My Followers

Saturday, 23 June 2012

भिमकवी वामनदादा....!!!


 

भिमकवी वामनदादा....!!! 

                                                      चांदण्याची छाया..!!!

चांदण्याची छाया कापराची काया
माऊलीची माया होता माझा भीमराया....

चोचीतला चारा देत होता सारा
आईचा उबारा देत होता सारा
भीमाईपरी चिल्यापिल्यावरी
पंख पांघराया होता माझा भीमराया....

बोलतात सारे विकासाची भाषा;
लोपली निराशा आता...लोपली निराशा ;
सात कोटीमधी विकासाच्या आधी
विकासाचा पाया होता माझा भीमराया....

झाले नवे नेते मलाईचे धनी ;
वामनाच्या मनी येती जुन्या आठवणी;
झुंज दिली खरी रामकुंडावरी;
दगडगोटे खाया होता माझा भीमराया.....



आमचा वाटा ....!!!

सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?
सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो?

घाम शेतात आमचा गळे, चोर ऐतच घेऊन पळे
धन चोरांचा हा पळण्याचा फाटा कुठाय हो?

न्याय वेशीला टांगा सदा, माल त्याचा की आमचा वदा
करा निवाडा आणा तराजु , काटा कुठाय हो?

लोणी सारं तिकडं पळं, इथं भुकेनं जिवडा जळं
दुकानवालेदादा आमचा आटा कुठाय हो?

इथ बिऱ्‍हाड उघड्यावर, तिथं लुगडी लुगड्यावर
या दुबळीचं धुडकं-फडकं धाटा कुठाय हो?

इथं मीठ मिरची अन् तुरी, तिथं मुरगी काटा सुरी
सांगा आम्हाला मुरगी कटलेट काटा कुठाय हो?

शोधा सारे साठे चला, आज पाडा वाडे चला
वामनदादा आमचा घुगरी घाटा कुठाय हो?



दीनांच्या चाकरीसाठी ....!!!

भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे
दीनांच्या चाकरीसाठी तुझे इमान मागावे.

उपाशी जीव हे कोटी तयांची भूक भागावी
अशासाठी तुझ्याकडचे भीमाचे ज्ञान मागावे.

निवारा ना कुठे थारा अशांच्या आसऱ्‍यासाठी
मनाच्या मंदिरी थोडे तयांना स्थान मागावे.

भूमी ती भीमरायाची तुझ्या हाती आता आली,
मलाही पेरणीसाठी जरासे रान मागावे.

तुझी निष्ठा, तुझे जीवन, तुझी श्रद्धा भीमावरची
नसावी नाटकी “वामन” खरे बलिदान मागावे.

स्तूप....!!! 

जेथे समाज सारा हा एकरूप आहे,
तेथेच खरा माझ्या बाबांचा स्तूप आहे.                

वादात रंगते ना, रंगून भंगते ना
नेत्रूत्व ते अम्हाला तीर्थस्वरूप आहे.

द्वेषाचा दर्प नाही, तो काळसर्प नाही
सत्कारणी क्रूतीचा जेथे हुरूप आहे.

तनमनाने धनाने, जळतो धिमेपणाने
मानू तयास आम्ही तो भीमरूप आहे.


भीमरायाच्या मुला...!!!

तुडवाया टपले तुला,
वैराण रानच्या फुला
ही जाण असु दे तुला
रे भीमरायाच्या मुला.

भवताली वस्ती मधील,
जन आले मस्तीमधी
ते नडती आपुल्या भुला रे....

त्या उजाड माळावरी
कुणी काळी करनी करी
वन जळे आजुबाजूला रे....

सांगणे भीमाचे तुला,
सांभाळ तुझ्या घरकुला
सांभाळ प्राण आपुला रे....

लाडक्या भीमाच्या मुला
वामनच्या फुलत्या फुला
घे तळ हाताचा झुला रे....

जरी संकटाची काळरात होती....!!!

जरी संकटाची काळरात होती
तरी भीमराया तुझी साथ होती.
तुझी तेवण्याची सुरूवात होती,
प्रकाशात माझी पिढी न्हात होती.

पालवीत होते प्रकाशाचे गोळे,
चालवीत होते तुझे दोन डोळे,
प्रकाशाचे गाणे मनी गात होती....
अशी फौज माझी पुढे जात होती.

काळ्या काळजाची काळी काळदाती,
दात खात होती, पुढे येत होती,
तिचे काळे काळे, सुळे पाडण्याची
तुझी रग माझ्या मनगटात होती....

गणतीच माझी गुलामात होती
जिँदगीच माझी सलामात होती
तोडलीस माझी गुलामीची बेडी
अशी झुंजणारी तुझी जात होती.

मला दावलेली तुझी पायवाट
झाली अता ती विकासाची वाट
वदे आज "वामन" कालची तुझी ती
पेरणी उद्याच्या विकासात होती.


आम्ही तुफानातले दिवे....!!!

तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे
तुफान वारा पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे.

हल्ल्यावरती होती हल्ले अभंग अमुचे बाले किल्ले
असाच ताठर माथा अमुचा जरा न खाली लवे.

हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा
ह्या वाऱ्‍याने मावळणारी जात आमुची नव्हे.

तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून
भीमयुगाच्या निरांजनातून तेल मिळाले नवे.

काळ्या धरणीवरचे काळे, काळाने विणलेले जाळे
करील काळे आपुले अता काळ्या करणीसवे.

एक दिव्याने पेटवलेले,चरितेसाठी पाठविलेले
काळ्या रानी अखंड येथे फिरती आमुचे थवे.

जळू परंतू धरती उजळू ,प्रकाश येथे असाच उधळू
सदा चांदणे सुखी नांदणे हेच आम्हाला हवे..

------------------------------------------------------------------------------------------
आंबेडकरी अंगाई....!!!

बाळा थांब रे जोजविते
तुला उचलुन कडेवर घेते ।।धृ।।
तो पहा दिवस वर किती आला

... आज माझ्या धंद्याला उशिर झाला
येता जाता तुला हलविते
तुला उचलुन कडेवर घेते.....।।1।।

तो पहा पुढा-यांनी दिंडोरा दिला
सर्व जगात हा आवाज झाला
जिकडे तिकडे जयभिम गर्जते
तुला उचलुन कडेवर घेते।।2।।

ते पहा समता सैनिक आले मैदानी
हाती निळा झेंडा तो फडके गगणी
डोंगर माथ्‍याऊन उंच दिसते..
तुला उचलुन कडेवर घेते।।3।।

तो पहा भगवान बुद्ध आपल्‍या घरी
बाबा भिम बैसले त्‍यांच्‍या शेजारी
तुला मला सर्वांना पाहते
तुला उचलुन कडेवर घेते....।।4।।

3 comments: