My Followers

Thursday, 16 March 2023

शिवकालीन महार समाज...

छ.शिवाजी महाराजांच्या लष्करात महाराना अस्पृश्य मानले जात नसे. पण पुढे पेशवाईच्या काळात लष्करातील लोकांत उच्चनीच जातिभेदाचे थैमान जास्त माजले. 

मराठ्यांच्या पायदळात अस्पृश्य वर्गातील सैनिक होते. या पायदळ सैनिकांना 'पाईक' म्हणून संबोधण्यात येत असे. या पाईकांपैकी जे महार असत त्यांना ('नाईक' किंवा 'नायक' चा अपभ्रंश) 'नाक' हे नावापुढे लावत असत, व जे मांग जातीचे होते त्यांना 'राऊत हे उपपद लावत असत. 

मराठ्यांच्या लष्कराच्या तोफा बैलगाडीतून समरांगणावर नेत असत, या तोफा बैलगाडीवर चढविणे, बैलगाड्या समरांगणावर नेणे तेथे तोफांची व्यवस्था लावून त्या डागणे व उडविणे ही कामे महार व मांग पाईकांना नेमून दिलेली होती. 

पायदळातील स्पृश्य वर्गीय अधिकारी घोड्यावर बसून समरांगणावर जात असत. प्रत्येक अधिकाऱ्याच्या दिमतीला दोन अस्पृश्य पाईक असत. एक घोड्याचा मोतद्दारव दुसरा घोड्याला दाणाचारा घालणारा. स्पृश्यवर्गीय अधिकारी व सैनिक हे जातिभेदाच्या व उच्चनीचतेच्या भावनेने पछाडलेले होते. ते अस्पृश्य-पाईकांना चांगल्या तऱ्हेने वागवीत नसत. तरीही अस्पृश्य पाईक ही मानहानी करून तेथेच रहात नोकरी सोडून जात नसत. कारण, हा एकच त्यांना पोटापाण्याचा व्यवसाय होता आणि ज्यांचे आपण मीठ खातो त्यांच्याकरता आत्मर्पण करण्याची नितिमत्ता अस्पृश्य समाजाच्या अंगी बाणलेली होती. शिवाय पायदळातील नोकरी ही महारांची जवळ जवळ वंशपरंपरागत हक्काची बाब झालेली होती. त्यामुळे लष्करी नोकरी म्हणजे अस्पृश्यांची मिरासदारी, असा एक सामाजिक द्वेषभाव दृढमूल झालेला होता.

श्री.छत्रपति शिवाजी महाराज यांनी महारांना जंगलातील मार्ग, डोंगरकिल्ल्यावर जाणार गुप्त उघड मार्ग यांच्यावर देखरेख करणे आणि डोंगरी गडातील लोकांना जळण व वैरण पुरविणे, या कामावर नेमलेले होते. ही कामे म्हणजे लष्कराच्या संरक्षणाच्या नाड्या होत्या. त्या छत्रपति शिवाजी महाराजांनी महारांच्या हाती दिल्या होत्या. 

यावरून हे स्पष्ट होते की, महाराज महार जातीच्या इमानदारीची नि:शंकपणे कदर करीत होते. याशिवाय गडमाचीवर महारांची वसती ठेवणे, हाही महाराजांनीच पायंडा पाडला. ही अवघड कामे करण्यासाठी महाराजांनी जसे महार कुटुंबाना वडिलोपार्जीत नोकरीवर ठेवले तसेच त्यांनी हजारो महार तरुणांना सैनिक म्हणून रणांगणावर शत्रूविरुद्ध लढविले. 

परंतु यासंबंधीचे स्पष्ट उल्लेख उच्च वर्णीय बखरकरांनी आपल्या बखरीत केलेले नाहीत. परंतु, महाराजांच्या नंतरच्या मराठेशाहीच्या काळात हजारो महारांनी जे शौर्य गाजविले त्याबद्दल त्यांना ठिकठिकाणी इनामी जमिनी सरदारकी व पाटीलकी दिल्याचे पुरावे अस्तित्वात असल्याचे दिसून आले.

स्पृश्यवर्णीय बखरकरांनी हा महारांच्या बाबतीत जो अन्याय केला, तितक्या तीव्रतेने इंग्रज ग्रंथकारांनी केलेला नाही. कारण त्यांना ऐतिहासिक दृष्टी होती. आणि ते जरी राज्यकर्ते होते तरी सद्गुणांचे चहाते होते, म्हणून त्यांनी स्वतःच्या इंग्रज लढवय्यांबद्दल जसे साग्र वर्णन केलेले आहे तसे इंग्रजेतर लढवय्यांबद्दल जरी केले नाही, तरी त्यांना अनुलेखाने मारलेले नाही. बऱ्याच महार शूर लढवय्यांबद्दल त्यांनी गौरवपर लिहून ठेवलेले आहे...

- ॲड.राज जाधव, पुणे...!

(संदर्भ - दि महार फ्लॉक पृष्ठ क्र.५९ - ६०, The Regimental History of the MAHAR M. G. Regiment, by Colonel Major General S. P. P. Thorat, DSO (1954), PAGE 3).

फाळणी आणि महार बटालियन...


शौर्य... धैर्य... पराक्रम... कर्त्यव्य... माणुसकी... याचे अमूल्य असे उदाहरण...

ऑगस्ट १९४७ मध्ये महार बटालियनला दिल्लीला नेण्यात आले, दिल्लीतील जी मुसलमान कुटुंबे पाकिस्तानात जाणार होती; त्यांना आगगाड्यातून सिमेवर सुरक्षितपणे पोहोचविण्याचे काम बटालियनला करावे लागले. 

२२ आगगाड्यातून २५-३० हजार मुसलमानांना सुरक्षितपणे नेण्याचे अवघड कार्य या जवानांनी केले. या बाबतीत यांना प्राण धोक्यात घालून मुसलमान निर्वासितांचे रक्षण करावे लागले...

याबद्दलची दोन उदाहरणे उल्लेखनीय आहेत,

११ सप्टेंबर १९४७ ला दिल्लीहून अत्तारीला, आगगाडी मुसलमान निर्वासीतांना घेऊन चालली होती. महार मिडियमगनची एक तुकडी सुभेदार के. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली, आगगाडीचे रक्षक म्हणून आगगाडीतील निरनिराळ्या डब्यात बसवली होती. रेल्वे लाईनवर कोणीतरी अपघाताचे कारस्थान अगोदर केल्यामुळे जलंदर शहराच्या नंतर गाडी रूळावरून घसरली तेव्हा आसपासच्या भागातून शेकडो हिंदू व शीख लोक हातांत काठ्या, तलवारी व भाले घेऊन मुसलमान प्रवाशांना मारण्यासाठी धावून आले. 

सुभेदार गायकवाड यांनी आपल्या सैनिकांना या हल्लेखोरांवर गोळ्या झाडण्याचा हुकूम दिला. सर्व डब्यांतून दोन्ही बाजूनी गोळ्यांचा वर्षाव होत असलेला पाहून हल्लेखोर पळून गेले व दूर उभे राहिले. हे हल्लेखोर परत गाडीवर चाल करतील हे ओळखून सुभेदाराने गार्डाला आगगाडी परत जालंदर शहराला नेण्यास हुकूम दिला. जालंदरच्या स्टेशनावर पुनः दुसऱ्या थव्याने आगगाडीवर हल्ला केला. तेव्हांही सुभेदाराने सैनिकांना गोळीबाराचा आदेश दिला, तेव्हा हल्लेखोरांचा जमाव दूर पळाला व तेथे उभे राहून आम्ही मुसलमानांना कापणार अशा घोषणा देऊ लागला. असा हा प्रकार तीन दिवस चालू होता. मुसलमान प्रवासी आगगाडीच्या डब्यात जीव मुठीत घेऊन तीन दिवस अन्न-पाणी व झोप यांच्याशिवाय गप्प बसून राहिले होते. मुले, भूक व तहान यांनी व्याकूळ होऊन रडत होती. सुभेदाराने, स्टेशनपासून दूरच्या ठिकाणी पाणी आणण्यासाठी सैनिकांच्या दोन तुकड्या पाठविल्या. त्यांनी जेव्हां पाणी आणले तेव्हां ते सर्व प्रवांशांना पिण्यास दिले. सुभेदार गायकवाड यांनी प्रसंगावधान व धैर्य दाखवून निर्वासित प्रवासी मुसलमानांचे प्राण वाचविले. चौथ्या दिवशी आगगाडी, रेल्वेलाईन दुरुस्त झाल्यावर जालंदरच्या पुढे निघून इष्ट स्थळी मुसलमान प्रवाशांना पोहचविले. 

.........................................................................

दुसरी गाडी मुसलमान प्रवाशांना घेऊन त्याच मार्गाने चालली होती, त्यावेळी जोराचा मुसळधार पाऊस आला. पावसामुळे जालंदरजवळची रेल्वे लाईन उध्वस्त झाली. सुभेदार के. मोरे यांच्या नेतृत्वाखाली या गाडीचे रक्षण करणेचे काम होते. सुभेदार के. मोरेही गाडीत होतेच. जालंदरला गाडी असलेली पाहून शेकडो हिंदू व शीख हल्ला करण्यास धाऊन आले आणि सांगू लागले तुम्ही तुमचे सैनिक बाजूला घ्या आम्ही सर्व मुसलमानांची कत्तल करतो." 

सुभेदार मोरे उत्तरले की तुम्ही हल्ला केला तर मी माझ्या सैनिकांना तुमच्यावर गोळ्या झाडण्याचा हुकूम देईन व तुम्हां सर्वांना भुईसपाट करीन, 

सुभेदार मोरे हल्लेखोरांचे व यांचे कडाक्याचे बोलणे १५-२० मिनिटे चालले हल्लेखोर ऐकत नाहीत असे पाहून मोरे यांनी सैनिकांना फायरींगसाठी तयार व्हा असा जोरात ओरडून हुकूम दिला; तेव्हा हल्लेखोर पळून गेले. 

रेल्वेलाईन दुरुस्त झाल्यानंतर गाडी, ५ दिवसांनी इष्ट स्थळी पोहोचली. या दोन महार लष्करी पथकांच्या नायकांनी आपल्या कर्तव्यावर नितांत निष्ठा ठेऊन हजारो-लाखों मुसलमानांना पाकिस्तानच्या हद्दीवर नेऊन सोडले.

तत्कालीन परिस्थिती अतिशय भयावह अशी होती, दोन्ही बाजूकडून अमर्याद अश्या कत्तली सुरू असताना... स्वत:चा जीव धोक्यात घालून महार बटालियनने आपल्या कर्तव्यात कोणताही कसुर केला नाही...

 - ॲड.राज जाधव, पुणे...!

( संदर्भ - अस्पृश्यांचा लष्करी पेशा, पृष्ठ क्र.७२-७३)

महार रेजिमेंट बॅज...!


लंडन येथील "नॅशनल आर्मी म्युझियम" मध्ये हा "बिल्ला" जतन करून ठेवलेला असून, त्याबाबत अशी माहिती लिहून ठेवली आहे की,

"भारतातील महाराष्ट्रातील महार समाजातील सैनिक हे ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे आर्मीचा मुख्य आधार होते. हा बिल्ला दुस-या महायुद्धाचा असला तरी, त्यावरिल वैशिष्ट्यीकृत स्तंभ हा १८१८ मध्ये झालेल्या कोरेगावच्या लढाईचे स्मरण व युद्धाचा सन्मान करतो, जेथे महार सैन्याने कंपनीला पेशव्यांच्या सैन्याचा पराभव करण्यास मदत केली होती, आणि त्या विजयाच्या स्मरणार्थ, ईस्ट इंडिया कंपनीने कोरेगावमध्ये 'विजय स्तंभ' उभा केला..."

- ॲड.राज जाधव, पुणे...!

(संदर्भ - by Field Marshal Sir John Chapple Indian Army Collection, location - National Army Museum, Study collection, London)

हवालदार राऊ कांबळे...!

शिरच्छेद झाला तरीही हल्ला चालूच ठेवणारा विर पराक्रमी... 

१९४७ मध्ये प्रथम महार बटालियन जम्मू काश्मीर मध्ये तैनात असताना...

हवालदार राऊ कांबळे आणि नाईक बारक्या कांबळे हे आपली तुकडी घेऊन झांगर या रणक्षेत्रावर ६००० पाकिस्तानी शत्रू सैन्याला सामोरे गेले. 

त्या ६००० पाकिस्तानी शत्रू सैनिकांना आपल्या तुकडीतील ५० सैनिकानिशी तोंड देत राहिले व त्यांचे इतर सहकारी शत्रूच्या तावडीत सापडू म्हणून शत्रूवर गोळ्यांचा वर्षाव करीत राहिले.

या कांबळे यांनी शत्रूला जागचे जागी थोपवून धरले आणि आपल्या सहकारी तुकड्यांना पाकिस्तानी शत्रूच्या जबड्यातून बाहेर पडण्यास भरपूर वाव दिला, त्यावेळी तुकडीतील सर्व सैनिक कामास आलेले होते. 

आता या दोघा वीरांवर शत्रूने हल्ला चढविला व ते दोघे ज्या इमारतीच्या आश्रयाने गोळ्यांचा वर्षाव करीत होते त्या इमारतीलाच आग लावून दिली. आणि त्या दोघांना पकडून त्यांचा शिरच्छेद केला... 

शिरच्छेद झाला तरीही चार - पाच सेकंद राऊ कांबळे यांच्या मशीनगमधून गोळीबार चालूच होता...

या दोन वीरांची नांवे बटालियनच्या इतिहासात सुवर्णक्षरांनी लिहिली गेली. डिसेंबर १९४७ च्या काळात कंपनीने जो रणसंग्राम काश्मिरच्या रणभूमीवर केला त्यांत १० सैनिक कामास आले, ६ जखमी झाले आणि १ बेपत्ता झाला.

झांगर येथील संग्रामात जे महार बटालियनचे नुकसान झाले होते, त्याचा वचपा दुसऱ्या कंपनीने नौशेरच्या ६ फेब्रुवारी १९४८ ला झालेल्या रणसंग्रमात काढला. 

या लढाईतील तुकडीचे नेतृत्व नाईक कृष्णा सोनवणे आणि पुंडलिकमहार यांचे होते. या दोघानी शौर्याची कमाल केली. त्या दोघांनी सुमारे १००० शत्रूंना एका दमात गारद केले. जम्मू व काश्मिर यांच्या रणक्षेत्रात जेवढी शत्रूची संख्या मृत म्हणून गणली गेली; त्यात नौशेरच्या रणक्षेत्रातील हा एक हजार शत्रूंना ठार केल्याचा आकडा सर्वांत मोठा होय.

जम्मू आणि काश्मिर येथील समरांगणात पहिल्या महार बटालियन मधील ज्या महार तरुणांनी आपले देह धारतीर्थी ठेवले त्यांच्याबद्दल अनेक जणांनी प्रशंसोद्धार काढलेले आहेत. 

- ॲड.राज जाधव, पुणे...!

(संदर्भ - The Mahar MG Regiment, Page 40-41, अस्पृश्यांचा लष्करी पेशा, पृष्ठ क्र.७३-७४)

(सदर लेखावर काम चालू आहे, संकलीत करण्याच्या उद्देशाने publish केला आहे)