My Followers

Sunday, 18 August 2013

माझा भीम मला भेटतो बाई ग....!

माझा भीम मला भेटतो बाई ग....!


मले सांगतो काही
मले सांगतो काही
माझा भीम मला भेटतो बाई गा
शेता-शेताच्या पाटात उभा
राबत्या हाताच्या साथीला उभा
मुक्या वासराच्या आसवात बाई
भीम पाहते बाई
शाळे-शाळेच्या दारात उभा
टाक लेखनाच्या श्याहीत उभा
बुका-बुकाच्या राशीत उभा
चिमणी चिमणीच्या वातीत तो उभा
वाती वातीच्या उजेडात उभा ग
बोट लेकराचे हातामधी घेई
त्याले शाळेत नेई
लढ शिकण्यासाठी म्हनतो ग बाई
त्याले शाळेत ने
शिक लढण्यासाठी म्हनतो ग बाई
त्या ग हापिसाच्या उभाबाहेर
त्या ग फॅक्टरीच्या बाहेर उभा
काम हाताला धुंडीत उभा
डोंब भुकेचा घेऊन उभा
कोर-चतकोर धुंडीत उभा
तुझे काम कोनी चोरले गा बाई
मले पुसत राही
मले पुसत राही
तुझ्या उरावर मालकशाही
तिले गाडत का नाही
तिले गाडत का नाही
आई भूमीला म्हनतो ग बाई
नदी काठाने धुंडीत तो आई
पाय ठेवायला जमीन का नाही
वनवास रामाचा सांगत्यात बाई
वनवास रामाचा १४ वर्ष बाई
आमचा वनवास जल्माचा बाई ग
आमचा वनवास जल्माचा बाई ग
त्याचे आहे का कुनाला काही
वो ....भीम गर्जून सांगतो बाई
मागून मिळणार नाही
मागून मिळणार नाही
कसेल त्याचीच होईल भुई
मागून मिळणार नाही
तुडुंब तळ्याच्या बाहेर उभा
सरी सर सर बघित उभा
देणे निसर्गाचे म्हणीत उभा
तहान उरात घेऊन उभा
आग डोळ्यात जाळीत उभा
त्याच्या जीवाची गा होई लाही लाही ग
हुंदकार सांडत राही
हुंदकार सांडत राही
उभी पाणवठ्यावर बामणशाही
तिले गाडत का नाही
तिले गाडत का नाही
अशा या बाबासाहेबांना कुठे ठेवलेले आहे
अशा या बाबासाहेबांना म्हणजेच त्याच्या गोर गरीब माणसाना कुठे ठेवलेले आहे
भीम पुतळ्यात बंद केला बाई
भीम भजनात मंद केला बाई
त्याच्या वै-यानी जेरबंद केला गा
भीम माझा रडितो ग ठायी ठायी ...आसू डोई बडी पायी
वळीव आसवाचे कोसळती बाई ..
अंग अंग अशी चवताळते बाई
भीम बाजारी आनला ग बाई
त्याची जाहिरात झाली ग बाई
सारे खाटिक ग जमले ग बाई गा .....
सुरे सर सरसावले बाई
सहस्त्र रक्तांच्या चिळकांड्या बाई
सा-या आभाळी भिडल्या गा बाई
भीम राजा रे रडू नको बाबा रे रडू नको राजा
वाटे भीमाचे घातले ग बाई
कुनी मतासाठी इकतो गं बाई
कुनी स्वतासाठी इकतो गं बाई
कुनी पदासाठी इकतो गं बाई
कुनी खुर्चीसाठी इकतो गं बाई
भीम राजा रे .....भीम बाबा
भीम पुतळ्यातून बाहेर ये बाबा
भीम भजनातून बाहेर ये बाबा
नवा विचार घेऊन ये बाबा
नवा हत्यार घेऊन ये बाबा
भीम भीम येनार येनार बाई
पन अवतार घेऊन नाय

उद्याचे बाबासाहेब हे आपल्या लढ्यातून आणि चळवळीतून येणार आहेत
आणि म्हणून वाट पाहते आहे माजी आई
वाट पाहते बाई...वाट पाहते बाई....वाट पाहते बाई...!

- संभाजी भगत.....!

Thursday, 15 August 2013

राष्ट्रध्वज......!


राष्ट्रध्वज......! 

प्रबोधनकार ठाकरे यानी २० /०८ /१९४७ नवशक्ती मध्ये लिहलेले पत्र - 
(तिरंगा अधिकृत ध्वज ठरल्यानंतर पाच दिवसांनी लिहलेले पत्र ) - 

"दहा जुलै ला हिंदू महासभेचे काही नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सांताक्रूझ विमानतळावर भेटले, त्यांना दोन भगवे ध्वज भेट दिले, भगवा ध्वजच राष्ट्र ध्वज म्हणून निवडावा, अशी विनंती केली. बाबासाहेब ध्वज समितीत सदस्य होते, बाबासाहेबांनीहि या कल्पनेचा विचार करण्याचे आश्वासन दिले, दिल्लीत येवून भगव्या राष्ट्रध्वजाबाबात समितीला निवेदन द्यावे, असे बाबासाहेबांनी सुचविले होते. प्रत्यक्षात दिल्लीत कुणी गेले नाही. समितीत बाबासाहेबांनी हा विषय मांडला, पण पाठींबा मिळाला नाही. 

भगव्याचा आग्रह करणारे दिल्लीत का गेले नाहीत, प्रश्न उपस्थित करत प्रबोधनकारांनी माशी कुठं शिकली, असा प्रश्न विचारला आहे, 

भेटण्यास आलेल्या शिष्टमंडळास बाबासाहेब म्हणाले, "आपण थोर - थोर प्रातिनिधिक संस्थांची थोर - थोर मंडळी आहात, हे काम माझ्यासारख्या एका महाराच्या पोरावर सोपवणं हा तुमच्या मनाचा थोरपणा आहे. दिल्लीत मला तुमचे भक्कम पाठबळ लाभले तर हे कार्य मला साधेल."

- संदर्भ : डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, खंड - १०, पाने १७ ते १९, आभार - सकाळ 

संपादन - राज जाधव......!

Sunday, 16 June 2013

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा स्मृतिदिन

आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा स्मृतिदिन (१७ जून 1674)..... जिजाऊ मांसाहेबांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन....!

Saturday, 13 April 2013

"आंबेडकर"...!



"आंबेडकर"...!

पर्यायच नाही...तुला व्हावेच लागेल ‘आंबेडकर’...!

‘आंबेडकर’ यांच्या एवढा मोठा नाहीस झाला....तरी
लहानगा का होईना...आंबेडकरच व्हावे लागेल तुला...!

तुझ्या बापापरी मजूर नाही, वा मास्तरही नाही,
कलेक्टरही नाही, फक्त आंबेडकर होणे आहे तुला...!

म्हणजे सम्यक क्रांतीला...देशात आणणे आहे तुला...!

सर्वांना भीम जयंतीच्या स्नेहांकित लाख लाख शुभेच्छा……. !

Thursday, 21 February 2013

स्त्री जन्मा...ही तुझी कहाणी....!

स्त्री जन्मा...ही तुझी कहाणी....!


हिमाचल प्रदेश मधील "कुल्लू" या शहराला देवता ची घाटी म्हटले जाते, हि घाटी आपल्या चित्र विचित्र अंधश्रद्धा आणि देव परंपरा यासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या बोली भाषेला "गणाशी" म्हटले जाते. त्या घाटीमध्येच "मलाणा" हे गाव असून, या गावात अशी मान्यता आहे हि, हे गावावर फक्त देवाचे शासन चालते, या गावाच्या भूमीवर "जमलु" नामक देवताचा अधिकार असून गावातील लोक त्याची प्रजा आहेत.

"जमलु" नामक  देवताच्या परवानगी शिवाय या गावात कोणी येवू शकत नाही आणि बाहेर देखील जाऊ शकत नाही, देवाच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द हा अखेरचा मानला जातो...!

देवाच्या आणि त्याच्या प्रजेच्या मध्ये एक दुवा आहे, तो म्हणजे "गुर" (ब्राह्मण पुजारी). हा गुर भक्ताचे गाऱ्हाणे देवाला सांगतो आणि ती  "जमलु" नामक  देवता या "गुर" (पुजारी) व्दारे भक्ताला उपाय सांगते...!  
   
PICS: इस गांव का है विश्व का सबसे पुराना लोकतंत्र, यहां नहीं चलता भारतीय कानूनमलाना गावामध्ये स्त्रियांची परिस्थिती अतिशय कष्ट दायक आणि गंभीर आहे, जिथे संपूर्ण भारतात जर कोणाला मुल बाळ होणार असेल तर सगळीकडे कुटुंबात आनंदाचे वातावरण असते.  मुल जन्मल्यावर मुल आणि आईची विशेष काळजी घेतली जाते...त्यांना ऊन, वारा, पाऊस या पासून रक्षण केले जाते...त्यांना आवश्यक दवा पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यांची मनोभावे सेवा केली जाते... सकस आहार दिला जातो, खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली जाते....इथे मात्र....   

कुल्लू घाटी मधील "मलाणा" या गावामध्ये एखादी महिला प्रसूत झाली कि, देवाच्या आदेशाने त्या महिलेला तिच्या नवजात शिशुसोबत घराबाहेर काढले जाते, जन्म दिल्या पासून १५ दिवस गावाच्या बाहेर एखाद्या तात्पुरत्या तंबू मध्ये त्या दोघांना रहावे लागते. हि परंपरा आज देखील या गावातील लोक मानतात...या प्रथे विरुद्ध कोणी बोलत नाही, कारण त्याला या तथाकथित "देवता" चा कोप "गुर " व्दारे सहन करावा लागेल.  
    
PICS: इस गांव का है विश्व का सबसे पुराना लोकतंत्र, यहां नहीं चलता भारतीय कानूनगावामध्ये वीज, दवाखाना, शाळा देखील आहे परंतु स्त्रियांसोबत होणारा हा अमानुष खेळ यांच्या परंपरेचा एक भाग आहे. तत्पूर्वी प्रसूत झालेल्या महिलेला स्वतचे रक्ताळलेले कपडे स्वतच धुवावे लागतात, १५ दिवस नवजात शिशुचे देखील कपडे त्याच्या आईलाच धुवावे लागतात, १५ दिवस गावाच्या बाहेर राहिल्यानंतर १६ व्या दिवशी घराला रंगकाम वगैरे करून देवताच्या आदेशा नुसार तिला व तिच्या नवजात शिशूला घरात घेतले जाते.  कित्येकदा १५ दिवस घराच्या बाहेर राहिल्यामुळे औषधपाणी व व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे प्रसूता किंवा त्या नवजात शिशूचा अंत होतो. आज हि गावातील लोक या रूढीचे पालन करने हे "जमलु" देवाचा आदेश आणि आपला धर्म समजतात.  

मालानाच्या स्त्रियांचे एवढेच दुखः नाही तर अशी अनेख रूढीवादी परंपरा त्यांना रोजच्या जनजीवनात छळत आहेत, नवऱ्याने बायकोला सोडून दिले तर ३०००/- रुपये देवाला अर्पण करून त्याचे कृत्य जायज समजले जाते, विधवा झाल्यास कोणताही दाग दागिना स्त्री घालू शकत नाही. अश्या कित्येक गोष्टीव्दारे "स्त्री" वर्गाची विटंबना केली जाते.

हे देवाचे शासन आहे,  देव हे सांगतो, देव ते सांगतो असे म्हणून लोकांना वेड्यात काढणाऱ्या पुजारयाना अद्दल घडविणे गरजेचे आहे, अन्यथा हे "गुर " नामक ब्राह्मण पुजारी "जमलु" देवाला खुश करण्यासाठी स्त्रियांचे अश्या प्रकारे बळी देतच राहतील  देवाच्या नावाने बाळगली जाणारी अश्या प्रकारची अंधश्रद्धा लवकरात लवकर व्हायला हवी.    

आज हि या पुरातन, रूढीवादी, धर्मांध, पुरुषप्रधान संस्कृती मध्ये एक तर स्त्रीला "देवीचा" दर्जा दिला जातो, नाहीतर "वेश्ये" चा तरी.....!  (स्त्रीला महान तरी बनविले जाते नाहीतर हीन वागणूक दिली जाते, समान वागणूक दिली जात नाही )     

आज भारत एक जागतिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत आहे, परंतु आज हि खेडो पाडी, ग्रामीण भागात, हिमालयात लोक पोथी, पुराण, रूढी, अंधश्रद्धा, उपास  तपास यामध्येच अडकलेले आहेत, आणि याचे मुख्यत शिकार प्रामुख्याने "स्त्री" वर्ग होताना दिसतो...याला मुख्यत रूढीवादी, अवाजवी, पुरुषप्रधान संस्कृती कारणीभूत ठरतेय, हीच पुरुषप्रधान संस्कृती सध्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बलात्कारात दिसून येत आहे, "स्त्री" ला जोपर्यंत हीन दर्जाने पाहणे, वागवणे सोडून दिले जाणार तो पर्यंत स्त्रियांवर अशे अत्याचार होताच राहणार....त्यामुळे आपणच आपल्या वागण्यात रोजच्या जीवनात, आई, बहिण, पत्नी, सहकारी यांच्या सोबत सन्मानाने वागले पाहिजे, घरातूनच स्त्रीचा सन्मान करायला शिकाल तर बाहेरच्या स्त्रीला देखील सन्मानानेच पाहाल, तेव्हा कुठे अश्या घटनांना आळा बसेल....!     
  
लेखक - अँड. राज जाधव...!!!

Wednesday, 6 February 2013

कारुण्यमूर्ती.......रमाई........!


कारुण्यमूर्ती.......रमाई........! 


"साहेब मी चालले.....आता ही आपली शेवटी भेट...यशवंता, मुकुंदा लहान आहेत. खूप इच्छा होती आपल्या कार्यात मदत करावी, परंतु आता ते शक्य नाही. रमाई आता काही क्षणांची सोबती आहे. आतातर शब्दही उमटत नाहीत. तिला काहीतरी सांगायचे आहे पण मुखातून शब्द उमटत नसल्याने फक्त ओठांची होणारी हालचाल......


अठ्ठावीस वर्षांची समर्थ साथ देणा-या रमाईच्या स्वभावाची बाबासाहेबांना जाणीव होती. रमाईचे मन फक्त बाबासाहेबच जाणून होते. `इतक्या वर्षांच्या संसाराच्या धबडग्यात आपण कधी तिला तू कशी आहेस? असे साधे शब्दानेही विचारपूस केली नाही. आपल्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून राजगृहाची ही मालकीण प्रवेशद्वारावर तासन्तास बसून राहायची. मला भेटावयास आले की, त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागणारी, साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा. आलेल्याची रवानगी करताना त्याचे नाव, गावं, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपणारी रमा...कार्यालयीन सचिवाची एकप्रकारे भूमिका पार पाडत होती... 


हिंदू कॉलनी, परळ, शिवडी विभागात स्वत जाऊन महिलांची भेट घेऊन चळवळीचे महत्त्व पटवून देणारी...आपण विदेशात अभ्यासात व्यस्त असल्याने, वसतीगृहातील मुलांची उपासमार होऊ नये यासाठी कधीकाळी मोठ्या हौसेने बनविलेल्या सोन्याच्या बांगड्या वराळे मास्तरांकडे देऊन `हे विकून मुलांचा खर्च भागवा, मुले उपाशी राहता कामा नयेत' असे सांगणारी रमा... आपले वाचनाचे वेड लक्षात घेऊन लटक्या रागाने बोलणारी...`बघावं तेव्हा आपलं पुस्तकात लक्ष. ना जेवणं ना खावंण...' आपण तिला सांगायचो, `बघ, रमा तू जेऊन घे. मी हा आलोचं, पण पुस्तकात डोकं खुपसल्यावर जेवणाची कसली ती शुद्धच राहात नसायची. आपल्या या स्वभावामुळे एकदा ती चिडलीच व म्हणाली, `काय हो, तुम्ही हे तासन्तास वाचत बसता. तुमच्या या ढिगभर पुस्तकात घरात बायको आहे, तिला एक मुलगा आहे. विशेष म्हणजे स्वतला एक घर आहे. त्यांच्यासाठी थोडातरी वेळ काढावा, असे काहीतरी लिहिले नाही काय?' 


रमाच्या त्या बोलण्यावर आपण मनमुराद हसलो. इतके हसलो की, क्षणापूर्वी रागावणाऱया त्या तिच्या डोळ्यातील रागाची जागा तरल स्नेहभावाने घेतली. त्यावेळी तिने चक्क बखोटीला धरून, `चला, जेवण गरम आहे. एकदा पोटभर जेवा आणि मग बसा लायब्ररीत जाऊन...'


बाबासाहेबांच्या डोळ्यांपुढे रमाईचे गतजीवन एखाद्या चलतचित्रपटासारखे पुढे सरकू लागले. 1907 साली परकर-चोळीतील निरागस रमाशी आपण विवाहाच्या बंधनात अडकलो. खरे तर या साऱया गोष्टींना आपण तयार नव्हतो. पण वडिलांच्या आज्ञेबाहेर जाण्याचे धाडस होत नव्हते. अस्पृश्यातील पहिला पदवीधर होण्याचा मान मला मिळाला. त्यामागे बाबांचाच मोठा सिंहाचा वाटा आहे. बाबांनी माझी आवड लक्षात घेऊन पदरमोड करून पुस्तकं पुरविली. मॅट्रिक झालेल्या तरुणाला कमी शिकलेली मुलगी द्यायची? धोत्रे मंडळीत यावर कुजबूज सुरू होती. नाहीतरी मुली शिकून काय दिवा लावणार आहेत? या अज्ञानापोटी त्यावेळी मुलींना शाळेत पाठवित नसत. याची माझ्या वडिलांना जाणीव होती. `बघुया जमलं तर, आम्ही लग्नानंतर शाळेत घालू. खूप शिकवू', रमाला पाहिल्यावर का कोण जाणे, रामजी बाबांनी तात्काळ होकार दिला. भर पावसात भायखळ्याच्या बाजारात लग्नसोहळा पार पडला. बाजारात का? तर अस्पृश्य असल्याने त्यांना पैसे मोजूनही कोणी हॉल द्यावयास कोणी राजी नव्हते. लग्नानंतर दुसऱयाच दिवशी बाबासाहेब परदेशात उच्चशिक्षणासाठी गेले. आम्ही 1912 साल डॉ. बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष मानतो. 12/12/1912 साली यशवंतराव तथा भय्यासाहेबांचा जन्म झाला. याच साली डॉ. बाबासाहेब बी.ए. झाले. दरम्यान, बाबासाहेब पुन्हा मुंबईत आले. परेलच्या बीआयटी चाळ, 8/50 येथे आंबेडकर कुटुंबाचे वास्तव्य होते. तेथून पोयबावडी असा प्रवास चालू होता. भूतकाळ भराभरा सरकत होता.


यशवंतरावांच्या जन्मानंतर खरेतर बाबांच्या जागी दुसरा इसम असता तर आधी त्याने बायको-मुलांची काळजी घेतली असती. मुलाला चांगल्या शाळेत घातले असते. परंतु बाबासाहेबांची गृहकृत्यदक्षता समाजासाठी होती. हजारो निराधार, सामाजिक गुलामगिरीच्या जोखडाखाली दडलेल्या समाजाचे पालकत्व बाबासाहेबांनी स्विकारले होते.त्यामुळेच रमाईंना बाबासाहेबांचा फार कमी सहवास लाभला. यशवंतरावांच्या पाठीवर गंगाधर, रमेश, इंदू व राजरत्न जन्मास आले. परंतु मुलाचे मुख पाहण्याइतकीही बाबासाहेबांना फुरसत नाही. बाळंतपणानंतर स्त्रीला खूप जपावे लागते. अशावेळी स्त्री पतीच्या मायेच्या स्पर्शासाठी आसूसलेली असते . तिला काय हवे नको, याची विचारपूस केली तरी तिला पुरेसे असते. परंतु हे सुखाचे क्षण रमाईच्या वाट्यास कधीच आले नाहीत. गंगाधर खूप आजारी असल्याचे रमाईचे पत्र मिळताच `मी लवकरच येत आहे. तू त्याला डॉक्टरकडे ने, काहीही कर. असेल नसेल ते गहाण ठेव पण मुलाला वाचव' महिनाभरात त्यांच्या हाती दुसरे पत्र असे. त्यात `साहेब, मला क्षमा करा. मी गंगाधराला वाचवू शकले नाही.' जी गत गंगाधरची तीच गत रमेशची व इंदूची. इंदू अगदी रमाईचा तोंडवळा घेऊन आली होती. असे म्हणतात आंबेडकरांच्या घराण्यात ती उजवी ठरली असती इतकी नाकीडोळी छान होती. परंतु इंदूही दोन भावांच्यामागोमाग निघून गेली. धाकटा राजरत्न गेला. तेव्हा बाबासाहेब ओक्साबोक्सी रडले होते. परदेशातून आल्यावर भर पावसात ते एकटेच स्मशानात गेले जेथे राजरत्नला दफन केले, त्या मातीवर फुले वाहताना काही क्षण बाबासाहेब स्तब्ध झाले. खूप रडले. एक पिता म्हणून बाबासाहेबांना काय वाटले असेल? पहाडासारखा माणूस नखशिखांत हादरला. कशासाठी हा त्याग? अनुयायी म्हणविणारे आम्ही, या त्यागाची जाणीव ठेवणार आहोत की नाही? 1912 पासून डॉ. बाबासाहेब राजकारणात अधिक व्यस्त होत गेले. 1913- न्यूयॉर्प येथे उच्चशिक्षणाकरीता रवाना झाले. 


1915 इंडियन कॉमर्स या प्रबंधावर एमएची पदवी प्राप्त केली. 1916- जातीसंस्थेचे उच्चाटन या प्रबंधामुळे पीएचडी. 1918 - सिडनहॅम कॉलेजचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक. 1920 ते 1932 ही तेरा वर्षे बाबासाहेब अक्षरश घरपण विसरले. मूकनायकाचा प्रारंभ, बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे मेळावे, आंदोलने, महाडचा सत्याग्रह, गोलमेज परिषदेनिमित्त झालेला संघर्ष, पुणे कराराची लढाई, त्याआधीचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह यासर्व घडामोडींत बाबासाहेब कुटुंबापासून जे दूर गेले ते 1933 मध्येच परतले.


दादर हिंदू कॉलनीत त्यांनी रमाईच्या मनाजोगे प्रशस्त घर बांधले. ही प्रचंड वास्तू पाहून रमाई इतक्या हरखून गेल्या की, मागच्या सर्व दुःखांचा त्यांना विसर पडला. कारण कार्यकर्त्यांचा राबता, त्यांची उठाबस करण्यात रमाईंचा वेळ जाऊ लागला. वडिलांच्या समान असलेले कार्यकर्तेही त्यांना रमाई याच नावाने संबोधित असत. सुरुवातीला कसे अवघडल्यासारखे वाटे. नंतर सवय होत गेली. उरलेले आयुष्य आता साहेबांच्या सारखेच समाजाच्या सेवेसाठी वाहायचे हा एकच विचार! साहेब खूप मोठे आहेत. प्रबोधनकार ठाकरे - बोले- चित्रे-गद्रे ही ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर मंडळी सतत येत होती. त्यांच्या चर्चेतून साहेब काहीतरी `न भुतो न भविष्यती' असे कार्य करणार आहेत. त्यासाठी त्यांचा रात्रंदिवसं अभ्यास चालू आहे. त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येणार नाही, याची काळजी घेत रमाई राजगृहाच्या मुख्य दरवाज्यावर बसून असायच्या. पहारा देतादेता डोळा कधी लागे हे त्यांचे त्यांनाच कळत नसे. पहाटे पर्यंत डॉ. बाबासाहेबांचे वाचन चाले. अध्ययनातून बाहेर आल्यानंतर त्यांना दरवाजाला डोके टेकून गाढ झोपेत असलेल्या रमाईंना पाहिल्यावर बाबासाहेब धावत. मग डोळ्यावर पाणी मारून उठवावे लागे. केवळ त्यांच्या अस्तित्वाने राजगृहाचे घरपण टिकून होते. आज मात्र राजगृह मुका झाला होता. रमाई गेल्याचे कळताच लाखो लोकांचा समुदाय त्यांच्या दर्शनार्थ धावत होता. त्यांच्या निपचित पडलेल्या देहाकडे बाबासाहेब पाहत होते. रमाईंच्या आठवणींनी एकच गर्दी केली. महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी आग्रह धरणाऱया रमाई... सत्याग्रहींसाठी एखाद्या झाडाखाली चूल पेटवून निदान भाकरी भाजून देण्याची संधी मिळावी म्हणून धडपडणारी रमाई... अशी कितीतरी रमाईची रूपं डोळ्यांपुढे साकारत होती. शाहीर पुंदन कांबळे हा प्रसंग शब्दबद्ध करताना लिहितात, 


रमा बोले साहेबांना, हट्ट पुरवा माझ्या राया

त्या महाड संग्रामात, नका विसरू मला न्याया।

आजपरी मी हो कसला, कधी हट्ट नाही केला

आली संधी आज नामी, मग नकार कशाला ?

चितारले मनी स्वप्न, पुढे साकार कराया।।


तिच रमाई आज आम्हा सर्वांना सोडून जात आहे. काही क्षणांचीच ती सोबतीण आहे. थोड्यावेळाने ती दृष्टिआड होईल. बाबासाहेब मनोमन कोसळले. बाहेर प्रचंड समुदाय रमाईंच्या आठवणींनी धाय मोकलून रडत होता. यशवंतरावांना आई गेल्याचे कळताच त्याने बाबासाहेबांना घट्ट मिठी मारली. आईविना पोरकं लेकरू, बापाचं सदैव समाजकार्यात लक्ष कसं होणार बाळाचं? काळीज फाडणारं ते दृश्य. लाखोजणांची माता निघून गेली होती. रमाईने पाण सोडला, पण त्यांच्या डोळ्यांतील कारूण्य मात्र काळाला नेता आले नाही. आल्यागेल्याची काळजी घेणारी माता... कार्यकर्ते पुढे आले आणि रमाईचं कलेवर उचललं गेलं. एकच हंबरडा फुटला. आता परतीचा प्रवास सुरू झाला...


माय वासरांची गेली गेली, गाय वासरांची गेली।

सुनी सुनी झाली दुनिया, भिम पाखरांची।


अशा या रमाई बाबासाहेबांच्या कार्याचे एक अविभाज्य अंग बनून राहिलेल्या... 76 वर्षे उलटली तरी रमाई चळवळीचा एक हिस्सा बनून राहिल्या आहेत. मुंबईत वरळी स्मशानभूमीत जेथे त्यांना अग्नी देण्यात आला, त्या वरळी स्मशानभूमीतच काही तरुणांनी पुढाकार घेऊन पुतळा उभा केला आहे. चैत्यभुमीला अभिवादन करण्यासाठी आपण जसे न चुकता जातो, तसेच 27 मे, रोजी रमाईंना अभिवादन करण्यासाठी निदान मुंबईतून तरी न चुकता अनुयायांनी जायला हवे. रमाई म्हणजे प्रज्ञा-करुणा आणि दया यांचा संगम. रमाईंच्या प्रतिमेकडे पाहताना त्यामुळेच आपले लक्ष फक्त त्यांच्या डोळ्यांवरच स्थिरावते. जणू काही जगातील सगळं कारुण्य त्यांच्या डोळ्यात एकवटले असल्याचा भास होतो..............! 


संदर्भ - विजन ब्लॉग वरून साभार....!

संपादन - अँड. राज जाधव...!!!

Wednesday, 30 January 2013

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तेजस्वी पत्रकारिता......!


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तेजस्वी पत्रकारिता......!


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रामुख्याने घटनेचे शिल्पकार आणि दलित समाजाचे उध्दारक म्ह्णून आपण सारे ओळखतो. पण एक तेजस्वी आणि महान पत्रकार अशी त्यांची ओळख सहसा कोणाला नाही. 1920 पासून पत्रकारितेचे व्रत अंगीकारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता तसेच प्रबुध्द भारत ही चार वृत्तपत्रे सुरु केली, अनेक अडचणींचा सामना करीत ही वृत्तपत्रे हिरीरिने चालविली. समता आणि इतर वृत्तपत्रात सातत्याने लेखन केले, असे असूनही वृत्तपत्रांचा इतिहास लिहिणार्‍यांनी त्यांच्या या कार्याची हवी तेवढी दखल घेतली नाही. डॉ. गंगाधर पानतावणे, वसंत मून  आणि इतर काही अभ्यासकांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेबाबत स्वतंत्रपणे ग्रंथलेखन केले तेव्हा महाराष्ट्राला त्यांच्या पत्रकारितेची थोरवी लक्षात आली.

हजारो वर्षे आपले प्राक्तन समजून सवर्णांचा अन्याय निमूटपणे सहन करणार्‍या दीनदलित समाजाला जागे करण्यासाठी 'मूकनायक' हे वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर 31 जानेवारी 1920 रोजी सुरु केले. तेव्हा डॉ. आंबेडकर इंग्लंडमधून उच्चशिक्षण आर्थिक अडचणींमुळे अर्धवट सोडून नुकतेच परतले होते. या वृत्तपत्राच्या पहिल्या अंकात भूमिका विषद करताना त्यांनी म्ह्टले होते "आमच्या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणार्‍या अन्यायावर चर्चा होण्यास तसेच त्यांच्या भावी उन्नतीच्या मार्गांची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी भूमी नाही.पण अशा वर्तमानपत्राची उणीव असल्याने ती भरुन काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे". डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे वृत्तपत्र तीन वर्षे अखंडपणे चालविले  दलित समाजाला जागे करण्यास व आपल्या हक्कांची जाणीव करुन देऊन संघर्षासाठी सिध्द करण्यास प्रारंभ केला .पण त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उच्चशिक्षण पूर्ण करण्यास पुन्हा इंग्लंडला जावे लागले. त्यांच्या अनुपस्थितीत अनुयायांना मूकनायक चालविण्याचे आव्हान पेलले नाही त्यामुळे 8 एप्रिल 1923 ला ते वृत्तपत्र बंद पडले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 एप्रिल 1927  रोजी 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुरु केले. या वर्तमानपत्रासाठी त्यांनी आपले रक्त आटवले, इंग्रजांनी देऊ केलेली मोठ्या पगाराची नोकरी नाकारली.अनेकदा हे वृत्तपत्र बंद पड्ले , पण पुन्हा हिरीरिने सुरु केले. मात्र अगदीच नाईलाज झाल्याने 15 नोव्हेंबर 1928 ला हे वृत्तपत्र बंद करावे लागले.वसंत मून यांनी आपल्या ग्रंथात लिहिले आहे "बहिष्कृत भारत वृत्तपत्राने अस्पृश्य समाजात मोठी क्रांती घडवून आणली आहे. हे पत्र म्ह्णजे धार्मिक किल्ल्याच्या जातीभेदररुपी तटास भगदाड पाडणारी मशीनगणच आहे". या विधानावरुन त्या काळात बहिष्कृत भारत ची कामगिरी किती महत्वाची होती हे जाणवते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 24 नोव्हेंबर 1930 रोजी 'जनता' हे पाक्षिक सुरु केले, ते पुढे साप्ताहिक झाले व 1956 पर्यंत सुरु राह्रिले. अस्पृश्य समाजाचे प्रश्न इतर समाजालाही कळावेत यासाटी त्यांनी 'जनता' ची सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौध्द धम्माची  दीक्षा घेतल्यानंतर 'जनता' साप्ताहिकाचे नामांतर 'प्रबुध्द भारत' असे करण्यात आले. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे महानिर्वाण झाल्यावरही अनुयायांनी ते अनेक वर्षे चालविले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आणि त्यांच्या वृत्तपत्रांव्रर त्या काळात अनेक सवर्ण नेत्यांनी व त्यांच्या वृत्तपत्रांनी जहरी टीका केली. पण आंबेडक्ररांनी सतत विचारांनीच त्या टीकेला उत्तर दिले, यात त्यांचे मोठेपण जाणवते.लको अनुयायी असतानाही त्यांनी कधी मारा,झोडाची भाषा केली नाही. सतत 36 वर्ष भारताच्या उन्नतीसाठी आपल्या तेजस्वी लेखणीने माग्रदर्शन करणार्‍या या महान पत्रकाराने जातीपाती तोडण्यापासून देशाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत सर्व विषयांवर नेमके लेखन केले आहे. त्यांची पत्रकारिता म्ह्णजे भारताच्या इतिहासाचा उलगडा करुन भविष्यातील बलशाली भारताचे चित्र रेखाटणारी पत्रकारिता आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या वृत्तपत्रांची शीर्षके निवडतानाही अतिशय समर्पक निवड केली होती.अनेक वर्षे ही वृत्तपत्रे चालविणे सर्वच संदर्भाने अतिशय कठीण होते.ज्या समाजापर्यंत शिक्षण फारसे पोहोचलेच नव्हते व ज्यांचे सातत्याने आर्थिक व सामाजिक शोषण झाले अशा दीनदलित समाजातील लोक मोठया प्रमाणात वृत्तपत्राचे वर्गणीदार होतील अशी अपेक्षा करणे शक्य्‍ा नव्हते, हे ठाऊक असूनही बाबासाहेब आपल्या ध्येयापासून तसूभरही ढळले नाहीत.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषा प्रवाही व धारदार होती. 'बहिष्कृत भारत' च्या एका अग्रलेखात भारतीय समाजाच्या टिकून राहण्याची कारणमीमांसा करताना त्यांनी लिहिले आहे "जेव्हा जेते लोक शहाणे झाले व जीत लोकांना मारुन टाकण्यापेक्षा शेतकी वगैरे कामाकडे त्यांचा उपयोग करुन घेता येईल असे त्यांना दिसून आले तेव्हा जीत लोकांचा संहार करण्याची पध्दती नाहीशी होऊन त्यांना गुलाम करण्याची पध्दत अमलात आली". यात पुढे त्यांनी लिहिले आहे की, "आम्ही जगलो याचे कारण आम्ही शास्त्राप्रमाणे वागलो हे नसून शत्रूंनी ठार मारले नाही हेच होय.शास्त्राप्रमाणे वाघून जर काही झाले असेल तर ते हेच की,इतर राष्ट्रांपेक्षा आम्ही अधिक हतबल झालो व कोणाविरुध्द दोन हात करुन जय संपादन करण्याइतकी कुवत आमच्याजवळ राहिली नाही".
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश आपल्या अनुयायांना देणार्‍या बाबासाहेब आंबेडकरांनी कितीही अडचणी आल्या तरी आपली लेखणी कुठे गहाण ठेवली नाही आणि जाहिरातींच्या मलिदयाची अपेक्षा बाळगली नाही. स्वतंत्र प्रज्ञेने त्यांची लेखणी सतत धारदार तलवारीच्या पात्यासारखी झळाळत राहिली. त्यांच्या पत्रकारितेचा विचार एका चौकटीत करण्याचे प्रकार थांबायला हवेत.त्यांची पत्रकारिता बलशाली भारताचे चित्र रेखाटणारी परिपूर्ण पत्रकारिता आहे.हृी पत्रकारिता यापुढ्च्या काळातही योग्य दिशा दाखविण्याचे कार्य करीत राहणार आहे, याची खात्री आहे.

- दैनिक दिव्य मराठी.......!

संपादन अँड. राज जाधव...!!! 

Friday, 11 January 2013

“गड आला पण सिह गेला”......!

“गड आला पण सिंह गेला”......!

गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य नवमी) रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. समोर असलेल्या ध्येयाकडेच सर्व मावळ्यांची नजर होती..
कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा.
भयाण रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता चढणे दिवसासुध्दा अशक्य होते. तानाजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले.
एकच ध्यास होता तानाजींच्या मनात “कोंढाणा” आणि त्यासाठी ते देहभान विसरून लढत होते, झटक्यासरशी शत्रूंची तुकडी कापून काढत होते.. शत्रूशी बेभान होऊन लढत होते आणि अशातच तानाजींच्या हातातील दहाल निखळून खाली पडली, अशा बिकट परिस्थितीतही त्यांनी  डाव्या हातावर तलवारीचे वार घेत लढू लागले.. हातावर वार बसत होते पण याची भ्रांत स्वराज्याच्या आणि शिवरायांच्या मावळ्याला थोडीच होणार.. हात रक्तबंबाळ झाला होता तरीही वाकत नव्हता..  शेवटी समोर उदयभान येऊन उभा टाकला.. मग काय हर हर महादेव अशी सिंहगर्जना करत अक्षरशः वीर तानाजी उदयभानावर तुटून पडले..
दोघामध्ये तुंबळ युद्ध सुरु झाले, आधीच घायाळ झालेल्या वाघावर असंख्य वार होऊ लागले.. अंगावर होत असलेल्या बचावासाठी होते काय तर रक्ताने माखलेला हात.. तरीही तानाजी मागे हटले नाहीतच…. गर्जना करत होते, वार घालत होते.. मनामध्ये शिवराय, एकाच ध्येय एकाच ध्यास “कोंढाणा”
खूप काम होते अजून करायचे, उदयभानाला आसमंत दाखवायचा…. कोंढाणा काबीज करायचा…. शिवरायांना गड जिंकल्याचा निरोप धाडायचं…. मोहीम फत्ते करायची…. जबाबदारी संपवून घरी जायचे…. घरी पाव्हन-रावळ थांबलेली…. रायबाचे लगीन…. रायबाला शिवरायांच्या सेवेत स्वराज्याच्या सेवेत रुजू करायचं…. खूप खूप काम होती….  पण कोंढाण्याला पाहिजे होते तानाजी…. 
उदयभानावर शेवटचा वार करून शेवटी उदयभानाला निपचित पाडूनच या वाघाने शिवरायांच्या मावळ्याने स्वत:चे प्राण सोडले.
गड अजून यायचा बाकी होता.. मात्र त्यांच्यामागुन ‘सूर्याजी मालुसरे’ आणि ‘शेलारमामा’ यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला.
गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना आजच्याच दिवशी म्हणजेच ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.
तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसऱ्या दिवशी राजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी समजल्यावर महाराजांना खूप दुःख झाले.
महाराज म्हणाले, “गड आला पण सिंह  गेला”.
अत्यंत दुःखी अश्या राजांनी आपल्या तानाजीचे शव त्यांच्या ‘उमरठ’ (पोलादपुरजवळ) या गावी पाठवले. ज्यामार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता ‘मढेघाट’ या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा ‘विरगळ’ स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारक सुद्धा उभे केले गेले आहे....!

नकळत छातीकडे हात जात आपण म्हणतो, "मुजरा सुभेदार".....!  

संदर्भ - शिवसंकल्प...दिनेश सूर्यवंशी, आणि मराठा इतिहासाची दैनिदिनी.....!   

संपादन अँड. राज जाधव...!!!