My Followers

Tuesday, 30 October 2012

दलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी ? - पु.ल.


दलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी ? - पु.ल.


चंद्रपूर येथील अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ४ मार्च १९८९ ला पुलंनी केलल्या भाषणातला अंश... 


आयुष्यात माणसाला निखळ माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देणारा मंत्र मला केशवसुतांच्या ' मळ्यास माझ्या कुंपण पडणें अगदी न मला साहे ' या ओळीत सापडला. शाळकरी वयापासून आजतागायत केशवसुतांना मी अनेक वेळा भेटत आलो. माझ्याप्रमाणे तुमच्यापैकी अनेकांसाठी केशवसूत आजही गातचि बसले आहेत. वाढत्या वयाबरोबर आसपास पाहायला लागल्यावर वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाच्या मळ्याला जात, धर्म, राष्ट्रीयत्त्वाच्या भ्रामक कल्पना, देव, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म, पूर्वजन्म, कर्मविपाक अशा नाना प्रकारची नाना कारणांनी उभारलेली असंख्य कुंपणं दिसायला लागली.


ऐहिक आणि पारलौकिक दहशतीच्या दगडांच्या भिंतीची ती कुंपणं होती. अशा या अंधा-या वातावरणात जगणा-यांच्या जीवनात वीज चमकावी, गडगडाट व्हावा, मुसळधार पाऊस कोसळून नांगरल्याविण पडलेल्या भूमीवर नवं पीक येण्याची चिन्हं दिसावी अशी अवस्था झाली. बाबासाहेबांनी एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुनं जग उलथवण्याची शक्ती असलेलं साहित्य उभं राहिलं. तो शब्द म्हणजे ' धम्म ' . ' धम्म ' या शब्दानं समाजात माणसाचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटलं. बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असं झालं नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचं त्यांना जिथे अपूर्व मिश्रण आढळलं, त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. अंधश्रद्धांवर आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणा-या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचं नाव 'धम्म' असं आहे. 


बाबासाहेब हे सामाजिक शोषणाच्या पाळामुळाशी जाऊन कुदळ चालवणारे पहिले क्रांतिकारक म्हणायला हवेत. उन्मत्ताच्या टाचेखाली रगडल्या जाणा-या माणसाला माणुसकीच्या प्राथमिक हक्कांसाठी लढणारा सैनिक म्हणून उभं करणं हे एक दिव्य होतं. बाबासाहेबांनी ते करून दाखवलं. चवदार तळ्याचं पाणी सर्वांना वापरायला द्यायची घोषणा म्हणजे बाबासाहेबांनी आंधळ्या रुढी पाळणा-या अमानुषांना निखळ सुंदर माणसं बनवण्याची दिलेली एक सुवर्णसंधी होती.


दलित साहित्याचं जे सूर्यकूल आपण मानतो त्याची पहाट महाडच्या क्षितीजावर फुटली होती, असं म्हणायला पाहिजे. शरसंधानासारखं हे शब्दसंधान होतं. एका नव्या त्वेषाने पेटलेल्या कवींना आणि कथा-आत्मकथा-कादंबरीकारांनी या प्रतिमासृष्टीतून वास्तवाचं जे दर्शन घडवलं, ते साहित्यात अभूतपूर्व असं होतं. जिथे धर्म, वर्ण, वर्ग या शक्ती माणसाच्या छळासाठी अन्याय्य रीतीने वापरल्या जातात, तिथे त्या प्रवृत्तींचा नाश करायला शस्त्र म्हणून जेव्हा शब्द वापरले जातात त्या क्षणी दलित साहित्याचा जन्म होतो. त्या साहित्यिकाचा जन्म कुठल्या जातीत आणि कुठल्या धर्मात झाला याचा इथे काहीही संबंध नाही. शोषण, उपेक्षा, जन्मावरून उच्चनीच भेद ठरवणा-या रुढी यांचा बीमोड करायला उठलेलं हे साहित्य फक्त माणुसकीला मानतं. ' बहुजन हिताय बहुजन सुखाय ' हीच मुळी या साहित्याची मूळ प्रतिज्ञा आहे. वास्तवाशी इमान राखून तिथे पदोपदी जाणवणा-या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, या ध्येयाने प्रेरित झालेले हे साहित्य जन्मजातच दुय्यम दर्जाचे, असा साहित्यिक हिशेब मांडणा-यांना दलित साहित्य हा शब्द खटकणारच.


दलित शब्दाची व्याप्ती लक्षात न घेणा-यांना दलित संमेलन हा सवतासुभा वाटतो. पण ही विचारसरणी नवी नाही. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हा विश्वव्यापी विचार घेऊन लढलेल्या आंबेडकरांना हिंदू समाजातल्या अस्पृश्यांचे पुढारी म्हणून एका कुंपणात टाकून देण्यात आले होते. त्यांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या साहित्यालाही अशाच प्रकारचं लेबल लावून त्यामागील व्यापकता आकुंचित करण्यात आली तर त्यात नवल नाही. बाबासाहेबांसारखा ग्रंथप्रेमी आजच्या काळात लाखात एखादा झाला असेल. पण जीवनातला त्यांचा प्रवास मात्र ग्रंथाकडून ग्रंथाकडे असा झाला नाही. ग्रंथाकडून जीवनाकडे आणि जीवनाकडून ग्रंथाकडे अशी त्यांची परिक्रमा चालली होती. अशी जीवनातून प्रेरणा घेऊन पुन्हा जीवनालाच सार्थ करणारे साहित्य निर्माण करायची प्रेरणा लाभावी या साहित्य संमेलनाचा प्रपंच आहे, असं मी मानतो.


पुनर्संपादन - अँड. राज जाधव...!!!  
संदर्भ - म.टा. १२ जून २००८ 

1 comment: