My Followers

Monday, 21 August 2017

वाडवडीलार्जित मिळकती वरील आपला हक्क...?

वाडवडीलार्जित मिळकती वरील आपला हक्क...?


आपल्या पुर्वजाच्या मिळकतीला आपण वाडवडीलार्जित मिळकत असे म्हणतो. वडील, आजोबा किवा पणजोबा यांच्या कडून त्यांनी जर मृत्युपत्र केले नसेल किवा केले असले  तरी कायदेशीर नसेल तर त्यांच्या वारसांना, त्यांच्या मृत्युमागे त्यांची मिळकत वारसा हक्काने प्राप्त होते. ही मिळकत कोणास मिळावी हे त्या व्यक्तिच्या धर्मामध्ये जे काही रीतिरिवाज असतील त्या प्रमाणे ठरविले जाते. बदलत्या काळात वाडवडीलार्जित मिळकतीवरून होणारे तंटे थांबविण्यासाठी या रीतिरीवाजांना कायदेशीर स्वरूप देणे प्राप्त ठरले. यातूनच वारसा हक्काच्या कायद्यांची निर्मिती झाली. १७ जून १९५६ रोजी हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ अमलात आला. हा अधिनियम धर्माने जी व्यक्ती  मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी किवा ज्यू नाही  अशी कोणत्याही व्यक्तींना लागू होतो. त्यानूसार वीरशैव, लिंगायत, ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज व आर्य समाजाचे अनुयायी तसेच  बौध्द, जैन आणि शिख धर्मीयांना लागू होतो. हे लक्षात घेता आपणास असे म्हणावे लागेल की, हा कायदा महाराष्ट्रातील बहूसंख्य समाजाला लागू होत आहे.

या कायद्याच्या निर्मिती आधी ज्यांचा मृत्यू झाला  असेल त्यांना जे कायदे लागू होतात त्याचा विचार  आता आपण करणार आहोत.

वारसाहक्क कोणाला प्राप्त व्हावा यावर  दयाभाग व मिताक्षर या  दोन विचारप्रणाली (प्रबंध ) लिहील्या गेल्या. यातील दयाभाग या विचारप्रणालीचा प्रभाव बंगाल व आसाम या भागांवर आहे. तर उर्वरीत भारतावर मिताक्षर या विचारप्रणालीचा प्रभाव आहे. मिताक्षर हा प्रबंध १२ व्या शतकात विघ्नेश्वर या तज्ञाने चालुक्य साम्राजाच्या काळातील न्याय व्यवस्थेकरीता लिहीली. हा प्रबंध हिंदुकायद्यातील प्रभावी लेख आहे. मिळकतीच्या हक्कासंबंधातील यातील तत्वांचा वापर हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ येण्या अगोदर कायद्याचा भाग म्हणून वापरला जात होता म्हणून त्याला जूना हिंदु कायदा असेही म्हटले जाते. त्यानंतर जून्या हिंदु कायद्यामधील   जी तत्त्वे हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६  मध्ये वापरली गेली  त्यांना  या अधिनियमानी विधिमान्यता मिळाली.

भारतीय समाज हा मुख्यताः शेतीवर अवलबूंन होता. शेत जमीन पुर्वापार वंशपरंपरेने पुढील पिढीकडे चालुन येत होती. कुटुंबातील सर्वच घटक जमीनीवर उदरनिर्वाह करत असल्या कारणाने भारतात  एकत्र कुटुंब पध्दत अस्तित्वात होती. म्हणजेच मुलगा , वडील व आजोबा हे एकाच घरात राहत होते. आजोबांचे नाव जर बाजी असेल व त्यांना  गणपत वगैरे मुले असतील व गणपतला  शंकर वगैरे मुले असतील तर जून्या हिंदु कायद्याप्रमाणे बाजीच्या सर्वच गणपत वगैरे मुलांना जल्मतःच वडिलार्जित मिळकतीत हक्क असतो. तसेच गणपतच्या शंकर वगैरे  मुलांना जल्मतःच वडिलार्जित मिळकतीत हक्क असतो. मुलांचा हक्क जल्मतःच असल्या कारणाने वडील मिळकतीचे एकटे मालक नसतात. तेव्हा कुटुंबाची कायदेशीर गरज नसेल तर वडिलांना एकट्याला मिळकत विकता येत नाही. मिळकतीमध्ये वर म्हटलेले सर्वच घटक हे सहहिस्सेदार असल्या कारणाने ती  अविभाज्य असते.

जून्या  कायद्या प्रमाणे फक्त पुरूषांनाच एकत्र कुटूंबाच्या मिळकतीमध्ये हक्क होता. सन १९३७ ला  वुमेन्स राइटस टू प्रॉपर्टी अँक्ट हा कायदा ला लागू झाला. या कायद्याने विधवा  स्त्रीला एकत्र कुटूंबाच्या मिळकतीमध्ये हिस्सा मिळाला. आपल्या हयातीपर्यंत ती या हक्काचा उपभोग घेउ शकत होती. परंतु तिला वाटप करून मागण्याचा हक्क नव्हता. मात्र हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ या कायद्यातील कलम १४ च्या तरतुदीप्रमाणे ती मिळकतीची पूर्ण मालक झाली आणि म्हणून तिला मिळकतीचे वाटप करून मागण्याचा हक्क प्राप्त झाला. या कायद्याने विधवेस मुला इतका हक्क प्राप्त झाला. सन १९५६ पूर्वि मुलींना एकत्र कुटूंबाच्या मिळकतीमध्ये काही हक्क नव्हते. नंतर या अधिनियमाच्या कलम ६ अन्वये १९५६ साली मुलींना काही  हक्क दिले गेले. काय हक्क दिले त्याच उदाहरण खाली दिले आहे.

जर एक वडिलार्जित ८००० मिटर  जमीन १७ जुन १९५६ पूर्वि  चार व्यक्तिंच्या नावांवर आहे. यातील गणपत नावाची व्यक्ति १९६० साली मयत झाली त्याला मृत्यूपश्र्चात  बायको, ३ मुले व एक मुलगी आहे. आता गणपतच्या वारसांचे हिस्से काढण्यासाठी प्रथम गणपतचा वडिलार्जित मिळकतीमधील चौथा हिस्सा म्हणजेच २००० चौरस मीटर एवढ्याचाच विचार करावयाचा आहे. गणपतच्या मुलांना  जल्माने वारसा हक्क मिळाला आहे. तसेच सन १९३७ च्या  वुमेन्स राइटस टू प्रॉपर्टी अँक्ट ह्या  कायद्याने  विधवा  बायकोला  एकत्र कुटूंबाच्या मिळकतीमधील हिस्सा मिळाला आहे. तेव्हा गणपतच्या २००० चौरस मीटरचे हिस्से खाली प्रमाणे पाडावे लागतील.

१ हिस्सा गणपतचा, १ हिस्सा त्याच्या विधवा बायकोचा, ३ मुलांचे प्रत्येकी १ हिस्सा या प्रमाणे २००० चौरस मीटर चे ५ भाग म्हणजेच प्रत्येक हिस्सा ४०० मीटरचा होतो.
मयत गणपतच्या ४००मीटरच्या  हिश्यामध्ये हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ प्रमाणे १ हिस्सा त्याच्या विधवा बायकोचा, ३ मुलांचे प्रत्येकी १ हिस्सा  व मुलीचा एक हिस्सा या प्रमाणे ५ हिस्से होतात. म्हणजेच गणपतच्या ४०० मीटरचे पुन्हा ५ भाग करावयाचे आहेत. त्यानूसार गणपतच्या वारसांना प्रत्येकी ८० मीटर आणखी मिळतात. आता गणपतच्या वारसांना खाली दिल्या प्रमाणे हिस्से मिळतात. 
बायकोल
४८० मीटर
३ मुलांना प्रत्येकी
४८० मीटर
मुलीला      
0८० मीटर

  
यातून आपणास असे दिसते की, जून्या हिंदु कायद्याच्या प्रभावामुळे मुलीला वडीलांच्या मिळकतीत समान हक्क प्राप्त होत नाही. मुला मुलींमधील हि असमानता दूर करण्या साठी महाराष्ट्र सरकारने २२ जून १९९४ रोजी हिंदु वारसा महाराष्ट्र दुरूस्ती कायदा १९९४  चॅप्टर २ अ मध्ये व कलम २९ अ मध्ये दुरूस्ती केली.  या दुरुस्तीनूसार मुलींना,  मुल इतकेच वारसा हक्क प्राप्त झाले. ज्या मुलींची लग्ने हा कायदा होण्या आधी झाली असतील त्यांना वरील उदाहरणात दाखविलेला ०८० मीटर येवढा मुलीचा  हिस्सा प्राप्त होतो. ज्यांची लग्ने झाली नसतील त्यांना मुलांइतकाच म्हणजे वरील उदाहरणात दाखविलेला ४०० मीटर इतका हिस्सा प्राप्त होतो.
गणपतचे दोन विवाह झाले असतील तर त्याच्या दोन्ही विधवांना मिळून एक हिस्सा मिळतो. त्याच्या दोन बायका (१ हिस्सा) व त्या बायकांपासून झालेली अपत्ये  हे त्या मिळकतीचे सहहिस्सेदार असतात.

केंद्र सरकारने २००५ साली हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ मध्ये सुधारणा केल्या व यातील मुळचे कलम ६ बदलून नविन कलम ६ टाकले. यात महाराष्ट्र सरकारने २२ जून १९९४ रोजी हिंदु वारसा महाराष्ट्र दुरूस्ती कायदा १९९४ जसे बदल केले तसेच बदल केले आहेत.

ज्या वाडवडीलार्जित घरात  मुले रहात असतात त्या घराची वाटणी मुलींनी मागीतली तर मुलांना अडचणीचे ठरेल म्हणून हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ कलम २३ अन्वये मुलीना वाटप करून मागता येत नव्हते. परंतु आता केंद्र सरकारने २००५ साली हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ मध्ये ज्या सुधारणा केल्या त्या मध्ये कलम २३ रद्द केलेले आहे.

वारसा हक्काने जो हिस्सा आपल्याला मिळतो तो हिस्सा आपल्या पश्र्चात कोणाला मिळावा ते आपण मृत्युपत्रात लिहू शकतो. आपण आपला हिस्सा कोणत्याही व्यक्तीला विकू शकतो. ती  व्यक्ती आपल्या एकत्रीत मालमत्तेमध्ये सहहिस्सेदार या नात्याने तीचा हक्क बजावू शकते.

हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ च्या कलम ८ मध्ये मृत्युपत्र न करीता मरण पावलेल्या हिंदू पुरषाच्या संपत्तीला जे वारस असतात त्यांच्याकरीता अनुसूची तयार केली गेली आहे त्यामध्ये वर्ग १ व वर्ग २ पाडलेले आहेत ते वर्ग खाली दिल्या प्रमाणे आहेत.

वर्ग १ ला

मुलगा,मुलगी, विधवा, आई, आधी मरण पावलेल्या मुलाचा मुलगा, आधी मरण पावलेल्या मुलाची मुलगी, आधी मरण पावलेल्या मुलीचा  मुलगा, आधी मरण पावलेल्या मुलीची  मुलगी, आधी मरण पावलेल्या मुलाची विधवा, जर मुलगा मरण पावला असेल व त्याचा मुलगाही (नातू ) मरण पावला असेल तर त्याच्या मुलाचा मुलगा (पणतू), जर मुलगा मरण पावला असेल व त्याचा मुलगाही (नातू ) मरण पावला असेल तर त्याच्या मुलाची मुलगी (पणती), जर मुलगा मरण पावला असेल व त्याचा मुलगाही (नातू ) मरण पावला असेल तर त्याची विधवा.   जर मुलगी मरण पावली असेल व तीची  मुलगीही (नात) मरण पावली असेल तर तीचा  मुलगा,  जर मुलगी मरण पावली असेल व तीची  मुलगीही (नात) मरण पावली असेल तर तीची  मुलगी, आधी मरण पावलेल्या मुलीच्या मुलाची विधवा,  आधी मरण पावलेल्या मुलाची मुलगीही मरण पावली असेल तर तीची मुलगी

वर्ग २ रा

एकपिता 

दोन
(१) मुलाच्या मुलीवा मुलगा (२) मुलाच्या मुलीची मुलगी (३) भाऊ (४) बहीण. 
तीन
(१) मुलीच्या मुलाचा मुलगा (२) मुलीच्या मुलाची मुलगी (३) मुलीच्या मुलीचा मुलगा (४)मुलीच्या मुलीची मुलगी 
चार
(१) भावाचा मुलगा (२) बहिणीचा मुलगा (३) भावाची मुलगी (४) बहिणीची मुलगी. 
पाच
पित्याचा  पिता , पित्याची माता. 
सहा
पित्याची विधवा, भावाची विधवा 
सात
पित्याचा भाऊ, पित्याची बहीण. 
आठ
मातेचा पिता, मातेची माता 
नऊ
मातेचा भाऊ, मातेची बहीण.

(संदर्भ - लँड ऑफ महाराष्ट्रा संकेतस्थळ )

Wednesday, 16 August 2017

सावरकरांच्या टीकेवर बाबासाहेबांचे प्रत्युत्तर...?

भगवान बुद्ध.... सावरकरांच्या टीकेवर बाबासाहेबांचे प्रत्युत्तर....!

"बुद्ध धरमावर बरेच लोक खोडसाळपणे टीका करतात. त्यापैकी सावरकर एक होत. वास्तविक त्यांना काय म्हणायचे आहे हेच मला कळत नाही. बुद्ध हा वाइट मनुष्य आहे, असे त्यांना म्हणावयाचे आहे काय ? बौद्ध धर्म प्रचारक राजे वाइट होते असे त्यांना म्हणावयाचे असेल तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडावी. मी त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे. केसरीत प्रसिध्द केलेल्या ‘बौद्धाच्या आततायी अहिंसेचा शिरछेद" या लेखातून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही. सावरकरच काय, पण कुणालाही बौद्ध धर्माबाबत काही विचारावयाचे असल्यास त्यांनी उघडपणे मला विचारावे, त्यांना उत्तर देण्याची माझी हिम्मत आहे. भगवान बुद्धाचा जो अफाट भिक्शुसंघ होता त्यात शेकडा ७५ टक्के ब्राम्हण होते. हे सावरकरांना माहित आहे काय ? सारीपुत्त मोग्ग्लायान्सारखे पंडित ब्राम्हण होते, सावरकरांनी हे विसरू नये सावरकरांना मला अस प्रश्न विचारायचा आहे कि पेशवे कोण होते, ते भिक्षु होते काय ? मग त्यांच्या हातून इंग्रजांनी राज्य कसे हिसकावून घेतले ? तेव्हां अशा नादान व बेजबाबदार लोकांच्या आपण नादी लागू नये. काही लोक म्हणतात सावरकर विष ओकले पण मी म्हणतो सावरकरांनी आपल्या पोटातील नरक ओकले ! तेव्हां कुणी कितीही खोडसाळ टीका केली तरी माझा मार्ग निश्चित आहे, "मी बुद्द धर्म स्वीकारणार" ! तुम्हाला पटला तर तुम्हीही स्वीकारा आतापर्यंत हिंसक मार्गाने व अमानुष अत्य्चाराच्या जोरावर बुद्ध धर्माची लाट परतवून लावली. परंतु आता बुद्ध धर्माची लाट येईल, ती कधी परत जाणार नाही. या अफाट सागराला भरती येईल, पण ओहोटी येणार नाही.

संदर्भ - मुंबई येथे बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात दि २४ मे १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल भाषण, पुस्तक :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर : भाषणे आणि विचार, खंड - ६, संपादक :- धनराज डाहाट 

Thursday, 22 December 2016

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक विचार...!

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक विचार...!


भारताच्या किर्तीवंत सुपुत्रांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. देशाच्या सामाजिक-राजकीय क्षितिजावर त्यांचा उदय 1920 च्या दशकात झाला. समाजाच्या, अस्पृश्य म्हणून हिणविल्या गेलेल्या अगदी तळातील वर्गाच्या पुनरुत्थानासाठी सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक पातळीवर तेव्हापासूनच त्यांचा संघर्ष सुरू होता. बाबासाहेब एक थोर विचारवंत होते आणि त्यांनी अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विधिज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, संसद सदस्य आणि या सर्वांच्या पलीकडे जाऊन समाजसुधारक आणि मानवाधिकारांचा रक्षक या नात्याने केलेले कार्य अतुलनीय आहे. देशभरातील अस्पृश्य समाजाला एकवटून, संघटित करून सामाजिक समतेच्या ध्येयाप्रत जाण्याच्या दृष्टीने राजकीय मार्ग कसा अवलंबायचा, याविषयी त्यांनी दिशादर्शन केले. 


अस्पृश्य समाजात 1891 मध्ये जन्मलेल्या बाबासाहेबांनी देश-विदेशातून उच्चशिक्षण प्राप्त केले. कोलंबिया विद्यापीठाची अर्थशास्त्रातील पीएच. डी. (1917),  लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी तसेच लंडनमधील ग्रेज इन्ची बार अ‍ॅट लॉ (1923) अशा उच्च पदव्या त्यांनी संपादित केल्या. दलित समाजातील विद्यार्थ्याने त्या काळात अशा प्रतिष्ठेच्या पदव्या मिळविणे ही अद्वितीय बाब होती.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूळ अभ्यासविषय अर्थशास्त्र हाच होता. त्यांच्या कारकीर्दीचे ढोबळमानाने दोन भाग करता येतात. 1921 पर्यंत एक अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांनी केलेल्या लिखाणाचा एक कालखंड असून, त्यानंतरच्या दुसर्‍या कालखंडात ते एक राजकीय नेते म्हणून उदयाला आले आणि 1956 मध्ये महानिर्वाणापर्यंत त्यांनी शोषित, पीडित समाजासाठी उदंड कार्य केले. मानवी हक्‍कांचा जागर केला.


बाबासाहेबांनी अर्थशास्त्रात विपुल लिखाण केले असून, या विषयावर त्यांची तीन प्रमुख पुस्तके आहेत :- 

1) अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी, 

2) दि इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया आणि 

3) दि प्रॉब्लेम ऑफ द रुपी : इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्यूशन. 


पहिली दोन पुस्तके सार्वजनिक वित्तव्यवस्थेवरील असून, त्यातील पहिल्या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीच्या 1792 ते 1858 या काळातील वित्तव्यवहारावर भाष्य केले आहे. दुसरे पुस्तक ब्रिटिशांच्या आमदनीतील भारतात वित्तीय व्यवहारांमधील केंद्र आणि राज्य संबंधांवर भाष्य करते. हा कालखंड 1833 ते 1921 असा आहे. त्यांचे तिसरे पुस्तक चलनविषयक अर्थशास्त्रावरील एक उत्कृष्ट ग्रंथ मानला गेला आहे. या पुस्तकात 1800 पासून 1893 पर्यंतच्या कालखंडात विनिमयाचे माध्यम म्हणून भारतीय चलनाची कशी उत्क्रांती झाली, हे बाबासाहेबांनी सांगितले आहे. तसेच 1920 च्या दशकाच्या पूर्वार्धात सुयोग्य चलनाची निवड करण्यात आलेल्या अडथळ्यांचीही चर्चा त्यांनी केली आहे. भारतात परतल्यावर डॉ. आंबेडकरांनी अर्थशास्त्रावर एकही पुस्तक लिहिले नाही. मात्र, त्यांच्या कार्याचा आढावा घेतल्यास त्यांच्यातील अर्थतज्ज्ञ वारंवार डोकावत राहतो.


बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेम्ब्लीचे सदस्य असताना (1926) ग्रामीण भागातील गरिबांच्या समस्यांविषयीचे त्यांचे समग्र आकलन त्यांनी उभारलेल्या जनआंदोलनांमध्ये प्रतिबिंबित होते. शेतीमधील खोती पद्धतीविरुद्ध त्यांनी केलेल्या यशस्वी आंदोलनामुळे अनेक ग्रामीण गरिबांची आर्थिक शोषणातून मुक्तता झाली. महार वतन या नावाखाली सुरू असलेल्या शुद्ध गुलामगिरीविरुद्ध त्यांनी आवाज उठविल्यानंतर ग्रामीण भागातील गरिबांचा मोठा वर्ग शोषणमुक्‍त झाला. सावकारांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी त्यांनी असेम्ब्लीमध्ये विधेयक आणले. औद्योगिक कामगारांच्या क्षेत्रात डॉ. आंबेडकरांनी 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. त्याकाळी कामगारांचा आवाज बुलंद करणार्‍या अन्य संघटना होत्याच; मात्र त्यांना अस्पृश्य कामगारांच्या मानवाधिकारांशी काहीही देणे-घेणे नव्हते. नव्या राजकीय पक्षाने ही उणीव भरून काढली. त्याचप्रमाणे व्हॉइसरॉयज् एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे कामगार सदस्य या नात्याने 1942 ते 1946 या काळात डॉ. आंबेडकर यांनी कामगारविषयक धोरणात आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. त्यात सेवायोजन कार्यालयाची स्थापना ही महत्त्वपूर्ण घटना होती आणि स्वतंत्र भारतातील औद्योगिक संबंधांची तीच पायाभरणी ठरली. बाबासाहेबांनी पाटबंधारे, ऊर्जा आणि इतर सार्वजनिक बांधकामे ही खातीही सांभाळली. देशाचे पाटबंधारे धोरण निश्‍चित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दामोदर व्हॅली प्रकल्पाचा यात प्राधान्याने समावेश करावा लागेल.


जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेसारख्या सामाजिक आजारांचे आर्थिक पैलू उलगडून दाखविणे, हे डॉ. आंबेडकरांचे आणखी एक विद्वत्तापूर्ण कार्य होय. श्रमविभागणीच्या तत्त्वानुसार महात्मा गांधींनीही जाती व्यवस्थेचे अस्तित्व स्वीकारले होते. मात्र, आंबेडकरांनी ‘जातींचा उच्छेद’ या आपल्या पुस्तकात त्यावर कडाडून टीका केली होती. जाती व्यवस्थेमुळे केवळ श्रमाची विभागणी केली गेली नसून, श्रमिकांचीच विभागणी केली गेली आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. डॉ. आंबेडकरांचा जाती व्यवस्थेवरील हल्ला हे केवळ उच्चवर्णीयांच्या वर्चस्ववादाला दिलेले आव्हान नव्हते, तर आर्थिक विकासाशी त्यांच्या मांडणीचा जवळचा संबंध होता. जाती व्यवस्थेमुळे श्रमाची आणि भांडवलाची गतिशीलता कमी झाली असून, त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि विकासावर प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे त्यांचे प्रतिपादन होते. 


स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाने ब्रिटिश सरकारला 1947 साली सादर केलेल्या टिपणामध्ये भारताच्या आर्थिक विकासाची योग्य धोरणे कोणती, हे सांगितले होते. अत्युच्च उत्पादन क्षमतेचा विचार करून लोकांच्या आर्थिक जीवनाचे नियोजन करणे तसेच खासगी उत्पादकांना कोणतीही आडकाठी न करता आणि संपत्तीचे समान वाटप होईल अशारीतीने आर्थिक नियोजन करणे हे सरकारचे दायित्व आहे, असे त्यांनी नमूद केले होते. 


स्वातंत्र्यानंतर डॉ. आंबेडकर भारताचे पहिले कायदामंत्री बनले. 1948-49 मध्ये घटना समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय राज्यघटनेला आकार देतानाही त्यांच्यातील अर्थतज्ज्ञ आपल्याला दिसून येतो. मानवी अधिकारांचे मूलतत्त्व म्हणून त्यांनी लोकशाही राज्यव्यवस्थेचा ताकदीने पुरस्कार आणि पाठपुरावा केला. समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या तीन लोकशाही तत्त्वांचा केवळ राजकीय हक्‍क असा संकुचित अर्थ लावला जाऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचे ते खंदे पुरस्कर्ते होते आणि सामाजिक-आर्थिक लोकशाहीकडे दुर्लक्षून राजकीय लोकशाही टिकू शकणार नाही, असा इशाराही द्यायला ते विसरले नाहीत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ दि स्टेट पॉलिसी हा अनुच्छेद घटनेत समाविष्ट करून त्यांनी आर्थिक लोकशाहीचा हेतू विषद केला. 


कायदामंत्री या नात्याने डॉ. आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल संमत करण्यासाठी मोठा संघर्ष केला. महिलांचे अधिकार, विशेषतः विवाह आणि पितृसंपत्तीविषयक अधिकार सुरक्षित करणारी ही मोठी सामाजिक सुधारणा होती. हे विधेयक संसदेत संमत होऊ शकले नाही, म्हणून सप्टेंबर 1951 मध्ये त्यांनी राजीनामा दिला.  डॉ. आंबेडकर यांचे व्यक्‍तिमत्त्व अनेक पैलूंनी युक्‍त असले तरी त्यात एक समान धागा होता आणि तो आर्थिक हित पाहणारा होता. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या त्यांनी दिलेल्या मंत्रातूनच त्यांचे आर्थिक विचार सुस्पष्टपणे दिसून येतात. आंबेडकरांचे विचार सामाजिक, धार्मिक आणि नैतिक तत्त्वांवर आधारलेले आहेत. शोषक आणि शोषित हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू आहे. दबलेल्यांना उभारी देणे आणि शोषितांची जोखडातून मुक्‍तता करणे हाच त्यांच्या विचारांचा मूलाधार आहे. सर्वांना स्वातंत्र्य, समता आणि न्याय मिळावा, हाच त्यांच्या वैचारिक मांडणीचा प्रमुख हेतू आहे. याच हेतूसाठी लाखो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला.

Saturday, 26 November 2016

स्तुपांची मंदिरं- भाग १ (विठ्ठल मंदिर)

स्तुपांची मंदिरं- भाग १ (विठ्ठल मंदिर)

१) १९४०-१९६५ या कालावधित पुण्यावरुन प्राथमिक शाळेचे उजळणीचे (मुळाक्षर व अंकगणित) पुस्तक प्रकाशित होत असे. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दशावताराचे चित्र असे. त्यात नववा अवतार बुध्द असल्याचे दाखविले जास्त असुन जे चित्र छापले जायचे ते अजिंठा किंवा वेरुळच्या बुद्धाचे नसुन पंढरिनाथ “विठठलाचे” चित्र असे. विट्ठ्ल हाच बुद्ध आहे असे स्पष्ट करणारा हा सगळ्य़ात मोठा पुरावा.
२) कागदाचा शोध लागण्या आधी किंवा त्या नंतरही महाराष्ट्रात शिळाप्रेसवर पंचांगे छापली जात असत. या पुरातन पंचांगाच्या मुखपृष्ठांवर नवग्रहाची किंवा दशावताराची चित्रं छापली जात असतं. या सर्व शिलापंचांगात सर्वत्र नववा अवतार म्हणून विठठलाचे चित्र छापले जात असतं व नावाबद्द्ल शंका येऊ नये म्हणून विठठलाच्या चित्राखाली बुद्ध असे लिहले जात असे. श्री. वा.ल. मंजुळ व डॉ. के जमनादास यानी अशा प्रकारच्या पंचांगाचा संग्रह तयार केला आहे. विठठलाच्या शिल्पाला बुध्द नाव असलेली काही ठिकाणं येणेप्रमाणे आहेत.

अ) तासगांव (जि. सांगली) येथे विंचुरकरानी बांधलेल्या दक्षीणी शैलीच्या गणेश मंदिराच्या गोपुरावर विठठलाचे मुर्तीला बुद्ध असे नाव आहे.
ब) कोल्हापुरच्या महाल़क्ष्मी मंदिराच्या प्राकाराअतिल एक ओवरीत बुद्ध नावाने विठाबो दिसेल.
क) राजापुर (जि. रत्नागिरी) येथील लक्ष्मीकेशव मंदिरात मुर्तीच्या प्रभावळीत जे दशावतार कोरलेले आहेत त्यातही बुद्ध म्हणून जी मुर्ती कोरलेली आहे, ती आज झिजुन गेलेली असली तरी तिच्या उर्वरित आकारातुन ती विठठलाची मुर्ती असल्याचे स्पष्ट होते.
आता बघु या काही पुस्तकांचे व ईतिहासकारांचे या वरिल मत.
डॉ. भाऊ लोखंडे: 
यानी संपुर्ण मराठी संतांच्या वाड.मयाची समिक्षा करुन त्यांचा सारांश काढलेला आहे. ज्यानुसार मध्ययुगीन मराठी संतकवीनी विठठलाला, दुसरे काहि नसुन बुद्धच मानलेले आहे. मी तो जशाचं तसं ईथे देतो (लोखंडे : १९७९ पान १२३) “बाराव्या शतकातील ’गीत गोविंद’ कर्ते कवि जयदे वुद्धाची स्तुती नवव्या अवताराच्या स्वरुपात करतात. ती पुराणावर आधारित आहे. मराठी संत त्यांचे प्रमुख दैवत यांना बुद्धच मानतात (विठोबाच्या रुपाने) कारण विठोबाच बुद्ध आहेत असं दशावतारात मांडलेलं आहे. संत एकनाथ विठठलाला बुद्ध मानुन पुढिल प्रमाणे म्हणतात
“ लोक देखोनि उन्मत दारांनी आसक्त।
न बोले बौद्ध रुप ठेवीले जघनी हात।
नववा वेसे स्थिर रुप तथा नाम बौद्धरुप।“
व वारक-याची दिक्षा देताना जी पाच वचने वधविली जातात ती पंचशिलापेक्षा काहि वेगळी नाही.”

श्री. ए. आर. कुळकर्णी.:
श्री कुळकर्णी यांचे मत सर्वविदीत असुन त्यानी संपादन केलेल्या ’धर्मपद’ या ग्रंथाच्य अपरिशिष्टात देलेले आहे. त्यानी मराठी संतकवींव्या साहित्याची समिक्षा करुन निष्कर्ष काढले आहेत जसे कि, आपण पाहिल्या प्रमाणे भाऊ लोखंडे यानी काढले आहेत. कुळकर्णी म्हणतात कि मंदिराच्या मंडपातील खांबावर ध्यानी बुद्धाच्या आकृत्या आहेत. ते असे सुद्धा म्हणतात कि, विख्यात पाश्चिमात्य विद्वान जॉन विल्सन “मेमॉयस ऑन दि केव्ह टेम्पल” नामक आपल्या ग्रंथात विठठल मंदिर हे बुद्ध मंदिर असल्याचे प्रमाण दिलेले आहेत.
पांडुरंगाची मुर्ती हि झिल्लिदार पंजाची एक अप्रतिम नमुना आहे. झिल्लीदार पंजा बुद्धाचे परंपरागत चिन्ह आहे. यावरुन ती बुद्ध मुर्ती आहे हेच स्पष्ट होते.

आर. डी. भांडारकर:
विठालाची मुर्ती हि बुद्ध मुर्ती असल्याचे पुरावे देताना भांडारकर दोन शिलालेखाचे पुरावे देतात. बेळगाव नजीक एका गावाचे दान पुंडरिक क्षेत्रासाठी दिलेले आहे. हे क्षेत्र भिमारथी च्या काठी असुन ते पवित्र आहे. इ. १२४९ व १२७० चा आप्तोराम्य यज्ञ व शिलालेखात पांडुरंग आणि पुंडरिक हि नावे आह्ते. हि दोन्ही नावे बौद्ध परंपरेची आहेत. ’सधर्म पुंडरिक’ नामक ग्रंथ तर प्रसिद्धच आहे. विठ्ठल हे नाव ब-याच नंतरच्या काळात आले हे स्पष्टच आहे असे भांडारकारांचे म्हणने आहे.

रा. चि. ढेरे
ढेरे यांचे “श्री विठ्ठल एक महासमन्वय” (दक्षिण गोपजनांच्या एका लोकप्रिय देवाच्या वैष्णविकरणाची आणि उन्नयनाची शोधकथा) ॥ढेरे: १९८४॥ या ग्रंथात विठठलाच्या अनेक पैलुंचे विश्लेषण केलेले आहे. सर्वच स्थल पुराणांचे विवरण दिलेले आहे. त्यांचे म्हणणे आहे कि, सर्वच स्थल-पुराणातिल “पांडुरंग महात्म्य” विठ्ठल या देवतेचे वैष्णविकरण करण्याचा प्रयास आहे. ते म्हणतात कि वैष्णवानी बुद्ध स्विकारला परंतु बुद्धाच्या विचाराना छेद दिला व त्यात हिंदुत्व पेरलं.

- मायबोली...!