कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ कायदा २०१३...!
लैंगिक छळ म्हणजे..?
लैंगिक छळामध्ये स्त्रीच्या इच्छेविरुद्ध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे केल्या जाणा-या कोणत्याही लैंगिक स्वरूपाच्या कृतींचा समावेश होतो. शारीरिक, तोंडी किंवा हावभाव किंवा इतर माध्यमांतून स्त्रीच्या इच्छेविरुद्द केलेली लैंगिक कृती आणि वर्तन जे महिलांसाठी कामाच्या ठिकाणी भितीदायक वातावरण तयार करतं याला लैंगिक छळ व्याख्येमध्ये धरलं जातं. स्त्रियांना दुय्यम मानून त्यांचा अपमान करणे हा देखील लैंगिक छळ आहे. महिलेच्या इच्छेविरुद्ध केलेली खालील कोणतीही कृती लैंगिक छळामध्ये धरली जाते.
शारीरिक स्पर्श किंवा जवळीक साधणं
शरीर संबंधाची मागणी करणे किंवा तशी इच्छा ठेवणं, असुरक्षित स्पर्श करणं, कुरवाळणं, पाठ थोपटणं, चिमटे घेणे, हात लावणे हा लैंगिक छळ आहे. एखाद्या महिलेच्या इच्छेविरुध्द तिच्या खाजगीपणाचे उल्लंघन करणारी कोणतीही शारीरिक जवळीक साधणारी कृती ही लैंगिक छळामध्ये धरली जाईल.
लैंगिक प्रकारातील बोलणं
लैंगिक अर्थाचे शब्द स्त्रीला उद्देशून वापरण जसं, आयटम, चिकणी इ. शिवाय पेहराव, लैंगिक अवयव, लिंग या संदर्भाने लैंगिक वाक्य उच्चारणं देखील लैंगिक छळ मानला जाईल. एखाद्या स्त्रीला पाहून गाण गाणं. लैंगिक आवाज काढणं, शिटी वाजवणं किंवा शिव्या उच्चारणं, अश्लील किंवा स्त्री सन्मानाला धक्का पोहचेल असे जोक्स मेसेज करणे किंवा प्रत्यक्ष सांगणं हा लैंगिक छळ आहे. वैयक्तिक आयुष्यातील घटना किंवा खाजगी बाबी सर्वांसमोर उघडपणे बोलणं, स्वत:च्या किंवा पत्नीच्या व्यक्तिगत लैंगिक आयुष्याबद्दल चर्चा करणे. लैंगिक गोष्टींचा उल्लेख करुन पत्र, ईमेल किंवा फोन करणे, द्विअर्थी शब्द उच्चारणं. इ. सर्व लैंगिक छळामध्ये गृहीत धरलं जातं.
लैंगिक साहित्य किंवा तशी सामग्री दाखवणं
अश्लील फिल्म, पुस्तके, फोटो दाखवणे किंवा त्यांची मागणी करणं हा देखील लैंगिक छळ आहे.
कामामध्ये लुडबुड करणं
एखाद्या स्त्रीला आकर्षित करण्यासाठी कामाच्या ठिकाणी अवाजवी महत्व देणे किंवा तिच्याकडे दुर्लक्ष करणं, काम करत असताना तिच्या कामाच्या खात्रीबद्दल भितीदायक वातावरण तयार करणे, तिच्या कामामध्ये लुडबुड करणं, विरोध करणं, अमानवी व्यवहार करणं, अपमानास्पद वागणूक देणे ज्यामुळे स्त्रिच्या आरोग्यावर आणि सुरक्षितेवर परिणाम होईल याला लैंगिक छळच म्हणतात
कामाचे ठिकाण म्हणजे?
शासकीय, निमशासकीय आणि शासन पुरस्कृत इ. किंवा स्थानिक प्रशासन, सार्वजनिक कंपनी, महामंडळ किंवा सहकारी संस्था संचलित कोणतीही संस्था, उद्योग, कार्यालय, किंवा शाखा.
खाजगी क्षेत्रातील संस्था किंवा कंपनीने संचालित केलेली संस्था, उद्योग, सोसायटी, विश्वस्त संस्था, स्वयंसेवी संस्था इ. तसंच व्यापारी, व्यावसायिक किंवा कौशल्य प्रशिक्षण केंद्र. शैक्षणिक संकुलं आणि मनोरंजनाची ठिकाणे उद्योग, आरोग्य किंवा वित्त इत्यादी क्षेत्रात पुरवठा, विक्री, वितरण किंवा अन्य सेवा देणा-या संस्था. रुग्णालये किंवा शुश्रुषागृहं.
खेळांशी संबंधित संस्था, स्टेडीयम, वास्तू, स्पर्धेची ठिकाणं मग ती निवासी असोत किंवा अनिवासी, अशी ठिकाणं जी खेळ किंवा तत्सम कामासाठी वापरात आहेत.
कर्मचारी कामासंदर्भात भेट देत असलेली ठिकाणी किंवा नियोक्त्याने पुरवलेली साधनं.
नियोक्त्याचे निवासाचे ठिकाण अथवा घर
असंगीत क्षेत्र – कामाच्या संबंधातील घर ज्याची मालकी एखाद्या व्यक्तीकडे असेल, कोणत्याही प्रकारच्या सेवा पुरवणा-या व्यक्ती किंवा स्वयंरोजगार करणारे कामगार आणि घरकामगार याची त्याच्या कामानुसार बदलणारी ठिकाणं देखील यामध्ये समाविष्ट आहेत.
कायद्याची व्याप्ती आणि कार्य समजून घेण्यासाठी त्यातील इतर व्याख्याः
पीडित/तक्रारदार महिला – कामाच्या ठिकाणी संपर्कात येणारी कोणत्याही वयाची स्त्री तक्रार दाखल करु शकते.
घर कामगार – घरकाम करण्यासाठी थेट किंवा एखाद्या संस्थेमार्फत तात्पुरत्या/कायम स्वरूपी, अर्धवेळ अथवा पूर्णवेळासाठी नेमलेली स्त्री घरकामगार समजली जाईल. मात्र ती स्त्री घरमालकाच्या कुटुंबाची सदस्य असता कामा नये.
कर्मचारी- नियमित, तात्पुरती, रोजंदारीने किंवा कंत्राटी पध्दतीने नेमणूक केलेली व्यक्ती कर्मचारी या व्याख्येत बसते. कामाच्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी किंवा ऑडीटसाठी येणारी व्यक्ती देखील कर्मचारी मानली जाईल. मुख्य मालकाला माहित नसताना एखाद्या ठेकेदाराने कामासाठी नेमलेली व्यक्ती कर्मचारी धरली जाईल. पगारी, बिनपगारी, ऐच्छिक काम करणा-या व्यक्तीला कर्मचारी म्हटले जाईल.
मालक अथवा नियोक्ता- कोणत्याही कंपनीचा मालक किंवा कामाच्या ठिकाणी व्यवस्थापन, निरीक्षण किंवा नियंत्रण करण्याची जबाबदारी असलेली कोणतीही व्यक्ती, मंडळ किंवा समिती यांना मालक/नियोक्ता समजण्यात येईल संस्थेसंबंधी धोरणात्मक निर्णय घेण्यास व अंमलात आणण्यास जबाबदार असेल अशा व्यक्तींना मालक म्हणता यईल. जी व्यक्ती घर कामगाराला कामाला लावत असेल आणि तिच्या कामाचा लाभ घेत असेल अशा व्यक्तीना मालक किंवा नियोक्ता म्हणता येईल. जी व्यक्ती घर कामगाराला कामाला लावत असेल आणि तिच्या कामाचा लाभ घेत असेल अशा व्यक्तीला मालक किंवा नियोक्ता म्हणता येईल.
समितीची स्थापना
तक्रार निवारण समितीची स्थापना दोन पद्धतीने होते जिथे १० पेक्षा जास्त कर्मचारी असतील तिथे अंतर्गत तक्रार निवारण समितीची स्थापना करावी लागते. जिथे १० पेक्षा कमी कर्मचारी आहेत अशा कामाच्या ठिकाणी संबंधित स्त्रियांसाठी ‘स्थानिक कामाच्या तक्रार निवारण समिती’ जिल्हाधिका-यांनी स्थापन करणं आवश्यक आहे. या समित्यांच्या कामकाजाबाबत कायद्याने काही व्याख्या स्पष्ट केल्या आहेत.
अंतर्गत तक्रार निवारण समिती
प्रत्येक आस्थापन प्रमुखाने ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ची स्थापना करणे अनिवार्य आहे. अशी तक्रार निवारण समिती प्रत्येक शाखेमध्ये करणे गरजेचे आहे
समितीची स्थापना करण्यासाठी पुढील बाबी आवश्यक आहेत
समितीच्या अध्यक्षपदी त्या ठिकाणी काम करणाच्या कर्मचा-यांमधून वरीष्ठ पातळीवर काम करणा-या महिलेची नेमणूक करावी. वरीष्ठ महिला उपलब्ध नसेल तर त्याच मालक/नियोक्त्याच्या अन्य शाखा किंवा कंपनीतील वरीष्ठ महिलेची अध्यक्षपदी नेमणूक करावी. मालक किंवा पदावरील प्रमुख या समितीचा अध्यक्ष असता कामा नये.
कर्मचा-यांमधून कमीत कमी दोन सदस्य असे नेमण्यात यावेत ज्यांची महिलांच्या प्रश्नांवर बांधिलकी असेल व ज्यांना समाजकार्याचा अनुभव असेल किंवा कायद्याची माहिती असेल.
स्वयंसेवी संस्था किंवा संघटनांमधून एक सदस्य घेणे आवश्यक आहे त्या सदस्याची महिलांच्या प्रश्नांशी बांधिलकी असेल तसंच लैंगिक छळाच्या मुद्द्यांबाबत जाण असेल. शिवाय स्वयंसेवी संस्थेमधून घेण्यात आलेल्या सदस्याला मालक/नियोक्ताकडून ठराविक फी किंवा भत्ता देता येवू शकतो.
समितीमध्ये किमान ५० टक्के सदस्य महिला असल्या पाहिजेत; अध्यक्ष व समितीचे अन्य सदस्य जास्तीत जास्त ३ वर्षे त्या समितीवर त्यांची नेमणूक झाल्यापासून काम करतील
सदस्यावर किंवा अध्यक्ष एखाद्या गुन्हेगारी शिस्तभंगाची कारवाई सुरु असेल तर अशा सदस्याला समितीवरून काढण्यात येईल व रिक्त जागा नियमाप्रमाणे भरण्यात यावे.
कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात नेमणूक झालेल्या जिल्हाअधिका-यांना स्थानिक तक्रार निवारण समिती स्थापन करणे आवश्यक आहे. असंघटित क्षेत्रात काम करणा-या कामगारांना लैंगिक छळाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी स्थानिक तक्रार निवारण समिती उपलब्ध असते. शिवाय संघटित क्षेत्रातील मालकाच्या/नियोक्त्याच्या विरोधात तक्रार करायची असेल तर अशा तक्रारी स्थानिक तक्रार निवारण समितीकडे नोंदविता येवू शकतात. अंतर्गत तक्रार समितीची स्थापना झालेली नसेल किंवा कामकाज कायदेशीर तरतुदीप्रमाणे होत नसेल तर अशा तक्रारीदेखील जिल्हाअधिका-यांकडे नोंदवता येतात. शिवाय नेमून दिलेल्या जिल्हाअधिका-याची प्रत्येक जिल्ह्यात अंतर्गत आणि स्थानिक तक्रार निवारण समिती यांच्या कामकाजांची देखरेख करणे, त्यांचे वार्षिक अहवाल स्विकारणं आणि त्याच्या कामकाजाचे मूल्यमापन करणे ही प्रमुख जबाबदारी असते.
समितीची स्थापना करण्यासाठी पुढील बाबी आवश्यक आहेत
सामाजिक क्षेत्रात काम करणारी महिला अध्यक्ष म्हणून नेमणूक करावी.
संबंधित जिल्ह्यातील तालुका, प्रभाग, नगर परिषद या ठिकाणी कार्यरत असणा-या महिलांना सदस्य म्हणून नेमण्यात यावे.
समाज कल्याण अधिकारी किंवा जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी यांची सदस्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात यावी.
कायदेतज्ञ असणारी एक व्यक्ती नेमण्यात यावी.
निमसरकारी संघटनेची एक व्यक्ती नेमण्यात यावी.
समितीचा कार्यकाल ३ वर्षाचा असेल. ३ वर्षांनतर नवीन सदस्यांची नेमणूक करवी.
समितीतील कोणताही सदस्य तक्रारदार महिलेची, साक्षीदाराची, आरोपीची किंवा केससंदर्भातील माहिती प्रसारित किंवा सार्वजनिकरित्या कोणतीही प्रकाशित / उघड केल्यास त्या व्यक्तीस समितीतून काढण्यात यावे.
समितीमधील सदस्यास एखाद्या अपराधासाठी शिक्षा झाली किंवा शिस्तभंग कारवाईत ती व्यक्ती दोषी असेल किंवा पदाचा गैरवापर केला तर अशा सदस्यास समितीतून काढण्यात यावे.
समितीमधील सदस्यांना कामकाज चालवण्यासाठी निर्देशित केलेली फी किंवा भत्ता दिला जावा.
कायद्यांतर्गत नेमणूक झालेल्या जिल्हाअधिकाऱ्यांकडे किंवा समाज कल्याण अधिकारी किंवा महिला आणि बाल विकास अधिकारी यांच्याकडे थेट तक्रार देता येते.
अंतर्गत आणि स्थानिक तक्रार निवारण समितीच्या कामाचं स्वरुप
समितीच्या नियमित बैठका होणे गरजेचे आहे
समितीच्या कोणत्याही सदस्याकडे लैंगिक छळाची तक्रार आल्यास समितीची बैठक बोलवण्यात येईल.
समितीचे अध्यक्ष लेखी सूचनेद्वारे किंवा ईमेलद्वारे सदस्यांना बैठकीसाठी बोलावतील. या सूचनेची प्रत फाईलमध्ये ठेवण्यात येईल.मिटिंगचा अजेंडा अध्यक्ष ठरवतील आणि सर्व सदस्यांना कळवतील.
समितीकडे आलेल्या सर्व तक्रारी गोपनीय राहतील आणि त्याबद्दल समितीच्या बाहेरच्या व्यक्तींना त्यांचे तपशील देणार नाहीत.
समितीचे कामकाज दिवाणी न्यायालयाप्रमाणे चालेल.
कामकाज जलदगतीने केलं जावं हे समितीला बंधनकारक असेल.
समितीच्या सदस्यांनी तक्रारदार महिलेला अर्ज लिहिणं, समुपदेशन करणं तसंच पोलीस कारवाईमध्ये सर्वोतपरी मदत करणे अपेक्षित आहे
समितीच्या सदस्यांची नावे आणि संपर्क क्रमांक संस्थेच्या कार्यालयात सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावावीत तसंच वेबसाईटवर देखील प्रसिद्ध करावीत
लैंगिक छळाबाबत आणि तक्रार निवारणासंबंधी जाणीवजागृती, प्रशिक्षण आणि अशा घटनांना आळा बसावा यासाठी तक्रार निवारण समितीने संस्थेच्या कर्मचायांसाठी कार्यक्रम आयोजित करावे. नव्याने रुजू होणार्या कर्मचार्यांच्या भरती प्रक्रियेमध्ये अशा सत्रांचा समावेश करता येवू शकतो.
समितीच्या प्रत्येक बैठकीचे मिनिट्स ठेवण्यात येतील. तसेच प्रत्येक केसचे दस्ताऐवज राखून ठेवले जातील.
समितीच्या कामाचा वार्षिक अहवाल जिल्हा अधिकार्याकडे जमा करणे बंधनकारक आहे.
तक्रार देताना पुढील गोष्टी लक्षात असू द्या -
इतरांशी बोलाः
लैंगिक शोषण थांबविण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे त्याबद्दल इतरांशी बोला. यामुळे समस्या नक्की काय आहे हे तुम्हाला व इतरांनाही कळेल. समस्येचे अस्तित्व मान्य होईल आणि त्यावर उपाय शोधायला सुरुवात करता येईल. तक्रारदार व्यक्तीलाही आपली व्यथा व्यक्त करण्यासाठी एक विश्वासू वातावरण मिळते. माहितीचा आधार मिळाला की अशा प्रकारच्या केसेसमध्ये नक्की काय पावले उचलायची हेही कळू शकते. तुम्ही सहनशील आणि गप्प राहिलात तर त्यामुळे समोरच्याचे फावते व तुमच्या समस्येबद्दल बोला नाही तर ते तसंच चालू रहाते. कदाचित इतरांनाही तसाच अनुभव आला असेल! स्वतःला दोष देऊ नका आणि विलंब करू नका.
त्या त्या वेळी बोलाः
छळ करणाऱ्या व्यक्तीला तुमचा नकार स्पष्ट आणि स्वच्छ शब्दांमध्ये कळवा. त्याचं वर्तन अश्लील आणि अस्वीकारार्ह आहे हे त्याला तुमच्या शब्दातून, हावभावातून आणि कृतीतून दाखवून द्या. त्या त्या वेळी असा विरोध केला तर पुढे त्या व्यक्तीवर आरोप दाखल करताना या विरोधाचा फायदा होतो.
नोंद ठेवा :
जे काही घडतंय त्याची कुठेतरी नोंद करून ठेवत जा. तुम्हाला कोणी चिठ्ठ्या, पत्रे किंवा इतर कागद / चित्रे पाठवत असेल तर तीही जपून ठेवा. त्यासंदर्भातील तारीख वेळ, स्थळ आणि काय काय घडलं याचे सर्व तपशील लिहून ठेवा. कोणी साक्षीदार असतील तर त्यांची नावे लिहून ठेवा. अनेक लोकांनी पत्र लिहून व त्या पत्रात त्यांना कोणते वर्तन लैंगिक गैर वाटत आहे ते त्या व्यक्तीला पत्राद्वारे कळवून असं वर्तन त्वरित थांबवायला सांगा. पत्र औपचारिक, सभ्य भाषेत, तपशीलवार आणि मुद्देसूद असावं. अनेकदा तोंडी सांगण्यापेक्षा असे लिखित पत्र जास्त प्रभावी ठरते. या पत्राची एक प्रत तुमच्यापाशी नक्की ठेवा.
स्पष्ट नकार द्या :
तुम्हाला मनाविरुध्द किंवा एखाद्या असुरक्षित स्थळी जावे लागत असेल, कृती करावी लागत असेल प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत असतील तर अशा वेळी ठाम पणे नकार द्या. ‘नाही’ म्हणा! त्या वेळी समोरच्या व्यक्तीला आवडेल का? वगैरे विचार करत बसू नका. पहिल्यांदा स्वतःची काळजी घ्या.
गाफील राहू नका:
कोणत्या प्रकारच्या परिस्थितीपासून व लोकांपासून तुम्हाला धोका वाटतो याविषयी सतर्क रहा. गाफील राहू नका. तुम्हाला कोणी सावधान करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
अंतर्मनाची सूचना:
धोक्याबाबत आपल्या अंतर्मनाचं ऐका. असुरक्षित परिस्थितीमध्ये मुळात तिथे थांबूच नका. बिनतोड जवाब द्या. आधी तुम्ही काय वागलात, कोणत्या प्रकारचे कसे संकेत दिलेत हे महत्त्वाचे नसून जर कोणी तुमच्यावर कसलीही जबरदस्ती करत असेल तर ती कोणत्याही वेळी थांबवायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. तुमचा हा हक्क/अधिकार ओळखा आणि त्यानुसार वागा.
साक्षीदार निर्माण करा:
लैंगिक छळ होत असल्यास त्या वर्तनाचे साक्षीदार निर्माण करा. तुमच्या विश्वासातील सहका-यांना याविषयी सांगा तुम्हाला जेव्हा असा त्रास दिला जात असेल तेव्हा तुमचा विश्वासू सहकारी त्या घटनेचा दृश्य/ ऐकण्याच्या बाबतीत साक्षीदार होईल असे पहा . तुम्ही पुढे जेव्हा तक्रार कराल तेव्हा त्यासाठी याचा उपयोग होईल. तुम्हाला त्रास देणा-या व्यक्तीला लैंगिक छळाविरुध्दच्या ऑफिस धोरणाचे कागद/नियम पाठवा.
संघटनेतील कार्यकर्त्ये / प्रतिनिधीशी बोला:
तुम्ही जर कामगार/कर्मचारी संघटनेच्या सदस्य असाल तर तुमच्या संघटना प्रतिनिधीशी बोला.
वैद्यकीय तपासणी:
जर तुम्हाला शारीरिक अतिप्रसंग सहन करावा लागला असेल किंवा तुमच्यावर हल्ला झाला असेल तर म्हणजे लैंगिक हल्ला किंवा बलात्कार झाला असेल तर लगेच वैद्यकीय तपासणी (सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात) करून घ्या. त्याचा अहवाल मिळवा. हे फार महत्त्वाचे आहे. जर तुम्ही कायदेशीर केस करायची ठरवली तर हा एक पुरावा होऊ शकतो.
योग्य व्यक्तीकडे तक्रार नोंदवाः
तुम्हाला कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे तपासून बघा आणि गरज वाटल्यास पध्दतशीर लिखित स्वरूपात तक्रार नोंदवा. तुमच्या संस्थेत लैंगिक शोषणविरोधी धोरण नसेल तर तुमचे संस्थाचालक तसे धोरण लागू करतील व त्यासंदर्भात संबंधित कारवाया करतील यासाठी प्रयत्न करा.
(courtesy - violence no more)