My Followers

Thursday, 25 October 2012

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा.....!

                                            
  महात्मा ज्योतीराव फुलेंचा छत्रपती  शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा             




कुळवाडी - भुषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||
लंगोट्यास देई जानवी पोषींदा कूणब्यांचा |
काळ तो असे यवनांचा ||
शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा |
असे तो डौल जाहागिरीचा ||
पंधराशे एकूणपन्नास साल फळले |
जुन्नर तें उदयास आले ||
शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले |
जिजाबाईस रत्न सापडले ||
हातापायांची नख़े बोट शुभ्र प्याजी रंगीले |
ज्यांनी कमळा लाजविले ||
वर ख़ाली टिर्‍या पोटर्‍या गांठी गोळे बांधले |
स्पटिकापरी भासले ||
सानकटी सिंहापरी छाती मांस दुनावले |
नांव शिवाजी शोभले ||
राजहौंसी उंच मान माघे मांदे दोंदीले |
जसा का फणीवर डोले ||
एकसारखे शुभ्र दांत चमकू लागले |
मोती लडी गुंतविले ||
रक्‍तवर्ण नाजूक होटी हासू छपविले |
म्हणोन बोबडे बोल ||
सरळ नीट नाक विशाळ डोळ्यां शोभले |
विषादें म्रुग वनी गेले ||
नेत्र तिखे बाणी भवया कामठे ताणिले |
ज्यांनी चंद्रा हाटविले ||
सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबले |
कुरळे केस मोघीले ||
आजानबाहू पायांपेक्षा हात लांबलेले |
चिन्ह गादिचे दिसले ||
जडावाची कडी तोडे सर्व अलंकार केले |
धाकट्या बाळा लेविवले ||
किनखांबी ठंकोचे मोती घोसाने जडले |
कलाबतुचे गोंडे शोभले ||
लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले |
डाग लाळीचे पडलेले ||
हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे |
पायी घुंगरू खुळखुळे ||
मारी लागोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले |
ख़ेळण्यावर डोळे फिरविले ||
मजवर हा कसा ख़ेळणा नाही आवडले |
चिन्ह पाळणी दिसले ||
टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले |
पाळण्या हालवू लागले ||
धन्य जिजाबाई जिने जो जो जो जो जो केले |
गातों गीत तिने केले ||
||चाल ||
जो जो जो जो जो जो गाऊं, जी जी जी जी जी जी गाऊं |
चला वेरूळांस जाऊ, दौलताबादा पाहू ||
मूळ बाबाजींस ध्याऊ, किर्ती आनंदाने गाऊ |
सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधराऊ ||
पाटिल होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ |
थोर विठाजी नाव घेऊ, सान मालोजी त्याचा भाऊ |
दिपाबाई त्यास देऊ, छंदाजोगा गिती गाऊं ||
|| चाल ||
मालोजी राजा | तुझा बा आजा ||
यवनी काजा | पाळिल्या फौजा ||
लाविल्या ध्वजा | मारिल्या मौजा ||
वेळेस मुक्का | साधल्या बुक्का ||
विचारी पक्का | जाधवा धक्का ||
शेशाप्पा नायका | ठेविचा पैका ||
द्रव्याची गर्दी | चांभारगोंदी ||
देवळे बांधी | तळी ती खांदी ||
आगळी बुध्दी | गुणाने निधि ||
लिहीले विधि | लोकांस बोधी ||
संधान साधी | जसा पारधी ||
भविषी भला | कळले त्याला ||
सांगोनी गेला | गादी बा तुला ||
उपाय नाही जाणोन चाकर झाला यवनाचा |
शिपाई होता बाणीचा ||
खोट्या दैवा कोण खोडी बेत देवाजीचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भुषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा || १||

वडील बंधु संभाजीने लळे पुरविले |
धाकट्यासवे ख़ेळले ||
उभयतांचे एकचित तालमीत गेले |
फरीगदग्या शिकले ||
आवडीने खमठोकी कुस्ती पेचाने खेळे |
पवित्र दस्तिचे केले ||
द्वादशवर्षी उमर आली नाही मन धाले |
घोडी फिरवू लागले ||
अट्टल घोडेस्वार भाला बोथाटी शिकले |
गोळी निशाण साधले ||
कन्या वीर जाधवाची जिने भारथ लावले |
पुत्रा नीट ऐकविले ||
अल्पवयांचे असता शिकार करू लागले |
माते कौतुक वाटले ||
नित्य पतीचा आठव डोंगर दुखाःचे झाले |
घर सक्‍तिने घेतले |
छाती कोट करून सर्व होते साठविले|
मुखमुद्रेने फसविले ||
चतुर शिवाजीने आईचे दुःख ताडिले |
पित्यास मनी त्यागिले ||
पुत्राचे डोळे फिरले माते भय पडले |
हीत उपदेशा योजिले ||
मनी पतिभक्‍ती पुता बागेमधी नेले |
वृक्षाछायी बसविले ||
पुर्वजांचे स्मरण करून त्यास न्याहाळिले |
नेत्री पाणी टपटपले ||
या क्षेत्राचे धनी कोण कोणी बुडविले |
सांगते मुळी कसे झाले ||
क्षेत्रवासी म्हणोन नाव क्षत्रिय धरले |
क्षेत्री सुखी राहीले ||
अन्य देशिंचे दंगेखोर हिमालयी आले |
होते लपुन राहीले ||
पाठी शत्रुभौती झाडी किती उपासी मेले |
गोमांसा भाजून धाले ||
पाला फळे खात आखेर ताडपत्रा नेसले |
झाडी उल्लघून आले ||
लेखणीचा धड शीपाया सेनापती केले |
मुख्य ब्रम्हा नेमले ||
बेफाम क्षेत्रिय होते अचूक टोळ उतरले |
कैदी सर्वास केले ||
सर्व देशी चाल त्याचे गुलाम बनविले |
डौलाने क्षुद्र म्हणाले ||
मुख्य राजा झाला ज्याने कायदे केले |
त्याचे पुढे भेद केले ||
ब्रम्हा मेल्यावर परशराम पुंड माजले |
उरल्या क्षत्रिया पिडीले ||
माहारमांग झाले किती देशोधडी केले |
ब्राम्हण चिरंजीव झाले ||
देश निक्षत्रीय झाल्यामुळे यवना फावले |
सर्वास त्याही पिडीले ||
शुद्र म्हणती तुम्हा ह्रुदयी बाण टोचले |
आज बोधाया फावले ||
गाणे गाते ऐक बाळा तुझ्या आजोळी शिकले |
बोली नही मन धाले ||
||चाल ||
क्षेत्र क्षत्रियांचे घर,तुझे पित्रु महावीर |
सुखा नसे त्यांच्या पार, आल्यागेल्याचे माहेर||
शीखराकार डोंगर, नानावल्ली तरूवर ||
दरी खोरी वाहे नीर खळखळे निरंतर |
झाडा फुले झाला भार, सुगंधी वाहे लहर |
पक्षी गाती सोळा स्वर, मंजूळ वाणी मनोहर ||
नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार |
भूमी अती काळसर, क्षेत्र देई पीक फार ||
धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियांस मार |
दास केले निरंतर, ब्रम्हा झाला मनी गार ||
लोभी मेले येथे फार, विधवा झाल्या घरोघर |
उपाय नाही लाचार, स्त्रिया बंदी पाटावर ||
दुसरा झाला शिरजोर, परशा तोबा कठोर ||
मार त्याचा अनिवार, केला क्षत्रिया संव्हार ||
क्षत्रिय केले जरजर, भये कांपे थरथर |
दुःखा नाही त्यांच्या पार, ठाव नाही निराधार ||
बहू केले देशापार, बाकी राही मांगमाहार |
निक्षेत्री झाल्यावर, म्लेच्छे केले डोके वर ||
आले सिंधू नदीवर, स्वार्‍या केल्या वारोंवार |
गाते काटांवात सार, लक्ष देई अर्थावर ||
||चाल ||
काबुला सोडी | नदांत उडी ||
ठेवितो दाढी | हिंदूस पिडी ||
बामना बोडी | इंद्रिये तोडी ||
पीडिस फोडी | देऊळे पाडी ||
चित्रास तोडी | लेण्यास छेडी ||
गौमांसी गोडी | डुकरांसोडी ||
खंड्यास ताडी || जेजुरी गडी ||
भुंग्यास सोडी | खोडीस मोडी ||
मुर्तीस काढी | काबूला धाडी||
झादीस तोडी | लुटली खेडी ||
गडांस वेढी | लावली शिडी ||
हिंदूस झोडी | धर्मास खोडी ||
राज्यास बेडी | कातडी काढी ||
गर्दना मोडी | कैलासा धाडी ||
देऊळे फोडी | बांधीतो माडी ||
उडवी घोडी | कपाळा आढी ||
मीजास बडी | ताजीम खडी ||
बुरखा सोडी || पत्नीस पीडी ||
गायनी गोडी || थैलिते सोडी ||
माताबोध मनी ठसतां राग आला यवनांचा |
बेत मग केला लढण्याचा ||
तान्हाजी मालुसरे बाजी पासलकराचा |
स्नेह यशाजी कंकाचा ||
मित्रा आधी ठेवी जमाव केला मावळ्याचा |
पूर करी हत्यारांचा ||
मोठ्या युक्‍तीने सर केला किल्ला तोरण्याचा |
रोविला झेंडा हिदूंचा ||
राजगड नवा बांधिला उंच डोंगराचा |
भ्याला मनी विजापूराचा ||
दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा |
दादोजी कोंडदेवाचा ||
मासा पाणी खेळे गुरू कोण असे त्याचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी- भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||२||

जाहागिरचा पैसा सारा लावी खर्चात |
चाकरी ठेवी लोकांस ||
थाप देऊन घेई चाकण किल्ल्यास |
मुख्य केले फिर्डोजीस ||
थोड्या लोकांसहीत छापा घाली सुप्यास |
कैद पाहा केले मामांस ||
सुप्या सोबत हाती घेतले तीनशे घोड्यास |
करामत केली रात्रीस ||
मुसलमानां लांच देई घेई कोडाण्यास |
सिंहगड नाव दिले त्यास ||
पुरंधरी जाई जसा भला माणूस न्यायास |
कैद पाहा केले सर्वांस ||
गांव इनाम देऊन सर्वां ठेवी चाकरीस |
मारले नाही कोणास ||
वाटेमधी छापा घालून लूटी खजिन्यास |
साठवी राजगडांस||
राजमाची लोहगडी लढे घेई तिकोण्यास ||
बाकी चारा किल्ल्यास ||
मावळ्यांस धाढी कोकणी गाव लुटायांस |
धूर्त योजी फितुरास ||
सन्मान कैद्या देई पाठवी वीजापूरास |
मुलान्या सुभेदारांस ||
विजापूरी मुसलमाना झाला बहू त्रास |
योजना केली कपटांस ||
कर्नाटकी पत्र पाठवी बाजी घोरपड्यास |
कैद तुम्ही करां शहाजीस ||
भोजनांचे निमित्त केले नेले भोसल्यास |
दग्याने कैद केले त्यास ||
थेट शहाजी कैदी आणिला विजापूरास |
खुशी मग झाली यवनांस ||
चिरेबंदी कोठडीमध्ये बंद केले त्यास |
ठेविले भोक वार्‍यास ||
शाहाजीला पिडा दीली कळाले शिवाजीस |
ऐकून भ्याला बातमीस ||
पिताभक्‍ती मनी लागला शरण जायास |
विचारी आपल्या स्त्रियेस ||
साजे नाव सईबाई स्त्री सुचवी पतीस |
ताडा दंडी दुसमनास ||
स्त्रीची सुचना सत्य आसली लिहीले पत्रास |
पाठवी दिल्ली मोगलांस ||
चाकर झालो तुमचा आता येतो चाकरीस |
सोडवा माझ्या पित्यास ||
मोगल थैली गेली थेट मुसलमानास |
ठेविले किल्ल्यावर त्यास ||
बाजी शामराज का लाजला जात सांगायास |
धरू पाही शिवाजीस ||
धेड म्हणावा नाक नाही द्यावा कोणांस |
आडचण झाली बखरीस ||
सिध्दीस बेत गेला नाही अंती भ्याला जिवास |
काळे केले महाडास ||
शाहाजीचा बाजी आखेर घेईल बक्षीस |
हा पाजी मुकला जातीस ||
करनाटकी आज्ञा झाली शाहाजीस |
यवन भ्याला सिंहास ||
वर्षे चार झाली शिवला नाही कबजास |
पिताभक्‍ती पुत्रास ||
चंद्रराव मोर्‍यास मारी घेई जावळीस |
दुसरे वासोट्या किल्ल्यास ||
प्रतापगड बांधी पेशवा केला एकास |
नवे योजी हुद्यास ||
आपली बाकी काढी धाढी पत्र तगाद्यास |
चलाखी दावी मोगलांस ||
रात्री जाऊनी लुटी जुन्नरास |
पाठवी गडी लुटीस ||
आडमार्ग करी हळूच गेला नगरांस |
लुटी हत्तिघोड्यांस ||
उंच वस्त्रे, रत्ने होन कामती नाही द्रव्यास |
चाकरी ठेवी बारगिरास ||
समुद्रतिरी किल्ले घेई पाळी गलबतास |
चाकरी ठेवि पठाणास ||
सिद्दि पेशव्या आपेश देई घेई यशास |
उदासी लाभ शिवाजीस ||
आबजूलखान शूर पठाण आला वाईस |
शोभला मोठा फौजेस ||
हत्ती बारा हजार घोडा त्याचे दिमतीस |
कमी नाही दारूगोळिस ||
कारकुनाला वचनी दिले हिवरे बक्षिस |
फितवीले लोभी ब्राम्हणास ||
गोपीनाथ फसवी पठाणा आणी एकांतास |
चुकला नाही संकेतास ||
माते पायी डोई ठेवी, लपवी हत्यारास |
बरोबर आला बेतास ||
समीप येता शिवाजी जसा भ्याला व्याघ्रास |
कमी करी आपल्या चालीस ||
गोपीनाथ सुचना देई भोळ्या यवनांस |
भ्याला तुमच्या शिपायांस ||
त्या अधमांचे एकून शिपाई केला बाजूस |
लागला भेटू शिवाजीस ||
वर भेटभाव वाघनख मारी पोटास |
भयभित केले पठाणास ||
पोटी जखम सोसी केला वार शिवाजीस |
झोंबती एकमेकांत ||
हातचलाखी केली विंचवा मारी शत्रूस |
पठाण मुकला प्राणास ||
स्वामीभक्‍ती धाव घेई कळले शिपायास |
राहिला उभा लढण्यास ||
त्याची धोप घेई शिवाजी बचवी आपल्यास |
तान्हाजी भिडे बाजूस ||
दांती दाढी चावी तोडी घेई धनी सूडास |
घाबरे केले दोघांस ||
नाव सय्यद बंडू साजे शोभा आणी बखरीस |
लाथाळी जीवदानास ||
तान्हाजीला हूल देई मारी हात शिवाजीस |
न्याहाळी प्रेती धन्यास ||
उभयतांसी लढता मुकला आपल्या प्राणास |
गेला जन्नत स्वर्गास ||
छापा घाली मारी करी कैद बाकी फौजेस |
पठाणपुत्र खाशा स्त्रियेस ||
चार हजार घोडा लूट कमी नाही द्रव्यास |
दुसर्‍या सरंजामास ||
अलंकार वस्त्रे देई सर्व कैदी जखम्यास |
पाठवि विजापूरास ||
वचनी साचा शिवाजी देई हिवरे बक्षीस |
फितुर्‍या गोपीनाथास ||
नाचत गात सर्व गेले प्रतापगडास|
उपमा नाही आनंदास || ||चाल ||
|| शिवाचा गजर जयनामाच झेंडा रोविला ||
||क्षेत्र्याचा मेळा मावळ्यांचा शिकार ख़ेळला ||
माते पायी ठेवी डोई गर्व नाही काडीचा |
आर्शिवाद घेई आईचा ||
आलाबला घेई आवडता होता जिजीचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||३||

लढे रांगणी विशाळगडी घेई पन्हाळ्यास |
केले मग सुरू खंडणीस ||
रुस्तुल जमाना आज्ञा झाली विजापूरास |
नेमिला कोल्हापुरास |
स्वार तिन हजार घेई थोड्या पायदळास |
आला थेट पन्हाळ्यास ||
मार देत शिवाजी पिटी कृष्णा पैलतडीस |
अति जेर केले त्यास |
खंडणी घेत गेला भिडला विजापुरास |
परत मग आला गडास ||
राजापुर दाभोळ लूटी भरी खजिन्यास |
मात गेली विजापुरास ||
सिध्दीजोहरा नेमी मोठी फौज दिमतीस |
सावंत सिद्दी कुमकेस ||
बंदोबस्त करी शिवाजी राही पन्हाळ्यास |
करी मग जमा बेगमीस ||
वारंवार छापे घाली लुटी भौती मुलखास |
केले महाग दाण्यास ||
त्रासाने खवळून वेढा घाली शिवाजीस |
कोंडिले गडी फौजेस ||
चार मास लोटले शिवाजी भ्याला वेढ्यास |
योजनां करी उपायास ||
कोकणांमधी सिध्दी झोडी रघुनाथास|
उपद्रव झाला रयतेस ||
पासलकर बाजीराव पडाले वाडीस |
दुःख मग झाले शिवाजीस ||
सिध्दी जोहरा निरोपाने गोवीं वचनास |
खुशाल गेला भेटीस||
वेळ करून गेला उरला नाही आवकास |
कच्चा मग ठेवी तहास ||
सिद्दिस लाडी गोडी मधी मान डुकलीस |
गेला थाप देऊन गडास ||
सिद्द्या पोटी खुष्याली जाई झोपी सावकाश |
हयगय झाली जप्तीस ||
तो शिवाजी पळून गेला घेई पाथी रात्रीस |
सविले मुसलमानांस ||
सिद्दि सकाळी खाई मनी लाडू चुरमुर्‍यास |
स्वारदळ लावी पाठीस ||
चढत होता खिंड शिवाजी गांठले त्यांस |
बंदुका लावी छातीस |
बाजीप्रभु मुख्य केला ठेवि मावळ्यास |
एकटा गेला रांगण्यास ||
स्वस्वामीला वेळ दिला बाजी भिडला शत्रुस |
हरवी नित्य मोगलास ||
दोन प्रहर लढे वाट दिली नाही त्यास|
धन्य त्याच्या जातीस ||
मोठी मोगल फौज दाखल झाली साह्यास |
खवळला बाजी युध्दास ||
अर्धे लोक उरले सरला नाही पाउलास |
पडला प्रभू भूमीस ||
तो शिवाजी सुखी पोहचला कान सुचनेस |
अंती मनी हाच ध्यास ||
बार गडी ऐकून सुखी म्हणे आपल्यास |
निघून गेला स्वर्गास ||
सय्यद मागे सरे जागा देई बाजीरावास |
पाहून स्वामीभक्‍तीस ||
विजापुरी मुसलमान करी तयारीस |
खासा आला लढण्यास ||
कराडास डेरे दिले घेई बहू किल्ल्यांस |
वश करी चाचे लोकांस ||
दळव्यासी लढून घेई श्रुंगारपुरास |
मारले पाळेगारांस ||
लोकप्रितीकरीता करी गुरू रामदासास |
राजगडी स्थापी देवीस ||
मिष्ट अन्नभोजन दिले सर्वा बक्षिस |
केली मग मोठी मजलस ||
तानसैनी भले गवय्या बसवी गायास |
कमी नाही तालस्वरास ||
||चाल ||
जीधर उधर मुसलमानी | बीसमिलाहि हिमानी ||
सचा हरामी शैतान आया | औरंगजीब नाम लिया ||
छोटे भाईकू हूल दिया | बडे भाईकी जान लिया ||
छोटे कूंबी कैद किया | लोक उसके फितालीया ||
मजला भाई भगादिया | आराकानमे मारा गया ||
सगे बापकूं कैद किया | हुकमत सारी छिनलीया ||
भाईबंदकू कैद किया | रयत सब ताराज किया ||
मार देके जेर किया | खाया पिया रंग उडाया ||
आपण होके बेलगामी | शिवाजीकू कहे गुलामी ||
आपण होके ऐषारामी | शिवाजीकू कहे हरामी ||
बेर हुवा करो सलामी | हिंदवाणी गाव नाभी ||
||चाल ||
आदी आंतन | सर्वा कारण ||
जन्ममरण | घाली वैरण ||
तोच तारण | तोच मारण ||
सर्व जपून | करी चाळण ||
नित्य पाळण | लावी वळण ||
भूती पाहून | मनी ध्याईन ||
नाव देऊन | जगज्जीवन ||
सम होऊन | करा शोधन ||
सार घेऊन | तोडा बंधन ||
सरनौबती डंका हुकूम पालेकराचा | घेई मुजरा शाई(रा)चा ||
सुखसोहळे होता तरफडे सावंत वाडीचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भुषण गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा || ४||

सावंत पत्र लिही पाठवी विजापुरास |
मागे फौज कुमकेस ||
बाजी घोरपडा बल्लोळखान येती सहाय्यास |
शिवाजी करी तयारीस ||
खरा करून गेला छापा घाली मुधोळास |
मारिले बाजी घोरपड्यास ||
भाऊबंद मारिले बाकी शिपाई लोकांस |
घेतले बापसूडास ||
सावंताची खोड मोडून ठेवी चाकरीस |
धमकी देई पोर्तुगीस ||
नवे किल्ले बांधी डागडुजी केली सर्वांस ||
बांधिले नव्या जहाजास |
जळी सैनापती केले ज्यास भिती पोर्तुगीस |
शोभला हुद्दा भंडार्‍यास ||
विजापुरचा वजीर गुप्त लिही शिवाजीस |
उभयता आणिले एकीस ||
व्यंकोजी पुत्रा घेई शाहाजी आला भेटीस |
शिवाजी लागे चरणास ||
शाहाजीचे सदगुण गाया नाही आवाकाश |
थोडेसे गाऊ अखेरीस ||
सुखसोहळे झाले उपमा लाजे मनास |
उणे स्वर्गी सुखास ||
अपूर्व वस्तू घेऊन जाई विजापूरास |
भेट मग देई यवनास ||
पराक्रमी शिवाजी पाळी पाऊन लक्षास |
साजे यवनी स्नेहास ||
विजापुरचा स्नेह होता लढे मोगलास |
घेतले बहूता किल्ल्यास ||
सर्व प्रांती लूट धूमाळी आणिले जेरीस |
घाबरे केले सर्वांस ||
संतापाने मोगल नेमी शाइस्तेखानेस |
जलदि केली घेई पुण्यास ||
चाकणास जाऊन दावी भय फिर्डोजीस |
फुकट मागे किल्ल्यास ||
मास दोन लढला घेऊन सर्व फौजेस |
खान खाई मनास ||
आखेर दारू घालून उडवी एका हुकूमास |
भीति आंतल्या मर्दास ||
लागोपाठ मार देत हटवि पठाणास |
खचला खान हिंमतीस ||
प्रातःकाळी संतोषाने खाली केले किल्ल्यास |
देई मुसलमानास ||
फिर्डोजीला भेट देता खुषी झाली यवनास |
देऊन मान सोडी सर्वास ||
शिवाजीची भेट देता खुषी झाली यवनास |
वाढवी मोठ्या पदवीस ||
फिर्डोजीचे नाव घेता मनी होतो उल्हास |
पीढिजाद चाकरीस ||
येशवंतसिंग आले घेऊन मोठ्या फौजेस |
मदत शाईस्तेखानेस ||
सरनौबत भौती लुटी नगरी मुलखास |
जाळून पाडिला ओस ||
पाठी लागून मोंगल मारी त्याच्या स्वारांस |
जखमा केल्या नेताजीस ||
राजगड सोडून राहीला सिंव्हगडास |
पाहून मोगलसेनेस ||
जिजीबाईचे मुळचे घर होते पुण्यास |
खान राही तेथे वस्तीस ||
मराठ्यास चौकी बंदी गावात शिरण्यास |
होता, भित शिवाजीस ||
लग्नवर्‍हाडी घुसे केला पुण्यात प्रवेश |
मावळे सोबत पंचवीस ||
माडिवर जाऊन फोडी एका खिडकीस |
कळाले घरांत स्त्रीयांस ||
शाइस्त्यास कळता दोर लावी कठड्यास |
लागला खाली जायास ||
शिवाजीने जलदी गाठून वार केला त्यास |
तोडिले एका बोटास ||
स्त्रिपुत्रा सोडून पळे पाठ दिली शत्रूस |
भित्रा जपला जिवास ||
आपल्या पाठिस देणे उणे शिपायगिरीस |
उपमा नाही हिजड्यास ||
सर्व लोकांसहीत मारीले खानपुत्रास |
परतला सिंहगडास |
डौलाने मोगल भौती फिरवी तरवारीस |
दावी भय शिवाजीस ||
समीप येऊ दिले हुकूम सरबत्तीस |
शत्रू पळाला भिऊन मारास ||
करनाटकी बदली धाडी शाइस्तेखानास |
मुख्य केले माजमास ||
राजापुरी जाई शिवाजी जमवी फौजेस |
दावी भय पोर्तुगास ||
सर्व तयारी केली निघाला नाशिक तिर्थास |
हुल कसी दिली सर्वास ||
मध्यरात्री घेई बरोबर थोड्या स्वारांस |
दाखल झालो सुर्तेस ||
यथासांग सहा दिवस लुटी शहरास |
सुखी मग गेला गडास ||
बेदनूराहून पत्र आले देई वाचायास |
आपण बसे ऐकायास ||
शिपायाचे बच्चे शाहाजी गेले शिकारीस |
लागले हरणापाठीस ||
घोड्या ठेंच लागे उभयता आले जमीनीस |
शाहाजी मुकला प्राणास ||
पती कैलासा गेले कळाले जिजीबाईस |
पार मग नाही दुःखास ||
भुमी धडपडे बैसे रडून गाई गुणांस |
घेई पुढे शिवाजीस ||
||चाल ||
अतिरूपवान बहु आगळा | जैसा रेखला चित्री पूतळा ||
सवतीवर लोटती बाळा |
डाग लाविला कुणबी कुळा ||
सवतीला कसे तरी टाळा |
कज्जा काढला पती मोकळा ||
खर्‍या केसाने कापि का गळा |
नादी लागला शब्द कोकीळा || मुख दुर्बळ राही वेगळा |
अती पिकला चिंतेचा मळा ||
झाला शाहाजी होता सोहळा |
मनी भूलला पाहूनी चाळा ||
बहुचका घेती जपमाळा |
जाती देऊळा दाविती मोळा ||
थाट चकपाक नाटक शाळा | होती कोमळा जशा निर्मळा ||
खर्‍या डंखिणी घाली वेटोळा |
विषचुंबनी देती गरळा ||
झाला संसारी अती घोटाळा |
करी कंटाळा आठी कपाळा ||
मनी भिऊन पित्याच्या कुळा |
पळ काढला गेले मुताळा ||
छातीवरी ठेवल्या शिळा |
नाही रुचला सवत सोहळा ||
कमानीवर | लावले तीर ||
नेत्रकटार | मारी कठोर ||
सवदागर | प्रीत व्यापार ||
लावला घोर | सांगते सार ||
शिपाई शूर | जुना चाकर ||
मोडक्या धीर | राखी नगर ||
आमदानगर | विजापूरकर ||
मंत्रि मुरार | घेई विचार ||
वेळनुसार | देई उत्तर ||
धूर्त चतुर | लढला फार ||
छाती करार | करी फीतूर ||
गुणगंभीर | लाविला नीर ||
होता लायक | पुंडनायक ||
स्वामीसेवक | खरा भाविक ||
सिंहगडावर गेला बेत केला क्रियेचा |
बजावला धर्म पुत्राचा ||
रायगडी जाई राही शोक करी पित्याचा |
शत्रु होता आळसाचा ||
दुःखामधी सुख बंदोबस्त करी राज्याचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||५||

सर्व तयारी केली राजपद जोडी नावास |
शिक्का सुरू मोर्तबास ||
अमदानगरी नटून फस्त केले पेठेस |
भौती औरंगाबादेस ||
विजापूरची फौज करी बहुत आयास |
घेई कोकणपटीस ||
सावध शिवाजी राजे आले घेऊन फौजेस |
ठोकून घेई सर्वास ||
जळी फौज लढे भौती मारी गलबतास |
दरारा धाडी मक्केस ||
मालवणी घेऊन गेला अवचित फौजेस |
पुकारा घेतो मोगलास ||
जहाजावर चढवी फौज गेला गोव्यास |
लुटले बारशिलोरास ||
जलदी जाऊन गोकर्णी घेई दर्शनास |
लुटले मोगल पेठांस ||
पायवाटेने फौज पाठवी बाकी लुटिस |
आज्ञा जावे रायगडास ||
स्वतां खासी स्वारी आज्ञा लोटा जहाजास |
निघाला मुलखी जायास ||
मोठा वारा सुटला भ्याला नाही तुफानास |
लागले अखेर कडेस ||
औरंगजेब पाठवी राजा जयशिंगास |
दुसरे दिलीरखानास ||
ठेवले मोगल अमीर येऊन पुण्यास |
वेढिले बहुता किल्ल्यास ||
मानकरी शिवाजी घेई बसे मसलतीस |
सुचेना काही कोणास ||
बाजी प्रभू भ्याला नाही दिलीरखानास |
सोडिले नाही धैर्यास ||
हेटकरी मावळे शिपाई होते दिमतीस |
संभाळी पुरंधरास ||
चार्तुयाने लढे गुंतवी मोगल फौजेस |
फु्रसत दिली शिवाजीस ||
फार दिवस लोटले पेटला खान इर्षेस |
भिडला किल्ला माचीस ||
बुर्जाखाली गेला लागे सुरंग पाडण्यास |
योजी अखेर उपायास ||
हेटकरी मावळे जाती छापे घालण्यास |
पिडीले फार मोगलास ||
मोगलाने श्रम केले बेत नेला सिध्दिस |
काबीज केले माचीस ||
यशस्वी भासले लागले निर्भय लुटीस |
चुकले सावधपणास ||
हेटकर्‍यांचा थाट नीट मारी लुटार्‍यास |
मोगल हटले नेटास ||
बाजी मावळ्या जमवी हाती घेई खांड्यास |
भिडून मारी मोगलांस ||
पळ काढी पाठ दिली मावळ्यास |
मर्द पाहा भ्याले उंदरास ||
लाजे मनी दिलीरखान जमवी फौजेस |
धीर काय देई पठाणास ||
सर्व तयारी पुन्हा केली परत हल्ल्यास |
जाऊन भिडला मावळ्यास ||
बाजी मार देई पठाण खचले हिंमतीस |
हटती पाहून मर्दास ||
पराक्रम बाजीचा पाही खान खोच मनास |
लावीला तीर कमानीस ||
नेमाने तीर मारी मुख्य बाजी प्रभुस |
पाडिला गबरू धरणीस ||
सय्यद बाजी ताजीम देती घेती बाजूस |
सरले बालेकिल्ल्यास ||
मोगल चढ करती पुन्हा घेती माचीस |
धमकी देती मावळ्यास ||
हेटकरी मारी गोळी फेर हटवि शत्रूस |
पळवी इशानी कोणास ||
वज्रगडाला शिडी लावली आहे बाजूस |
वरती चढवी तोफांस ||
वरती मोगल मारी गोळे बालेकिल्ल्यास |
आणले बहु खराबीस ||
हेटकरी मारी गोळे बालेकिल्ल्यास |
आणले बहु खराबीस ||
हेटकरी मावळे भ्याले नाही भडिमारास |
मोगल भ्याला पाऊसाअ ||
मोगल सल्ल करी शिवाजी नेती मदतनीस |
घेती यवनी मुलखास ||
कुलद्रोही औरंगजेब योजी कपटास |
पाठवी थैली शिवाजीस ||
शिवाजीला वचन देऊन नेई दिल्लीस |
नजरकैद करी त्यास ||
धाडी परत सर्व मावळे घोडेस्वारांस |
ठेविले जवळ पुत्रास ||
दरबार्‍या घरी जाई देई रत्न भेटीस |
जोडीला स्नेह सर्वास ||
दुखणे बहाणा करी पैसा भरी हाकीमास |
गूल पाहा औरंगजेबास ||
आराम करून दावी सुरू दानधर्मास | देई खाने फकीरास ||
मोठे टोकरे रोट भरी धाडी मशीदिस |
जसा का मुकला जगास ||
दानशूर बनला हटवी हातिमताईस |
चुकेना नित्यनेमास ||
औरंगजेबा भूल पडली पाहून वृत्तीस | विसरला नीट जप्तीस ||
निरास कैदी झाला शिवाजी भास मोगलास | चढला मोठ्या दिमाखास ||
पितापुत्र निजती टोकरी बदली रोटांस |
बाकी सोपी चाकरास ||
जलदी करीती चाकर नेती टोकरांस | करामत केली रात्रीस ||
दिल्ली बाहेर गेले खुले केले शिवाजीस |
नेली युक्‍ती सिध्दीस ||
मोगल सकाळी विचकरी दांत खाई होटांस |
लावि पाठी माजमास ||
|| चाल ||
औरंगजेबीचा धूर दीला | पुत्रासवे घोडा चढला ||
मधीच ठेवी पुत्राला | स्वताः गोसावी नटला ||
रात्रीचा दिवस केला | गाठले रायगडाला ||
माते चरणी लागला | हळूच फोडी शत्रूला ||
स्नेह मोगलांचा केला | दरारा देई सर्वाला ||
||चाल ||
हैद्राबादकर | विजापूरकर ||
कापे थरथर | देती कारभार ||
भरी कचेरी | बसे विचारी ||
कायदे करी | नीट लष्करी ||
शिवाजीचा बेत पाहून जागा झाला गोव्याचा |
बंदोबस्त केला किल्ल्याचा ||
वेढा घालून जेर केला सिद्दी जंजिर्‍याचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||६||

शिवाजी तो मसलत देई मित्र तान्हाजीला |
बेत छाप्याचा सुचवीला ||
तान्हाजीने भाऊ धाकटा सोबत घेतला |
मावळी हजार फौजेला ||
सुन्या रात्री सिंहगड पायी जाऊन ठेपला |
योजिले दोर शिडिला ||
दोरीची शिडी बांधली शिपाई कमरेला |
हळूच वर चढवीला ||
थोडी चाहूल कळली सावध उदेबानाला |
करी तयार लोकाला ||
थोड्या लोकांसवे तान्हाजी त्यावर पडला |
घाबरा गढकरी केला ||
रणी तान्हाजी पडे मावळे पळती बाजूला |
सुर्याजी येऊन ठेपला |
धीर मोडक्या देई परत नेई सर्वाला |
उगवी बंधु सुडाला ||
उदेबान मारिला बाकिच्या रजपुताला |
घेतले सिंहगडाला ||
गढ हाती लागला तान्हाजी बळी घेतला |
झाले दुःख शिवाजीला ||
संहगडी मुख्य केले धाकट्या सुर्याजीला |
रुप्याची कडी मावळ्याला ||
पुरंधर माहूली घेई वरकड किल्ल्याला |
पिडा जंजिरी सिद्द्याला ||
सुरत पुन्हा लुटी मार्गी झाडी मोगलाला |
मोगल जेरदस्त केला ||
कैद करी शिवाजी बाकी उरल्या फौजेला |
त्यामधी अनेक स्त्रियांला ||
सुंदर स्त्रिया परत पाठवी ख़ानदेशाला |
सुरू केले चौथाईला ||
जलदी मोगल धाडी मोहबतखानाला |
देई मोठ्या फौजेला ||
औंढापट्टा घेऊन वेढी साल्हेर किल्ल्याला |
धिंगाणा दक्षिणेत केला ||
गुजर उडी घाली सामना शत्रुचा केला |
मोरोबा पठाण पंक्‍तीला ||
लढता पळ काढी दावी भ्याला मोगलाला |
जसा खरा मोड झाला ||
तो मराठे पळती मोगल गर्वाने फुगला |
आळसाने ढिला पडला ||
गुजर संधी पाहून परत मुरडला |
चुराडा मोगलाचा केला ||
बेवीस उमराव पाडले रणभूमीला |
नाही गणती शिपायाला ||
लहान मोठे कैदी बाकी सर्व जखम्याला |
पाठवी रायगडाला ||
मोगल वेढा झोडून मार देत पिटीला |
खिदाडी औरंगाबादेला ||
रायगडी नित्य शिवाजी घेई खबरीला |
गोडबोल्या गोवी ममतेला ||
एकसारखे औषध पाणी देई सर्वाला |
निवडले नाही शत्रूला ||
जखमा बर्‍या होता खुलासा सर्वांचा केला |
राहिले ठेवी चाकरीला ||
शिवाजीचू किर्ती चौमुलखी डंका वाजला |

शिवाजी धनी आवडला ||
मोगल यवनी शिपायी सोडी चाकरीला |
हाजरी देती शिवाजीला ||
पोर्तुग्यास धमकीही देई मागे खंडणीला |
बंदरी किल्ला वेढीला ||
मधीच इंग्रज भ्याला जपे मुंबै किल्ल्याला |
बनया धर्मा आड झाला ||
दिल्लीस परत नेले सुलतान माजूमाला |
दुजे मोहबतखानाला ||
उभयतांचा बदली खानजहान आला |

मुख्य दक्षीणेचा केला ||
मोगलाला धूर देऊन लुटले मुलखाला |
गोवळकुंडी उगवला ||
मोठी खंडणी घेई धाकरी धरी निजामाला |
सुखे मग रायगडी गेला ||
मोगलाचे मुलखी धाडी स्वार लुटायाला |
लुटले हुबळी शहराला ||
समुद्रकाठी गावे घेई जाहाजाला |
केले खुले देसाईला ||
परळी सातारा किल्ले घेई पांडवगडला |
आणिक चार किल्ल्यांला ||
|| चाल ||
हुकूम विजापुरी झाला | सोडिले बहुत फौजेला ||
द्यावा त्रास शिवाजीला | घ्यावे त्याचे मुलखाला ||
शिवाजी सोडी गुजराला | कोंडी आबदुल करीमाला ||
केला महाग दाण्याला | शत्रू अती जेर केला ||
आर्जव करणे शिकला | भोंदिले सैनापतीला ||
निघून विजापुरी गेला | क्रोध शिवाजीस आला ||
रागाऊन लिहीले पत्राला | निषेधी प्रतापरावाला ||
गुजर मनात लाजला | निघून वर्‍हाडात गेला ||
||चाल ||
आबदुल्याने | बेशर्म्याने ||
फौज घेऊन | आला निघून ||
राव प्रताप | झाला संताप ||
आला घाईने | गाथी बेताने ||
घुसे स्वताने | लढे त्वेषाने ||
घेई घालून | गेला मरून ||
प्रतापराव पडता मोड फौजेचा झाला |
पाठलाग मराठ्यांचा केला ||
तोफ गोळ्या पोटी पोटी दडती भिडती पन्हाळ्याला |
गेले नाही शरण शत्रूला ||
अकस्मात हंसाजी मोहीता प्रसंगी आला |
हल्ला शत्रूवर केला ||
गुजर दळ मागे फिरून मारी यवनाला |
पळिवले विजापुरला ||
शिवाजीने हंसाजीला सरनौबत केला |
शिवाजी मनी सुखी झाला ||
सेनापतीचे गुण मागे नाही विसरला |
पोशी सर्व कुटूंबाला ||
प्रतापराव – कन्या सून केली आपल्याला |
व्याही केले गुजराला ||
काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा |
केला खेळ गारूड्याचा ||
लुटारू शिवाजी लुटला धाक गृहफौजेचा |
खर्च नको दारूगोळीचा ||
बहुरूपी सोंग तूलदान सोने घेण्याचा |
पवाडा गातो भोसल्याचा ||
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||७||

विश्वासू चाकर नेमी मुलखी लुटायाला |
शिवाजी कोकणांत ||
छोटे मोठे गड घेई बांधी नव्या किल्ल्याला |
जमाव फौजेचा केला ||
गोवळकुंडी जाई मागून घेई तोफाला |
फितीवले कसे निजामाला ||
करनाटकी गेला भेटे सावत्रभावाला |
वाटणी मागे व्यंकोजीला ||
लोभी व्यंकोजी हिस्सा देईन बळासी आला |
आशेने फिरवी पगडीला ||
बंधू आज्ञा मोडून गर्वाने हट्टी पेटला |
बिर्‍हाडी रागाऊन गेला ||
शिवाजीला राग आला कोट छातीचा केला |
कैदी नाही केले भावाला ||
तंजोर बाकी ठेवी घेई सर्व मुलखाला |
खडा कानाला लावला ||
दासीपुत्र संताजी बंधू होता शिवाजीला |
करनाटकी मुख्य केला ||
हंबीरराव सेनापती हाताखाली दिला |
निघाला परत मुलखाला ||
वाटेमध्ये लधून घेई बिलरी किल्ल्याला |
तेथे ठेवी सुमंताला ||
शिवाजीचे मागे व्यंकोजीने छापा घातला |
घेतले स्वःता अपेशाला ||
जेर झाला व्यंकोजी देई उरल्या हिश्याला |
शिवाजी रायगडी गेला ||
विजापूराचा साह्य नेई राजे शिवाजीला |
मोगल मुलखी सोडला ||
मुलखी धिंगाणा धुळीस डेश मिळवीला |
सोडिला नाही पिराला ||
वाटेमधी मोगल गाठी शिवाजीला |
ग़्हाबरा अतिशय केला ||
भिडला शिवाजी मोगल मागे हाटीवला |
वाट पुढे चालू लागला ||
दुसरी फौज आडवी माहारज राजाला |
थोडेसे तोंड दिले तिजला ||
काळ्या रात्री हळूच सुधरी आडमार्गाला |
धूळ नाही दिसली शत्रूला ||
फौजसुध्दा पोहचला पटा किल्ल्याला |
फसविले आयदी मोगलाला ||
विजापुरचा आर्जव करी धडी थैलीला |
आश्रय मागे शिवाजीला ||
हांबीरराव मदत पाठवी विजापुरला |
बरोबर देई फौजेला ||
नऊ हजार मोगलांचा पराभव केला |
ज्यानी मार्ग अडीवला ||
विजापुरी जाऊन जेर केले मोगलाला |
केला महाग दाण्याला ||
शत्रुला पिडा होता त्रासून वेढा काढला |
मोगल भिऊन पळाला ||
दिल्लीचा परत बोलवी दिलीरखानाला |
पाठवी शाहजहानाला ||
जलदी करून शिवाजी वळवी पुत्राला |
लाविला नीट मार्गाला ||
तह करून शिवाजी नेती विजापुरला |
यवन घेती मसलतीला ||
शिवाजीचे सोवळे रुचले नाही भावाला |
व्यंकोजी मनी दचकला ||
निरस मनी होऊन त्यागी सर्व कामाला |
निरा संन्यासी बनला ||
शिवाजीने पत्र लिहीले बंधु व्यंकोजीला |
लिहीतो पत्र अर्थाला ||
वीरपुत्र म्हणविता गोसावी कसे बनला |
हिरा का भ्याला कसाला ||
आपल्या पित्याचा ठसा कसा जलदी वीटला |
मळावाचून काटला ||
कनिष्ठ बंधु माझ्या लाडकी पाठी साह्याला |
तुम्ही का मजवर रुसला ||
बोध घ्या तुम्ही माझा लागा प्रजापालनाला |
त्यागा ढोंगतोर्‍याला ||
मन उत्तम कामी जपा आपल्या फौजेला |
संभाळा मुळ आब्रुला ||
किर्ती तुझी ऐकू यावी ध्यास माझ्या मनाला |
नित्य जपतो या जपाला ||
कमी पडता तुम्ही कळवा माझ्या लोकांला |
सोड मनच्या आधीला ||
सुबोधाचे पत्र ऐकता शुध्दीवर आला |
व्यंकोजी लागे कामाला ||
शिवाजीला रायगडी गुडघी रोग झाला |
रोगाने अती जेर केल ||
त्याचे योगे नष्ट ज्वर फारच खवळला |
शिवाजी सिसी दुःखाला ||
यवनी विरास भिडता नाही कुचमला |
शिवाजी रोगाला भ्याला ||
सतत सहा दिवस सोसी तापदहाला |
नाही जरा बरळला ||
सातव्या दिवशी शिवाजी करी तयारीला |
एकटा पुढे आपण झाला ||
काळाला हूल देऊन स्वःता गेला स्वर्गाला |
पडले सुख यवनाला ||
कुळवाडी मनी खचले करती शोकाला |
रडून गाती गुणाला ||
||चाल ||
महाराज आम्हांसी बोला | धरल का तुम्ही आबोला ||
मावळे गडी सोबतीला | शिपाई केले उघड्याला ||
सोसिले उन्हातान्हाला | भ्याला नाही पावसाला ||
दोंगर कंगर फिरला | यवन जेरीस आणला ||
लुटले बहूत देशांला | वाढवी आपुल्या जातीला ||
लढवी अचाट बुध्दीला | आचंबा भुमीवर केला ||
बाळगी जरी संपत्तीला | तरी बेताने खर्च केला ||
वाटणी देई शिपायाला | लोभ द्रव्याचा नाही केला ||
चतुर सावधपणाला | सोडिले सोडिले आधी आळसाला ||
लहान मोठ्या पागेला | नाही कधी विसरला ||
राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला | नाही दुसरा उपमेला ||
कमी नाही कारस्तानीला | हळूच वळवी लोकांला ||
युक्‍तीने बचवी जीवाला | कधी भिईना संकटाला ||
चोरघर्ती घेई किल्ल्याला | तसेच बाकी मुलखाला ||
पहिला झटे फितुराला | आखेर करी लाढाईला ||
युध्दी नाही विसरला | लावी जीव रयतेला ||
टळेना रयत सुखाला | बनवी नव्या कायद्याला ||
दाद घेई लहानसानाची | हयगय नव्हती कोणाची ||
आकृती वामनमुर्तीची | वळापेक्षा चपळाईची ||
सुरेख ठेवण चेहर्‍याची | कोंदिली मुद्रा गुणरत्नाची ||
||चाल ||
भिडस्त भारी | साबडा घरी ||
प्रिय मधुरी | भाषण करी ||
मोठा विचारी | वर्चड करी ||
आस सोयरी | ठेवी पदरी ||
लाडावरी | रागाचे भारी ||
इंग्लीश ज्ञान होता म्हणे मी पुत्र क्षेत्र्याचा |
उडवी फट्टा ब्रम्हाचा ||
जोतिराव फु्ल्याने गाईला पुत क्षुद्राचा |
मुख्य धनी पेशव्याचा ||
जिजीबाईचा बाळ काळ झाला यवनाचा |
पवाडा गातो शिवाजीचा ||
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा |
छत्रपती शिवाजीचा ||८||

अँड. राज जाधव...!!!            

2 comments:

  1. सर मनापासून आभार ....म.फुले खरचं ग्रेट होते ....

    जय शिवराय .

    ReplyDelete
  2. होय महात्मा फुले हे खरेच खूप मोठे विद्वान होते, बाबासाहेबांनी उगीच त्यांना गुरु स्थानी नाही नेमले.........!

    ReplyDelete