My Followers

Saturday, 5 September 2020

शिक्षक दिन...?

 शिक्षक दिन...?

५ सप्टेंबर हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असल्याने शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.

ब्रिटीश सरकारचे निष्ठावंत म्हणून त्यांना "सर" हा किताब देण्यात आला होता.

आयुष्यातील बहुतेक सगळा काळ त्यांनी परदेशी विद्यापिठांमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करण्यात घालवला.
त्यांनी २ टर्म भारताचे उपराष्ट्रपती आणि एक टर्म राष्ट्रपती म्हणूनही काम पाहिले. ते अपक्ष असूनही या पदांवर नियुक्त केले गेले. वेदांतावरचे वलयांकित विचारवंत असल्याने त्यांना हे सन्मान दिले गेले. त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान "भारत रत्न " ही दिला गेलेला आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार त्यांना दिला गेला तेव्हा ते तो देणार्‍या [उपराष्ट्रपती] पदावर कार्यरत होते. देणाराने स्वत:लाच पुरस्कार घ्यावा हे ग्रेट आहे. 

राष्ट्रपती हे आपल्या देशात सर्वोच्च पद आहे. त्या पदावर असताना स्वत:चा वाढदिवस शिक्षकदिन म्हणून सुरू करा असा आदेश देणारे सर्वपल्ली राधाकृष्णन मला अतिशय थोर वाटतात. शिक्षणाने / शिक्षकाने बालकांच्या मनावर चारित्र्याचे संस्कार करणे अभिप्रेत असते. 

डॉ. राधाकृष्णन यांच्या चारित्र्याचे जे वाभाडे त्यांच्याच मुलाने [ थोर विद्वान प्रो.गोपाल यांनी ] काढलेले आहेत ते वाचनीय आहेत.

ज्या अर्थी त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून पाळली जाते त्या अर्थी त्यांनी शिक्षक म्हणून काहीतरी असाधारण काम केलेले असणार. तथापि ते काम कोणते याबद्दल मी आजवर असंख्य शिक्षकांना विचारले असता त्याचे नेमके उत्तर एकही शिक्षक देऊ शकला नाही.

त्यांनी शिक्षण क्षेत्राला काहीतरी महत्वाचे योगदान दिलेले असेल या दृष्टीने माहिती घ्यायचा प्रयत्न केला असता परदेशात ते प्राध्यापक होते हेच त्यांचे सर्वात मोठे योगदान असल्याचे सांगितले गेले. 

त्यांनी शिक्षणशास्त्राला काहीतरी भरिव दिले असेल असे म्हणावे तर ना त्यांनी कोणतीही शिक्षणविषयक थिएरी मांडली ना ते शिक्षणशास्त्राचे शिक्षक, प्राध्यापक होते. ना त्या विषयावर त्यांनी काही लेखन केले.

ते धर्मशास्त्राचे - तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांचे लेखन वेदांतावर आहे. ते उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती होते म्हणून त्यांच्या नावे शिक्षक दिन होत असेल असे म्हणावे तर आजवर डझनावारी लोक या पदांवर बसून गेलेत.

भारतविद्या, प्राचीन विद्या, धर्मशास्त्र, संशोधन या विषयातील सर्वोच्च काम असलेल्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेच्या निवडणुकीला ते उभे होते, तेव्हा मात्र त्यांचा दणदणीत पराभव झालेला होता. 

संस्थेच्या विद्वान मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले होते. विशेष म्हणजे तेव्हा ते देशाचे उपराष्ट्रपती होते आणि तरिही भांडारकरच्या निवडणुकीत ते हारले होते. उपराष्ट्रपती या पदावर असताना एका संस्थेच्या निवडणुकीत पराभूत होण्याचा विक्रम त्यांच्या एकट्याचाच नावे जमा आहे.

ज्या अर्थी त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा केला जातो त्या अर्थी त्यांचे शिक्षक म्हणून देशाला काहीतरी अभुतपुर्व योगदान असणारच. ते नेमके कोणते यावर कोणी प्रकाश टाकील काय ?

लेखक - प्रा. हरी नरके...!

Saturday, 25 July 2020

उपेक्षीत सुर्यपुञ भैय्यासाहेब आंबेडकर...?

( *प्रज्ञासुर्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा एकुलता एक सुपुत्र सुर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या उपेक्षित जीवनाचा आलेख आणि त्यांचे कतृत्वाचा परिचय करुन देणारा, अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी शब्दबध्द केलेला लेख नक्कीच वाचा*)

****** एक दडपलेला इतिहास *****

महापुरुषाचा मुलगा होणे ही जशी आनंदनीय बाब असते तेवढीच ती कठीणही असते. महापुरुषाच्या घरात जन्म झाला म्हणजे सामान्य जीवन जगणे समाप्त होते. तुम्ही अमुकाचे अमुक आहात अन् तरीही असे का वागता असे ज्याला कळते वा न कळते त्या सगळ्यांकडून ऐकून घ्यावे लागते. त्यांना उत्तर दिले तर तो उध्दटपणा ठरतो. अशाच दुर्बिणीखालील भय्यासाहेबांचे आयुष्य गेले.

लहानपणीच न्यूमॅनिटीक आणि पायाच्या पोलिओ सारख्या आजाराने ग्रासलेल्या भैय्यासाहेबांना त्यांचे मामा धोत्रे यांनी वेगवेगळ्या प्रकारचे औषधोपचार केले. समुद्राच्या तप्त वाळूमध्ये पाय गाडून उभे राहणे आणि त्यातून पायात ऊर्जा निर्माण करणे हा त्यांचा नित्याचा कार्यक्रम असे. त्याच बरोबर गावठी औषधाच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले. त्यांना व्यवस्थित चालता बोलता यावे म्हणून विविध प्रकारचे खेळ ही खेळविण्यात येत होते.

एका बाजूला भय्यासाहेब आजाराशी मुकाबला करीत होते, त्याचवेळी बाबासाहेबांची चळवळ उभारी घेत होती. काही निर्णय प्रश्नासंबंधी अत्युच्च टोकाला पोहोचत होती. अवघे वातावरण आंबेडकमय झालेले असायचे. याच दरम्यान भय्यासाहेब मॅट्रिकच्या परीक्षेला बसले. परंतु ते कधीच उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. ते मॅट्रिक का पास होऊ शकले नाहीत याकडे कोणीच लक्ष दिले नाही. एका विद्वानाचा मुलगा मॅट्रिक पास होऊ शकत नाही हा ठपका घेऊन भय्यासाहेबांना आयुष्यभर जगावे लागले. जी गोष्ट भय्यासाहेबांची तशीच मुकुंदराव आंबेडकरांची सुद्धा. मुकुंदरावही मॅट्रिक पास होऊ शकत नाहीत. ज्या काळात एक आंबेडकर भारतीय समाज व्यवस्थेला पेलता आले नाही, त्याच्याशी दोन हात करताना पळता भुई थोडी व्हायची, त्या काळात आणखी दोन आंबेडकर कसे काय पेलवणार ? आणि म्हणूनच त्यांना मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ दिले नाही. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश, राऊंड टेबल कॉन्फरन्स, गांधीजींचे उपोषण या निर्णायक काळात भय्यासाहेब व मुकुंदराव पुन्हा पुन्हा परीक्षेला बसत होते, परंतु त्या दोघांनाही ती परीक्षा उत्तीर्ण होऊ दिली नाही. या अपयशाची कधी कोणी मुल्यमापन केले आहे का ? दोघांनीही पुढे जे लिखाण केले, जी भाषणे केली, चळवळी केल्या त्याचा मागोवा घेतल्यास मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणे इतपत निर्बुद्ध होते असे कोण म्हणेल ?  व्यवस्थेने त्यांच्या माथी मॅट्रिक नापासाचा ठपका मारला व नंतरच्या काळात ते पदवीधर नाहीत म्हणून समाजातील म्होरक्यांकडून सतत अवेहलना स्वीकारावी लागली. भय्यासाहेबांना देण्यात येत असलेल्या मनस्तापाचा कधीही आणि कोणीही साकल्याने विचार केला नाही. त्यामुळे भय्यासाहेब हे सतत दडपणाखाली जगले आणि तरीही ते जे काही राजकीय व सार्वजनिक आयुष्य जगले त्याचे ते स्वतः शिल्पकार होते. भोवतालची परिस्थिती त्यांना अगतिक करू पाहत होती पण तरीही ते विजयी मुद्रेने जगले. याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना लाभलेली कमालीची विल पाॅवर. या इच्छाशक्तीच्या बळावर त्यानी भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुनिन्सिपल कामगार संघ, पंचायत समिती, महाराष्ट्र विधिमंडळ आणि त्या काळचे राजकारण यावर त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटविला.

बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसचे व्यवस्थापन, पक्षाचे मुखपत्र आणि धम्मयान सारखे धार्मिक नियतकालिक ही त्यांच्या इच्छाशक्तीची जितीजागती उदाहरणे आहेत.(क्रमश:)

(भाग — दुसरा)

भय्यासाहेबांनी स्वतःचे आयुष्य स्वतः घडविले. त्यांनी सिमेंटचा कारखाना काढला. या कारखान्यात ते 25 टक्के भागीदार होते. परंतु या कारखान्यासंदर्भात कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्याकडे तक्रार केली. बाप बेट्यांचे मतभेद व्हावेत ही दुष्ट अभिलाषा होतीच. ती त्यांची पूर्ण झाली आणि बाबासाहेब भय्यासाहेबांवर खप्पा झाले. शेवटी तो कारखाना मोडकळीस निघाला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरू केला. त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही. हा व्यवसाय सुरळीत पणे चालला. भय्यासाहेब स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत हे कार्यकर्त्यांना सहन झाले नाही. भय्यासाहेब हे सतत लंगडत असावेत व आपली काठी सांभाळावी. अशी अपेक्षा बाळगणाऱ्या लोकांनी पुन्हा एकदा बाबासाहेबांकडे कांगाळ्या सुरू केल्या. काही अफवा पसरविल्या. दिल्लीला भय्यासाहेब काम करायला येत आहेत. तुमच्या पदाचा आणि नावाचा दुरुपयोग करणार आहेत. असे सांगण्यात आले. आपल्या पुत्राने स्वकर्तृत्वाने जीवन जगावे, कोणाचाही आधार घेऊ नये. माझ्या नावाचा सुद्धा, आणि म्हणूनच बाबासाहेबांनी भय्यासाहेबांना परत पाठविले. हात हलवीत. मतभेद नकोत. कांगाळ्या नकोत म्हणून भय्यासाहेबांनी तो उद्योग बंद केला.  पित्याचे कर्तव्य बाबासाहेब करीत नव्हते असे नव्हे. त्यांनी भारत-भूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना सुरू केला. तो छापखाना एका दंगलीमध्ये जाळण्यात आला. तो पुढे बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस म्हणून आजच्या जागेत चालू आहे. ही जागा (गोकुळदास पास्ता लेन, दादर, पूर्व) बाबासाहेबांनी विकत घेतली. त्या जागेचा खाजगी ट्रस्ट केला. या जागेतला प्रेस भय्यासाहेबांना देण्यात आला. त्या दिवसापासून सर्व प्रकारची लायसन्स भय्यासाहेबांच्या नावावर होती. पुढे पक्षाची मुखपत्र चालवितांना संपादकीय मंडळाने प्रेस कोणाचा हा वाद उकरून काढला.
 त्याकाळी बाबासाहेबांनी अनेक संस्था सुरू केल्या. त्या संस्थांच्या नियामक मंडळावर भय्यासाहेब गेले नाहीत. त्या संस्थांनीही भय्यासाहेबांना विचारले नाही. व स्वाभिमानी भय्यासाहेबांनी त्या संस्थावर ट्रस्टी म्हणून जाण्याचा आग्रह कधी धरला नाही. ते आपले स्वतंत्र अस्तित्व सतत जपत राहिले. माझे वडील हे माझ्या एकट्याच नसून सर्व समाजाच्या आहेत हे भान त्यांनी ठेवले. हा खरेतर परोपकारी त्याग होता. हे एका तरी पुढाऱ्याला जमले असते का ? भय्यासाहेबांना ते जमले कारण एका स्वतंत्र बाण्याच्या महापुरुषाचे ते रक्त होते. त्यांच्या स्वतंत्र बाण्याचा आज आम्हाला अभिमान वाटत आहे. ते आम्ही आमचे भांडवल समजतो. आम्हाला समजायला लागल्यापासून आम्ही पाहत होतो ते सतत प्रवासात असणारे भय्यासाहेब.

काही वर्ष एकत्रित कुटुंबात राहिल्यामुळे फारशी चणचण भासली नाही. परंतु पुढे पुढे ती जाणवायला लागली. आमच्या शिक्षणाची त्यांनी योग्य काळजी घेतली. माझ्या शाळेतल्या प्रिन्सिपल, वर्ग शिक्षकाला ते अधूनमधून भेटत असत. पालकदिनी ते स्वतः हजर राहत. व्यवस्थेने त्यांना मॅट्रिक होऊ दिले नाही. परंतु व्यवस्थेवर सूड उगविण्यासाठी त्यांनी आमच्या शिक्षणाची काळजी घेतली. स्वतः गणिते सोडवली. परिणामतः आम्ही सगळी भावंडे पदवीधर झालो. माझी शाळा समाप्त होण्याच्या दरम्यान त्यांचा आजार बळावला.न्युमॅनिटीकच्या आजारावर मात करण्यासाठी डॉक्टरांनीच काही प्रमाणात मद्य घ्यायचा सल्ला दिला. मी त्यांना कधीही डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याच्या बाहेर मद्य प्यायलेलं पाहिले नाही. माझ्यापुढे सगळ्यात मोठा प्रश्न होता तो भय्यासाहेबांच्या मद्य प्राशनाचा एवढा बाऊ का करण्यात आला ? शारीरिक परिस्थिती सगळ्यांच्या लक्षात आल्यावरही जेंव्हा एखाद्या दूर्गुणाचा बाऊ करण्यात येतो तेंव्हा त्याला राजकारणाचा वास येऊ लागतो. अलीकडे हे माझ्या लक्षात येऊ लागले आहे. भय्यासाहेबांना वाढू दिले असते तर मग आपले काय ? या विवंचनेत असणाऱ्या लोकांनी भय्यासाहेबांना बदनाम करून त्या बदनामीच्या होळीवर स्वतःची पोळी भाजली. आयुष्याच्या प्रत्येक नव्या टप्प्यावर नवी बदनामी त्यांच्या नावाला चिटकलेली दिसते. ज्यांनी बाबासाहेबांच्या जिवंतपणी भय्यासाहेबांची बदनामी केली त्यांना बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर तर रानच मोकळे मिळाले आणि भय्यासाहेबांची बदनामी करणे हा एककलमी कार्यक्रम राबवू लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले पोलादी समाज संघटना कमकुवत होऊ नये म्हणून भय्यासाहेब नेहमीच जागरूक राहीले. रिपब्लिकन पक्षात अनेक गटाधिपती होते. भय्यासाहेबांना ही एखाद्या गटाचा नेता होता आले असते. परंतु आपल्या नावाने निर्माण झालेल्या गटापेक्षा आपल्या पित्याच्या कर्तृत्वाने निर्माण झालेल्या संघटनेला त्यांनी महत्व दिले, व जे गट निर्माण करीत होते त्यांना एकत्रित करीत राहिले. खरेतर भय्यासाहेबांनी स्वतंत्र पाऊल उचलले असते तर रिपब्लिकन पक्षाचा इतिहास काही वेगळाच झाला असता. कदाचित तमाम जनता बाबासाहेबाप्रमाणे भय्यासाहेबांबरोबर सुद्धा आली असती. परंतु जिल्हा वादातून निर्माण झालेले गट शाबूत राहिले असते. भय्यासाहेबांना हे नको होते. आपल्या वडिलांनी महत्प्रयासाने बांधलेल्या संघटनेला तडा नको म्हणून आयुष्यभर ऐक्यासाठी झटणाऱ्या भय्यासाहेबांना जेंव्हा कळून चुकले की, जनता जिल्हा आणि पोटजात विसरायला तयार नाही, तेंव्हा अगदी नाईलाजाने त्यांनी स्वतंत्र पाऊल उचलायचे ठरविले. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. आणि जनता वेगवेगळ्या गटात विसावली होती.

(भाग तिसरा—पुढे चालु....)

(भाग — तिसरा)

आपल्यामुळे आंबेडकरी संघटन दुभंगले, पंगू झाले. हा ठपका येऊ नये म्हणून भय्यासाहेब जागृत राहिले. तरी मोक्याच्या वेळी त्यांनी आपली हुकमी एक्याचा वापर केलेला दिसतो. उदाहरणात 1974 नंतरच्या ऐक्य प्रक्रियेनंतर बंगलोर येथे झालेल्या बैठकीत त्यांनी गवईचा राजीनामा स्वतःकडे घेतला. राज्यकर्त्या काँग्रेस पक्षाने दिलेल्या तकलादू पदापेक्षा बाबासाहेबांची पोलादी संघटना महत्त्वाची हे ठरल्यानंतर गवई यांनी सत्ता स्थानाचा राजीनामा देणारे हे पत्र भय्यासाहेबांनी घेतले खरे परंतु तो सगळा आभास होता. पक्ष पुन्हा एकदा फुटला. गवईची सत्ता स्थाने शाबूत राहिली. बिचारे भय्यासाहेब! भय्यासाहेबांचा राग अनावर झाला आणि अखेर त्यांनी गवईच्या राजीनामा पत्राच्या चिंध्या चिंध्या केल्या. भय्यासाहेबांनी संघटनेला प्राधान्य आणि सत्तेला दुय्यम स्थान दिले होते. काही रिपब्लिकन नेत्यांची संघटनेला राज्यकर्त्या पक्षाची बटीक करून सत्ता उपभोगली तर सत्तेसाठी संघटनेला लाथ मारली. भय्यासाहेबांनी या दोन्ही पैकी काहीच केले नाही. त्यांना पद दिले जाईल एवढा मनाचा मोठेपणा रिपब्लिकन नेत्यांत नव्हता, आणि म्हणून महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची नियुक्ती हे काही रिपब्लिकन पक्षाचे कर्तृत्व नाही. या नियुक्तीचे श्रेय जाते ते संयुक्त महाराष्ट्र समितीकडे. समितीकडे भय्यासाहेबांच्या नावाचा आग्रह धरला. त्यातून तत्कालीन रिपब्लिकन नेत्यांच्या मानसिकतेचा अंदाज घेता येतो. रिपब्लिकन नेतृत्वाने भय्यासाहेबांचा आपल्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला. भय्यासाहेबांना वापरून घेणे यापलिकडे या नेतृत्वाचा दुसरा कोणताही हेतू नव्हता. हा उद्देश नसता तर नंतरच्या राज्यसभेच्या एका निवडणुकीत एका रिपब्लिकन नेत्यांनी त्या काळी लाखो रुपये खर्च केले व भय्यासाहेबांना एका मताने पाडले, हे आता गुलदस्त्यात राहिले नाही.

बाबासाहेबांवर जनतेची आघात श्रध्दा होती व आजही आहे. अन् तरीही चैत्यभूमीच्या नावाने उभारण्यात येणारे स्मारक पूर्ण होत नव्हते. निधी पाहिजे त्या प्रमाणात जमत नव्हता. लोकांची मानसिकता आजही बदललेली नाही. आज आर्थिक अवस्था बदलली आहे. परंतु देण्याची प्रवृत्ती वाढीला लागली नाही. सामान्य माणूस खिसा खाली करतो. परंतु आर्थिक स्थैर्याचा लाभ उठविणारे आपला खिसा भरेल कसा हेच पहात असतात. बाबासाहेबांच्या नावाने वेगवेगळ्या स्वरूपात फायदा घेणारे लोक चैत्यभूमी साठी भय्यासाहेबांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नव्हते आणि म्हणून भय्यासाहेबांनी हा निधी गोळा करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यासाठी त्यांनी महुपासून भिमज्योत काढली. मध्यप्रदेशातून नागपूर, पुणे मार्गे मुंबईला आणली. या प्रवासात चैत्यभूमी साठी निधी मिळाला. माझ्या आठवणीप्रमाणे या पिशव्या नाण्यांच्या असायच्या. काही लोकांनी जास्त रक्कम देण्या ऐवजी हजारो लोकांनी दिलेल्या अल्प मदतीतून, म्हणजेच महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या मदतीने हा निधी उभा राहिला. चैत्यभूमीच्या बांधकामासाठी नेत्यांच्या आवाहनानुसार स्टेट बँकेत लोकांनी रांगा लावून पैसे भरले होते. रिपब्लिकन पक्षाच्या गटबाजीमुळे, हे पैसे चैत्यभूमीसाठी देण्यात आले असते तर भैय्यासाहेबांना महु ते मुंबई हा भीमज्योतीसह प्रवास करावा लागला नसता. आजही या निधीचे काय झाले, समाजातील म्होरके निधी संकलकांना विचारीत नाहीत. मग मी तरी कशाला विचारू ? निधी संकलन आजही जिवंत आहेत, आणि स्टेट बँकेने व्याज देणे बंद केले आहे. समाजाचे लाखो रुपये कुजविले जात आहेत. याबद्दल कधीही कुणाला तरी जाणीव होईल यावर माझा विश्वास आहे. पण निधी संकलन जिवंत असेपर्यंत ही जाणीव झाली नाही तर पुढे दगडावर डोके आपटल्यासारखे होईल. जी परिस्थिती स्टेट बँकेच्या पैशाची तीचपरिस्थिती गाव कामगार कनिष्ठ सभेची. हायकोर्टाच्या एका निर्णयानुसार फोर्टमधील स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेतून 36 हजार रुपये उपशाम यांच्याकडे देण्यात आले. त्या पैशांचे काय झाले हे एकाही पुढाऱ्यांने त्यांना विचारले नाही. याचे कारण त्याने बाबासाहेबांच्या संस्था वाटून घेतल्या होत्या. कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ताबा घेतला. कोणी इंप्रुव्हमेंट ट्रस्टचा तर कोणी गावकामगार सारख्या इतर संस्थांचा. भय्यासाहेबांना या कोणत्याही संस्थेत प्रवेश नव्हता. त्यामुळे त्या संस्थांमध्ये आर्थिक गडबडी होत असल्या तरी तेरी भी चूप, मेरी भी चुप या न्यायाने खाणाऱ्यांना मुक्तद्वार ठेवण्यात आले. बाबासाहेबांनी कणाकणाने पैसा गोळा केला. संस्था उभ्या केल्या. त्या नावारूपाला आणल्या. परंतु त्यांच्या सहकाऱ्यांनी मात्र त्या मनमुराद लुटल्या. आज या संस्थांची जी अवस्था आहे तिला संस्थेचे पदाधिकारी जबाबदार नाहीत असे कोण म्हणेल ? या संस्थेमध्ये भय्यासाहेबांना घेण्यात आले असते तर काही प्रमाणात वचक बसला असता. वरळीच्या आर. एन. चव्हाण मास्तरांनी उपोषणाची धमकी दिली नसती आणि वराळे संस्थेमध्ये नसते तर भय्यासाहेबांची पीपल्स एज्युकेशन सोसायटीत वर्णी लागली नसती. वर्णी लागली तेंव्हा लूटमार झालेली होती. भय्यासाहेबांच्या प्रवेशानंतर ती काही काळ थांबली.

(भाग — शेवटचा)
प्रॉपर्टीचा वाद कोर्टात गेला. कोर्टाच्या नियमाप्रमाणे तीन लाख साठ हजार रुपये राजगृहाची किंमत ठरली. माईसाहेब 50 टक्के हिस्सेदार ठरल्या. या राजगृहात माईसाहेब राहायला जाणार असतील तर त्यांनी भय्यासाहेबांना एक लाख ऐंशी हजार रुपये द्यावे व माईसाहेब जाणार नसतील तर त्यांना भय्यासाहेबांनी एक लाख ऐंशी हजार द्यावेत.

खारचे घर एकत्रित कुटुंबाचे होते म्हणून राजगृहात राहायचे भय्यासाहेबांनी ठरविले. त्यांनी दीड लाखाची तरतूद केली. परंतु 30 हजार कमी पडले. माईंना तर एकरक्कमी पैसे हवे होते.

भय्यासाहेबांनी नाईलाजाने 30 हजार रुपये पीपल्स एज्युकेशन सोसायटीकडे कर्जरूपाने मागितले. व्याजासहित ते लवकरच परत करेन असा लेखी अर्ज दिला. परंतु भय्यासाहेबांचा अर्ज निकालात काढला. त्यांना कर्ज नाकारले. मात्र त्याच वेळी संस्थेने अनेक बड्या मंडळींना कर्जवाटप केले. आपल्याला नकार आणि इतरांना होकार हे भय्यासाहेबांना कळले तेव्हा त्यांना काय वाटले असेल ?  

भय्यासाहेबांनी तेही दुःख गिळले व इतर मार्गाने 30 हजार रुपये गोळा करून माईंना दिले, व आजचे राजगृह विकत घेतले. राजगृह त्याकाळी हॉस्टेल झाले असल्यामुळे बाबासाहेबांचे अतिमहत्‍वाचे सामान जयराजभवन वरून पीपल्स एज्युकेशन सोसायटी कडे देण्यात आले. त्या सामानाचे काय झाले हे कधीच कळले नाही. माझ्या समजुतीप्रमाणे या प्रश्नाचे उत्तर दोनच व्यक्ती देऊ शकतील, एन.एम. कांबळे व दुसरे घनश्याम तळवटकर.

 मी राजगृहामध्ये 1968 साली आलो. त्या आधी मी आजी-आजोबांकडे राहत होतो. परंतु अधूनमधून मी राजगृहामध्ये येत असे व कापर्डेकर व मिलिटरी रिटायर्ड कांबळे यांची भेट घेत असे.

 माईसाहेबांना एक लाख ऐंशी हजार रुपये देऊन सुद्धा 1966 पर्यंत भय्यासाहेब राजगृहावर येऊ शकले नाहीत. 

 1964 साली वडाळ्याचे वसतीगृह सुरु झाल्यानंतर राजगृहातले विद्यार्थी सिद्धार्थ विहारमध्ये गेले. 

1964 साली वडाळा हाॅस्टेल झाल्यानंतरही सोसायटीकडे अनेक अर्ज विनंती कराव्या लागल्या. अखेर तिसर्‍या माळ्यावरील एक फ्लॅट भय्यासाहेबांना देण्यात आला. या दरम्यान भय्यासाहेबांचा पायाचा आजार बळावला. त्यांना तिसर्‍या माळ्यावर जिने चढणे मुश्किल होऊ लागले आणि म्हणून पुन्हा एकदा अर्ज करावा लागला. सोसायटीने दुसरा माळा द्यावा अशी विनंती भय्यासाहेबांनी केली होती. परंतु त्या अर्जावर निर्णय घेण्यास सोसायटीला  5-6 वर्ष लागली. भय्यासाहेबांच्या आजाराची कल्पना सोसायटीच्या लोकांना नव्हती असे नाही. शिवाय त्या जागेसाठी भय्यासाहेबांनी पैसे मोजले होते. हॉस्टेल झाल्यामुळे भय्यासाहेब हतबल झाले होते व सोसायटीच्या लोकांनी तर छळवाद मांडला होता. या छळवादाला काय म्हणावे ?

 समाजातल्या म्होरक्यांनी भय्यासाहेबांची कोंडी केली असली तरी सामान्य माणूस मात्र भय्यासाहेबांवरून प्राण ओवाळून टाकायला तयार होता. त्यांचे सहकारी अखेरच्या काळात त्यांना सोडून गेले. 

धर्मांतरीत बौद्धांचा हक्काची समस्या 1960 पासून अनुत्तरीत होती. बौद्धांच्या सवलती साठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला व आयुष्याच्या संध्याकाळी ह्या एकाच प्रश्नावर लोकसभेची निवडणूक लढविली राजा ढाले, ज.वि. पवार यांनी त्यांना सर्वतोपरी मदत केली. परंतु भय्यासाहेबांसमोर "तुम्हालाच मते" म्हणणार्‍या लोकांनी स्वार्थाला बळी पडून विरोधकांना मते दिली.

 एका समस्येसाठी निवडणूक लढवणाऱ्या भय्यासाहेबांनी हाही कडू घोट गिळाला.

 भैय्यासाहेबांच्या निर्वाणानंतर एक राजकीय पोकळी निर्माण झाली. आंबेडकरी समाजाचे नेतृत्व ज्यांच्याकडे Political vision नाही त्यांच्याकडे राहिले. आजही ती अवस्था आहे. ही उणीव कधीतरी भरून निघेल का ? हा माझ्या समोरील मोठा प्रश्न आहे. मी त्याच बरोबर एवढेच म्हणतो की, राजकीय लीडरशिप नसली तरी चालेल, परंतु व्यक्तिगत जाणिवेने प्रेरित होऊन समूहांमध्ये क्रांती घडविणे महत्त्वाचे असते. इतिहासच निर्वाळा देईल की, आंबेडकरी समाज हा केवळ सत्तेभोवती घुटमळला की बाबासाहेबांनी दाखविलेल्या क्रांतिकारक मार्गाने गेला ?  नेत्यांमध्ये Political vision नसल्यामुळे मला ही चिंतनीय बाब वाटत आहे.

(लेखक : प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर)

Wednesday, 17 June 2020

मुझे पढे लिखे लोगोंने धोका दिया...?

मुझे पढे लिखे लोगोंने धोका दिया...?

मी वारणा महाविद्यालयात शिकत असताना मंगल कांबळे नावाच्या मुलीशी ओळख झाली,तीला मी बहीण मानली होती.तिच्यामुळे मी तिच्या घरी जात असे. ते तिचं घर एक ग्रंथालयच होतं. तीला सहा भाऊ ती एक बहीण. तीचे सर्व भाऊ क्लास वन अधिकारी. अख्या कोल्हापूर जिल्ह्यात ते एकमेव बौद्ध घराणं होतं असं माझं मत झालं होतं,त्या घरात मला बाबासाहेबांनी  लिहिलेला *बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ वाचायला मिळाला तो ग्रंथ वाचल्यानंतर हिंदू धर्म मला डबकं वाटलं व बुद्ध धम्म मला समुद्रासारखा वाटला.त्या वेळी मी ठरवलं कि आपण बौद्ध धम्म स्वीकारायचा,त्या प्रमाणे आम्ही जवळ जवळ एक हजार मातंग समाजाच्या तरुणांनी कोल्हापूर जिल्ह्यातील मिनचे या गावी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली*.त्या दिवसापासून बऱ्याच मातंग तरुणांची बौद्ध पद्धतीने लग्न होऊ लागली. 

मिनचे गावचे आमचे मित्र सहदेव घाटगे यांचे लग्न ठरले,ठरते वेळी बुद्धाचा विषय नव्हता, लग्नाच्या दिवशी व्हराड कपाळाला भंडारा लावूनच आले,इकडे बौद्ध पद्धतीची तयारी,ही तयारी पाहून व्हराडातील मातंग पुढारी बिथरले,बौद्ध पद्धतीच्या लग्नाला विरोध चालू केला,लग्नाची वेळ निघून गेली. मुलगी मांडवात येईना,बैठक बसली. त्या वेळी नवरा मुलगा सहदेव याने ठणकावून सांगितले कि, 'लग्न बौद्ध पद्धतीनेच होणार नसेल तर मुलगी परत घेऊन जा' ही टोकाची भूमिका घेतल्यानंतर मुलीच्या वडिलांनी नांगी टाकली.त्याने मुलगा मातंग असल्याची खात्री करुन लग्नाला मान्यता दिली, लग्न बौद्ध पद्धतीने झाले. 

माझ्या भाचीचे लग्न बौद्ध पद्धतीने ठरले,ठरते वेळी माझा एक जवळचा पाहुणा बुद्धाचं नाव घेतल्यानंतर बैठकीतून उठून गेला.लग्न ठरले त्या लग्नाची पत्रिका घेऊन निमंत्रण देण्यासाठी त्याच्या घरी गेलो.मला घरात न घेता दारातच उभे राहून ठणकावून सांगितले कि,'मी महाराच्या लग्नाला येतं नाही.'

अशा पद्धतीने मी अनेक लोकांची  लग्न जुळवून बुद्ध पद्धतीने लग्न लावत होतो, पण माझेच लग्न होईना.
     
मी १९८४ ला बुद्ध धम्म स्वीकारला. १९८४ ते १९९१ पर्यंत माझं लग्नच होईना. *मला मांग पण मुलगी देईना व बुद्ध पण मुलगी देईना,माझी एकच अट होती लग्न करणार तर बुद्ध पद्धतीनेच.*

मला मातंग समाजाची एक मुलगी ठरली. तीचा वडील उपशिक्षण अधिकारी होता,बैठकीत तो म्हणाला कि,हं देणंघेणं बोला. मी म्हणालो देणंघेणं काय नाही, मी जन्माने मांग असलो तरी मी बुद्ध झालोय.तेव्हा लग्न बौद्ध पद्धतीनेच होणार. असे म्हणताच काय तर चावल्यासारखाच तो उडाला.बाहेर गेला. आमच्या लोकांना म्हणाला, कि हेचं आडनाव कांबळे नाव घेतोय बुद्धाचं हा मांग तर आहे का?  आमची लोकं म्हणाली, अहो खरच तो मांगाचा आहे.त्यावर मी त्यांना म्हणालो,मला मुलगी देऊ नका. तुम्हांला एवढा बाबासाहेबांच्या विचाराचा तिरस्कार असेल तर उपशिक्षण अधिकारी पदाचा राजीनामा दया.बाबासाहेब जन्माला आले नसते तर तुम्हांला त्या ऑफिसमध्ये कोणी पुसायला सुद्धा ठेवले नसते.त्या वर तो म्हणाला तुझं तत्वज्ञान तुझ्याजवळच ठेव मी तुला मुलगी देत नाही. 

मी मांगाचा नाद सोडून बुद्धाच्या नादाला लागलो. एका सभेत बुद्धाची एक प्राध्यापिका भाषणाला उभी राहिली. तीचे भाषण ऐकून मी भारावून गेलो. मी तीची ओळख करुन घेतली. त्या ओळखीतून तीचे लग्न नाही हे मला कळाले. मी तीला सरळसरळ लग्नाची मागणी घातली. मी कांबळे म्हटल्यानंतर तिने लगेच होकार दिला. तिने सांगितले कि रीतसर मागणी घालण्यास घरी या. मी दुसऱ्या दिवशी तिच्या घरी गेलो, तर तीचा म्हातारा दांडकं घेऊनच दारात बसला होता.तो मला बघून म्हणाला, 'पुन्हा दारात दिसलास तर तंगडंच मोडीन'.आम्हांला फसवतो तूझ्या गावी आमचे पाहुणे आहेत, त्यांच्याकडून आम्हांला कळलं कि तू महाराचा नसून मांगाचा आहेस.मी म्हणालो,अहो मी जन्माने मांग जरी असलो तरी बुद्ध झालोय. त्यावर तो म्हणाला कि बुद्ध जरी झालास तरी मूळचा मांगच कि. मी माझी मुलगी मांगाला देत नाही. 

  मला माझे मित्र गचांड्या घालायचे अन म्हणायचे लग्नानंतर बुद्ध म्हण कि,मी त्यांना म्हणायचो मी माझ्यासाठी हे करत नाही यदाकदाचित पुढच्या पिढीचे मातंग हिंदू धर्माला कंटाळून मार्ग शोधू लागले तर सुकुमार कांबळे हा मांग बुद्धाच्या मार्गाने गेला होता असे म्हणतील व त्या वाटेने ते चालतील. त्या आशे पोटी मी बुद्ध पद्धतीनेच लग्न करणार, नाहीच कोणी मुलगी दिली तर बौद्ध भिक्षु होणार. 

  मी त्या काळात एक लोकसभा व एक विधानसभा लढलो होतो. *माझ्या प्रचाराला व्ही.पी.सिंग पंतप्रधान असताना आले होते,* त्यामुळे माझं बऱ्यापैकी नाव झालं होतं.एक दिवस धोतर,शर्ट, टोपी घातलेला एक माणूस मला शोधत आला,माझ्या कॉलेजवर मी त्यांना घेऊन कॉलेज कॅन्टीन मध्ये गेलो,चहा पान झाल्यावर मी म्हणालो बोला काय काम? त्यावेळी तो म्हणाला मी कोथळी गावचा मांग,माझी मुलगी डी. एड.होऊन चार वर्ष झाली नोकरी नाही, तेव्हा म्हटलं तुम्हांला जाऊन भेटावं.ही बघा तीची कागदं. मी ती कागदाची फाईल पहिली,मी सांगितलं कि ठीक आहे.कळवतो तुम्हांला. 
तो निघाला,निघता -निघता म्हणाला मुलीला एखादं स्थळ असेल तर सुचवा.मी त्याच वेळेस माझं बोलणार होतो, पण विचार केला कि शिकलेल्या लोकांनी दांडकी दाखवल्यात हा तर अशिक्षित... 

 माझे एक नातलग त्यांचा मुलगा सरकारी नोकरीला. तो मला भेटला व म्हणाला,'सुकुमार तू सगळीकडे फिरतोयस मुलाला एखादी मुलगी असेल तर सुचवं,' मला कोथळीचा तो देव माणूस आठवला. मी म्हणालो आहे पोरगी! उद्याच बघायला जाऊ!ठरले.मी निरोप दिला उद्या पोरगी बगायला येतोय.त्यांना वाटलं मीच पाहायला येतोय,त्यांनी सगळ्या गावात सांगून टाकलं सुकुमार कांबळे माझ्या मुलीला बगायला येतोय.

मी त्या वेळी जनता दलात काम करत होतो.ते गाव ९०%जनता दलाचं,मी येणार म्हणून सगळे थांबलेले,मी गेलो सर्व मला भेटले, मुलगी कुठे आहे असे पुढे पुढे होऊन मीच सर्व करू लागलो,त्या वेळी त्या मुलीचे वडील मला म्हणाले कि,जरा बाहेर या, मी बाहेर गेलो. ते मला म्हणाले कि,अहो तुम्ही मुलगी बगायला येणार म्हणून सगळं गाव थांबलंय,तर तुम्ही दुसरंच स्थळ आणलंय. त्या वेळी मी त्यांना म्हणालो तुम्ही जरा बाजूला या. मी त्यांना बाजूला घेऊन गेलो व त्यांना म्हणालो तुम्ही म्हणताय ते खरं आहे पण माझी एक अडचण आहे.ते म्हणाले काय अडचण आहे.मी म्हणालो, 'मी मांग जरी असलो तरी मी बुद्ध धम्म स्वीकारला आहे.तेव्हा मी लग्न केलं तर बुद्ध पद्धतीने करणार हे तुम्हाला मान्य आहे का?. *त्यावर तो देवमाणूस म्हणाला कि, 'बुद्ध म्हणजे माणुसच नव्ह,मी म्हटलं होय,त्यावर ते म्हणाले मग कर कि कसं करायचं ते'* मी तुला मुलगी द्यायला तयार आहे,हे त्या देवमाणसाचे बोलणे एकूण मी अवाक झालो. त्या वेळी मला बाबासाहेबांचे एक वाक्य आठवले कि,"मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया "

आलेले पाहुणे कसे तरी घालवले. माझं त्या देवमाणसाच्या मुलीशी लग्न ठरलं अन शेवटी बुद्ध पद्धतीनेच लग्न लावलं.ती मुलगी माझी पत्नी मंदा हिने माझं जीवनचं बदलून टाकलं.

लेखक - प्रा. सुकुमार कांबळे...!
(डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, संस्थापक अध्यक्ष)