मुझे पढे लिखे लोगोंने धोका दिया...?
मी वारणा महाविद्यालयात शिकत असताना मंगल कांबळे नावाच्या मुलीशी ओळख झाली,तीला मी बहीण मानली होती.तिच्यामुळे मी तिच्या घरी जात असे. ते तिचं घर एक ग्रंथालयच होतं. तीला सहा भाऊ ती एक बहीण. तीचे सर्व भाऊ क्लास वन अधिकारी. अख्या कोल्हापूर जिल्ह्यात ते एकमेव बौद्ध घराणं होतं असं माझं मत झालं होतं,त्या घरात मला बाबासाहेबांनी लिहिलेला *बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ वाचायला मिळाला तो ग्रंथ वाचल्यानंतर हिंदू धर्म मला डबकं वाटलं व बुद्ध धम्म मला समुद्रासारखा वाटला.त्या वेळी मी ठरवलं कि आपण बौद्ध धम्म स्वीकारायचा,त्या प्रमाणे आम्ही जवळ जवळ एक हजार मातंग समाजाच्या तरुणांनी कोल्हापूर जिल्ह्यातील मिनचे या गावी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली*.त्या दिवसापासून बऱ्याच मातंग तरुणांची बौद्ध पद्धतीने लग्न होऊ लागली.
मिनचे गावचे आमचे मित्र सहदेव घाटगे यांचे लग्न ठरले,ठरते वेळी बुद्धाचा विषय नव्हता, लग्नाच्या दिवशी व्हराड कपाळाला भंडारा लावूनच आले,इकडे बौद्ध पद्धतीची तयारी,ही तयारी पाहून व्हराडातील मातंग पुढारी बिथरले,बौद्ध पद्धतीच्या लग्नाला विरोध चालू केला,लग्नाची वेळ निघून गेली. मुलगी मांडवात येईना,बैठक बसली. त्या वेळी नवरा मुलगा सहदेव याने ठणकावून सांगितले कि, 'लग्न बौद्ध पद्धतीनेच होणार नसेल तर मुलगी परत घेऊन जा' ही टोकाची भूमिका घेतल्यानंतर मुलीच्या वडिलांनी नांगी टाकली.त्याने मुलगा मातंग असल्याची खात्री करुन लग्नाला मान्यता दिली, लग्न बौद्ध पद्धतीने झाले.
माझ्या भाचीचे लग्न बौद्ध पद्धतीने ठरले,ठरते वेळी माझा एक जवळचा पाहुणा बुद्धाचं नाव घेतल्यानंतर बैठकीतून उठून गेला.लग्न ठरले त्या लग्नाची पत्रिका घेऊन निमंत्रण देण्यासाठी त्याच्या घरी गेलो.मला घरात न घेता दारातच उभे राहून ठणकावून सांगितले कि,'मी महाराच्या लग्नाला येतं नाही.'
अशा पद्धतीने मी अनेक लोकांची लग्न जुळवून बुद्ध पद्धतीने लग्न लावत होतो, पण माझेच लग्न होईना.
मी १९८४ ला बुद्ध धम्म स्वीकारला. १९८४ ते १९९१ पर्यंत माझं लग्नच होईना. *मला मांग पण मुलगी देईना व बुद्ध पण मुलगी देईना,माझी एकच अट होती लग्न करणार तर बुद्ध पद्धतीनेच.*
मला मातंग समाजाची एक मुलगी ठरली. तीचा वडील उपशिक्षण अधिकारी होता,बैठकीत तो म्हणाला कि,हं देणंघेणं बोला. मी म्हणालो देणंघेणं काय नाही, मी जन्माने मांग असलो तरी मी बुद्ध झालोय.तेव्हा लग्न बौद्ध पद्धतीनेच होणार. असे म्हणताच काय तर चावल्यासारखाच तो उडाला.बाहेर गेला. आमच्या लोकांना म्हणाला, कि हेचं आडनाव कांबळे नाव घेतोय बुद्धाचं हा मांग तर आहे का? आमची लोकं म्हणाली, अहो खरच तो मांगाचा आहे.त्यावर मी त्यांना म्हणालो,मला मुलगी देऊ नका. तुम्हांला एवढा बाबासाहेबांच्या विचाराचा तिरस्कार असेल तर उपशिक्षण अधिकारी पदाचा राजीनामा दया.बाबासाहेब जन्माला आले नसते तर तुम्हांला त्या ऑफिसमध्ये कोणी पुसायला सुद्धा ठेवले नसते.त्या वर तो म्हणाला तुझं तत्वज्ञान तुझ्याजवळच ठेव मी तुला मुलगी देत नाही.
मी मांगाचा नाद सोडून बुद्धाच्या नादाला लागलो. एका सभेत बुद्धाची एक प्राध्यापिका भाषणाला उभी राहिली. तीचे भाषण ऐकून मी भारावून गेलो. मी तीची ओळख करुन घेतली. त्या ओळखीतून तीचे लग्न नाही हे मला कळाले. मी तीला सरळसरळ लग्नाची मागणी घातली. मी कांबळे म्हटल्यानंतर तिने लगेच होकार दिला. तिने सांगितले कि रीतसर मागणी घालण्यास घरी या. मी दुसऱ्या दिवशी तिच्या घरी गेलो, तर तीचा म्हातारा दांडकं घेऊनच दारात बसला होता.तो मला बघून म्हणाला, 'पुन्हा दारात दिसलास तर तंगडंच मोडीन'.आम्हांला फसवतो तूझ्या गावी आमचे पाहुणे आहेत, त्यांच्याकडून आम्हांला कळलं कि तू महाराचा नसून मांगाचा आहेस.मी म्हणालो,अहो मी जन्माने मांग जरी असलो तरी बुद्ध झालोय. त्यावर तो म्हणाला कि बुद्ध जरी झालास तरी मूळचा मांगच कि. मी माझी मुलगी मांगाला देत नाही.
मला माझे मित्र गचांड्या घालायचे अन म्हणायचे लग्नानंतर बुद्ध म्हण कि,मी त्यांना म्हणायचो मी माझ्यासाठी हे करत नाही यदाकदाचित पुढच्या पिढीचे मातंग हिंदू धर्माला कंटाळून मार्ग शोधू लागले तर सुकुमार कांबळे हा मांग बुद्धाच्या मार्गाने गेला होता असे म्हणतील व त्या वाटेने ते चालतील. त्या आशे पोटी मी बुद्ध पद्धतीनेच लग्न करणार, नाहीच कोणी मुलगी दिली तर बौद्ध भिक्षु होणार.
मी त्या काळात एक लोकसभा व एक विधानसभा लढलो होतो. *माझ्या प्रचाराला व्ही.पी.सिंग पंतप्रधान असताना आले होते,* त्यामुळे माझं बऱ्यापैकी नाव झालं होतं.एक दिवस धोतर,शर्ट, टोपी घातलेला एक माणूस मला शोधत आला,माझ्या कॉलेजवर मी त्यांना घेऊन कॉलेज कॅन्टीन मध्ये गेलो,चहा पान झाल्यावर मी म्हणालो बोला काय काम? त्यावेळी तो म्हणाला मी कोथळी गावचा मांग,माझी मुलगी डी. एड.होऊन चार वर्ष झाली नोकरी नाही, तेव्हा म्हटलं तुम्हांला जाऊन भेटावं.ही बघा तीची कागदं. मी ती कागदाची फाईल पहिली,मी सांगितलं कि ठीक आहे.कळवतो तुम्हांला.
तो निघाला,निघता -निघता म्हणाला मुलीला एखादं स्थळ असेल तर सुचवा.मी त्याच वेळेस माझं बोलणार होतो, पण विचार केला कि शिकलेल्या लोकांनी दांडकी दाखवल्यात हा तर अशिक्षित...
माझे एक नातलग त्यांचा मुलगा सरकारी नोकरीला. तो मला भेटला व म्हणाला,'सुकुमार तू सगळीकडे फिरतोयस मुलाला एखादी मुलगी असेल तर सुचवं,' मला कोथळीचा तो देव माणूस आठवला. मी म्हणालो आहे पोरगी! उद्याच बघायला जाऊ!ठरले.मी निरोप दिला उद्या पोरगी बगायला येतोय.त्यांना वाटलं मीच पाहायला येतोय,त्यांनी सगळ्या गावात सांगून टाकलं सुकुमार कांबळे माझ्या मुलीला बगायला येतोय.
मी त्या वेळी जनता दलात काम करत होतो.ते गाव ९०%जनता दलाचं,मी येणार म्हणून सगळे थांबलेले,मी गेलो सर्व मला भेटले, मुलगी कुठे आहे असे पुढे पुढे होऊन मीच सर्व करू लागलो,त्या वेळी त्या मुलीचे वडील मला म्हणाले कि,जरा बाहेर या, मी बाहेर गेलो. ते मला म्हणाले कि,अहो तुम्ही मुलगी बगायला येणार म्हणून सगळं गाव थांबलंय,तर तुम्ही दुसरंच स्थळ आणलंय. त्या वेळी मी त्यांना म्हणालो तुम्ही जरा बाजूला या. मी त्यांना बाजूला घेऊन गेलो व त्यांना म्हणालो तुम्ही म्हणताय ते खरं आहे पण माझी एक अडचण आहे.ते म्हणाले काय अडचण आहे.मी म्हणालो, 'मी मांग जरी असलो तरी मी बुद्ध धम्म स्वीकारला आहे.तेव्हा मी लग्न केलं तर बुद्ध पद्धतीने करणार हे तुम्हाला मान्य आहे का?. *त्यावर तो देवमाणूस म्हणाला कि, 'बुद्ध म्हणजे माणुसच नव्ह,मी म्हटलं होय,त्यावर ते म्हणाले मग कर कि कसं करायचं ते'* मी तुला मुलगी द्यायला तयार आहे,हे त्या देवमाणसाचे बोलणे एकूण मी अवाक झालो. त्या वेळी मला बाबासाहेबांचे एक वाक्य आठवले कि,"मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया "
आलेले पाहुणे कसे तरी घालवले. माझं त्या देवमाणसाच्या मुलीशी लग्न ठरलं अन शेवटी बुद्ध पद्धतीनेच लग्न लावलं.ती मुलगी माझी पत्नी मंदा हिने माझं जीवनचं बदलून टाकलं.
लेखक - प्रा. सुकुमार कांबळे...!
(डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, संस्थापक अध्यक्ष)