कारुण्यमूर्ती.......रमाई........!
"साहेब मी चालले.....आता ही आपली शेवटी भेट...यशवंता, मुकुंदा लहान आहेत. खूप इच्छा होती आपल्या कार्यात मदत करावी, परंतु आता ते शक्य नाही. रमाई आता काही क्षणांची सोबती आहे. आतातर शब्दही उमटत नाहीत. तिला काहीतरी सांगायचे आहे पण मुखातून शब्द उमटत नसल्याने फक्त ओठांची होणारी हालचाल......
अठ्ठावीस वर्षांची समर्थ साथ देणा-या रमाईच्या स्वभावाची बाबासाहेबांना जाणीव होती. रमाईचे मन फक्त बाबासाहेबच जाणून होते. `इतक्या वर्षांच्या संसाराच्या धबडग्यात आपण कधी तिला तू कशी आहेस? असे साधे शब्दानेही विचारपूस केली नाही. आपल्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून राजगृहाची ही मालकीण प्रवेशद्वारावर तासन्तास बसून राहायची. मला भेटावयास आले की, त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागणारी, साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा. आलेल्याची रवानगी करताना त्याचे नाव, गावं, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपणारी रमा...कार्यालयीन सचिवाची एकप्रकारे भूमिका पार पाडत होती...
हिंदू कॉलनी, परळ, शिवडी विभागात स्वत जाऊन महिलांची भेट घेऊन चळवळीचे महत्त्व पटवून देणारी...आपण विदेशात अभ्यासात व्यस्त असल्याने, वसतीगृहातील मुलांची उपासमार होऊ नये यासाठी कधीकाळी मोठ्या हौसेने बनविलेल्या सोन्याच्या बांगड्या वराळे मास्तरांकडे देऊन `हे विकून मुलांचा खर्च भागवा, मुले उपाशी राहता कामा नयेत' असे सांगणारी रमा... आपले वाचनाचे वेड लक्षात घेऊन लटक्या रागाने बोलणारी...`बघावं तेव्हा आपलं पुस्तकात लक्ष. ना जेवणं ना खावंण...' आपण तिला सांगायचो, `बघ, रमा तू जेऊन घे. मी हा आलोचं, पण पुस्तकात डोकं खुपसल्यावर जेवणाची कसली ती शुद्धच राहात नसायची. आपल्या या स्वभावामुळे एकदा ती चिडलीच व म्हणाली, `काय हो, तुम्ही हे तासन्तास वाचत बसता. तुमच्या या ढिगभर पुस्तकात घरात बायको आहे, तिला एक मुलगा आहे. विशेष म्हणजे स्वतला एक घर आहे. त्यांच्यासाठी थोडातरी वेळ काढावा, असे काहीतरी लिहिले नाही काय?'
रमाच्या त्या बोलण्यावर आपण मनमुराद हसलो. इतके हसलो की, क्षणापूर्वी रागावणाऱया त्या तिच्या डोळ्यातील रागाची जागा तरल स्नेहभावाने घेतली. त्यावेळी तिने चक्क बखोटीला धरून, `चला, जेवण गरम आहे. एकदा पोटभर जेवा आणि मग बसा लायब्ररीत जाऊन...'
बाबासाहेबांच्या डोळ्यांपुढे रमाईचे गतजीवन एखाद्या चलतचित्रपटासारखे पुढे सरकू लागले. 1907 साली परकर-चोळीतील निरागस रमाशी आपण विवाहाच्या बंधनात अडकलो. खरे तर या साऱया गोष्टींना आपण तयार नव्हतो. पण वडिलांच्या आज्ञेबाहेर जाण्याचे धाडस होत नव्हते. अस्पृश्यातील पहिला पदवीधर होण्याचा मान मला मिळाला. त्यामागे बाबांचाच मोठा सिंहाचा वाटा आहे. बाबांनी माझी आवड लक्षात घेऊन पदरमोड करून पुस्तकं पुरविली. मॅट्रिक झालेल्या तरुणाला कमी शिकलेली मुलगी द्यायची? धोत्रे मंडळीत यावर कुजबूज सुरू होती. नाहीतरी मुली शिकून काय दिवा लावणार आहेत? या अज्ञानापोटी त्यावेळी मुलींना शाळेत पाठवित नसत. याची माझ्या वडिलांना जाणीव होती. `बघुया जमलं तर, आम्ही लग्नानंतर शाळेत घालू. खूप शिकवू', रमाला पाहिल्यावर का कोण जाणे, रामजी बाबांनी तात्काळ होकार दिला. भर पावसात भायखळ्याच्या बाजारात लग्नसोहळा पार पडला. बाजारात का? तर अस्पृश्य असल्याने त्यांना पैसे मोजूनही कोणी हॉल द्यावयास कोणी राजी नव्हते. लग्नानंतर दुसऱयाच दिवशी बाबासाहेब परदेशात उच्चशिक्षणासाठी गेले. आम्ही 1912 साल डॉ. बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष मानतो. 12/12/1912 साली यशवंतराव तथा भय्यासाहेबांचा जन्म झाला. याच साली डॉ. बाबासाहेब बी.ए. झाले. दरम्यान, बाबासाहेब पुन्हा मुंबईत आले. परेलच्या बीआयटी चाळ, 8/50 येथे आंबेडकर कुटुंबाचे वास्तव्य होते. तेथून पोयबावडी असा प्रवास चालू होता. भूतकाळ भराभरा सरकत होता.
यशवंतरावांच्या जन्मानंतर खरेतर बाबांच्या जागी दुसरा इसम असता तर आधी त्याने बायको-मुलांची काळजी घेतली असती. मुलाला चांगल्या शाळेत घातले असते. परंतु बाबासाहेबांची गृहकृत्यदक्षता समाजासाठी होती. हजारो निराधार, सामाजिक गुलामगिरीच्या जोखडाखाली दडलेल्या समाजाचे पालकत्व बाबासाहेबांनी स्विकारले होते.त्यामुळेच रमाईंना बाबासाहेबांचा फार कमी सहवास लाभला. यशवंतरावांच्या पाठीवर गंगाधर, रमेश, इंदू व राजरत्न जन्मास आले. परंतु मुलाचे मुख पाहण्याइतकीही बाबासाहेबांना फुरसत नाही. बाळंतपणानंतर स्त्रीला खूप जपावे लागते. अशावेळी स्त्री पतीच्या मायेच्या स्पर्शासाठी आसूसलेली असते . तिला काय हवे नको, याची विचारपूस केली तरी तिला पुरेसे असते. परंतु हे सुखाचे क्षण रमाईच्या वाट्यास कधीच आले नाहीत. गंगाधर खूप आजारी असल्याचे रमाईचे पत्र मिळताच `मी लवकरच येत आहे. तू त्याला डॉक्टरकडे ने, काहीही कर. असेल नसेल ते गहाण ठेव पण मुलाला वाचव' महिनाभरात त्यांच्या हाती दुसरे पत्र असे. त्यात `साहेब, मला क्षमा करा. मी गंगाधराला वाचवू शकले नाही.' जी गत गंगाधरची तीच गत रमेशची व इंदूची. इंदू अगदी रमाईचा तोंडवळा घेऊन आली होती. असे म्हणतात आंबेडकरांच्या घराण्यात ती उजवी ठरली असती इतकी नाकीडोळी छान होती. परंतु इंदूही दोन भावांच्यामागोमाग निघून गेली. धाकटा राजरत्न गेला. तेव्हा बाबासाहेब ओक्साबोक्सी रडले होते. परदेशातून आल्यावर भर पावसात ते एकटेच स्मशानात गेले जेथे राजरत्नला दफन केले, त्या मातीवर फुले वाहताना काही क्षण बाबासाहेब स्तब्ध झाले. खूप रडले. एक पिता म्हणून बाबासाहेबांना काय वाटले असेल? पहाडासारखा माणूस नखशिखांत हादरला. कशासाठी हा त्याग? अनुयायी म्हणविणारे आम्ही, या त्यागाची जाणीव ठेवणार आहोत की नाही? 1912 पासून डॉ. बाबासाहेब राजकारणात अधिक व्यस्त होत गेले. 1913- न्यूयॉर्प येथे उच्चशिक्षणाकरीता रवाना झाले.
1915 इंडियन कॉमर्स या प्रबंधावर एमएची पदवी प्राप्त केली. 1916- जातीसंस्थेचे उच्चाटन या प्रबंधामुळे पीएचडी. 1918 - सिडनहॅम कॉलेजचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक. 1920 ते 1932 ही तेरा वर्षे बाबासाहेब अक्षरश घरपण विसरले. मूकनायकाचा प्रारंभ, बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे मेळावे, आंदोलने, महाडचा सत्याग्रह, गोलमेज परिषदेनिमित्त झालेला संघर्ष, पुणे कराराची लढाई, त्याआधीचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह यासर्व घडामोडींत बाबासाहेब कुटुंबापासून जे दूर गेले ते 1933 मध्येच परतले.
दादर हिंदू कॉलनीत त्यांनी रमाईच्या मनाजोगे प्रशस्त घर बांधले. ही प्रचंड वास्तू पाहून रमाई इतक्या हरखून गेल्या की, मागच्या सर्व दुःखांचा त्यांना विसर पडला. कारण कार्यकर्त्यांचा राबता, त्यांची उठाबस करण्यात रमाईंचा वेळ जाऊ लागला. वडिलांच्या समान असलेले कार्यकर्तेही त्यांना रमाई याच नावाने संबोधित असत. सुरुवातीला कसे अवघडल्यासारखे वाटे. नंतर सवय होत गेली. उरलेले आयुष्य आता साहेबांच्या सारखेच समाजाच्या सेवेसाठी वाहायचे हा एकच विचार! साहेब खूप मोठे आहेत. प्रबोधनकार ठाकरे - बोले- चित्रे-गद्रे ही ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर मंडळी सतत येत होती. त्यांच्या चर्चेतून साहेब काहीतरी `न भुतो न भविष्यती' असे कार्य करणार आहेत. त्यासाठी त्यांचा रात्रंदिवसं अभ्यास चालू आहे. त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येणार नाही, याची काळजी घेत रमाई राजगृहाच्या मुख्य दरवाज्यावर बसून असायच्या. पहारा देतादेता डोळा कधी लागे हे त्यांचे त्यांनाच कळत नसे. पहाटे पर्यंत डॉ. बाबासाहेबांचे वाचन चाले. अध्ययनातून बाहेर आल्यानंतर त्यांना दरवाजाला डोके टेकून गाढ झोपेत असलेल्या रमाईंना पाहिल्यावर बाबासाहेब धावत. मग डोळ्यावर पाणी मारून उठवावे लागे. केवळ त्यांच्या अस्तित्वाने राजगृहाचे घरपण टिकून होते. आज मात्र राजगृह मुका झाला होता. रमाई गेल्याचे कळताच लाखो लोकांचा समुदाय त्यांच्या दर्शनार्थ धावत होता. त्यांच्या निपचित पडलेल्या देहाकडे बाबासाहेब पाहत होते. रमाईंच्या आठवणींनी एकच गर्दी केली. महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी आग्रह धरणाऱया रमाई... सत्याग्रहींसाठी एखाद्या झाडाखाली चूल पेटवून निदान भाकरी भाजून देण्याची संधी मिळावी म्हणून धडपडणारी रमाई... अशी कितीतरी रमाईची रूपं डोळ्यांपुढे साकारत होती. शाहीर पुंदन कांबळे हा प्रसंग शब्दबद्ध करताना लिहितात,
रमा बोले साहेबांना, हट्ट पुरवा माझ्या राया
त्या महाड संग्रामात, नका विसरू मला न्याया।
आजपरी मी हो कसला, कधी हट्ट नाही केला
आली संधी आज नामी, मग नकार कशाला ?
चितारले मनी स्वप्न, पुढे साकार कराया।।
तिच रमाई आज आम्हा सर्वांना सोडून जात आहे. काही क्षणांचीच ती सोबतीण आहे. थोड्यावेळाने ती दृष्टिआड होईल. बाबासाहेब मनोमन कोसळले. बाहेर प्रचंड समुदाय रमाईंच्या आठवणींनी धाय मोकलून रडत होता. यशवंतरावांना आई गेल्याचे कळताच त्याने बाबासाहेबांना घट्ट मिठी मारली. आईविना पोरकं लेकरू, बापाचं सदैव समाजकार्यात लक्ष कसं होणार बाळाचं? काळीज फाडणारं ते दृश्य. लाखोजणांची माता निघून गेली होती. रमाईने पाण सोडला, पण त्यांच्या डोळ्यांतील कारूण्य मात्र काळाला नेता आले नाही. आल्यागेल्याची काळजी घेणारी माता... कार्यकर्ते पुढे आले आणि रमाईचं कलेवर उचललं गेलं. एकच हंबरडा फुटला. आता परतीचा प्रवास सुरू झाला...
माय वासरांची गेली गेली, गाय वासरांची गेली।
सुनी सुनी झाली दुनिया, भिम पाखरांची।
अशा या रमाई बाबासाहेबांच्या कार्याचे एक अविभाज्य अंग बनून राहिलेल्या... 76 वर्षे उलटली तरी रमाई चळवळीचा एक हिस्सा बनून राहिल्या आहेत. मुंबईत वरळी स्मशानभूमीत जेथे त्यांना अग्नी देण्यात आला, त्या वरळी स्मशानभूमीतच काही तरुणांनी पुढाकार घेऊन पुतळा उभा केला आहे. चैत्यभुमीला अभिवादन करण्यासाठी आपण जसे न चुकता जातो, तसेच 27 मे, रोजी रमाईंना अभिवादन करण्यासाठी निदान मुंबईतून तरी न चुकता अनुयायांनी जायला हवे. रमाई म्हणजे प्रज्ञा-करुणा आणि दया यांचा संगम. रमाईंच्या प्रतिमेकडे पाहताना त्यामुळेच आपले लक्ष फक्त त्यांच्या डोळ्यांवरच स्थिरावते. जणू काही जगातील सगळं कारुण्य त्यांच्या डोळ्यात एकवटले असल्याचा भास होतो..............!
संदर्भ - विजन ब्लॉग वरून साभार....!
संपादन - अँड. राज जाधव...!!!
sumit bansode
ReplyDeletebabasaheb ani ramaini jo tag aplasati kela ahe to konihi karu shaknar nahi
खूप महान त्याग होता माता रमाई चा
ReplyDelete