पुन्हा पुन्हा तोच गुन्हा...
पुन्हा आमचे चारित्र्य तपासले जाणार,
पुन्हा त्यावर शिंतोडे उडवले जाणार,
पुन्हा आम्ही दंगेखोर, नक्सली ठरणार,
पुन्हा आमचे संबंध अनैतिक ठरणार,
पुन्हा तुमचा खुन ? खुन, आमचा आत्महत्या ठरणार,
पुन्हा आमचे चारित्र्य, आमचे नैराश्य समोर येणार,
पुन्हा शिकणे, संघटीत होणे, संघर्ष करणे,
जगण्यास मज्जाव करणारा, गुन्हा होणार,
पुन्हा कुठे खर्डा, तर कुठे जवखेडा होणार,
दोन दिस दुखवटा, चार दिस निषेध होणार,
तुम्ही याल जामीनावर छातीठोकपणे,
आमचा माञ कायमचा भोतमांगे होणार
पुन्हा तुमचा जातीवाद ? नुसता वाद ठरणार,
पुन्हा आमचा निषेधही, जातीयवाद ठरणार,
पुन्हा न्यायाचा बाजार भरणार,
ज्याची बोली मोठी, त्याचाच नफा होणार,
एक निरपराधी जगविण्याच्या अट्टाहासात,
पुन्हा शंभ्भर अपराधी सोडले जाणार,
शंभरातले हे असे बेगडी निरपराधी सुटत राहणार,
पुन्हा पुन्हा नव्याने, नवनवे जीव घेतचं राहणार...
- अॅड. राज जाधव, पुणे....!