल्या आवडत्या पुढाऱ्याचे दर्शन मिळावं म्हणून बारा बारा तास वाट पाहणारे अनुयायी ज्याला लाभतात त्याच्या लोकोत्तरपणाला तुलनाच नाही.”
‘राजगृहा’तील दर्शन...!!!
‘राजगृहा’च्या पश्चिमाभिमुखसज्जांत बाबासाहेबांचे शव ठेवण्यासाठी शामियाना उभारण्यांत आला होता. या शामियान्यांत पुष्पशय्येवर पार्थिव देह ठेवण्यात आला. त्यांच्या उशाकडील बाजूला बाबाचे पुतणे मुकुंदराव व दलित फेडरेशनचे नेते होते. दर्शनोत्सुक जनतेला थोपवितांना ‘समता दला’ च्या सैनिकांना अतिशय जड जात होते. पोलिसांच्या पलटणीही लोकांना आटोक्यात आणण्यासाठी धडपडत होत्या. दलित जनतेला काबूत आणणे कठीण जात होते. आदल्या दिवसापासून तिष्ठत असलेल्या आणि क्षणाक्षणाला वाढत असलेल्या त्या प्रचंड समुदायाचा धीर आता सुटत चालला होता. अक्षरश: ओक्साबोक्शी रडत हे स्त्री-पुरुष ‘राजगृहा’च्या कुंपणावर लोटत होते. तरीसुध्दा ‘राजगृहा’ भोवतालच्या परिसरात एवढाही गोंधळ गर्दी आढळून येत नव्हती. ‘समता दैनिक दला’ च्या सैनिकांनी शेवटी लोकांच्या रांगा करण्यात यश मिळविले. या रांगा मध्य रेल्वेच्या दादर स्टेशनपासून रुईया महाविद्यालयाला वळसा घालून ‘राजगृहा’ च्या प्रवेशद्वारापाशी पोहोचल्या होत्या.
नवयुग-मराठा तर्फे पुष्पाजंली...!!!
सकाळी साडेसात वाजल्यानंतर सर्व पक्षांचे मान्यवर नेते अत्यंदर्शनासाठी व पुष्पांजली अर्पण करण्यासाठी येऊ लागले. हिंदी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र कमिटीचे अध्यक्ष कॉ. मिरजकर, समाजवादी पक्षाचे नेते रोहीत दवे व हॅरीस,मिल मजदुर पक्षाचे बापूराव जगताप आदि मंडळी सकाळी पुष्पहार अर्पण करून गेली. साडेआठच्या सुमारास आचार्य अत्रे येऊन त्यांनी दैनिक ‘मराठा’व साप्ताहीक ‘नवयुग’ तर्फे बाबासाहेबांच्या पार्थिव देहाला पुष्पाजंली वाहिली. बाबासाहेबांचे अत्यंदर्शन घेतांना आचार्य अत्रे यांचे डोळे पाणावले. हे पाहून भोवतालच्या मंडळींना शोकावेग आवरणे कठीण गेले.
स्मृतीला अभिवादन...!!!
श्री. नाना पाटील त्यादिवशी साताऱ्याला होते. त्यांना ही दु:खद वार्ता समजताच ते ताबडतोब मुंबईस निघून आले. त्यांनीही बाबांच्या स्मृतीला अभिवादन केले. कॉ.डांगे येथे नसल्यामुळे त्यांच्या वतीने सौ. उषाताई डांगे व कन्या यांच्यासह येऊन त्यांनी पुष्पहार अर्पण केला. बाबासाहेबांच्या या जुन्या सहकाऱ्याने बाबासाहेबांच्या पुष्पशेजेवर शीर नमवितांच तिथे गंभिर शांतता पसरली.
‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ चे कार्यवाह श्री. राम मोहाडीकर ‘रुपारेल महाविद्यालया’ चे प्राचार्य चि. व. जोशी, ‘सिध्दार्थ’ चे डॉ. हेमंत कर्णिक, प्रा. अनंत काणेकर आदि नामवंत मंडळींनी पुष्पहार अर्पण केले.
जगातल्या कोणत्याही सामर्थ्यापेक्षा, राज्यसत्तेपेक्षांहि मानवी अंत:करणातल्या भावना किती शक्तीमान, तेजस्वी व स्थलकालाची, अंतराची बंधने जुमानत नसतात. यांचे प्रत्युतर मुंबईच्या जनतेला ता. ३। ११। ५६ ला दिसून आले.
बाबासाहेबांच्या परिनिर्वाण यात्रेसाठी जो दहा लाखांचा जनसागर त्यादिवशी गोळा झाला होता त्याने काही तास तरी मुंबइंचे सारे यांत्रिक जीवन स्थगितच केले होते. ज्या ज्या भागातून मिरवणूक गेली त्या त्या भागातील सारे व्यवहार बंद पडले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माणसे धावत होती.
एखाद्या नदीला पुराचा लोंढा यावा त्याप्रमाणे लोकांच्या झुंडी रत्यावरून धावताना दिसत होत्या. जनसागराच्या भावनांचे जे विराट दर्शन दादर चौपाटीच्या परिसरांत पाहायला मिळाले, ते पाहिल्यानंतर ही भावनांची शक्ति जगातल्या कोणत्याही अन्यायी शक्तिपुढे कधीच मान तुकवणार नाही याचा साक्षात्कार सर्वाना झाला.
(दै. मराठाच्या ७ डिसेंबर १९५६ च्या अंकातून साभार)
No comments:
Post a Comment