"तुला व्हावेच लागेल दुसरे आंबेडकर"
मनू मानी ज्यांना महाअरी
तिथे तुझा जन्म झाला असेल तर
तुला व्हावेच लागेल "आंबेडकर"’
युगांतरकारी "आंबेडकर"’!
क्रांतिकारी ‘आंबेडकर’!
मनूचा मर्मांतक वैरी ‘आंबेडकर’!
दुसरा पर्यायच नाही
तुला व्हावेच लागेल ‘आंबेडकर ’!
‘आंबेडकर’ एवढा मोठा नाहीस झाला
तरी लहानगा का होईना
आंबेडकरच व्हावे लागेल तुला
तुझ्या बापावरी मजूर नाही,
वा मास्तरही नाही,
कलेक्टरही नाही,
फक्त आंबेडकर होणे आहे तुला
म्हणजे सम्यक क्रांतीला देशात आणणे आहे तुला !
इथे या देशातील दुष्टांनी
कधी देव होवून
कधी देवावतार होवून
कधी धर्म होवून
फार छळले आहे देशवासीयांना !
स्त्री, शूद्र बहिष्कृतांना !
मूळ मालक असल्यामुळे एवढे पिडले की,
तुझा संघर्षशील आंबेडकर होण्याविणा,
संगरामागे संगर केल्याविणा गत्यंतर नाही तुला.
आंबेडकरांचे अनुकरणकरणे जरूर आहे तुला
अनेक युगांनंतरअनेक एकलव्य,
शंभुकां नंतर एक आंबेडकर जगू शकले
फक्त अन् तू त्यांच्या नंतर जगलेला !
तुझ्या विकासाला कारण तू एकटा नाहीस,
आणि नाही हिंदू धर्म पण तुझ्या विकासाला कारण आंबेडकर !
हे ध्यानात धर त्यांचे अनुकरण कर
अथवा दारूण देशभक्त क्रूर, कठोर क्रांती कर स्टॅलिन हो !
त्याविना हा भगवान बुद्धाचा सुफळ, सुंदर, समृद्ध देश
‘प्रबुद्ध भारत’ होणार नाही
राहील दंगलखोर कौरव पांडवांचा देश
म्हणून मी म्हणतो
तुला व्हावेच लागेल आंबेडकर
करुणामय, क्रांतिकारक ‘आंबेडकर’!
भारत भाग्यविधाता ‘आंबेडकर’!
कवी - बाबूराव बागूल...!
No comments:
Post a Comment